Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

रक्षाबंधन - प्रवास जबाबदारीचा.

Read Later
रक्षाबंधन - प्रवास जबाबदारीचा.विषय - सामाजिक कथा.

रक्षाबंधन १.


सदर कथा आणि तिथलं वातावरण हे साल २००० च्या आसपासच आहे याची कृपया नोंद घ्यावी. त्यावेळी स्मार्ट फोन जनसामान्य लोकांच्या हातात नव्हते.


"हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
रामकृष्ण रहीम ख्रिस्त बुध्द चर तृष्ट.
महावीर मानव संत मानव्याचे दीपस्तंभ"

        प्रार्थना सुरू होती. सगळे तल्लीन होऊन आणि हात जोडून प्रार्थना म्हणत होते. ते एक बालसुधार गृह होते आणि सध्या तिथे सकाळची प्रार्थना सुरू होती. प्रार्थना होताच सगळे आपापल्या कामाला निघून गेले. अलका मात्र तिथल्या वॉर्डनला शोधत होती. ती कुठे दिसत नाही हे पाहून ती ऑफिसमध्ये गेली तर मॅडम काहीतरी लिहीत होत्या.

" मॅडम.." तिने हाक मारली. मॅडम ने चष्मा ठीक करत समोर पाहील आणि अलकाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं.

" बोल अलका. काय झालं?" मॅडम ने विचारलं.

" मॅडम,ते माझ्या भावाबद्दल काही कळलं का?" अलका ने आशेने विचारलं.

" अगं , तुला सांगितलं ना की मागच्या तीन महिन्यांपूर्वी कोणीतरी परिवार त्याला घेऊन गेला. आता त्याला चांगलं आयुष्य मिळत आहे. तू काळजी करू नको. तू सुद्धा आता अठरा वर्षाची होशील आणि इथून तुझी सुद्धा सुटका होईल. आता सगळं चांगलं होईल बघ." मॅडम म्हणाली.

" त्या आश्रम मधून कळणार नाही का त्याला कोणी दत्तक घेतलं ते?" अलका ने काकुळतीने विचारलं.

" अगं अशी माहिती नाहीत देत." मॅडम निराश होत म्हणाल्या.

" मॅडम, ते रक्षाबंधन आलेलं. फक्त एकदा बघायचं होत म्हणून.." अलका चे डोळे आता पाणावले होते. ते बघून मॅडम ने सुस्कारा सोडत चष्मा काढला.

" मी प्रयत्न करते. पण खात्री नाही देऊ शकत. तू जा आता. " मॅडम म्हणाली.

अलका ने होकारार्थी मान हलवली आणि तिथून बाहेर पडली. आता चालता चालता तिला तिचा भूतकाळ आठवत होता ज्यात फक्त आणि फक्त दुखः होतं. क्षणात तिच्या डोळ्यासमोर दोन वर्षापूर्वीचा काळ आला.

दोन वर्षापूर्वी.

         " टन टन टन......" शाळेची घंटा वाजली तसं अलका ने शाळेच्या दिशेला पाहिलं. पाच वाजले होते आणि नेहमीच्या वेळी शाळा सुटली होती. तिने हातातली शेळी तशीच ओढत शाळेच्या कुंपण जवळ नेली अन् कुंपणाच्या पलीकडे झालेली मुलांची गर्दी बघू लागली. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर आता आनंद होता कारण शाळा सुटली होती आणि घराकडे जाण्याची ओढ त्यांच्या हावभावात दिसत होती. ती तशीच उभी राहून त्या गणवेश घातलेल्या मुलांना कुहतुलाने बघत होती. कधी काळी तीही त्यांच्यातलीच एक होती पण आता मात्र ती शाळेच्या बाहेर होती. तिला त्याचं दुःख वाटत होतं पण तिच्याकडे काही पर्याय नव्हता. तेवढ्यात कधी काळी तिच्या वर्गात असणाऱ्या मुलींचा घोळका आला तशी ती बाजूला झाली अन् शेळीला ओढत घेऊन तिथून दूर जाऊ लागली .

" चल ग बाय..तू आता जास्ती तरास नग दिऊ. माझ्या मैतरणीनी बघितलं तर पुन्यांदा इचार्त्याली शाळा का सुडली म्हणून. आता त्यांचं मायबाप हायती चांगली कमावती. पण माझ्या नशिबी न्हायत तसं मायबाप मंग म्या काय करणार?" अलका शेळी सोबत बोलत तशीच तिच्या घरी आली . त्यावेळी तिची भाषा अशुध्द होती. तिने शेळीला खुंटीला बांधलं आणि आत जाऊ लागली.

" कोण? अल्के तू हायस का?" आतून तिच्या बाबांचा आवाज आला.

" व्हय म्याच हाय." अलका आत येत म्हणाली. तिचे वडील घरात असलेल्या एकुलत्या एक खाटेवर बसलेले. डोळ्यांना दिसत नव्हतं त्यामुळे जास्त कुठे जात नव्हते.

" आय कुठं गेली?" अलका ने परात घेत विचारलं आणि ती चुली समोर येऊन बसली. तिने सरपण चुलीत घालून त्यावर दिव्यातल थोडं रॉकेट ओतलं आणि काडी पेटवली तसं जळण जळू लागलं आणि एकुलत्या एका त्या मातीच्या घरात धुराच्या लाटा पसरू लागल्या.

" आसल हिथच कुठतरी." तिचा बाबा बोलला.

तिने मग जास्त चौकशी केली नाही अन् भाकऱ्या थापायला घेतल्या.

" गणू आला का?" बाबा ने विचारलं. गणू तिचा छोटा भाऊ होता.

" आताच शाळा सुटल्या. खेळत बसला आसल." तिने फुकणी ने चुलीत फुंकत उत्तर दिलं. तेवढ्यात तिची आई आत आली.

" आजुन जेवान न्हाय व्हाय झालं?"आईने तिथच समोर बसत विचारलं.

" आताच आल्या." अलकाने उत्तर दिलं.

" बरं, ते साहेबांच्या घरात कामवाली पायजेल. तुझ्यासाठी मी बोलून ठेवलं हाय. उद्यापासून तिथं जा म्हणजी घरात दोन पैक येत्याली." तिची आई म्हणाली.

" अगं पण मग शिर्डी कोण बघायचं?"अलका ने भाकरी टाकता टाकता विचारलं.

" कोण म्हणजी? गण्या बघाल की." तिच्या आईने उत्तर दिलं आणि अलका भाकरी भाजता भाजता तशीच थांबली.

" आये, पर त्याची तर शाळा हाय ना. मग त्यो कसा शिर्डीला बघल?" तिने विचारलं.

" काय बी गरज न्हाय शाळत जायची. तसबी शिकून कोण मोठं हुत्या?" आई म्हणाली आणि अलकाचा चेहरा पडला.

" आय, त्याची शाळा असुदे सुरू. म्या बघल शिर्डी पण. त्येला शाळत जायला लय आवडत." अलका म्हणाली.

" मी सांगितलं ना एकुंदा. आता त्याची शाळा बंद म्हणजी बंद. " आई रागात म्हणाली.

" अग, तू अल्की ची शाळा बंद केली पर आता गण्याची राहूदे की." एवढ्या वेळ शांत पने ऐकणारे अलका चे बाबा मध्ये पडले.

" आता याच म्हाताऱ्या च ऐकण बाकी राहिल्याल." आई बडबड करत पुन्हा बाहेर निघून गेली.

        खरंतर तिचे बाबा वयाने जास्त होते आणि आईचं वय मात्र खूप कमी होतं. लग्न झालं तेव्हा घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे तिची आई पण व्यवस्थित राहिली पण तीन वर्षापूर्वी तिच्या बाबांचा शेतातून येताना एका ट्रक समोर येऊन अपघात झाला आणि त्यात त्यांचे डोळे गेले. तेव्हापासून सगळ्या घराची घडी विस्कटली. तिचं शिक्षण सुटलं. आई काय करते कुठे जाते तिला काही कळत नव्हतं. पण गावात तिच्या आई बद्दल चांगलं बोललं जात नव्हतं हे मात्र तिला माहिती होतं. लंती त्याकडे लक्ष देत नव्हती.आता सुद्धा तिची आई तिच्या बाबावर चिडून बाहेर गेली. ते पाहून अलका ने एक उसासा सोडला आणि करपलेली भाकरी बाहेर काढली.

       पण आता मनात विचारांचं वादळ उठलं होतं. एकतर तिच्या लाडक्या भावाची शाळा सुटणार होती आणि वरून तिला आता साहेबाच्या घरी कामाला जाव लागणार होतं. त्या साहेबाला दोन मुलं होती. दोघेही बाहेर गावी कॉलेज मध्ये होती अस तिने ऐकलं होतं. त्यातल्या मोठ्या मुलाबद्दल तिने फारस चांगलं ऐकलं नव्हतं. त्यामुळे तिला भीती वाटू लागली होती. पण आता पर्याय नव्हता. आई बोलली होती म्हणजे कामाला तर जाव लागणार होतं.

क्रमशः

सदर कथेचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत तर कोणीही कॉपी करण्याचा प्रयत्न करू नये.

प्रीती चव्हाण.
जिल्हा - सातारा, सांगली.


_______________________________________

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Love Angel

Housewife

Nothing

//