रक्त रंजीत 365 रात्री ( भाग चवथा )

एक अविश्वसनीय कथामालिका
रक्तरंजीत 365 रात्री ( भाग चवथा )

मागच्या भागात -
( मांत्रिकाने मात्र चिमुटभर राख धनपालराज आणि विक्रमच्या अंगावर फुकली आणि आपल्या झोळीतून  एक बाटली काढून त्यातलं द्रव घटाघटा पित तो बोलायला लागला. पूढे काय झालं ते बघू या. )

त्यांच्या भोवती त्याने राखेच एक वर्तुळ काढलं आणि कवटी मधे बोटं घालून कुकूं काढून दोघांच्या कपाळाला फासलं. आणि एका अगम्य भाषेत दोघांवर तांदूळ फेकायला सुरूवात केली.

ॐ अ घो रेभ्योऽ थ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः
सर्वेभ्यस सर्व सर्वेभ्यो नमस्तेऽस्तु रुद्र रूपेभ्यः
ॐ अघोरेभ्योत् घोरेभ्यो घोरा घोरा तारेभ्य:
सर्वेभ्यास सर्व सर्वेभ्यो नमस्तेस्तुस्तु रुद्र रूपेभ्यः
 
दोघे डोळे विस्फारून विस्मयचकित होऊन बघतच राहीले. भले ते दोघंही समोरासमोर दोन हात करायला कोणालाच भीत नव्हते. पण त्यांना या प्रकाराची कल्पना नव्हती. दोघं दचकून हा प्रकार पाहून एकमेकांकडे बघायला लागले.

धनपालराज एकदम डरकाळी फोडल्या सारख्या आवाजात ओरडला,

" ए, भोंदू माणसा. हे तुझं नाटकं बंद कर. मुकाट्यानं ईथुन निघून जा. मला तू अजून ओळखलेलं दिसतं नाही. मी या गावचा सरपंच आहे. माझ्या परवानगी शिवाय तू या स्मशानात आलाच कसा "

या वर त्या माणसानं चेहऱ्यावर मंद स्मित हास्य आणलं आणि म्हणाला,

" बालक, स्मशानात यायला तूझी नाही. वरच्याची परवानगी लागते. लोकं दुसऱ्याच्या खांद्यावर येतात. तू मात्र या ठिकाणी स्वतःच्या पायाने आलेला आहेस. जाणार मात्र माझ्या परवानगीने. "

त्याच्या आत्मविश्वास पूर्वक बोलण्याने धनपालराज आणि विक्रम दोघेही दचकले. त्या लोकांकडे वळून तो ओरडला,

" तूम्ही लोकं निघा आता. तुमचं काम झालं ना. जातांना घरी जाई पर्यंत कोणीच कोणाशी बोलू नका, नाहीतर आजचा विधी निष्फळ होईल "

ते लोक नमस्कार करून निघून गेले. तो मांत्रिक या दोघांकडे वळून म्हणाला,

" आता बोला, मी नागनाथ पतंजली. मी नाथ संप्रदायी आहे. तुमचं जे काही काम असेल ते मला सांगा. "

" अरे बाबा, माझं काही काम नव्हतं. उलट तुम्ही लोकं ईथ काय करत होता. हे बघायला आम्ही आलोय."

" बालक, कोणत्याही प्रयोजना शिवाय या विश्वात कोणतीच गोष्ट घडून येत नाही. तू इथे स्वतःहून आला यात देखील काहीतरी ईश्वरी संकेत आहे. अगोदर मी ईथ कसा आणि का आलो ते सांगतो. ज्या माणसाला मी बाळाच्या तोंडात दूध टाकायला सांगितलं होतं त्याचं नावं कैलास. त्याला बरेचं दिवस झाले पुत्र संतती नव्हती. म्हणजे पाच मुली झाल्या आहेत. पण मुलाचा गर्भच टिकत नव्हता. तो माझ्याकडे आला. त्याला समोर बसवून मी त्याचा वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहिला. त्याच्या नशिबात पुत्र संतती होती. परंतु काही कारणाने त्याला अडचणी येत होत्या. त्याच्यावरही काहीतरी उपाय असणारच होता. तो उपाय मी शोधून काढला. उपाय करण्यासाठी वाट पाहण्याची गरज होती आणि आज तो दिवस सापडला. कारण आम्हाला एकाच वेळी बाळ आणि त्याची आई मरण पावलेली हवी होती. त्या आईच्या राखेने मी बाळा भोवती पक्क कवच तयार केलं. मंतरलेलं दूध बाळाच्या तोंडात टाकलं आणि आता तुम्ही बघाल की त्याच्या होणाऱ्या संततीला काहीच धोका होणार नाही. त्याला होणारी संतती ही शंभर टक्के पुत्र असणार. हा माझा शब्द आहे तो कधीच खाली जाणार नाही."

त्याच्या आत्मविश्वास पूर्वक बोलण्याने धनपाल राज थक्क झाला. अचानक त्याला त्याच्या बोलण्यामध्ये त्याला स्वतःबद्दलचं एक आशा वाटू लागली. नागनाथ पतंजलीचं म्हणणं जर खर असेल तर कदाचित आपल्याला देखील पुत्र संतती होऊ शकते. या विचाराने तो स्वतःमध्येच दंग झाला.

नागनाथने त्याला विचारलं, " काय पाहुणे कसला विचार करताय ?"

त्यावर धनपालराज म्हणाला," महाराज तुम्ही जे काही बोलतात ते खरं आहे काय ? "

त्यावर नागनाथ भडकून म्हणाला, "याबद्दल तुझ्या मनात शंका आहे की काय  ? अरे मी खोटं बोललो तर मी याच ठिकाणी जळून भस्म होऊन जाईल "

हात जोडून धनपाल म्हणाला, " महाराज जरा माझ्या पण नशिबात बघा ना. पुत्र संतती आहे का ? "

"बघू बरं जरा तुझा हात," असं म्हणत नागनाथने धनपालराजचा हात हातात घेतला. बाजूला चिता जळत होती. तीची राख इकडं तिकडं उडत होती. आगीच्या झळा दोघांना लागत होत्या. चितेच्या लाल पिवळ्या प्रकाशात ते तिघही वेगळेच दिसतं होते. नागनाथ ने धनपालराजचा हात हातात घेऊन डोळे मिटून घेतले. असा बराच वेळ गेला. विक्रम देखील चूपचाप बसून होता. बसल्या जागीच तो चुळबूळ करत होता.

थोड्यावेळाने नागनाथने डोळे मिटूनच बोलायला सुरुवात केली.

" बालक, तूझ्या नशिबात पुत्र संतती आहे. पण त्याला वेळ लागेल. प्रयत्न सुरु ठेव. धीर सोडू नकोस. या व्यतिरिक्त महत्वाची गोष्ट म्हणजे तूझ्या नशिबात गुप्त धन देखील आहे"

धनपालराजचे डोळेचं विस्फारले. त्याने एक डोळा मागितला होता तर परमेश्वराने त्याला दोन डोळे दिले होते. नागनाथ च्या पायावर लोटांगण घालत तो म्हणाला,

" महाराज आपण कोण आहात. कुठं उतरला आहात. माझ्या घरी पायधूळ झाडा"

" मी मी आधीच सांगितलं आहे, की मी नागनाथ पतंजली नाथपंथी आहे . आम्ही आहे कोणाच्या घरी जात नसतो. मी स्मशानवासी आहोत जेव्हा जेव्हा तू माझी आठवण काढशील तेव्हा तेव्हा मी तुला येऊन भेटेल. काळजी करू नकोस. तुझे कल्याण होईल."

" पण बाबा तुम्ही मला कुठे भेटाल ?" धनपालने विचारले.

" त्याची काळजी करू नकोस. मीच तुला येऊन भेटेल", असं मला नागनाथ पतंजली नाग उठून उभे राहिले. स्मशानातून चालते झाले. ते गेले त्या दिशेला धनपाल राज बघत राहिला. काहीही न बोलता विक्रम आणि धनपाल घरी आले.

घरी आल्यावर त्यांनी ईश्वरीला स्मशानात घडलेली हकीकत सांगितली. त्यावर फिकटस हसत तिने जेवायची पान घेतली.

तिला मागच्या बाळंतपणात दगावलेली मुलगी आठवली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all