राखणदार.. भाग ४

रहस्य एका विहिरीचे


राखणदार.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की सुयशच्या बाबांच्या पेटीत त्यांचे सर्टिफिकेट मिळते ज्यावर त्यांच्या गावाचे नाव लिहिलेले असते. आता बघू पुढे काय होतं ते.


"इनामदारांचं घर कुठे आहे सांगू शकाल का?" सुयशने समोरच्या गावकऱ्याला विचारले.

" गावात नवीन दिसताय.." त्या माणसाने गाडीकडे बघत विचारले. "घर कसलं वाडा म्हणा वाडा. तिकडं तुमचं काय काम?" तो दोघांकडेही संशयाने बघत होता.

" थोडं खाजगी आहे." तुटकपणे सुयश बोलला.

" इथून सरळ जा. मग उजव्या अंगाला वळा. तिथून डाव्या अंगाला. समोरच दिसल बघा." खांदे उडवत तो गावकरी बोलला. त्याने सांगितल्याप्रमाणे दोघे जाऊ लागले. "वाडा" हा शब्द दोघांच्याही मनात घुमू लागला होता. विचारांच्या तंद्रीत ते दोघे कधी आपल्या ठिकाणावर येऊन पोहोचले ते त्यांचे त्यांनाच समजले नाही. मध्येच एक खड्डा आला आणि दोघांना धक्का बसला. गाडी थांबली होती. दोघांनी समोर बघितले आणि ते बघतच राहिले. छान चौसोपी वाडा होता. काळानुरूप पडझड झाली असली तरी अजूनही चांगल्या अवस्थेत दिसत होता. "एवढा मोठा वाडा असतानाही आपण आपले बालपण एवढ्याश्या टीचभर घरात का काढले? आईबाबांनी कधीच या बाबतीत का नाही सांगितले, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधीतरी मिळतील का?" सुयश विचार करत होता. कनिका मात्र भारावल्यासारखी पुढे पुढे जात होती. ती वाड्याच्या दारापर्यंत पोहोचली. ती आत पाऊल टाकणार तोच आवाज आला.

" थांबा."

कनिकाने आश्चर्याने आवाजाच्या दिशेने बघितले. नऊवारी नेसलेली एक मध्यमवयीन स्त्री उभी होती.

"तुम्ही इथं??" तिच्या चेहर्‍यावर निराशेचे भाव दिसत होते.

"तुम्ही आम्हाला ओळखता?"

" आमचं कुटुंब आहेत त्या.." त्या दिवशीचे आजोबा बाहेर येत बोलले. आजोबा म्हणायलासुद्धा सुयशला कसेतरी वाटत होते. त्या दिवशीचे थकलेले ते आजोबा कुठे आणि आजचे हे वयाची कात टाकलेले.. कात हा शब्द येताच सुजयला आठवले त्या दिवशी ते कसे नागाच्या रूपात निघून गेले. आजच्या काळातही या गोष्टीवर विश्वास ठेवायचा का? त्यापेक्षा जे होतंय ते पाहू, सुयशने विचार केला.


"ते आता आलेच आहेत तर काय करू शकतो आपण." आजोबा त्यांच्या बायकोला सरस्वतीबाईंना म्हणाले.

" मग थांबा. घरची सून आहे ती. मापटं ओलांडूनच येऊ दे घरात." म्हणत त्या लगबगीने आत गेल्या. येताना औक्षणाचं ताट आणि मापटं घेऊन आल्या. कनिकाने माप ओलांडताच तिथे अचानक वारा वाहू लागला. कोपर्‍यातल्या विहिरीजवळच्या झाडाच्या फांद्या तुटण्याचा आवाज आला. कनिका आणि सुयशला भिती वाटू लागली. पण त्या आजीआजोबांना याचे काहीच वाटत नव्हतं बहुतेक.

" हे काय चालू आहे?" कनिकाने घाबरून विचारले.

" तुमच्या येण्याने सुरू होणाऱ्या नाट्याची नांदी. तुम्ही थकला असाल. आत या. ताजेतवाने होऊ. मग बोलू." बोलताना आजोबा विहीरीच्या दिशेने बघत होते. "अहो, यांना त्यांची खोली दाखवा."

कनिकाने वाड्यात प्रवेश केला आणि बघतच राहिली. ही तीच जागा होती जी तिच्या स्वप्नात येत होती. तिने नकळत सुयशचा हात घट्ट धरला. तिची पावले विहिरीकडे वळली. विहीर पाण्याने पुरेपूर भरली होती. असं वाटत होतं कधीही पाणी ओसंडून जाईल. कनिका थोड्या भितीने, थोड्या उत्सुकतेने आत डोकावायला जाणार तोच सरस्वतीबाई आल्या.

" तिला समजले आहे तुम्ही आलात ते. आत्ताच आला आहात. जरा आराम करा. तिला तिचा वाटा द्यायचाच आहे. पण तुमची विश्रांती झाल्यावर." या शब्दांचा अर्थ लागेपर्यंत त्या आत गेल्यासुद्धा. तिने सुयशकडे बघितले. दोघेही आत जायला वळले तोच विहिरीत काहीतरी धप्पकन पडल्याचा आवाज आला. आणि कोणीतरी भेसूर ओरडल्यासारखे वाटले. मग तिथे अजिबात न थांबता ते दोघे आत गेले.


काय असेल त्या विहिरीचे रहस्य? हे आजीआजोबा नक्की कोण आहेत? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all