रक्ताचे नाते ( भाग एक)

नातेवाईक होण्यासाठी रक्ताच्या नात्यांची गरज असते असं नाही. कित्येक नाती तर शब्दांच्या पलीकडली असतात.
रक्ताचे  नात ( भाग एक )

विषय : नातीगोती

आईला कॅन्सर निघाला. आमच्या पायाखालची जमीन हादरली. सुरुवातीला आम्ही ठरवलं होतं की तिला काहीच सांगायचं नाही. तिचे उर्वरीत आयुष्य तिला सुखात जगू द्यायचं. पण या आजारात कसला आहे सुख. प्रत्येक क्षणाक्षणाला मृत्यूची चाहूल देणार हा भयंकर आजार.

त्यात वडिलांचे हातावरचे उत्पन्न. या महागाईच्या काळात कसंबस हातातोंडाशी गाठ पडू देणारं त्यांच उत्पन्न. त्यात माझं शिक्षण. त्याला लागणारा खर्च. या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आ वासून उभ्या होत्या.

सुरुवातीला आईला विशेष असं काहीच झालं नव्हतं.  फक्त छातीमध्ये जळजळ व्हायची. आसपासच्या डॉक्टरला तब्येत दाखवली. तेव्हा त्याने ऍसिडिटीच्या गोळ्या दिल्या. परंतु जसजसे दिवस पुढे सरकू लागले आईचे जेवण कमी होऊ लागल. ती  रात्र रात्र जागायला लागली. जेवण कमी झाल्यामुळे तिचं वजन कमी होवू लागले. सगळ्याच गोष्टीवरती परिणाम होऊ लागला.

आम्हाला हे थोडे गंभीर प्रकरण वाटले. आम्ही थोडा खर्च करून दुसऱ्या एका स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवल. त्यांनी एक्स-रे काढायला सांगितला. एक्स-रे मध्ये त्यांना काहीतरी संशय आला. आणि त्यांनी आम्हाला बायोप्सी करायला सांगितली. बायोप्सीचा रिपोर्ट आला.  त्यांनी मला बाजूला नेऊन आईला झालेल्या आजाराचे गंभीर स्वरूप सांगितले. आईला सांगायचं का नाही सांगायचं हे त्याने सर्वस्वी आमच्यावर सोपवलं होतं. मला काहीच सुचत नव्हत.

मी बाबांना ही गोष्ट सांगितली. ते एक क्षणभर सुन्न बसून राहिले. त्यांना आजपर्यंत तिने संसारासाठी  घेतलेले कष्ट आठवले. कोणते स्वप्न पाहून तिने संसाराला सुरुवात केली होती कुणास ठावूक.   कोणतीही आशा नसताना तिने आपल्या सोबत सात पाऊल टाकून सात जन्माची सोबत देण्याचे वचन घेतले होते. आणि आज ती एका दुर्धर आजाराला सामोरे जात संसार अर्धवट सोडून जाणार होती.

आम्ही घरी आलो. बरं असताना देखील आई स्वयंपाक घरात माझ्यासाठी आणि वडिलांसाठी काहीतरी खायला बनवत होती. तिच्या मध्ये काहीच ताकद नव्हती. पण आमच्यासाठी ती बनवत होती. टाकद नसताना तिची ती केविलवाणी धडपड मला फारच कष्टदायक वाटत होती.

वाटल आता जाऊन तिला मिठी मारावी आणि मनसोक्त रडून घ्याव. पण माझ्या वाढत्या वयाने मला ती गोष्ट करण्यासाठी रोखल. अगदी आज विचार केला तर वाटतं तेंव्हा मी का नाही तसं केलं. कोणी मला रोखलं होतं. आज माझ्या जवळ अश्रू शिवाय दुसरं काहीच नाही.

ती गोष्ट कोणाला न सांगता मनात ठेवणं माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती. आमच्या बाजूला एक मुस्लिम कुटुंब राहत होत. नावाला ते मुस्लिम होते. त्यांचे मूळ गाव पंढरपूर होत. पंढरपूरच्या मातीचा त्यांना गुण लागलेला होता. त्या बाईंना मी भाभी म्हणत असे. कधी त्या कधी न कळत विठ्ठलाची गाणी गुणगुणत असत. त्यांचं ते गुणगुणण मला दैवी वाटायचं. त्या दिवशी देखील त्या असंच काहीतरी भजन गुणगुणत होत्या.

मी त्यांच्या घरात गेलो. त्यांचा मुलगा इरफान अभ्यास करत होता. त्या स्वयंपाक करत होत्या. मी त्यांना म्हणालो,

" भाभी, मला तुम्हाला काही सांगायचं आहे"बोलता बोलतांना मला रडू येत होतं.

" सांग ना बेटा " त्या मायेने म्हणाल्या.

"भाभी कोणाला सांगू नका. पण माझ्या आईला कॅन्सर झालेला आहे." हे ऐकल्याबरोबर त्यांना धक्का बसला. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या,

" बेटा चिंता करू नकोस. मी आहे ना.आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह त्यांची काळजी घेईल."

त्यांना सांगितल्यावर माझं मन हलकं झालं. मी घरी आलो. आईला उठवलं जात नव्हत. ती स्वयंपाक करू शकत नव्हती.  तिला टाटा हॉस्पिटलला घेऊन जायचं  होतं.

ती जेव्हा हॉस्पिटल मधून घरी परत आली, तेव्हा प्रचंड थकली होती. काहीच करण्यास तिच्यामध्ये त्राण नव्हत. दिवसभर मी आणि बाबा दोघे उपाशी होतो.  आम्ही घरी आल्याबरोबर भाभीने गरमा गरम जेवण आम्हाला दिलं. आम्ही जेवण केलं एक प्रकारे ती आमची अन्नपूर्णा झाली होती.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all