रक्त रंजीत 365 रात्री ( भाग 18 )

एक भयावह मालिका

" विमे, मला बाळ हवं आहे. मुलगा असो मुलगी असो. काहीही चालेल बघ." असं विक्रमन लाडात येऊन म्हटल्यावर विमल त्याच्या कुशीत शिरली.

सगळीकडे काळोख पसरलेला होता. पण ती दोघं मात्र गप्पा मारत जागीच होती. सहज बोलता बोलता त्यानं नागनाथने लवकरच तिची कूस उजवणार असल्याचं  भविष्य तिला सांगितलं. ती लाडात त्याला म्हणाली,

" धनी, एव्हढी घाई कशापायी करता आहात. या बाबतीत तुम्हाला मालकांशी तर बरोबरी करायची नाही ना "

" छे, छे काहीतरीच काय बोलतेस. अग् मालकांना त्यांच्या संपत्तीला वारस हवा आहे. म्हणून त्यांची मुलासाठी धडपड सुरू आहे. " आणि बोलता बोलता अचानक त्याला नागनाथ जे बोलला होता ते आठवलं. नागनाथ म्हणाला होता, तूझ्या मालकाला नक्की मुलगा होईल पणं या बायकोपासून नाही. त्या वाक्याचा अर्थ त्याला आता तीव्रतेने जाणवला. नागनाथ जेंव्हा बोलला होता तेंव्हा त्याला या वाक्यात दडलेला अर्थ ईतका कळला नव्हता. त्याला हेही समजलं की नागनाथ बद्दलचा निरोप आपण अजून आपल्या मालकाला दिलेला नाही. अर्थात आल्या आल्या तो धनपालराजच्या घरात शिरला होता पण त्या वेळी धनपाल घरी नसल्याने त्याने तो निरोप दुसऱ्या दिवशी सांगायचा विचार केला होता आणि घरी परत आला होता.

सांगावं का नाही सांगावं अशा द्विधा मनस्थितीत तो अचानक गप्प राहिला. त्याला एकाएकी गप्प झालेलं पाहून विमलने विचारलं,

" अचानक गप्प का झालात हो. मला सांगायची नाही अशी तर कोणती गोष्ट नाही ना. " तिने हलकस हसून विचारलं. तसा तो एकदम हळू आवाजात बोलायला लागला,

" ही गोष्ट एकदम खाजगी आहे बरं का विमे, या कानाची खबर त्या कानाला व्हायला नको." त्याचा एकाएकी गंभीर झालेला आवाज ऐकून ती त्याच्या कानात कुजबुजली,

" माझ्यावर विश्वास नसेल तर नका सांगू धनी. "

" अग तुझ्यावर नाहीतर कोणावर ठेवणार मी विश्वास. आज मी ज्या नागनाथ कडे गेलो होतो ना, तो मला म्हणाला तूझ्या मालकाला पूत्र संतती होणार आहे पणं या वहिनी साहेबा कडून नाही "

" छी छी , किती घाण बोलता हो तुम्ही. घरामधे लक्ष्मी सारख्या वहिनी असतांना मालक बाहेर कशाला जातील. तुमचा तो नागनाथ खोटारडा असला पाहिजे." ती रागात म्हणाली.

" मला देखील खोटं वाटलं असतं ग. पण ज्याने मला त्याच्या घराचा पत्ता सांगितला होता, त्याला नागनाथने सांगितल्या प्रमाणे मुलगा झाला आहे " मग त्याने तिला स्वतःच्या डोळ्यांनी स्मशनभूमीतील घटना सांगीतली.

या वर ती खूप विचारात पडली. तिच्या मते मुलगा काय आणि मुलगी काय दोघेही सारखेच असतात. उलट मुलीचं आईवडिलांना मुलांपेक्षा जास्त लळा लावतात. थोडावेळ ती स्वतःच्याच विचारात गूंग होती. बराच वेळ विचार गप्प गप्प राहून विचार करत राहिली. नंतर ती हळूच विक्रमला म्हणाली,

" मी काय म्हणते ऐकता का. पण हसायचं नाही की रंगवायचं नाही"

विक्रम तिला हळुवारपणे थोपटत म्हणाला,

" अजीबात चिंता करू नकोस. काय तूझ्या मनात आहे ते सांगून टाक"

" मला वाटतं तुम्ही ईथल कामं सोडावं आणि शहरात नोकरी करावी. का कुणास ठावूक मला ईथ खूप गुदमरल्या सारखं वाटतं. वहिनी साहेब आणि त्या सगळ्या लहान मुली सोडल्या तर असं वाटतं हे घर मला अख्खच्या अख्खं गिळून टाकेल. खरचं सांगते मला कधी कधी खूप भयंकर स्वप्न पडतात. रात्र रात्र झोप येत नाही. "

" वेडी आहेस तू. असं काही नसतं" तो तिला समजावत म्हणाला.

" मग मला सांगा, नेहमी तुम्ही मालकासाठी एव्हढा जीव धोक्यात का घालता. मी पाहिलं आहे की त्यांचा एक शब्द देखील तूम्ही खाली पडू देत नाही. मला नाही आवडत हे सगळ "

तिचं बोलणं ऐकल्यावर विक्रम अंतर्मुख झाला. न कळतं त्याच्या डोळ्या समोरं काही वर्षांपूर्वी घडलेली ती घटना जशीच्या तशी तरळून गेली.

विक्रमच्या वडिलांनी धनपाल राज कडून कर्ज घेतलं होतं. ते त्यांना काही केल्या फेडता येणं शक्य होतं नव्हतं. ते परत करण्या साठी त्यांच्या जवळ जमीनही नव्हती, की काहीचं नव्हतं. प्रचंड बाचाबाची, बोलाचाली झाली. त्या भानगडी मधे विक्रमची बहीण धनपालराज वर धावून गेली. आणि तिने त्याच्या कानाखाली सगळयांच्या सामोरं सणसणीत कानाखाली वाजवली की क्षणभर धनपालच्या डोळ्यासमोर अंधारीच आली. तो खाली पडला. धनपाल खाली पडणं ही काही छोटी गोष्ट नव्हती. आणि ते ही ज्याने कर्ज घेतलं होतं त्याच्या दारात. धनपालने पोलीस कंप्लेंट केली आणि विक्रमच्या बहिणीची रवानगी जेल मधे होणार होती. त्याच्या आई वडिलांनी हात जोडून माफी मागीतली आणि तिला मोकळं करण्याची प्रार्थना केली. शेवटीं सगळ्यांच्या संगनमताने असं ठरलं की त्यांचं कर्ज फिटे पर्यंत विक्रमने धनपाल कडे विना मोबदला काम करावे.

नवीन नवीन विक्रमला धनपालकडे काम करायला अवघडल्या सारखं वाटतं होतं. नंतर तो घरच्या सारखा रुळला. शेवटी कर्ज फिटलं तरी त्यांच्या कडेचं काम करत राहिला.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all