रक्त रंजीत 365 रात्री ( भाग चवदावा )

एक भयावह मालिका
रक्तरंजीत 365 रात्री ( भाग चवदावा )

नागनाथच्या शोधात विक्रम गावाच्या बऱ्याच बाहेर आला. गावं जरी छोटं होतं तरी या भागात तो कधी आलेलाच नव्हता. गावातील वस्ती विरळ होतं होतं या भागात तर फारच कमी झालेली होती. ही लोकं देखील गावातली नव्हती. कुठूनतरी बाहेरून आलेली दिसत होती. कधी आली होती, केंव्हा आली होती आणि का आली होती, काहीचं माहिती नव्हतं. पण त्यांनी त्या ठिकाणी छान बस्तान बसवलेल दिसत होतं. त्यांचा आणि गावाचा कधी संबंध येतं होता की नाही ते देखील माहीत नव्हतं. ही लोकं आपल्या गरजा कशा भागवत होते हे पण माहीत नव्हतं. खरं म्हणजे या लोकांबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती.

गावाबाहेर थोडीशी दाट जंगली झाड होती. त्या झाडांच्या आसपास आठ दहा झोपड्या बांधलेल्या होत्या. या झोपड्या जरी कुडाच्या बनवलेल्या होत्या.तरी ऐसपैस जागा वापरून बनवलेल्या होत्या. प्रत्येक झोपडीला छान बांबूचे कंपाऊंड केलेले होते. आत मधलं अंगण टापटीप ठेवलेलं होतं. अनेक अनाकलनीय वस्तू तिथं पडलेल्या होत्या. बाहेर पाण्यासाठी रांजण भरून ठेवलेले होते. कपडे वाळवण्या साठी दोऱ्या बांधलेल्या होत्या. कुठून होमाच्या धुराचा येतो तसा वास येत होता. कोणीही माणसं बाहेर दिसतं नव्हती. कदाचीत घरात असावीत किंवा गावात गेली असावीत.

त्या माणसाने जो पत्ता सांगितला होता. तिथपर्यंत विक्रम बरोबर पोहोचला होता. आता त्याला खात्री होती की या ठिकाणी आपल्याला नागनाथ नक्की सापडेलं. विक्रम पहिल्यांदाच दिसलेल्या झोपडीत डोकावला. तो झोपडी जवळ जाताच एक जंगली कुत्रं एकदम आवेशाने त्याच्यावर धावून आले. कुत्र्याच्या येण्याची त्याला अजीबात कल्पना नव्हती. त्याच्या हातात काठी होती. पण काठी दाखवल्यावर तर कुत्रं जास्तच त्वेषाने त्याच्या अंगावर धावून येत होते.

" अरे, कोणी तरी या कुत्र्याला आवरा. कोणी आहे का आत ? " तो जोरात ओरडला. त्या बरोबर आतून एक केसं मोकळे सोडलेला , दाढी मिशा वाढवलेला, कमरेला भगवे वस्त्र गुंडाळलेला साधू सारखा दिसणारा,बाहेर आला. त्याचे डोळे लालभडक होते. आतून तंबाखू जाळाल्याचा वास येत होता. कुणास ठाऊक. कदाचीत तो गांजा देखील असावा.त्याने कुत्र्याला हातानेच शांत केलं.

कुत्रा गुरगुरत शांत झल्यावर विक्रम थोडा निर्धास्त झाला.

" या या, आत या. कोण हवय तुम्हाला  ?" त्या माणसाने विचारले.

" मला नागनाथ पतंजली कुठं राहतो ते हवय " विक्रम गुरगुरत म्हणाला.

" आता गुरुदेव तप करत असतील. तुम्हाला थोडावेळ थांबावं लागेल. तूम्ही असं करा थोडावेळ इथचं थांबा. मी ते घरी आहेत की नाही बघून येतो. " विक्रम तिथल्याच एका मोडक्या स्टुलावर बसला. तो साधू सारखा माणूस पायात खडावा घालून खटाखटा आवाज करत दिसेनासा झाला. विक्रम त्या खोलीच्या बाहेर एकटाच बसलेला होता. मनात विचार करत होता. खरचं कोण असतील बरं ही मंडळी. मुख्य म्हणजे कोठून आली असतील. कधीचे हे लोकं ईथं वस्ती करून राहताहेत. हे किती लोकं आहेत. त्यांचा चारितार्थ कसा चालतो सरपंच असून धनपालला याबद्दल काहीच कशी माहिती नाही. विक्रम विचार करत होता.

बराच वेळ तो बसून होता. काय करावे समजत नव्हते. एवढ्यात तो आधीचा साधू परत आला आणि म्हणाला की," गुरुदेवांनी तुम्हाला बोलावलं आहे या"

या सर्व लोकांचा नागनाथ मुखिया आहे तर. विक्रम ने विचार केला आणि तो त्या माणसाच्या मागे जाऊ लागला. दोन-चार झोपड्या ओलांडल्यानंतर, एका झोपडीसमोर तो माणूस जाऊन उभा राहिला. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली ती झोपडी बांधलेली होती.
आत गेल्यावर त्याने झोपडीचं निरीक्षण करायला सुरूवात केली. अंगणातचं जमीनीत अर्धा पुरलेला एक रांजण होता. त्यात पाणी भरलेलं होतं. हे पाणी नागनाथ कोठून आणत होता माहीत नाही. कदाचीत जवळपास कुठंतरी पाण्याचा सोर्स वगैरे असू शकत होता, जो विक्रमला माहीत नसावा.

एका व्याघ्र चरणावर चर्मावर नागनाथ बसलेला होता. त्या दिवशी रात्री स्मशानात पाहिलेला नागनाथ आणि आता समोर असलेला नागनाथ यात विक्रमला फारसा फरक जाणवला नाही. तसेच लाल भडक डोळे मोकळ्या सोडलेल्या जटा, कपाळावर, दंडावर , छातीवर लावलेलं भस्म आणि तीच शिक्षणा नजर तीक्ष्ण नजर.

झोपडीत अनेक गाठोडी बांधून ठेवलेली होती. भिंतीवर देखील काय काय टांगलेलं होतं. अनेक चित्रं विचित्र वस्तू तिथं पसरलेल्या होत्या. त्या सगळ्या पसाऱ्यात नागनाथ एखाद्या राजा सारखा बसला होता.

" तू इथं कसा आलास ?"त्याने आपल्या धारदार आवाजात विचारलं. क्षणभर विक्रम गडबडला. नंतर स्वतःला सावरून तो म्हणाला,

"  तू खोटारडा आहेस मालकांना तू सांगितलं होतं की त्यांना मुलगा होईल आणि ते खोटे ठरलं आहे." विक्रम म्हणाला.

" मूर्ख माणसा तुझी असं बोलायची हिम्मत कशी झाली ?", नागनाथ  चवताळून म्हणाला." आणि तुला माझा पत्ता मिळालाचं कसा?"

" कसा म्हणजे ? तुम्हाला गावात सगळे ओळखतात. सगळ्यांना तुमचा पत्ता माहीत आहे." विक्रम आत शिरत म्हणाला.

" बसा यावर. बोला, काय म्हणता " बसायला एक फाटकी चादर टाकून तो म्हणाला.

" मी तुम्हाला मालकाचा निरोप सांगायला आलोय. कसंही करुन तुम्ही उद्या मालकांना भेटायला या. माझं काम तुम्हाला निरोप द्यायचं होतं. ते मी केलं. आता येण वा न येणं, सगळं तुमच्या हाती आहे. काय करायचं ते तुम्ही ठरवा आणि न आल्यास जे काय होईल त्या परिणामाला सामोरे जायची तयारी ठेवा." विक्रमने स्पष्ट शब्दात धनपालराजचा निरोप नागनाथला सांगितला.

नागनाथ नाही त्याला हातानेच थांबायला सांगितलं आणि म्हणाला," जरा तुझा हात बघू "

मनाच्या नकळत विक्रमने त्याचा हात नागनाथच्या हातात दिला. हात हातात घेऊन नागनाथने डोळे बंद केले. जणू काही समाधी लागली आहे असा भाव चेहऱ्यावर आणला. थोड्या वेळाने डोळे उघडून तो म्हणाला,

" तुझ्या मालकाचं मला माहित नाही. परंतु तुझं भविष्य मला नक्की ठाऊक आहे. जा लवकर तुला एक गोड बातमी ऐकायला मिळेल."

बऱ्याच दिवसापासून विक्रम आपल्याला बाळ व्हाव म्हणून तळमळत होता. त्याच्या मनात आलं नागनाथने जे सांगितले त्याचा अर्थ तर असा नाही ना ? तसा तो आनंदाने नागनाथच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला,

" महाराज तुम्ही म्हणता तसं जर झालं तर तूम्ही म्हणाल ते मी तुम्हाला देईल" हे बोलत असताना त्याला गावातल्या त्या माणसाने जे काही सांगितलं होतं ते तो पूर्णपणे विसरून गेला होता. नागनाथ अजून बोलतच होता,

" अरे मी खोटं बोलत नाही. तुझ्या मालकाला देखील पुत्र संतती होणार आहे. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. फक्त तुझ्या मालकीणबाई पासून नाही. लक्षात ठेव  प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. तुला आता त्याचा प्रत्यय येईलच. जा तुझं कल्याण होईल."

नागनाथच्या पायावर वारंवार डोकं ठेवून विक्रम त्याला दक्षिणा देऊन गावाकडे परत आला. त्यावेळी तिकडे धनपालच्या बाबतीत काय झाले आहे हे त्याला माहीत नव्हते.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all