Mar 04, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

राखणदार.. भाग ८

Read Later
राखणदार.. भाग ८


राखणदार.. भाग ८

मागील भागात आपण पाहिले की भामाच्या हट्टी स्वभावामुळे तिचा विहिरीत मृत्यु होता आणि तिच्या मुलाचाही. आता बघू पुढे काय होते ते.


" तुझा विश्वास आहे या सगळ्यावर?" रात्री झोपायची तयारी करत असलेल्या कनिकाला सुयशने विचारले.

" काहीच समजत नाहीये.. विश्वास ठेवायचा की नाही. एक मन सांगते की हे स्वप्न आहे. तोच समोर वावरणारी माणसे, खरंतर त्यांना माणसे म्हणायचे तरी का, हाच विचार मनात येतो." कनिका विचारात गढली होती.

" आता पुढे काय? तुझे झाले समाधान हे सगळे बघून? आता जाऊया परत आपल्या घरी? मला इथे ना काहीतरी विचित्र वाटतं आहे." सुयश अस्वस्थ होत होता.

" सुयश.." कनिका अडखळली.

" बोल ना.."

" आपण ते धन बघायला जाऊ या?"

"क्काय?" सुयश जोरात ओरडला.

" हो.. मला पण ते बघावेसे वाटते आहे. तू त्या आजोबांना विचार ना ती जागा कुठे आहे ते? आपण ते बघून येऊ आणि मग जाऊ आपल्या घरी."


कनिकाचे हे बोलणे होताच खालून विहीरीतले पाणी घुसळले जाण्याचा आवाज येऊ लागला. जणू तो आवाज सुयशला सांगत होता, ते धन तुम्हाला मिळणार नाही. कनिका पटकन खिडकीजवळ गेली. तिला खाली आजोबा दिसले. ते कसलेसे मंत्र पुटपुटत होते. हळूहळू त्यांचा आवाज थांबला. आणि अचानक त्यांनी वर बघितले. त्यांची ती नजर कनिकाला सहन झाली नाही. ती खिडकीतून पटकन बाजूला झाली. सुयश पलंगावर विचार करत पडला होता.

" उद्या विचारशील ना त्या आजोबांना?" कनिकाने झोपण्याआधी परत विचारले.
मान हलवून सुयश झोपी गेला सुद्धा.


" आजोबा, ती जागा बघायला जाऊयात?" सुयश काहीच बोलत नाही हे बघून सकाळी कनिकानेच विचारले.

" कोणती जागा?"

" तीच गुप्तधनाची."

" कशासाठी?"

" तुम्हीच म्हणालात ना ते आमचे धन आहे. मग ते बघायला कारणाची गरज काय?" कनिकाचा आवाज वाढला होता. ते बघून खरंतर सुयशलाही आश्चर्य वाटत होते. आजोबांनी कनिकाकडे एकदा निरखून बघितले.

" बरं.. जाऊ.."

" आजोबा, पण तो नेवैद्य?" सुयशने विचारले.

" कसला नेवैद्य?"

" तोच.. जो पणजोबा दाखवत होते तो."

ते ऐकून आजोबा जोरात हसले.

" कोणाला दाखवणार तो नेवैद्य?"

" म्हणजे?"

" ते ज्या राखणदाराची पूजा करत होते तो तुमच्या समोर आहे. "

" मग ते धन असुरक्षित आहे?" कनिकाने विचारले.

" असं कसं होईल? आमच्यावर जबाबदारी आहे त्याची. पण जाण्याआधी एक प्रश्न विचारतो सूनबाई, खरं खरं सांगा. तुम्हाला विहीरीतल्या बाईची स्वप्ने पडतात का?"

ते ऐकून सुयश आणि कनिका दोघेही थक्क झाले.

" तुम्हाला??"

" चला.. धन बघायला जाऊ." त्यांना बोलू न देता आजोबा बोलले. आज त्या विहिरीतून कसलाच आवाज येत नव्हता. ती अगदीच शांत झाली होती. तिघे निघाले. काहीतरी विसरले म्हणून आजोबा परत घरात गेले. सुयशची अस्वस्थता अजूनही गेली नव्हती. त्याच अवस्थेत तो विहीरीजवळ जाऊन पोहोचला. त्याच क्षणी विहीरीतलं पाणी खवळलं. कोणी तरी कनिकाच्या कानात येऊन गुणगुणू लागलं.

" कधीची तळमळते आहे मी इथे. ढकल त्याला विहीरीत आणि दे मला मुक्ती." कनिका भारावलेल्या अवस्थेत पुढे जाऊ लागली. सुयश विहीरीजवळ तसाच उभा होता. कनिका त्याच्याजवळ आली. तिने दोन्ही हात वर उचलले..
कनिका ढकलेल का सुयशला विहिरीत? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//