राखणदार.. भाग ६

रहस्य एका विहिरीचे


राखणदार.. भाग ६


मागील भागात आपण पाहिले की कनिका विहिरीची ओटी भरते. आजोबा त्या दोघांना वाड्याचा इतिहास सांगायला सुरुवात करतात. आता बघू पुढे काय होते ते.


" माधवराव, आनंदाची बातमी आहे. तुमच्या घरी बाळकृष्ण येणार आहे." वैद्यबुवांनी घरी जाणाऱ्या माधवरावांना गोड बातमी दिली.

" वैद्यबुवा, आमच्या बाईसाहेबांना सहावा महिना सुरू आहे. तुमची ही बातमी आम्हाला देऊन झाली आहे. याचे तुम्हाला विस्मरण झाले का?" आश्चर्यचकित झालेल्या माधवरावांनी विचारले.


" माधवराव.. असे कसे विस्मरण होईल. अहो थोरल्या बाईसाहेबांकडे गोड बातमी आहे. इतक्या वर्षांची त्यांची तपश्चर्या फळाला आली."

वैद्यबुवा आनंदाने सांगत होते. ते ऐकून माधवरावांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लगबगीने ते घरी पोहोचले. सामोऱ्या आलेल्या भामेकडे दुर्लक्ष करून ते लक्ष्मीबाईंच्या दालनात गेले. भामेला पहिला धक्का तिथे बसला आणि मग असेच धक्के बसतच राहिले. भामेच्या घरच्या गरिबीमुळे तिचे बाळंतपण सासरीच होणार होते. तर आता लक्ष्मीबाईंची नाजूक प्रकृती म्हणून त्यांना प्रवास करायचा नव्हता. त्यामुळे त्यांचेही बाळंतपण इथेच होणार होते. सगळी जबाबदारी माधवरावांच्या आईने आणि घरातल्या मोलकरणींनी उचलली होती. भामाची कामे जिथे कर्तव्य म्हणून केली जायची तिथे लक्ष्मीबाईंना फुलासारखे जपले जायचे. हे बघून भामाचा जळफळाट व्हायचा. पण सध्यातरी ती काहीच करू शकत नव्हती. त्यातल्या त्यात तिच्यासाठी समाधानाची एकच गोष्ट होती की ती आधी आई होणार होती. भामेला नऊ महिने पूर्ण झाले आणि तिने एका मुलाला जन्म दिला. त्याचा जन्म होताच भामेच्या जुन्या आकांक्षांना पुन्हा धुमारे फुटले. पाचवी पुजून झाल्यावर माधवराव बाळ बघायला गेले. त्यांना बघून भामा गोड हसली आणि बाळाशी बोलू लागली,

" बघितलं का कोण आलं आहे तुला बघायला? बाबा आले आहेत. जायचं तुला त्यांच्याकडे? नाही म्हणतोस? का रे गुलामा?"

माधवराव कौतुकाने बघत होते. पहिल्या बाळाचे त्यांनाही कौतुक होतेच. ते त्याला घ्यायला पुढे होणार तोच भामाचे शब्द त्यांच्या कानावर पडले,

" हो.. बाबांनी आपल्या मोठ्या लेकासाठी काहीतरी आणले असेलच. शेवटी हे सगळे तुझेच आहे."

हे ऐकून माधवरावांचा चेहरा कठोर झाला. बाळाला न बघताच ते तिथून बाहेर पडले. भामा मात्र या भ्रमात होती की माधवराव तिच्या मुलाला मोठ्या मुलाचे हक्क देणार आहेत. भामा कशीही वागली तरी तिचा लेक मात्र लोभस होता. सगळ्यांना तो हवाहवासा वाटायचा. त्याने बाळसे धरेपर्यंत लक्ष्मीबाईही प्रसूत होऊन त्यांनाही मुलगा झाला. वाड्यात आनंदाची लहर पसरली. भामेचे तोंड मात्र उतरले. तिला आता तिच्या मुलाच्या जीवावर भाव खाता येणार नव्हता. माधवरावही जितक्यास तितके तिच्याशी बोलत होते. हे सगळे तिला सहन होत नव्हते. ती नुसती धुसफुसत असायची.

दोन्ही मुलं मोठी होत होती. भामा जरी गोविंदाचा,लक्ष्मीबाईंच्या मुलाचा राग राग करत असली तरी त्या मात्र तिच्या लेकावर, हरीवर प्रेम करत होत्या. भामेला आता वाड्यावर येऊन चारपाच वर्ष झाली होती. लक्ष्मीबाई थोरल्या असल्यामुळे सगळे कुळाचार त्याच करत असत. तसेही देवदेव करण्यात भामेला जास्त रस नसल्यामुळे ती यापासून होता होईतो लांबच रहायची. पण एवढ्या वर्षात तिला एक गोष्ट जाणवली की दर अमावस्या, पौर्णिमेला वाड्यात यथासांग नेवैद्य होत असतो. नंतर नटूनथटून लक्ष्मीबाई माधवरावांसोबत तो नेवैद्य घेऊन कुठेतरी जायच्या. इतके दिवस ना तिने कधी विचारले ना यांनी कधी सांगितले. पण आता मात्र तिला त्याची उत्सुकता लागली होती. तिने माधवरावांना विचारले, तर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन तिची बोळवण केली. त्यामुळे तिची उत्सुकता जास्तच वाढली. येणाऱ्या पौर्णिमेला याचा छडा लावायचाच असे भामेने ठरवले. त्याप्रमाणे माधवराव आणि लक्ष्मीबाई दोघेच नेवैद्य घेऊन जात असताना तिने हरीला दासीकडे सोपवले आणि ती त्यांच्यापाठी गुपचूप निघाली. काट्याकुट्यातून जाणारा रस्ता पार करून ते एका ठिकाणी पोहोचले.

भामा एका झाडामागे लपली. माधवराव आणि लक्ष्मीबाईंचे लक्षही नव्हते. त्यांना बहुतेक खात्री होती की त्यांच्यामागे कोणी येणार नाही. त्यांनी पूजेचे साहित्य खाली ठेवून पूजा करायला सुरुवात केली. ते बघून भामेचे डोळे विस्फारले.



कसली पूजा करत असावेत हे दोघे? काय रहस्य आहे या पूजेचे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all