रक्त रंजीत 365 रात्री ( भाग तेरावा )

एक भयावह मालिका


रक्तरंजीत 365 रात्री ( भाग तेरावा )

पौर्णिमेची रात्र होती. आकाशात भला मोठा गोलाकार पूर्ण चंद्र उगवलेला होता. चंद्राचा चंदेरी प्रकाश सगळी कडे पसरलेला होता. त्या प्रकाशात ओळखीच्या जागा देखील वेगळ्याच भासत होत्या. गावात अजून रस्त्यावरचे दिवे यायचे होते. कुठून तरी येणारी प्रकाशाची तिरीप वेगळीच वाटून जायची. त्या प्रकाशात गावात जाणारा कच्चा रस्ता सुरुवातीला दिसत दिसत अंधूक अंधूक होत दिसेनासा झाला होता. नेहमीचा रस्ता असल्याने चुकण्याची शक्यताच नव्हती. कुठतरी एखादं किराणा दुकान सुरु असायचं आणि माणसांच्या हालचाली दिसायच्या. मध्येच एखाद कुत्रं जोरदार भुंकत यायचं.

त्यादिवशी रात्री धनपाल उशिरा घरी गेला. शाळेचे काम मार्गाला लावता लावता किती महिने संपून गेले होते. हे त्याला कळलच नव्हत.  रात्रंदिवस तो शाळेसाठी धडपडत होता. दर दोन दिवसात तालुक्याला नाहीतर जिल्ह्याला त्याची फेरी व्हायची. मध्येच हे पारधी लोकांचं प्रकरण उद्भवलं. पण राघवच्या मदतीने तेही सेटल झालं. कार्यक्रम निर्वीघ्नपणे पार पडला.

आता लवकरच निवडणुकांना घोषणा होणार होती. त्या दृष्टीने तयारी करावी लागणार होती.आपल्या विरुद्ध कोण उभा राहतो ते ही पाहणं महत्त्वाचं होतं. सावधपणे पावल उचलणं खूप गरजेचं होतं.

अचानक त्याला आठवलं की कित्येक दिवस आपण ईश्वरीच्या जवळ गेलोच नाही आहोत. तिच्याशी निवांतपणे बोललेलोच नाही. बरेच दिवस झाले तिच्या तब्येतीची काहीच विचारपूस केली नाहीये. इतका हा कामाचा व्याप सुरू आहे.

म्हणून त्या रात्री घरी गेल्यावर जेवण झालं आणि तो ईश्वरी जवळ गेला. ईश्वरीला त्यांन जवळ घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ईश्वरी ने त्याला नकार दिला.

" आता दोन तीन दिवस अजिबात काहीच नाही करायचं. मी दूर बसलेली आहे", असं तिने म्हटल्या बरोबर त्याचा चेहरा एकदम उतरला. नागनाथ तर त्याला म्हणाला होता की यावेळी नक्की मुलगा होईल म्हणून आणि अचानक हे काय झालं ?  रात्रभर तो या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत बसला.

विक्रम बाजूलाच राहात होता. त्याला काही सुचत नव्हतं.रात्रीचं त्याने विक्रमला बोलवलं. विक्रम आल्याबरोबर त्यानं त्याला विचारलं,

"विक्रम तुला आठवत ना ?  त्या दिवशी नागनाथ स्मशानात काय म्हणाला होता की यावेळी तुम्हाला नक्की मुलगा होईल आणि विक्रम त्यावेळी मी त्याला त्याच्या या बोलण्यावर खूष होवून माझ्याजवळ होते तेवढे पैसे बिदागी म्हणून बक्षीस दिले. पण त्याने मला फसवले आहे म्हणून. तू आता  एवढेच कर उद्या सकाळी नागनाथ पतंजली याचा शोध घे. मी त्याला बरोबर करतो. मला फसवतो काय." 

असं बोलून उद्वेगाने तो घराबाहेर पडला फिरत फिरत दारूच्या गुत्त्यावर आला. तिथं त्याने भरपूर दारू पिली. त्याला काय करावे सुचत नव्हते.

निमझरीच्या रस्त्यावरून तो एकटाच फिरत होता. त्याच्या डोळ्यासमोर फक्त नागनाथ उभा होता. जर आत्ता तो समोर असता तर धनपालने त्याला मागचा पुढचा विचार न करता तुडवलाच असता. इतकं त्याचं डोकं फिरल होतं.

बराच चालत चालत तो झिंगत गावाच्या बाहेर आला.  त्याला ते स्मशान दिसलं जिथं नागनाथ भेटला होता. आणि अशीच रात्र झालेली होती. त्याच्या डोक्यात नागनाथच्या विचारांनी तिडीक मस्तकात गेली. एक झणझणीत शिवी त्याच्या तोंडातून बाहेर पडली. समोर ओढा दिसत होता. ओढ्याच्या वाळूचा वेडावाकडा कोरडा ओहोळ चंद्राच्या प्रकाशात चमकत होता. मधेच असणारे काळे कातळ मोठ्या अस्वला सारखे जमीनीवर पसरलेले दिसत होते.

समोर शाळा दिसत होती. शाळेपासून हाकेच्या अंतरावर पारध्यांची पालं पडलेली दिसत होती. तिथल्या झोपड्यांमध्ये कुठंतरी दिव्यांची, आणि माणसांची हालचाल दिसतं होती.

धनपालराजला मधेच त्या लोकांची आठवण आली. आणि अगोदरच सगळ्या गोष्टींवर वैतागलेला तो अजूनच वैतागला. सालं, त्या दिवशी या हलकट लोकांमुळे कार्यक्रमाचा बराच विचका झाला होता.

अर्थात ही गोष्ट जास्त कोणाला माहीत पडली नव्हती म्हणून, पण तो झालेला अपमान एकटा असला की धनपालला हमखास आठवे. कसं कुणास ठाऊक पण त्या उद्घाटन प्रसंगा पूर्वी झालेला मारहाणीचा प्रकार साहेबांसोबत आलेल्या पोलीस इन्स्पेक्टरला कळला होता आणि त्याने त्या बाबतीत धनपालला, अगदी बेड्या घालून त्याची गावभर मिरवणूक काढण्या ईतपत असा हग्या दम दिला होता की ती गोष्ट आठवली तरी धनपालला मेल्याहून मेल्यासारखे होतं असे आणि आता ती गोष्ट आठवली की रक्त उसळत असे. कोणी ही गोष्ट त्या इन्स्पेक्टरला सांगीतली असेल याचा अजून त्याला शोध लागला नव्हता.

आता अंधारात ती पालं दिसल्या वर त्याचं रक्त उसळ्या मारायला लागलं. जो दिसेल त्याच्या पेकाटात जोरदार लाथा घालाव्या अशी ईच्छा त्याला झाली. आणि त्या उर्मीत तो झोकांड्या देतं वस्ती कडे जाऊ लागला.

दोन चार पावलं लडखडत चालला असेल नसेल तोचं तो ओढ्यातल्या एका काळ्याशार कातळाला अडखळला आणि तोल जाऊन जोरात कोसळला. कातळावर त्याचं डोकं नारळा सारखं धाडकन आदळलं आणि तो शुद्ध हरपून खाली कोसळला.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all