राखणदार.. अंतिम भाग

रहस्य एका विहिरीचे


राखणदार.. भाग ९


मागील भागात आपण पाहिले की कनिका गुप्तधन बघायचा हट्ट धरते. आता बघू पुढे काय होते ते.


" कधीची तळमळते आहे मी इथे. ढकल त्याला विहिरीत. संपव त्याचा वंश आणि दे मला मुक्ती." कोणीतरी कनिकाच्या कानात गुणगुणू लागले. कनिका सुयशला ढकलण्यासाठी पुढे आली. तिने तिचे हात वर उचलले. ती त्याला ढकलणार तोच तिचे हात वरचेवर पकडले गेले आणि ताकदीने तिला पाठी ढकलले. विहिरीतले पाणी उफाळून आले होते पण पाण्याचा एकही थेंब बाहेर येऊ शकत नव्हता. आजोबांनी सुयशला बाजूला घेतले. आजींनी पकडलेली कनिका अजूनही सुटण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यांची पकड मजबूत होती. कनिका सगळ्यांकडे रागाने बघत होती. आजोबा पुढे झाले. काहीतरी पुटपुटत त्यांनी थोडे भस्म कनिकाच्या कपाळी लावले. तिला ते सहन झाले नाही. ती बेशुद्ध होऊन खाली पडली. ते बघताच सुयश तिच्याकडे धावत गेला. त्याने तिला जवळ घेतले.

" हे नक्की काय चालू आहे, मला समजेल का? उगाच आलो मी इथे. मी तिथे माझ्या घरीच खुश होतो. काहीतरी करून मी घर चालवलं असतं. का आलात तुम्ही आमच्या आयुष्यात?" सुयशच्या डोळ्यात पाणी होते.

" जे होणार असतं त्याला रोखू कोणीच शकत नाही ना. हिला घेऊन आत चल. आता तुला धोका नाही."

सुयशने कनिकाला उचलले आणि आत घेऊन गेला. तिच्या तोंडावर पाणी शिंपडताच ती शुद्धीवर आली.

" तिला मुक्ती हवी आहे. ती सांगत होती."

भेदरलेली कनिका बोलू लागली. तिचा आधीचा आवेश कुठेच दिसत नव्हता.

" हे फक्त ती बोलते. इनामदारांच्या प्रत्येक नवीन सुनेला तिने असेच बोलावून घेतले आहे. आणि त्या सुनेच्या हातून तिच्या नवर्‍याला विहिरीत ढकलायचा प्रयत्न केला आहे. आम्ही इथे आहोत म्हणूनच ती आजपर्यंत कोणाला मारू शकली नाही. तिच्या याच त्रासाला कंटाळून तुझ्या वडिलांनी हे गावच सोडले. तुम्ही इथे आलात तेव्हाच मला अंदाज आला होता, सूनबाईंना स्वप्न पडत असण्याचा. म्हणून आम्ही तुला इथे येऊ देत नव्हतो. तुझे आईवडील जोपर्यंत होते तोपर्यंत वर्षातून एकदातरी इथे येत होते. पण कधीतरी हे तुला समजणे सुद्धा गरजेचे होतेच. म्हणून तू आल्यावर आम्ही घटना जश्या घडत होत्या तश्या घडू दिल्या." आजोबा सांगत होते.

" पण मग हे संपणार तरी कधी आणि कसे?" कनिकाने उद्विग्न होत विचारले.

" देवास ठाऊक.." खांदे उडवत आजोबा म्हणाले.

"देव कधी करेल मला माहित नाही पण मला काय करायचे आहे ते मला समजले आहे." विचार करत सुयश म्हणाला.
" आजोबा, कनिका चला माझ्यासोबत. आज हे सगळं संपवूयाच." सुयश एका निर्धाराने बोलत होता.

सुयश, कनिका आजोबांसोबत बाहेर पडले. सुयशने आजोबांना गुप्तधनाच्या जागी नेण्याचा आग्रह केला. ते नाही म्हणूच शकले नाही. तिथे गेल्यावर त्यांनी तिकडच्या कपारीचा दरवाजा उघडला. सुयशने तिकडचे काही दागिने उचलले. ते सगळे परत घरी आले. सुयश आला तो थेट विहिरीपाशी गेला.

" घे.. तुला हेच हवं होतं ना? हा पैसा, ही दौलत आणि अजून काही काही." सुयशने ते दागिने विहिरीत फेकले. त्या विहिरीतून खदाखदा हसण्याचा आवाज आला.

" त्याच पैशाच्या हव्यासापोटी तू स्वतःचा जीव गमावलास, तुझ्या मुलाचाही जीव गमावलास. आणि तरिही तुझे समाधान झाले नाही?" सुयश बोलतच होता.

" सूड घ्यायचा आहे मला.. सूड.." विहिरीतून आवाज आला.

" कोणाचा? आणि कशासाठी?"

" तुम्हा सगळ्यांचाच.. त्यांनी मारले आम्हाला. आणि तुम्ही त्यांचेच वंशज."

" खरं? त्यांनी मारले की तो फक्त एक अपघात होता?"

" ते माझ्या मुलाला काही देत नव्हते. मला परत दरिद्री व्हायचे नव्हते." त्या आवाजाने एक हुंदका दिला.

" खरेच तुला काही मिळाले नाही? आठव तुझी माहेरची परिस्थिती. जिथे पोटात दोन घास जायची मारामारी. इथे सुग्रास जेवण मिळत होते म्हणून कशी नोकराचाकरांवर रूबाब दाखवायचीस? तुझ्या मुलालाही सगळं मिळालं असतं पण तुला हाव सुटली. तशीच लालच दाखवून तू मेल्यानंतरसुद्धा या घरच्या सुनांना मोहवून टाकत होतीस. पण तुला मिळाले काय? तर हे असं या विहिरीत तडफत राहणं. आता सुद्धा तुला संधी आहे. सोड हा हव्यास. तू ही मुक्त हो आणि आम्हालाही सुखाने जगू दे. तुझं मरण हा अपघात होता. तो स्वीकार आणि मुक्त हो." सुयश विहिरीसमोर हात जोडत म्हणाला.

" आणि ज्या धनापायी हे सगळं सुरू झाले ते कारणच आपण संपवूया.." कनिका आत्मविश्वासाने बोलली.

" कसे?" आजोबांनी अविश्वासाने विचारले.

" आजोबा, खरंतर हे धन महाराजांचं आहे. त्यावर आपला कोणाचाच हक्क नाही. हे आपण सरकारच्या ताब्यात देऊ. आणि या गावासाठी इनामदार म्हणून विकासाच्या योजना राबवू.."

" मलाही हेच योग्य वाटते. त्याआधी मी या पणजीचे श्राद्ध करणार आहे." सुयश बोलला. आता विहिरीतून फक्त रडण्याचे आवाज येत होते, ते रडणं होतं पश्चातापाचे.

लगोलग गावातल्या गुरूजींना बोलावून भामेचे श्राद्ध करण्यात आलं, जे इतक्या वर्षात कधीच झालं नव्हतं. सुयशने तर्पण केले. तिच्या नावे विहिरीवर नेवैद्य ठेवला. काही क्षणातच तो नेवैद्य नाहिसा झाला. इतके दिवस काळ्याशार पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या त्या विहीरीचे पाणी अचानक स्वच्छ झाले. त्याची पातळीही कमी झाली. ते बघून आजोबांनी सुस्कारा सोडला.

" आता हिला मुक्ती मिळाली. आमचे इकडचे काम संपले. आम्हालाही आमच्या वचनातून मुक्त कर. म्हणजे आम्ही आमच्या निवासस्थानी जायला मोकळे." आजोबा आजींकडे बघत बोलले.

" असं कसं होईल.. उलट तुमची तर जबाबदारी वाढली आहे. आपण जे धन सरकारदरबारी जमा करणार आहोत त्याबदल्यात आपल्याला सरकारकडून जी रक्कम मिळणार आहे त्यात आपण गावासाठी अनेक उपयोगी कामे करणार आहोत. त्याची राखण तुम्हालाच करायची आहे." सुयश आजोबांना अडवत म्हणाला.

" हो पण त्याआधी.. हे सगळं तुमच्यासाठी." आतून कनिका एका हातात नेवैद्य आणि दुसर्‍या हातात पूजेचे साहित्य घेऊन आली. तिने आजीआजोबांना पाटावर बसवले. त्यांची पूजा केली आणि सुयशच्या हातात एक स्तोत्र दिले. दोघांनी ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. ते म्हणून झाल्यावर तो नेवैद्य त्याने त्या दोघांना दाखवला. ते दोघेही आश्चर्यचकित झाले.

" तुम्हाला हे कुठे सापडले?"

"पणजोबांच्या फडताळात. त्यांनी नेवैद्य काय असावा, कसा अर्पण करावा, कोणते स्तोत्र म्हणावे या सगळ्याची माहिती लिहून ठेवली आहे. " कनिका हसत म्हणाली.

सुयश आणि कनिकाने केलेल्या पूजेने आजीआजोबा प्रसन्न झाले. गुप्तधन सरकारदरबारी जमा झाल्यानंतर सुयश आणि कनिका परत जायला निघाले. निघताना सुयशच्या सहकार्‍याचा फोन आला. त्यांच्या बॉसने त्याचा जुना कारखाना सुरू करायचे ठरवले होते. त्यामुळे सुयशची नोकरी परत सुरू होणार होती. कनिका आणि सुयश दोघेही आनंदाने परत जायला निघाले. निघताना त्यांनी परत परत आजीआजोबांना नमस्कार केला. आम्ही प्रत्येक अमावस्या, पौर्णिमेला नक्की येऊ असं सांगून ते घरी जायला निघाले.

सुयश आणि कनिकाची गाडी गावाच्या बाहेर पडताच आजी आजोबा खाली बसले.

" त्या दोघांनी सगळी संपत्ती दान केली आता पुढे काय?" आजींनी विचारले.

" त्यांनी त्यांना माहित असलेली दान केली. जी माहित नाही त्याचे काय?" आजोबा हसत म्हणाले. दोघेही आपल्या मूळ स्वरूपात परत आले. सरपटत दोघेही वाड्याच्या तळघराच्या दिशेने निघाले. तिथे इनामदारांच्या मूळपुरूषाने भलीमोठी संपत्ती लपवून ठेवली होती. लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून त्यातला थोडासा भाग राखणदाराच्या वास्तूत ठेवला होता.
त्याची जागा म्हणून अमावास्या, पौर्णिमेला तिथे जाऊन पूजा करायची प्रथा मूळ पुरूषाने पाडली होती.


आता जर कोणी तळघरात चुकून आलं असतं तर त्याला दिसलं असतं समोर असलेला खजिना आणि त्याची राखण करणारे दोन राखणदार.. विहिरीचे रहस्य
सुयश कनिकाला समजले, या धनाचे समजेल?



वरील कथा ही काल्पनिक आहे. ती मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात आली आहे. ती कशी वाटली ते सांगायला विसरू नका.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all