Oct 01, 2020
रहस्य

रख्मा

Read Later
रख्मा

रख्मा

©®राधिका कुलकर्णी.

 

"रख्मेऽऽ आता तुझ्या कामाचा व्याप अजून वाढणार आहे बरका गं.

पदर खोचून तयार रहा.

ऐनवेळी कुठे गावी बीवी जायला सुट्टी नको हो मागूस.आता पुढला महिनाभर तरी तूला कुठे जायला नाही मिळणार लक्षात ठेव"

नलिनी बाईंचे बोलणे ऐकतच रख्मा भांडी घासत होती.

शिरधनकर कुटूंब तसे खूप बडे प्रस्थ गावातले.

वाडीत सगळेच त्यांना खूप आदराने बघत.

कारणही तसेच होते.भाऊसाहेबांनी गावातल्या प्रत्येकाला हवी ती मदत केली.तंटा सोडवून समेट घडवण्यात तर त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता.म्हणूनच गेल्या तीन पिढ्यापासुन त्यांचे कुटूंब एकत्र गुण्या गोविंदाने नांदत होते.

घरात त्यांची पत्नी नलिनीताईंनीही तोच वारसा तंतोतंत पाळला होता.प्रसंगी कधी कधी त्या कडक वागत पण मनाने मात्र अगदी लोण्यासारख्या मऊ.रागावल्या तरी लगेच मायेने फुंकरही त्याच घालणार.दोघांनी मिळून घर कस अगदी अलगद फुला सारखे जपले होते.

भाऊसाहेबांना तीन मुले.त्यातल्याच धाकट्या मुलाच्या लग्नाचे ठरले होते.महिन्यावर लग्न आल्याने त्या जरा जास्तच खुषीत रख्माला गोड ताकीद देत होत्या.

रखमा गेल्या 20/25 वर्षापासुन ह्या घरची चाकरी करत होती.भाऊसाहेबांनीच एकदा रडत काम मागत आली म्हणून घरातल्या कामाला लावून घेतले होते.तिचा प्रामाणिकपणा,कामाचा उरक अन कमालीची स्वच्छता आणि सगळ्यात जास्त कौतुकास्पद गोष्ट म्हणजे अतिशय शांत स्वभाव.त्यामुळे प्रसंगी नलिनीबाई कितीही चिडून बोलल्या तरी ती शांत रहायची.

आता तर इतक्या वर्षात  सगळ्या घरादाराला रखमाची सवय झाली होती.ती असली की सगळे नीट होणार ही खात्रीच जणू.

घराचा कोपरान् कोपरा रखमाच्या स्पर्शाला आेळखायचा.

###############

 

शिरधनकरांच्या गेल्या तीन पिढ्यात एकही स्त्री आजवर नोकरी करता उंबरा आेलांडली नव्हती.

पण अविनाशच्या लग्नावेळी ह्या नियमाला मुरड घालून अर्थार्जन करणारी हुशार मुलगी निवडण्याचे औदार्य़ भाऊसाहेबांनी दाखवले होते.

अविनाश डॉक्टर होउन परदेशात उच्च शिक्षण घेवून आता मुबईत प्रॅक्टीस करत होता.त्यामुळे त्याला त्याच्याच व्यवसायातली डॉक्टर मुलगीच बायको म्हणून हवी होती.

अविनाश भाऊसाहेबांचे शेंडेफळ.पहिल्या पासुनच अतिशय कुशाग्र बुद्धी त्यामुळेच मग घरच्या शेतीकडे बघण्याचा कायदा तोडून भाऊसाहेबांनी अविला तालुक्याच्या ईंग्रजी शाळेत शिकायला घातले.

शिकून मोठ्ठा डॉक्टर झाला तरी कसला गर्व म्हणून नव्हता त्याला.गोरा वर्ण भारदस्त व्यक्तिमत्व आणि त्या रूपाला शोभेल असा नितांत शांत आणि मृदू स्वभाव.

एवढा डॉक्टर झाला तरी लग्नासाठी वधू-संशोधनाचे काम त्याने आई वडीलांवरच सोपवले होते.

नुमाही अगदी अविला शोभेशीच होती.

लांब सडक काळेभोर केस,केतकी सारखा गोरा वर्ण,सुंदर,टपोरे,बोलके डोळे,चेहऱ्यावर सतत एक स्मित झळकत असायचे.

शांत मनमिळाऊ तरीही तिच्या हुषारीची चमक नजरेत दिसायची.

कमालीचे साम्य होते दोघांच्या स्वभावात.

त्यामुळे एकमेकांना नापसंत करण्याचे कोणतेच कारण दोघांकडेही नव्हते.

तिही मुंबईतच प्रॅक्टीस करत होती.आणि पुढे एम्एस करायचाही तिचा मानस होता.पण इतके चांगले स्थळ आलेय म्हणल्यावर घरच्यांच्या मताला विरोध न करता तिने लग्नाला सहमती देवून टाकली होती.

अविनाशला स्वत:चे अद्ययावत सुखसोयींनी युक्त असे हॉस्पिटल मुंबईत उभारायची इच्छा होती.

मात्र भाऊसाहेबांना त्याने तेच हॉस्पिटल आपल्या गावात उभारून गावकऱ्यांना त्याच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा असे वाटत होते.

त्यावर त्यांचे अजून सहमत होत नव्हते.पण तुर्तास तो विषय बाजूला ठेवून सगळेच लग्नाच्या तयारीत जुंपले होते.

घरात आता माणूस,पै पाहुणा,नातेवाईक,गडी माणसे सगळ्यांचाच राबता वाढला होता.

रखमा सारखा खंदा गडी सोबत असल्याने नलिनीबाई निश्चिंत मनाने तिच्यावर सर्व सोपवून पंचक्रोशीतली निमंत्रणे स्वत: जोडीने देण्यासाठी कधी नव्हे ते घराबाहेर पडत होत्या.

म्हणता म्हणता दिवस घड्याळाच्या काट्यागत फिरले आणि लग्न पार पडले.

नुमाच्या घरी ती धरून फक्त चारच माणसे.त्यामूळे फार लोकांत वावरणे,खूप कामाचा व्याप ह्या सगळ्याची तिला सवयच नव्हती.

तसे घरात सगळ्याच कामाला गडी माणसे असल्याने काम असे नसायचेच पण तिला म्हणावा तसा एकटीचा कोपरा मिळायचा नाही.

मोठे कुटूंब म्हणून काही नियम होतेच.सकाळी सहा नंतर कोणीही अंथरूणात लोळायचे नाही.बायकांनी सगळ्यात अगोदर उठुन स्नान उरकूनच स्वैपाकघरात प्रवेश करायचा.त्याशिवाय पहिला चहा देखील मिळत नसे.

होस्टेलवर शिक्षण झाल्यामुळे ह्या सवयी तर नूमाला माहितच नव्हत्या.पण अविच्या प्रेमा खातर तीने हे सर्व आवडीने स्वीकारले होते.

पण सगळ्यात त्रासदायक जर काही असेल तर रात्री सर्व परिवार मिळून घातल्या जाणाऱ्या गप्पा.

लग्नानंतर तिला सतत वाटायचे की अविने तिला वेळ द्यावा,फिरायला दोघेच कुठेतरी बाहेर जावे,रात्री त्याने लवकर यावे.पण ह्यापैकी काहिही घडत नव्हते.

अविच्या स्पर्शाकरता आसुसलेली नुमा कित्येकदा वाट पाहून झोपून जायची.

मग केव्हातरी हाताच्या थंडगार स्पर्शाने जाग यायची.अवी जवळ येवून सलगी करताना बघुन थोड्याश्या नाराजीनेच ती विरोध करायची.

"किती वाजलेत बघितलेस का अवी ?

ही वेळ आहे का नको ते करायची? मला झोपू दे.सकाळी लवकर उठायचेय पून्हा."

अग् नविन लग्न झालेय आपले आणि तू रात्र जागवायची सोडून झोपतेस काय राणी! 

म्हणतच तीला आपल्या विळख्यात आेढायचा.

स्पर्शाने मोहोरलेली काया नाहीचे हो कधी म्हणते अन कधी ती त्याच्यात मिसळते नुमालाही कळत नाही.

"तू ना खूप चालू आहेस अवी"

"तूला कसे रे जमते माझा राग दूर करून प्रेमात ओढणे!"

"मी ही रोज ठरवते आज तुझ्या कुठल्याच थापांना बळी पडायचे नाही आणि चांगले पट्टीवर घ्यायचे.पण तू काय जादू करतोस की मी माझे सगळे विसरून जाते."

 

मला कळतय राणी इकडच्या वातावरणात तूझी खूप घुसमट होतेय.

बाहेर फिरायला जायची तूझी हौस मारावी लागतीय.सतत कोणीतरी आसपास असते, हवा तसा एकांत आणि वेळ आपल्याला एकमेकांसाठी मिळत नाही सर्व मला कळतेय पण इथे असे पर्यंत तरी हे नियम आपण मोडू शकत नाही.

आणि राहता राहिला रात्री उशीरा येण्याचा विषय तर ही सवय गेल्या कित्येक वर्षात मी अव्याहत चाललेली पाहतोय आमच्या घरात.

मी असा गप्पांच्या मधुनच निघून तुझ्याकडे आलो ना, तर घरचे लोक आपल्याला सतत दार वाजवून डिस्टर्ब तर करतीलच वर सतत टिंगल उडवून बायकोचा नंदीबैल म्हणून चिडवून हैराण करतील.

त्यांना तशी संधीच मिळू नये म्हणून मी ही रोज एक वाजे पर्यंत गप्पांमधे थांबतो.

नूमा तूला त्रास होतोय का ग ह्या सगळ्याचा?

नाही रे अवी.त्रास असे नाही पण मी खूप वेगळ्या संस्कारातून वाढलीय ना.

ह्या अशा नियमांची बंधने आमच्या घरी कधीच नव्हती.त्यामुळे हे सगळे स्विकारायला थोडा वेळ तर लागणारच ना.

मला फक्त तू सतत सोबत हवा असतोस आणि नेमके तेच इकडे मिळत नाही.

I really miss you darling..

 पून्हा एकदा दोघेही एकमेकांच्या बाहूपाशात घट्ट गुरफटली गेली.

 

################

 

पाच वाजता नलिनी ताई सगळ्यात अगोदर आवरून देवघरात पूजा करत असतानाच रखमा आली.

"मालकीण बाईऽऽऽऽऽ

पूजा करतासा जणू.."

"हो का गऽ,काय झाले,काही हवय का तूला?"

रखमाच्या बोलण्यावर उत्तर देतच नलिनीताई पूजा करत होत्या.

"जी,काय नाय जी.जरा बोलायच हुतं"

"मग अडखळतेस कशाला.बोल की.ऐकतेय मी."

"तस काही खास नाही जी.आपलं जरा ते हे....."

बोलण अर्ध्यावर सोडत रखमा एकदम पून्हा शांत झाली.

"का ग.काय बोलायचेय बोल की."

"जी काय नाय.होवुन द्या तुमची पूजा मंग बोलते.

लई काम पडल्यात.आधी काम उरकते बिगीबिगी"

नलिनीताईंनी बोल म्हणूनही ती झरकन कामाला निघुन गेली.

वीस पंचविस माणसाचा राबता असलेल्या घरात भांडी मात्र फक्त रखमाच घासलेली चालायची. 

तिच्या बदली कोणी काम करायला चालायचेच नाही.आरशा सारखी लख्ख स्वच्छ भांडी तिच्यासारखे कोणीच करत नसे.क्यामुळे रखमाच्या ह्या कामाला कधीच सुट्टी मिळत नसे.पण आज कारणच असे होते की तिला सुट्टी हवी होती.आणि तीच कशी मागावी म्हणून तिची जीभ रेटतच नव्हती.

त्या नुकतेच लगीन झालेले घर येणार जाणार चालूच कशी सुट्टी मागावी ह्या विचारातच तीने भांडी घासली.

हं बोल ग आता काय म्हणतेस.

काही हवे असेल तर नि:संकोच माग.

"बाई मला ह्या महिन्याचा पगार हवा होता.."

अग पंधरा दिवस आहेत अजून महिना भरायला.तूला अाधीच कशाला हवाय ग पगार?

नलिनीबाईंचा आवाज किंचित चढलाय हे तिलाही जाणवले.ती खालमानेनेच उभी राहीली.

"मी तुमचा पैसा बुडवणार न्हाय बाई.अडचण आलीया थोडी म्हणून गरज व्हती."

असली कोणची गरज ग तूला.तुझे खाणे पिणे राहणे कपडा लत्ता सगऴे तर आम्हीच करतो वर पगार पण देतो बिनचूक एक तारखेला मग कसली गरज पडली आता?

नलिनी ताई बरोबरच बोलत होत्या रखमाचा सर्व खर्च गेल्या वीस वर्षापासून हेच लोक करत असत.

"न्हाईजी.तस काय बी न्हाय.

गावाकड माय आजारी हाय निरूप आला म्हणून जरा जावून याव म्हनत व्हते.तसे तर बिमार पडून बी लई दिस झाले पन घरी लगीनघाई सोडून कशी जावू म्हणुन जीव मुठीत घेवून ऱ्हायले. पण आता दोन दिस जावून याव म्हनते.

त्हिकड् इलाजाला बी पैक न्हाइत.

बिचारी पार हथरूणाला खिळलीय माय.

शेवटी तिच्याबिगर मला अन् माझ्याबिगर तीलाआता कोण हाय मायेच मला.

जलम दिल्याचे ऋण न्हाय फेडले तर जलम फुका गेला. मग पैका जमून तरी काय उपेग नंतर."

तिच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.गळा रूद्ध झाल्याने शब्द घशातल्या घशातच अडकले होते.

आता नलिनीताई पण भावूक झाल्या होत्या.काही न बोलता तिच्या बोलण्याला मुक संम्मतीच देत होत्या.

काय करावे त्यांना काहीच सुचत नव्हते.रखमा गेल्यावर तिचे काम करणार कोण हाच मोठ्ठा प्रश्ऩ नलिनीताईंना भेडसावत होता.

बर तू बाकीची कामे उरक मग बघू म्हणत त्यांनी विषय तात्पुरता मिटवला.रखमाही डोळे पदराला पुसत दुसऱ्या कामाला लागली.

सगळा खर्च वर्षाचा करूनही दरमहा भाऊसाहेब तिला पाच हजार पगार देत होते.तिने कधी ही पगार वाढवा म्हणली नाही की कधी उशीर झाला म्हणून स्वत:हून मागणी केली नाही.

तेच सगळे आठवून तिला पैसे द्यावे हे तर ठरवलेच होते नलिनीताईंनी फक्त प्रश्न होता तो तिच्या बदली कामाचा.

शेवटी निघताना नलिनीताईंनी तिला बोलावून हातात पाच हजार ठेवले आणि म्हणाल्या बघ अजून महिना भरला नाही तरी पूर्ण पगार देतीय पैसे बुडवू नकोस हो.

आणि लवकर ये कामावर.तुझ्याशिवाय कोणाच्या हातचे काम मला आवडत नाही माहितीय ना तूला?

"व्हय जी.लवकर येते.तिला बर वाटल तर इकडच घेवून येते.पण आता निदान हप्ताभर तरी म्या न्हाय यायची.

लय उपकार झाले.जाते म्या"

डोळ्यांच्या कडा पुसतच रखमा बाहेर पडली.

आठवडा उलटून गेला तरी रखमाची काहीच खबर नाही.नलिनीताई आता जास्त अस्वस्थ झाल्या आणि मनातून चीडही येत होती तिच्या खोटे पणाची.आठ दिवस सांगून गेली तरी ना निरोप ना बातमी.

शेवटी त्यांनीच एक गडी गावी पाठवुन चौकशी करायला सांगीतले.

गडी रतोरात गावाहून परत आला.जरासा घाबरलेलाच होता.

काय झाले? कुठेय रखमा?

न्हाई ताईसाहेब.रखमा गेली..

गडी हमसून हमसून रडायला लागला.

गेली? कुठे गेली?

आईचे गाव सोडून दुसरीकडे कुठे गेली ही?

न्हाई ताईसाहेब रखमा देवाघरी गेली.

कायऽऽऽऽऽ?

हे कधी झालं,कोणी सांगीतल तूला हे?

आईला बर वाटत म्हणून म्हणल्याप्रमाण ती यायला निघाली वाटेतच अॅक्सिडेंट झाला.गाडीने पलटी खाल्ली न तीकडच जीव गेला म्हणे.दोन दीस कळलच न्हाय नंतर दोन दिवसांनी पोलीसांनी बॉडी बघितली पार सडून गेली व्हती.आय वाचली अन हीच गेली.

ऐकुन पायाखालची जमीनच सरकली नलिनीताईच्या.काय बोलाव हसाव का रडाव कुणाला सांगावे काहीच सुचेनासे झाले होते.इतक्या वर्षात कधी कामात एक दिवस उशीर न केलेली रखमा मात्र स्वत:च्या मढ्याला कोणी विल्हेवाट लावल म्हणून वाट पहात राहीली असल.अस कस मरण तिच्या नशीबाला आल दैवच जाणे..

आता पर्याय तर शोधायलाच हवा होता.

तिच्यासारखे स्वच्छ काम आणि नलिनीताईचा कडक,शिस्तप्रिय स्वभाव दोन्हीला झेलून काम करणारी बाई मिळणे कठिण होवून बसले होते.

 

####################

 

सकाळी रोजच्या सारखेच पाचला उठून सवयीनेच नलिनीताई परसदारी गेल्या.

भांडी घासुन पडलेली बघून जीव भांड्यात पडला.कोणी तरी गडी माणूस केला दिसतोय.

पण कसे केलेय ?

की पून्हा घासावी लागणार देव च जाणे.

पण आश्चर्य म्हणजे रखमेला लाजवेल इतके तोडीसतोड काम केले होते नव्या गड्याने.

नलिनीताईंना तर आनंदाला पारावारच ऊरला नाही.

रोज लवकर उठुन बघूया म्हणे पर्यंत काम करून गडी पसार झालेला असायचा.घरात जेवढी माणसे तेवढेच गडी वावरायचे.

कुणाकुणाला विचारणार?

ज्याला विचारू तो हेच बोलतो,"म्या न्हाय पाहिले."

शेवटी एक दिवस नलिनीबाईंनी हा विषय भाऊसाहेबांना बोलून दाखवलाच.

अहो रखमाच्या जागी कोण गडी ठेवलाय तुम्ही?

का? काय झाले आता?

काम नीट करत नाहीये का?

काय अडचण आहे?

हे बघा सगळे लोक एक सारखे नसतात कामात.काही वेळा वेळ निभावून न्यायला शिकल पाहिजे.रखमा सारखेच काम जमत नसेल तर काढून टाकू नका लगेच.होईल तयार हळुहळू.

तुमच्या बायकी कारभारात आता आम्हाला डोक लावायला लावू नका. आम्हाला भरपूर व्याप आहेत.

आज कधी नव्हे ते भाऊसाहेब जरा वैतागून बोलत होते.नलिनीताईंचे काहिही न ऐकून घेताच त्यांना गप्प करत आपले बोलणे चालू ठेवले होते.

अहोऽऽऽ मी त्याची तक्रार करतच नाहीये. उलट त्याचे काम अगदी रखमा सारखेच काकणभर जास्तच स्वच्छ आहे.म्हणून नवल वाटतेय की कोण आहे तो.तुम्ही कुठून शोधून आणलात असा माणूस?

बर झाल तुमच्या पसंतीला उतरला म्हणजे भरून पावल.

आम्हाला वाटले की आता काय नविन तक्रार.

बर पण त्याला काम संपल्यावर निदान मला भेटून जायला तरी सांगा.तो ऐकेल तुमचे.

"तो कोण कुठला काय नाव गाव काहीच माहीत नाही असे नको व्हायला ना."

"हे बघा सौभाग्यवती,आता उद्या तो कामावर आला की तुम्हीच विचारा त्याला आणि तुमचे नियम पण समजवा.

मला ह्या फंदात नका पाडू आता."

भाऊसाहेबांनी एका दमात सगळा विषय निकालात काढला त्यामुळे नलिनीताई निमूटपणे तिकडून निघुन गेल्या.

दुसऱ्या दिवशी पहाटे जरा लवकरच उठून त्या परसदारी गेल्या.अजून भांड्यांचा ढिग तसाच पडलेला होता.म्हणजे अजून तो कामावर आला नाहीये ह्या खात्रीने मनोमन खूष झाल्या नलिनीताई.

कारण आज त्या त्याच्याशी भेटू शकणार होत्या.परसदारी कसलीशी खुडबूड झाली पण अंधारात कोणी दिसेना.मांजर वगैरे उडी मारून गेले असावे असा विचार करून त्या तिकडेच खुर्चीत बसून राहील्या.पहाटेच्या मंद झुळुकीने कधी डोळा लागला कळलेच नाही.जाग आल्यावर काहीशा धडपडतच परसदारी गेल्या तर भांडी नेहमी प्रमाणेच घासून लख्ख करून तो आजही नलिनीताईंना न भेटताच निघुन गेला होता.आठ दिवस सतत हाच प्रकार घडत होता.एखादा देवदूत जसा यावा तसा हा नवा गडी काम करून अंतर्धान पावत होता.नंतर मग नलिनीताईंनीही विचार सोडून दिला.जावूदे. येवून काम करून जातोय ना निमुट मग राहूदे.

ज्या दिवशी तो स्वत:हून भेटायला येईल, महिना झाला की पगाराला येईल तेव्हा बोलू.

त्यामुळे आता जरा निश्चिंत झाल्या होत्या नलिनीताई.

त्याच्या येण्याच्या दिवशी रोज खूणा मात्र करत होत्या. आज बरोबर पंधरा दिवस होवून गेले होते.

नेहेमी प्रमाणेच नलिनीताई परसदारी गेल्या.

रोजच्यावेळी जिथे लख्ख भांडी दिसायची तिकडे आज तशाच खरकट्या भांड्यांचा ढिग बघून जराशा आश्चर्यचकितच झाल्या.

पून्हा परतून दार बंद करणार तेवढ्यात एक आवाज एेकून त्या हादरल्याच.

आवाज ओळखीचा होता.

थोड नीट बघितल्यावर दिसले की रखमाच ऊभी होती.

अग् कुठ होतीस इतके दिवस.आणि अशी गुपचूप का जात होतीस काम करून?

"मालकिणबाई,मी तुमचे पैसे बुडवले न्हाई.तुमचे ऋण फेडल्या बिगर मला मुक्ती बी भेटणार नाय बाई.

पंधरादिवसाचे काम करून चाललीय म्या."

क्षणभर ती काय बोलतीय हेच कळत नव्हते नलिनी बाईंना.

अंगाला दरदरून घाम फुटला होता आणि त्या अंथरूणावरच एखाद्या स्वप्नातून जाग्या व्हाव्या तशा जाग्या झाल्या.

आपण स्वप्नच बघत होतो तर!

विचार करतच त्या लगबगीने परसदारी गेल्या.

आज सोळावा दिवस होता.खरकटी भांडी तशीच पडलेली होती.

पंधरा दिवसांच्या कामाचे ऋण  फेडून रखमा खरच मुक्त झाली होती आज...

 

------------------(समाप्त)-------------------------

 

©®राधिका कुलकर्णी.

 

नमस्कार वाचक गण…..!

ही एका वेगळ्या विषयावरची कथा पॅरानॉर्मल अॅक्टिव्हीटीजवर एका स्पर्धेकरता लिहीली होती.

सांगायला अतिशय आनंद होतोय की त्या स्पर्धेत ह्या कथेला पहिले पारितोषिक मिळाले.मला तुमच्याही प्रतिक्रीया ऐकायला नक्की आवडतील..

तेव्हा कथा वाचुन तुमचे अभिप्राय नक्की कळवा.

लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन..माझ्या नावसहीत ही कुठेही शेअर करू शकता..

धन्यवाद.

@राधिका.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..