रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 27 )

एक भयावह मालिका

धनपाल आणि चिंधीला त्या अवस्थेत पाहून ईश्वरी जागीच थिजून गेली. अशा गोष्टी डोळ्यासमोर होण्या पेक्षा मरण कितीतरी पटीने परवडले असं तिला वाटलं. चिंधीला ती किती चांगली समजत आली होती. अगदी सख्ख्या बहिणी सारखं तिने तिला वागवलेलं होतं. पण शेवटी तिने केसाने गळा कापला होता. ओसरी मधे सांडलेल्या दारूचा वास पसरलेला होता. सर्वत्र फुटलेल्या काचा पडलेल्या होत्या. अन्नाच्या उष्ट्या ताटल्या पडलेल्या होत्या आणि त्या घाणीत ते तिघ कसलीच शुध्द नसल्या सारखे पडलेले होते.

गावचा सरपंच म्हणून आतापर्यंत ईश्वरीने धनपालच्या सगळ्या व्यसनांकडे दुर्लक्ष केलं होतं. पण त्याच्या गोष्टी या थराला जातील असं तिला अजीबात वाटलं नव्हतं. या आधी कोणी जर तिला असं सांगितलं असतं तर तिने त्यावर कधी विश्वासही ठेवला नसता. पण आता जे काही घडलं होतं ते तिच्या डोळ्यासमोर होतं. आणि आता ते दोघंही नशेत एव्हढे चूर होते की त्यांना कसलंच भान राहिलेलं नव्हतं.

आत्ताच्या आत्ता घरातून निघून जावं आणि गावातल्या त्या विहिरीत जावून जीव द्यावा असं क्षण भरासाठी तिला वाटलं. पण नंतर लगेच डोळ्यासमोर सगळी चिल्ली पिल्ली उभी राहिली. तिच्या काळजात वेदनांचा एव्हढा काहूर उसळला की तिच्या तोंडातून जोरात हुंदका बाहेर फुटला. विचित्र आवाज ऐकून सरु बाहेर आली. आपल्या नाजूक आणि सुंदर हळव्या मनाच्या मुलीला पाहून तिला रडणंच आवरलं गेलं नाही. तिला पोटाशी धरून ती ओक्साबोक्षी रडायला लागली. अशा अवस्थेत आईला पाहून सरू सुद्धा रडायला लागली. आईला रडतांना तिने कधी पाहिलेच नव्हते. काय करावं हेच तिला समजेना. ती स्वतः घाबरून गेली होती. कारणं ओसरीवर काय काय वस्तू सगळी कडे पडलेल्या होत्या आणि त्यात भरीत भर म्हणजे कशाचीच शुद्ध नसलेले ते तिघ अस्ताव्यस्त पडलेले होते. ते दृश्यच एव्हढ घाणेरडं दिसत होतं की कोणालाही भीती वाटली असती. यात तिचे बाबा कुठेच दिसत नव्हते. आकाशामध्ये पूर्ण चंद्र चमकत होता. झाडांच्या सावल्या अंगणात पसरलेल्या होत्या. तिसऱ्या गल्लीत असलेला मनसुखलालच्या अंगणातला पिंपळ एवढा सळसळ करत होता की त्याची सळसळ इतक्या लांब वर ऐकू येत होती.

ईश्वरी आणि सरू दोघी मायलेकी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडत होत्या.

" आई, बाबा कुठं गेले आहेत. तू का रडते आहे ?" सरुने असं विचारताच ईश्वरीला आपलं रडणं आवरण मुश्किल झालं. तिला काय उत्तर द्यावे हेच तिला कळेना.

रडण्याने कोणतेच प्रश्न सुटणार नव्हते. या प्रश्नाचं उत्तर नीट विचार करून शोधावा लागणार होत. संसाराची किंमत देऊन ती चिंधीला स्वीकारणार नव्हती. पण आता रात्री काहीच बोलणं शक्य नव्हतं त्यासाठी उद्याची वाट बघणं हाच मार्ग होता.

वारंवार तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत होता की आपण आपल्या नवऱ्याला सुख देण्यात कुठे कमी पडलो, की त्याला बाहेर ते सुख शोधण्याची गरज भासावी. असं तर नव्हतं ना की अकरा मुलं झाल्यानंतर त्याचा आपल्यातला रसच नाहीसा झाला.

पराभूत झाल्यासारखी आपल्या मुलीला घेऊन ती  घरात गेली. तिला कुशीत घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. सरूने तिचे कोवळे हात तिच्या गळ्यात टाकले होते. एकेकाळी हेच कोवळ्या आहात गळ्यात पडले कि तिचा दिवसभराचा सगळा थकवा नाहीसा होई. पण आज मात्र त्या हातांची मिठी पडून देखील झोप कोस कोस मैल दूर गेलेली होती. अर्धी रात्र होऊन गेली होती. सगळीकडे भीषण शांतता पसरलेली होती आणि ती मात्र टक्क जागी होती. असं तर नव्हतं ना की ही शांतता एखाद्या वादळापूर्वीची शांतता तर नव्हती ना.

आजूबाजूच्या पसरलेल्या काळोखात तिला तिचा भीषण भविष्यकाळ दिसायला लागला. ही गोष्ट इथेच थांबवायला हवी. नाहीतर आपला नवरा कायमचा तिच्या आहारी जाईल आणि आपल्याला या अकरा मुली सांभाळत आयुष्य काढावे लागेल.

या बाबतीत आपल्याला काय करता येईल याचा ती जसा जसा विचार करायला लागली तस तस आपल्याला बाहेरून कोणी मदत करेल याबद्दलची तिची अपेक्षा शून्य व्हायला लागली. जो काही निर्णय घ्यायचा आता आहे, तो थोडासा कणखर होऊन आपल्यालाच घ्यावा लागणार आहे. परिणाम काहीही हो, परिस्थितीला सामोरं आपल्याला जावं लागणार आहे. आपल्या नवऱ्याला आपण वाघ म्हटलं तरी खातो वाघोबा म्हटलं तरी खातो अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्याला वाघ म्हणूनच जाब विचारणं गरजेचं आहे. आज आपल्या नजरेस पडलं म्हणून हे आपल्याला कळलं. कुणास ठाऊक कधीपासून या दोघांचे संबंध सुरू आहेत. आधी वाटलं होतं त्याने आपल्याला मदत करण्यासाठी चिंधीला घरी आणले आहे. आता कळलं की हे सर्व त्याने स्वतःच्या सुखासाठी केलं होतं. स्वतःची वासना भागवण्यासाठी त्याने चिंधीला घरी आणलं होतं.

विचारांच्या वादळांनी त्याच्या मनात नुसतं थैमान घातलेलं होतं. काय करावे, कोणाला काय सांगावं. यातून कसा मार्ग काढावा. तिला काही म्हणजे काहीच कळत नव्हतं. पुन्हा झोपी गेलेल्या सरुला तिने बाजूला केले आणि सकाळ व्हायची वाट बघत ती ओसरीतल्या खांबाला टेकुन बसली.

घड्याळाच्या काट्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. अंगणामध्ये  रातराणी फुलली होती. तिचा वेगळाच धुंद सुगंध आसमंतात पसरलेला होता. परंतु असं म्हणतात की  सुगंधी झाडाला सापाने वेढा घातलेला असतो. त्याप्रमाणे तिच्या मनात दुर्दैवाच्या सापाने वेढा घातलेला होता. अखेर सकाळ झाली आणि आपल्या खोलीतून धनपाल राज बाहेर आला याच्या पाठोपाठ चिंधी उठून बाहेर आली. धनपालने बघितलं ओसरीतल्या खांबाला टेकून ईश्वरी बसलेली होती. तिची नजर काहीचं बघत नसल्या सारखी रिकामी होती.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all