रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 22 )

एक भयावह मालिका



गावातल्या विहीरीच्या पाण्यामुळे ओढ्यात पालं बांधलेल्या लोकांना पाण्याच्या बाबतीत खूप आराम पडला होता. वस्तीवरचे आणि गावातले लोकं हळूहळू एकमेकांना समजावून घेत पाणी घ्यायला लागले होते. विहिरीला चारही बाजूला एकूण चार रहाट होते. त्या पैकी एक रहाट गावातल्या लोकांनी ओढ्यातल्या लोकांना दिला होता. गावातले लोकं त्या रहाटाला रिकामा असला तरी हात लावत नसत. या नवीन लोकांना सामावून घ्यायला कोणी तयार नव्हतं. पण सरपंचांच्या निर्णयाविरोधात जायची कोणाची हिंमत नव्हती.

एकदोन दिवस धनपाल स्वतः विहीरी जवळ असलेल्या एका झाडाखाली खाटेवर बसून त्या लोकांना कोणी त्रास तर देतं नाही ना हे पाहायला जातीने हजर होता. त्या मागे अजून एक सुप्त ईच्छा होती ती ही की चिंधी पाणी भरायला आली तर तिला मनसोक्त न्याहाळता यावे. पहिल्या दिवशी त्याची ही ईच्छा काही पूर्ण झाली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र दुपारच्या वेळी त्याचं नशीब एकदम उजाडलं. दूरवरून त्याला चिंधी चालतं येतांना दिसली. तिच्या दोन्ही हातात पोचा पडलेल्या कळश्या होत्या. त्याने तिला दुरूनच ओळखलं. तो जास्तच सभ्य आणि सावध होवून बसला. काही माणसं आणि काही मुलं विहिरीवर आंघोळ करत बसली होती. तिच्यावर आपला प्रभाव पडावा म्हणून तो त्या मुलांवर आणि माणसांवर ओरडत मला म्हणाला,

" आटपारे लवकर .लोकांना पाणी भरू द्या आधी.  ओलं करून ठेवू नका सगळीकडे. पाय घसरुन पडतील पाणी भरणारे, समजलं की नाही"

" झालंच मालक , हो काका झालंच लगेच "असं त्या लोकांनी असं म्हटलेलं तिने येता येता ऐकलं. तिला लोक त्यांच ऐकतात हे पाहिल्यावर खूप मोठेपणा वाटला. कुठतरी ती सुखावली.

तिच्या कडे लक्ष नाही असं दाखवत धनपाल आंघोळ करणाऱ्या एका मुलावर ओरडला,

" का रे तुझा बाप कामावर जातो की नाही ? त्याला मला भेटायला सांग. काम मिळतं नसेल तर माझ्याकडे काम आहे म्हणून सांग. समजलं ना ?"

" हो काका, नक्की सांगतो. "तो मुलगा अंग पुसत म्हणाला.

" आणि शाळेत नाही गेला काय रे आज तू ?" मुद्दामून धनपाल तिच्यावर इंप्रेशन मारण्या साठी बोलला. तिरप्या नजरेने तो हळूच तिच्या कडे बघत होता. तिने त्यांच्या साठी ठेवलेल्या रहाटावरून दोर आत सोडला. त्या वेळी तिच्या शरीराच्या वलयदार हालचालींनी तो ईतका मंत्रमुग्ध होऊन बघत राहीला. क्षणभर त्याला आपण कोठे आहोत हेच समजलं नाही. झरझर तिने आपल्या कळशा भरल्या, एक डोक्यावर घेतली आणि दुसरी काखेत धरली. डोक्यावर ठेवलेल्या घागरीतल्या डुचमळणाऱ्या पाण्याने ती बरीचशी ओली झाली होती.  ओलेपणामुळे तिचं सौंदर्य अधिकच मोहक दिसत होतं. त्यात जातांना तिने त्याच्या कडे इतकी अलगद नजर टाकली की ती फक्त त्यालाच जाणवली. जणू त्या नजरेने त्याच्या सर्वांगाला स्पर्श केला होता.

क्षणार्धात ती पाणी भरुन पायवाटेने निघून गेली. तरी तिच्या घागरी मधून पडलेल्या पाण्याच्या थेंबांमूळे जमीनीवर उमटलेल्या ओलसर नक्षीकडे धनपाल वेड्यासारखा बघतच राहीला. त्याच्या डोळ्यासमोरून तिचं ते ओलं रूप काही केल्या जाईना. ती निघून गेल्यावर त्याला तिथं बसण्यात एक क्षणभरही रस राहीला नाही. लगेच तो तिथून निघून घराकडे निघाला.

त्या दिवशी कारण नसतांना त्याने ईश्वरीवर आणि मुलांवर चिडचिड केली. आपल्याला हे काय होते आहे हे त्याला कळेना. त्याचं मन त्याला वारंवार सांगू लागलं की तिला मिळवण्या साठी काहीतरी करायलाच हवं. तेही शक्य तितक्या लवकर.

त्याने मनाशी काही तरी निश्चय केला जेवणं झाल्यावर राघवला सोबत घेऊन तो गावातल्या पोलिस चौकीत आला. तिघांपैकी फक्त दोन जण ड्यूटीवर होते. स्वतः सरपंच आले म्हटल्यावर दोघेही सावध झाले. खरं म्हणजे गावात जी शांतता नांदते आहे ती, कायद्याच्या किंवा पोलिसांच्या कार्यक्षमते मूळे नव्हे तर धनपालराजच्या दराऱ्या मूळे ही गोष्ट ते पोलिस चांगलीच ओळखून होते. त्या मुळे चौकीतही त्याला खूप मान होता. त्याच्या साठी खास थंड कोल्ड्रिंक्स मागवून आवाजात शक्य तितक्या प्रमाणात लाचारी आणून त्यांनी म्हटलं,

" अरे साहेब, तुम्ही स्वतः कशाला आलात. आज्ञा केली असती तर आम्हीच आलो असतो की"

" मला वाटतं आता तुम्हा सगळ्यांना आमचा कंटाळा आलेला आहे. आता तुम्हाला बदली हवी आहे असं वाटतं" ,धनपाल आवाजात थोडी जरब आणून म्हणाला. ते दोघं एकदम दचकलेच.

" नाही नाही, साहेब. कोणी सांगितलं. आम्ही तर इथं खूष आहोत "

" तुम्हाला माहीत आहे का, परवा मी शहरात गेलो होतो तर तिथल्या पोलिस स्टेशन मधे चर्चा सुरू होती की आज कित्येक वर्ष निमझरी मधे गून्हेच घडत नाहीत तर तिथं ईतके पोलिस हवेतच कशाला. आणि एकाच जागी ठरावीक लोकच कायमचे का ठेवायचे. म्हणजे काही लोकांनी आराम करायचा आणि काही लोकांनी मेहनत करायची. "

" सर, ही शांतता आणि सुव्यवस्था तुमच्या मुळेच आहे. आमची बदली करु नका हो "

" अरे बाबांनो, सरकारी नोकरीत सगळचं रेकॉर्ड कोरं असून कसं चालेल. काहीतरी नोंद करा की." धनपाल जणू काही त्यांना मार्ग सुचवतो आहे अशा आवाजात म्हणाला.

" पणं सर, खरोखरच सगळं शांततेत व्यवस्थीत सूरू  आहे. गुन्हा नाही. तक्रार नाही. तर आम्ही करू तरी काय ?"

गुन्हा नाही कसा. मी सांगतो तुम्हाला असं म्हणून धनपाल राज त्या पोलिसांनाच ऐकू जाईल ईतक्या हळू आवाजात बोलायला लागला.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all