रखुमाई रूसली

कथा विठ्ठल रूक्मिणीची

"उद्या तुम्ही कुठे म्हणजे कुठे जाणार नाही.. नेहमी तुम्ही दुसर्‍यांची सेवा घेता.. उद्याचा दिवस माझा.. कळले ना?" रुक्मिणीने ठणकावून विठ्ठलाला सांगितले..

" हो ग.. मी का तुझ्या शब्दाबाहेर आहे.. तू म्हणशील तसे.." विठूरायाने मान डोलावली..

रामप्रहरी विठुरायाच्या कानी आवाज आला.. 'दळिता कांडिता तुज गाईन अनंता..' त्याने डोळे उघडले.. शेजारी रखुमाई झोपली होती.. तो तसाच उठला आणि निघाला त्याच्या जनीकडे.. तिचे दळण दळून येईपर्यंत इथे रखुमाईने गरम पाणी काढून ठेवले होते.. "आलात दळण दळून.. बसा अंग चोळून देते.. स्नान झाल्यावर खायला देते तोवर तरी थांबा.." विठुरायाने परत होकार भरला.. "मागणे हेचि माझे देवा, दुजेपणा दुरी ठेवा, मी तू ऐसी नको उरी, जनार्दनकृपा करी.." रखुमाई आत गेली आहे तोवर याने लगेच श्रीखंड्याचे रूप घेऊन नाथांच्या घरची वाट धरली.. तिथे पाणी भरून होईतो. "नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जावो पाहे.." ती आर्त हाक ऐकून त्याचे पाय वळले कान्होपात्रेकडे.. तिला दिलासा देऊन घाबरत विठुराया आले घरी.. समोर रखुमाई थालीपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा घेऊन उभीच होती.. 

" आता हे तरी शांतपणे खाणार कि अजून कुठे जायची घाई आहे?"

" मी कुठे जाणार तुला सोडून? बाकी थालीपीठ उत्तम झाले आहे ग.."

" हो ना.. मग आता दुपारी काय खाणार ते सांगा.."

" दुपारी भाजी भाकरी कर छान.. मी तर म्हणतो तो सावता कधीचा बोलावतो आहे तर एकदा त्याच्या मळ्यात जाऊन येऊ दोघे.."

" मी नाही येत. जा तुम्हीच.." चिडून रखुमाई बोलली.. पडत्या फळाची आज्ञा घेऊन विठुराया निघाला.. "कांदा मुळा भाजी.. अवघी विठाई माझी.." सावताच्या मळ्यातील थोडी ताजी भाजी रखुमाईचा राग कमी व्हावा म्हणून घेतली.. तोच एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला..

"केशवाचे ध्यान धरूनी अंतरी मृत्तिके माझारी नाचतसे " असे म्हणत बाळाला तुडवणारा गोरा कुंभार दिसला.. त्या बाळाला वाचवून त्याला त्याच्या हवाली करण्याच्या गोंधळात भाजी कुठेतरी राहून गेली.. तसेच मातीने भरलेले कपडे घेऊन तो पंढरपुरी परतला.. पण आज रखुमाईने भांडायचे नाही असे ठरवले होते ना.. "कपडे बदलून या.. तोपर्यंत भाकर्‍या करायला घेते.." तिने गरम भाकर्‍या करायला घेतल्या.. पण त्या काही त्याच्या घशाखाली उतरेना. तुपाची वाटी आणि नेवैद्य घेऊन उभा असलेला नामदेव सतत त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला.. आपण नेवैद्य ग्रहण करेपर्यंत तो काही खाणार नाही.. हा विचार पिछा सोडेना.. रखुमाईला भाकरी वाढ सांगून विठुराया आला नामदेवांनी.. तो म्हणतच होता "तरी वेणुनादी जेवण करा गोडु.." त्याच्या नेवैद्याचा घास घेऊन निघाला तर देहूला उन्हात "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी" असे गात असलेला तुकाराम दिसला.. त्याच्या डोक्यावर सावली धरली.. आणि शेवटी घरी परतला..

" थकला असाल.. जरा दम घ्या." असे रखुमाईने सांगितले.. तिच्याकडे कृतज्ञतापूर्वक पाहून तो जरा कलंडला.. संध्याकाळी उठला.. "चल आपण दोघे सारीपाट खेळू.." त्याने रखुमाईला सांगितले..

"बघा हां, आपण खेळायला बसू.. आणि परत तुम्हाला काहीतरी आठवेल.. मग मात्र मी चिडून इथून निघून जाईन.."

" नाही असे होणार.." त्याने हसून तिची खात्री पटवली.. त्याच्या मोहक हास्याच्या जाळ्यात तीही अडकली..

खेळ रंगात आला.. आणि "विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले.." अशी साद आली.. त्या चार भावंडांकडे कसे दुर्लक्ष करणार.. डाव अर्धवट सोडून तो निघाला.. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवायला.. त्या चार भावंडांना भेटून विठुराया आला खरा.. पण तोवर त्याची रखुमाई चिडून खरेच निघून गेली होती.. हि गोष्ट सर्व संतांना समजली. सर्वांनी येऊन तिची मनधरणी केली.. "तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना.. एकल्या विठुरायाला संसार पेलेना.." पण ती हि एवढी हट्टी.. ती ऐकेचना.. शेवटी ती त्याच्यापासून वेगळी झालीच.. 

          आता गेली अठ्ठावीस युगे तो विठुराया तिची विनवणी करतो आहे.. "येग येग रखुमाई, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी.."





हि एक काल्पनिक कथा आहे.. पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या एकमेकांपासून दूर आहेत.. एक आख्यायिका आहे कि पांडुरंगाच्या भक्तांना कंटाळून रुक्मिणी वेगळी झाली.. त्याला अनुसरून लिहिलेली एक छोटीशी कथा.. कशी वाटली ते नक्की सांगा..



सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई