रखमाची लेक
का गं रखमे,,किती मारशील पोरीला?
काय करु मग. माझाबी जीव आहे ना. रोज सकाळी उठून हिची सेवाचाकरी करायची. हिच्या वेडात मीपण वेडं व्हायचं. आता दोन वर्ष होत आली. डॉक्टर हकीम झाले. कायबी सुधारणा नाही.
गप बाई,रडू नकोस. जे भोग नशिबी आलेत ते काय सुटतात होय.,आक्की म्हणाली.
रखमा उठून आत गेली. तिची लेक अजुनही भीतीने थरथरत होती.
रखमेने गौरीला जवळ घेतलं. तिच्या गळ्यात पडून रडली मग तिला जेवण भरवू लागली. तोकडा गाऊन,हातात जत्रेतली बाहुली,भेदक डोळे,पिंजारलेले केस,गोऱ्यापान कांतीच्या गौरीला रखमा घास भरवू लागली. मग तिने ओल्या फडक्याने लेकीचं तोंड पुसलं. तिला कुशीला घेऊन झोपी गेली.
रखमाचा जरा डोळा लागला तसं पोस्टमनची हाक ऐकू आली. रखमा तशीच हेलपांडत उठून गेली.
दोन हजार रुपये पाठवले होते गौरीच्या नवऱ्याने. दरमहिन्याला पाठवत होता तो पण यावेळेला रखमाने ते पैसे परत पाठवले. तिला राग आला होता जावयाचा. जावयाने दुसरं लग्न केलं हे तिच्या कानावर आलं होतं . तिला साधं दोन ओळींच पत्रदेखील पाठवलं नव्हतं.
रखमाला पुर्वीचे दिवस आठवले. गौरीच्या जन्मानंतरची ती दोन वर्ष..सोन्याहून पिवळी अशी. नवरा ती अन् गौरी किती सुखी कुटुंब होतं. नवरा मजुरीला जायचा. संध्याकाळी घरी यायचा मग हातपाय धुवून गौरीला घेऊन बसायचा,तिला गाणं गाऊन दाखवायचा. रखमा भाकरी थापायची. भाकरी तव्यावर टम्म फुगायची अगदी पुनवेच्या चंद्रासारखी. कडधान्याचं कालवण नि भाकरी चुरुन दिली की नवरा गपागपा जेवायचा. रात्री रखमीला जवळ घ्यायचा,सुख द्यायचा. ह्याच सुखाला कुणाची दुष्ट लागली जणू. भरल्या ताटावरून कोणाला उठवावं तसं एक दिवस नवरा न सांगता न बोलता तिच्या आयुष्यातून निघून गेला. रखमाने पोलिस स्टेशन गाठलं. बरेच शोधतपास झाले पण त्याचा कुठे ठावठिकाणा लागला नाही. पदरात प्राजक्ताच्या फुलावानी नाजूक पोर..लोकांच्या नजरा डसू लागल्या पण बाजूची आक्का मदतीला धावून आली. तिच्या घरी गौरीला ठेवून रखमा हातातोंडाची भेट घडवण्यासाठी मिळेल ते काम करु लागली. कुठे ऊस कापणं,कुणाचं पाणी शेंदणं,सारवण करणं,गोधड्या शिवणं,बाळंतपण करणं,बाळंतिणीला मालिश करणं,बाळाला न्हाऊ घालणं..रखमा जीवतोड मेहनत करत होती. मुद्दामहूच अघळपघळ रहात होती. भोवताली भुंगे फिरु नयेत म्हणून तिच्या वागण्याबोलण्यात एक जरब आपसूक आली.
दिवसरात्रीचं कालचक्र अव्याहत चालू होतं. गौरी मोठी होत होती. गोरीपान,काळ्याभोर केसांची,टपोऱ्या डोळ्यांची गौराई. रखमा तिला म्हणे,"मागच्या जन्मात कोन्या देशाची राणी होती आसशील तू."
रखमेला आठवलं,गौराईने एकदा खेळणीवाल्या बाईच्या टोपलीतल्या बाहुलीसाठी हट्ट केला होता. रखमाने तिला बाहुली घेऊन दिली होती. गौरी भातुकलीचा खेळ खेळू लागली की तिची बाहुली तिच्या मांडीवर असायची. गौराई बाहूलीला जोजवायची. तिच्यासोबत गप्पा मारायची.
वर्षामागून वर्ष सरली. गौरी वयात झाली. फुललेल्या फुलावर भुंगा फेर धरतो तसं गौरीचा मित्र,पार्थ तिच्या मागेपुढे फिरु लागला. गौरीच्या मनातही त्याच्याबद्दल प्रेमभावना जाग्रुत झाली. दोघांच्या चिठ्ठ्याचपाट्या चालू झाल्या.
गौरीतला बदल,तिचं लाजणं, वेड्यागत हासणं पाहून रखमेला शंका आलीच. वयात आलेली पोरगी. काही कमीजास्त झालं तर..तिने गौरीला विचारलं. गौरीने पहिलं तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण तुला मामाकडे धाडून देते म्हंटल्यावर गौरी घाबरली. मामाच्या पोराची नजर वंगाळ होती. गौरीने ओळखलं,इथं रहायचं असेल तर आईला सगळं सांगितलं पाहिजे.
गौरीने धीर करुन रखमेला पार्थबददल सांगितलं. रखमाने नको होय करत पोरीच्या हट्टापायी पार्थला घरी बोलावलं. गौरी नि पार्थ दोघंही हट्टाला पेटली होती. रखमाने पार्थच्या आईवडिलांची भेट घेतली. पार्थचे आईवडील या लग्नाला तयार होईनात. आता पुढे काय करायचं,रखमेपुढे मोठा गहन प्रश्न उभा राहिला. रखमेने पार्थला हात जोडून सांगितलं,"पार्थ,तुझे आईवडील नाही म्हणतात तर तुम्ही हा विषय सोडून द्या. इथून पुढे तुझा मार्ग वेगळा नि माझ्या लेकीचा मार्ग वेगळा."
पार्थ रखमेला आर्जव करत होता पण रखमेने काळजावर दगड ठेवला व लेकीला घरी घेऊन आली. गौरी खूप रडली. पार्थशिवाय जगणं तिला अशक्य वाटू लागलं. आठवडा झाला तरी गौरी पाण्याशिवाय काहीच तोंडात घेईना. रखमेच्या जीवाला घोर लागला. तिने पार्थला बोलवून घेतलं व दोघांचं देवळात लग्न लावून दिलं. ही बातमी कळताच पार्थच्या वडिलांनी पोलिस स्टेशनात तक्रार नोंदवली.
गौरीला सज्ञान व्हायला एका महिन्याचा अवकाश होता. पार्थ व गौरी दोघे वेश बदलून रखमेच्या सख्ख्या बहिणीकडे राहू लागले. पोलिसांनी रखमाची कसून चौकशी केली,तिला सोडून दिलं. खेडेगावात पार्थ व गौरी दोघं मावशीच्या शेतात मदत करु लागली. रखमाची बहीणही तिच्या खोपटीत एकटीच रहात असल्याने तिलाही आधार मिळाला पोरांचा.
गौरी सज्ञान झाली तसं ती दोघं पुन्हा शहरात आली. रखमेच्या चाळीच्या मागच्या चाळीत त्यांनी एक लहानशी खोली घेतली. दोघं गुण्यागोविंदाने राहू लागले. रखमेचा आधार होता त्यांना. पार्थला नोकरी मिळाली. गौरीही फावल्या वेळात शिवणकाम करु लागली. रखमा काहीबाही गोडधोड करुन या दोघांसाठी आणायची.
गौरीला खूप वाटायचं,तिला सासूसासऱ्यांनी सून म्हणून स्विकारावं पण त्यांना पार्थची निवड पसंत नव्हती. रखमा तिला समजवायची,"लेकी,प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी वेगळं होत नाही." पार्थही गौरीला खूप जपायचा. एके दिवशी पार्थ रखमेकडे आला. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून रखमेने विचारलं,"जावयबापू,का एवढे घाबरलात?"
"गौरी चक्कर येऊन पडली अचानक,"पार्थ म्हणाला.
रखमा खोलीचं दार बंद करून लगोलग पार्थसोबत त्यांच्या घरी गेली. गौरी खाटीवर निजली होती. अतिशय म्लान दिसत होती ती. तेवढ्यात डॉक्टर वसुधा आल्या. त्यांनी तिला तपासलं व रखमेला म्हणाल्या,"रखमा आजी होणार तू."
ही शुभवार्ता ऐकताच रखमेचे डोळे लकाकले. तिने लेकीच्या गालावर बोटं दुमडून कडाकडा मोडली. सातेक महिने अगदी सोहळ्यासारखे गेले. आता बाळाच्या येण्याचे वेध लागले होते.
दोन दिवस झाले तरी नळ यायचा पत्ता नव्हता आणि दुपारच्या वेळेला पाणी आलं. सगळ्या बाया पाणी आणण्यासाठी नळाकडे धावल्या. साताठ नळ होते. गौरीही तिचा हंडा,कळशी घेऊन नळावर गेली. तितक्यात पार्थ आला. त्याने नळाला नंबर लावला नि गौरीला घरी जायला सांगितलं. वाटेत बायकांच्या हंड्या,कळशीतलं पाणी हिंदकळून वाट निसरडी झाली होती. गौरीचा पाय सरळ पुढे जात राहिला. गौरी तिथेच पडली.
सगळ्यांचा घोळका झालेला पाहून पार्थही तिथे पोहोचला. गौरी अशी वाटेवर पडलेली पाहून तो हादरला. मित्राच्या मदतीने त्याने गौरीला रिक्षात बसवले. गौरीला असह्य वेदना होत होत्या. ती गुरासारखी ओरडत होती. तिला डॉक्टरांच्या स्वाधीन करुन तो एका कोपऱ्यात पाय मुडपून बसला. डॉक्टरांनी सिझेरियन करण्यासाठी बाप म्हणून त्याची सही घेतली व दोघातल्या एकालाच वाचवता येईल असं सांगितलं. रखमाला कळताच रखमाही बिगीबिगी धावत आली. तिच्या डोळ्यांच्या धारा थोपत नव्हत्या.
डॉ. बाहेर आले. त्यांनी आई वाचली पण बाळ नाही वाचलं हे सांगताच रखमाने हंबरडा फोडला. पार्थला तर ते केवळ एक दु:स्वप्न वाटत होतं. रखमा गौरीला माहेरी घेऊन आली. गौरी कुठेतरी बघत बसायची. आजुबाजूची माणसं तिला असं बघून हळहळायची. तिच्या छातीतून दुधाच्या धारा वहायच्या. गौरीचं स्वतःच्या देहाकडे लक्षच नव्हतं. ती जीवंतपणी पुतळा बनली होती. कपड्यांचही भान नसायचं तिला. रखमा तिची छाती चोळून काढायची. तिच्या शरीराला मालिश करायची. लेकीची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यातून टीपं वहायची. पार्थला कामावर जाणं भाग होतं. त्यात भरीस भर म्हणून की काय त्याची बदली झाली.
रखमाच्या जीवावर गौरीला ठेवून ओलेत्या डोळ्यांनी तो बदलीच्या ठिकाणी रहायला गेला.
बाजूच्या आक्काला गौरीकडे लक्ष ठेव असं सांगून रखमा तिच्या कामांना जाऊ लागली. पैसा मिळवणं तर निकडीचं होतं.
एखाद महिना मधे गेला असेल,एके दिवशी रखमा कामं आवरून परत आली. बघते तर काय गौरीने जुन्या ट्रंकेतलं सगळं सामान बाहेर काढलं होतं. त्यातली तिची लहानपणीची बाहुली घेऊन ती एका कोपऱ्यात बसली होती.
रखमेने तिला साद घालताच म्हणाली,"शू, बोलू नको गं आई. आपली छकुली झोपलीय. नुकताच डोळा लागलाय तिचा." आणि मग स्वतः तिला कुशीत घेऊन झोपली. रखमाने तो सगळा पसारा आवरला. न्हाऊन भाकरी भाजी केली. गौरीला उठवलं,"बाय,चल उठ दोन घास खाऊन घे राजा."
गौरी उठली नि छकुलीला दुधाला घेऊन बसली. बाहुलीच्या तोंडांवरून दुधाची धार खाली गळून गौरीचा गाऊन ओलाचिंब करत होती. गौरीला त्याचं भान नव्हतं. रखमाने तिला भाजीभाकरी भरवली. सगळं आवरुन दोघी निजल्या. रखमाला वाटलं,"वाटलं असेल तिला आईसारखं जगावं. होईल उठली की नीट." पण तिला बिचारीला माहीत नव्हतं की तिच्यापुढे काय वाढून ठेवलं होतं.
सकाळी रखमाला जाग आली. पहाते तर काय गौरीने पाणी तापवलेलं व छकुलीला न्हाऊ घालत होती. तिला साबू लावून ,झालं झालं म्हणत होती. रखमा दिसताच तिला म्हणाली,"आई गं,पंचा घेऊन ये लवकर. माझ्या छकुलीला थंडी वाजली बघ." तेवढ्यात आक्का सहज म्हणून तिथे आली होती. तीही गौरीची ही अवस्था पाहून घाबरली.
सुट्टीला पार्थ आला. पार्थला वाटलं,गौरी सावरली असेल. शेवटी पुरुष तो. त्यालाही वाटत होतं,गौरीला कुशीत घ्यावं पण गौरी तिच्या छकुलीला सेकंदभरही सोडत नव्हती. उलट पार्थलाच ओरडली,"अरे,छकुलीचं अंग तापलय. चल लवकर डॉक्टरांकडे घेऊन जाऊया तिला." पार्थला समजेना ही खुळी की वेडी. डॉक्टरकडे जायचं म्हणून छान साडी नेसून तयार झाली. केस विंचरुन वेणी घातली नि छकुलीला एका फडक्यात गुंडाळून बसली. शेवटी आक्का नाक्यावरच्या डॉक्टरांना बाबापुता करुन घेऊन आली.
डॉक्टरांना बघताच गौरी म्हणाली,"तुमच्याकडेच यायला निघालो होतो डॉक्टर. बघा ना कालपासून अंग गरम लागतय हीचं. काहीतरी चांगलं औषध लिहुन द्या आणि हो जरा टॉनिकबिनिकबी लिहून द्या. तिचे पप्पा आलेत. त्यांना सांगते घेऊन यायला."
डॉक्टर म्हणाले,"बरं. छकुलीला तपासतो हं आणि तुलाही तपासतो."
"ओ डॉक्टर मला कशाला? मी ठणठणीत आहे."
"तसं नसतं बेटा. बाळाच्या आईलाही तपासावं लागतं," असं गोड गोड बोलत डॉक्टरांनी तिच्या मनगटावर गुंगीची सुई टोचली. काही मिनिटांत ती गाढ झोपली.
रखमा मात्र पदर तोंडावर घेऊन रडू लागली. डॉक्टरांनी तिला धीर दिला. एका मनोविकारतज्ञाची चिठ्ठी दिली. दुसऱ्या दिवशी पार्थ व रखमा गौरीला त्यांच्याकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तिला तपासून,तिच्याशी बोलून गोळ्याऔषधं सुरु केली. रखमाला म्हणाले,सध्या तिच्या कलाने घ्या. हळूहळू सावरेल ती यातून.
डॉक्टरची फी जबरदस्त होती. गौरीला पुन्हा तिथे न्हेणं परवडणारं नव्हतं. कुणी सांगितलं,"वेड्यांच्या इस्पितळात दाखल करा तिला," पण रखमाने ऐकलेलं, वेड्यांना इलेक्ट्रिक शॉक देतात. तिने ठरवलं,आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करायचा. गायत्री बरी होण्याची वाट बघायची.
पार्थ त्यानंतर एकदोनदाच आला नंतर येईनासा झाला,फोनही करेनासा झाला. रखमेला दुरुन कळलं की त्याच्या आईवडिलांनी त्याचं दुसरं लग्न लावून दिलं.
पोस्टमन जातो म्हणताच रखमा भानावर आली. आक्का म्हणाली,"का गं घेतले नाहीस पैसे?"
"अगं आक्के,आता त्याचं लग्न झालं. त्याची वाट वेगळी,माझ्या पोरीची वेगळी. वर्ष झालं,माझ्या गौरीला भेटायलासुद्धा आला नाही. माझी पोर जीवंत आहे की गेली याचं त्याला काहीच पडलं नाय. नको त्याचे पैसे मला."
आक्का म्हणाली,"रखमे,त्याचंपण काय चुकलं गं? कधीपर्यंत या गौरीच्या बरी होण्याची वाट बघत बसणार तो तरणाताठा गडी. जाऊदे आपलंच नशीब समजायचं."
रखमा म्हणाली,"आक्का,तुझी सोबत आहे म्हणून धीर येतो बघ मला. गौरीचं हे असं झाल्यापासनं भावानबी यायचं टाकलं माझ्याकडं. रक्ताची नाती म्हणतो ती अशीच असतात का गं आक्का? वक्ताला उपयोगी पडत नाही ती नाती काय कामाची!"
आक्काला कुणीबी मायेचं नव्हतं. ती गौरीला आपली लेक मानत होती. दोघी एकमेकींना धरून जगत होत्या.
दिवाळीचे दिवस होते. मुलं किल्ला बनवण्यात गुंग होती. गौरी आपल्या बाहुलीला कडेवर घेऊन ऊन खात बसली होती. मुलांची दगड,माती आणण्यासाठीची धावपळ बघत होती. इतक्यात तिथे आक्का आली व मुलांना म्हणाली,"गौरीताईवर लक्ष ठेवा रे बाळांनो. मी वाण्याकडे जाऊन आली." मुलं हो म्हणाली खरं पण ती त्यांच्या खेळात रंगली. कोण माती भिजवतय,कोण दगडविटांच्या ढिगावर ती लिंपतय तर कोण किल्ल्याच्या बाजूला छोटीसी विहीर तयार करतय.. सगळ्याजणांच्या अंगात मावळा संचारला होता.
दुसऱ्या गल्लीतला पक्याभाई काही कामानिमित्त तिथून जात होता. ओट्यावर बसलेल्या गौराईचं कोणाकडेच भान नव्हतं. तिनं गाऊनची दोन बटणं उघडून बाहुलीला दुधाला लावलं. पक्याभाईचे डोळे त्या पुष्ट स्तनांकडे पहाताच दिपून गेले. त्याचे ओठ थरथरले. आजुबाजूला कोण नाही हे पाहत त्याने गौरीला गोड बोलून घरात न्हेलं. गौरीची वस्त्रं फेडली व स्वतःची हिंस्त्र भूक भागवली. पोट भरलेल्या श्वापदाप्रमाणे तिथून निघून गेला. गौरीलाही हे सुख बऱ्याच काळाने मिळाल्याने ती त्रुप्त झाली. तिने कपडे घातले व परत आपली बाहुली हातात घेऊन बसली.
आक्का परत आली तशी गौरीची तिने विचारपूस केली. गौरी गालातल्या गालात हसत होती पण भोळ्या आक्काला त्यातलं काही कळलं नाही. तिने गौरीला पिठलंभात भरवला. तिच्या बाहुलीलादेखील भरवला. रखमा आली तशी गौरीने रखमाला मिठी मारली नि गोड हसली.
"किती दिवसांनी हसली गं माझी बया. आता असचं हसतखेळत रहायचं," तिला म्हणाली.
गौरीचं गालातल्या गालात हासणं,हातांत चेहरा लपवणं..सगळं अजब होतं पण एवढा विचार करत बसायला रखमाकडे वेळ कुठे होता. एक काम सुटलं म्हणून तिला दुसरं काम शोधावं लागणार होतं. हातावरच्या पोटाची हीच तर्हा होती. तिच्या पावलोपावली खस्ताच लिहिल्या होत्या.
रखमा नि आक्की बाहेर जाण्याची व्यवस्था करुन पक्याभाई चारेकदा तरी आपली वासनेची भूक भागवून गेला. पुरुषसुख मिळाल्याने का काय पण गौरी थोडीफार सुधारु लागली होती. ती नीटनेटकी रहायची. पावडरगंध लावू लागली. गाऊन ऐवजी साडीत,ड्रेसमधे राहू लागली. बाहुली हळूहळू बाजूला ठेवू लागली. रखमेला कामात मदत करु लागली. रखमाला खूप बरं वाटलं. पोरगी सुधारली एकदाची पण तिला बिचारीला काय ठाऊक होतं पोरीच्या नशिबी पुढे काय वाढून ठेवलं होतं ते.
एकेदिवशी गौरी घरातच चक्कर येऊन पडली. नशीब,रखमा घरी होती. ती आता एका सुतिकाग्रुहात कामाला लागली होती. तिने गौरीला तिथल्या डॉक्टरांकडे न्हेलं. डॉक्टरांनी गौरीला तपासून तिला दिवस गेल्याचं सांगितलं तशी रखमा धाय मोकलून रडू लागली. डॉ.शेखरने तिला खुर्चीवर बसवलं,पाणी दिलं व गौरीबद्दल सगळी माहिती विचारुन घेतली.
डॉक्टर शेखरही गौरीची कहाणी ऐकून सदगदित झाले. "रखमा,आपण पोलिस कम्प्लेंट करुया. गौरीवर कोणी बळजबरी केली याचा शोध लागायला हवा."
रखमाने डॉक्टरांचे पाय धरले व म्हणाली डॉक्टर तसं कायबी करु नका.
डॉ.शेखरने गौरीला मदतनीस म्हणून आपल्या इस्पितळात कामावर ठेवलं. दिवसेंदिवस गौरीच्या पोटातला गर्भ वाढत होता. त्या जीवाच्या हालचालीने गौरी अधिक सजग होत होती. ती माणसात येऊ लागली. आता ती आई बनणार होती. ते बाळ चाळकऱ्यांच्या मते गौरीच्या नवऱ्याचं होतं. खरं काय ते फक्त रखमा,गौरी नि आक्काला ठाऊक होतं.
पोलिसांनी काही कारणाकरता लहानमोठ्या गुंडांना आत घेतलं होतं. त्यात पक्याभाईही होता. आठेक दिवसांनी घरी आला पण घरात विपरीत घडलं होतं. त्याच्या लाडक्या बहिणीला,पारुला दिवस गेले होते.
पक्याभाई हे कळताच लालबुंद झाला. त्याने हाताच्या मुठी आवळल्या. कपाळावरची शीर तटतटीत फुगली.
"कोण तो नाव सांग पारु त्या नराथमाचं."
"दादा, तो मारवाड्याचा राजू."
"त्याची ही हिंमत! राजू तू मेलास आता."
"दादा,जरा ऐकून घे रे माझं. माझं प्रेम आहे राजूवर. जे झालं ते आमच्या संगनमताने झालं. त्याने बळजबरी केली नव्हती माझ्यावर."
"मग आता..त्याला सांगितलंस तू हे दिवस राहिल्याबद्द्ल?"
"हो, त्याला आनंदच झाला रे पण त्याचे बापू नाही म्हणतात. त्यांना मी सून म्हणून नकोय रे. दादा,यात राजूची चूक नाही. नको मारुस तू माझ्या राजूला."
"भित्रा,डरपोक आहे तुझा राजू. तुला फसवलं त्याने. पारु,आंधळी झालैस तू त्या राजूच्या प्रेमात. काही करत नाही मी त्याला पण तुझं लग्न त्याच्याशीच लावून देणार. शब्द आहे आपला."
पक्याभाईने गेलरीतून शिट्ट्या मारताच त्याची गँग जमा झाली. रात्री अकरा वाजता मारवाडी व राजू दोघे दुकानात होते. दिवाळीच्या सामानाच्या याद्या भरत होते. इतक्यात साताठ मोटरसायकलींचा प्रकाश दुकानासमोर पसरला. हातात लोखंडी गज,हॉकी स्टीक्स,चेन घेतलेले ताकदवान गडी बाइकवरून उतरले. पक्याभाईने त्यांना हातानेच मागे रहायला सांगितलं.
ह्या लोकांना पाहून मारवाडी जागीच थरथरायला लागला.
पक्याने राजूची कॉलर पकडली. त्याला देवीच्या फोटोसमोर उभा केला.
"राजू,बोल पारुके पेट में जो बच्चा है वो किस का है?"
"मेरा है।"
"पारु से प्यार करते हो?"
"हां भाई।"
"फिर उसको अपनाते क्यों नहीं?"
राजूने बापूकडे पाहिलं. बापू तरीही धीर करुन म्हणाला,"ऐसे कैसे अपनाएगा वो! हमारी बिरादरी शीथू करेगी हमपर।"
"ठीक है तो मैं राजू को पुलिस के हवाले करता हूँ। फिर बिरादरी में मिठाई बाँट। चल राजू।"
पक्या राजूला घेऊन जाऊ लागला तसं मारवाडी हात जोडत त्याच्यासमोर उभा राहिला.
"कुछ ले दे के निपटा लेंगे पक्याभाई।"
"बहेन है वो मेरी। तुमने टांग अडायी तो तुम्हारी दुकान बंद हुयी समझ ले.। बोरियाबिस्तर बाँध और इधर से दफाँ हो चल।"
आता मात्र मारवाडी घाबरला. आयुष्यभराची मेहनत मातीमोल होणं त्याला मान्य नव्हतं. त्याने या लग्नाला संमती दिली.
पक्याभाईने चाळीत मंडप उभारुन दोन दिवसांत राजूचं आपल्या बहिणीशी लग्न लावून दिलं व काही जरी वाकडं वागलास तर गाठ पक्याभाईशी आहे असं त्याला त्याच्या गळ्यावर चाकू ठेवत सांगितलं. पारुच्या सासूसासऱ्यांनाही तंबी दिली.
सगळं व्यवस्थित झालं म्हणून पक्याभाईच्या आईने पूजा घातली. पक्याचे आईवडील पुजेला बसले होते. येणारीजाणारी माणसं पक्याला चांगलं काम केलंस,बहिणीला न्याय मिळवून दिलास म्हणत होती पण पक्याला देवासमोर ताठ मानेने उभं रहाता येत नव्हतं. त्याला गौरी आठवत होती. गौरीच्या वेडेपणाचा फायदा घेऊन त्याने तिचा घेतलेला भोग आठवत होता.
दुसऱ्या दिवशी दुपारी तो त्या गल्लीत गेला खरा पण गौरीच्या घराला टाळं होतं. गौरी व रखमा सकाळीच सगळं आवरून सुतिकाग्रुहात जायच्या त्या तिन्हीसांजेला घरी यायच्या. चारेक दिवस पक्याभाई गौरीच्या घराकडे घिरट्या घालतोय हे आक्काच्या लक्षात आलं.
आक्काने त्याला नाक्यावर गाठलं व त्याचं गौरीकडे काय काम आहे असं विचारलं तसा पक्याभाईने तिला बाजूच्या रामाच्या देवळात न्हेलं. रामाच्या साक्षीने त्याने आक्कासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली व आता त्याला त्याच्या क्रुत्याचा पश्चाताप होतोय,तो गौरीशी लग्न करायला तयार आहे असं सांगितलं. हे बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रु झरत होते. तो आक्काच्या पाया पडला.
आक्का म्हणाली,"तू असा गुंड,तुला नोकरीधंदा नाही. काय म्हणून ती रखमा आपली पोरगी तुला देईल?"
असं म्हणताच क्षणी पक्याभाईने समईच्या पेटत्या ज्योतीवर हात धरला व आजपासून कुमार्ग सोडण्याची शपथ घेतली. त्याचा हात चांगलाच पोळला. आक्काने रामरायाकडे पाहिलं. त्याच्या मुर्तीवरचं फुलं खाली पडलं. आक्काने ते आशीर्वाद म्हणून उचलून घेतलं.
आक्काने रखमाला पक्याभाईविषयी सांगितलं. पक्याभाई त्याच्या आईवडिलांना घेऊन आला व त्याने रखमासमोर लोळण घातली. गौरीला चौथा महिना लागला होता. रखमाने तिची पक्याच्या घरी पाठवणी केली.
पुढे बारसं व लग्न एकाच मांडवात पार पडलं. पक्याभाईचा प्रकाश झाला. नाक्यावर संध्याकाळी पक्या पावभाजीचा स्टॉल लावतो. घामाचा पैसा कमवतो. बाळ जरा मोठं होताच गौरी सुतिकाग्रुहात नोकरीला जाऊ लागेल. गौरीचा बाळ, कुशल आजीआजोबांसोबत खेळतो. रखमा नि आक्का आता एकत्रच जेवतात. अधेमधे गौरीचा संसार बघायला जातात.
-------सौ.गीता गजानन गरुड.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा