Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

राखणदार.. भाग ७

Read Later
राखणदार.. भाग ७


राखणदार.. भाग ७मागील भागात आपण पाहिले की भामा आणि लक्ष्मीबाई दोघींनाही मुलगा होतो. भामा माधवराव आणि लक्ष्मीबाईंच्या पाठी जाते. आता बघू पुढे काय होते ते.


"राखणदारा, तुझा नेवैद्य आणला आहे. तो ग्रहण कर आणि आमच्यावर तुझी कृपा अशीच कायम ठेव."

माधवराव प्रार्थना करत होते. लक्ष्मीबाई त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. माधवरावांचे स्तोत्र म्हणून होताच तिकडची कपार उघडली गेली. तो पिवळाधम्मक प्रकाश लांबूनही भामेला सहन झाला नाही. तिने डोळे मिटले. तिने परत डोळे उघडले तेव्हा लक्ष्मीबाई आणि माधवराव गुडघ्यांवर खाली बसले होते. समोर एक जोडपे उभे होते. त्या जोडप्याची हे दोघे पूजा करत होते. आतमध्ये धनाच्या राशी दिसत होत्या. भामा पाठी वळली. परतीच्या प्रवासात तिने मनाशी एक निर्णय घेतला होता. जे दारिद्र्य तिने उपभोगले होते ते तिच्या लेकाच्या वाट्याला येऊ नये म्हणून ती वाटेल ते करणार होती.


" मला एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा आहे." रात्री माधवराव भामेच्या दालनात येताच तिने बोलायला सुरुवात केली. तिचा आविर्भाव माधवरावांना आवडला नाही.

" कसला सोक्षमोक्ष?"

" या संपत्तीचा आणि तिच्या वारसाचा.."

" घरातल्या बायकांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी तरी अजून इनामदारांवर वेळ आली नाही. तरिही ऐकायचे असेल तर ऐका. गोविंदा मानाने मोठा आहे. आमच्या पश्चात सगळे हक्क गोविंदाकडे जातील."

" आणि माझ्या हरीचे काय? वयाने तर तो मोठा आहे. त्याने काय लोकांपुढे सतत हात पसरायचे?" भामाच्या तोंडाचा पट्टा सुटला होता.

" हात का पसरावे लागतील? त्याच्या नावानेही शेतीवाडी असेलच." माधवराव समजवायचा प्रयत्न करत होते.

" डबोलं त्याच्याकडे आणि उरलेली शितं आमच्याकडे? असं चालणार नाही. माझा हरी मोठा आहे तर सगळं त्यालाच मिळालं पाहिजे.. त्या शेतातल्या धनासकट सगळं."

भामेचं बोलणं ऐकून माधवराव चमकले.

" तुला कसं माहीत?"

" मी बघितलं." भामाचा आवाज चढला होता.

" तू जर सरळमार्गी असतीस ना तर स्वतःहून सगळं दाखवलं असतं.. पण तुझ्या या कोत्या वृत्तीमुळेच तुझ्याकडे यायची काय त्या हरीला सुद्धा घ्यायची इच्छा होत नाही." माधवराव दालनातून बाहेर पडत म्हणाले.

" मी अशी नाही जाऊ द्यायची. मला हे वैभव हवं आहे." भामा ओरडत म्हणाली. माधवराव तिच्याकडे लक्ष देत नाही हे बघून तिने हरीला घेतले आणि ती विहिरीजवळ गेली.

" बोला करता का नाही सगळं याच्या नावावर? की मारू उडी विहीरीत?" भामेचा आवाज ऐकून वाड्यातले सगळेजण खाली आले होते. छोटा हरी काहीच न समजून रडत होता.

" धाकल्या बाई वेडेपणा करू नका. हरीला इथे द्या आणि तुम्ही सुद्धा या बाजूला या." लक्ष्मीबाई ओरडत होत्या.

" थांबा, मीच आणतो त्याला इथे." माधवराव पुढे झाले. आणि अचानक भामेचा पाय सटकला. तिच्या हातून हरी खाली जमिनीवर पडला आणि ती विहीरीत पडली. रात्रीची वेळ. दाट पसरलेला अंधार. गडी माणसं तिला काढायला येईपर्यंत भामेचा जीव गेला होता. छोट्या हरीला जोरात लागले होते. त्याने कसाबसा चार दिवस तग धरला. पाचव्या दिवशी त्यानेही प्राण सोडला. बस्स तेव्हापासून हे विहिरीचे नाटक सुरू झाले." आजोबांनी आपली गोष्ट संपवली.

" पण मग माझे बाबा इथे का नव्हते रहात? आणि तुम्ही इथे?" सुयशने विचारले.

" तिचे अस्तित्व जाणवायला लागल्याबरोबर तुझ्या पणजोबांनी हा वाडा रिकामा केला. गावात अशी वंदता पसरली होती की भामेचा खून झाला. ही गोष्ट त्यांच्या मनाला फार लागली. म्हणून ते वाडा सोडून दुसरीकडे रहायला गेले. गोविंदा म्हणजे तुझे आजोबा इथे येऊनजाऊन असायचे. सगळे कुळाचार पाळायचे. तिचीही ओटी भरायचे. पण तिच्या विखारी अस्तित्वाची जाणीव झाल्यामुळे तुझ्या वडिलांना मात्र त्यांनी यापासून दूर ठेवले. "

" पण मी तर तुम्हाला पाहिले होते माझ्या लहानपणी." सुयश बोलला.

" हो.. तुझ्या बाबांची नोकरी गेली होती. तुझ्यासारखंच सर्व संपलं असं त्याला वाटत होतं तेव्हा मी आलो होतो मोहरा घेऊन."

सगळे शांत बसले. बोलता बोलता अचानक निर्माण झालेल्या या शांततेने सगळ्यांनाच काय करायचे ते सुचेना. विचार करता करता सुयशला आठवले की कनिकाला अशाच विहिरीतून हाक मारणाऱ्या बाईचे स्वप्न दिसत असायचे. ती बाई हीच तर नव्हे? त्याने कनिकाकडे बघितले , ती ही त्याच्याकडेच बघत होती. काय होते तिच्या मनात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//