राखणदार.. भाग ३

रहस्य एका विहिरीचे


राखणदार.. भाग ३


मागील भागात आपण पाहिले की एक आजोबा सुयशला सोन्याच्या काही मोहरा द्यायला येतात. आता बघू पुढे काय होते ते.


" सुयश... हे काय होतं?" घाबरलेल्या कनिकाने विचारले.

" काय माहित? पण मला हे सगळं आधी झाल्यासारखे वाटतं आहे.." सुयश अजूनही तो नाग गेला त्या दिशेला बघत होता.

" म्हणजे?"

" मी खूप लहान होतो. बाबांची नोकरी गेली होती. ते खूप टेन्शनमध्ये होते. तेव्हा हेच आजोबा आल्यासारखे मला आठवतंय. " सुयश आठवायचा प्रयत्न करत होता.

" पण मग तुझ्या आईबाबांनी तुला काही सांगितले नाही?" कनिकाला आश्चर्य वाटत होते.

" नाही ग.. मी तेव्हा खूप लहान होतो. आणि नंतर आईबाबांचा मृत्युसुद्धा एवढा अचानक झाला की काही बोलणे होऊच शकले नाही. पण एक गोष्ट नक्की की मला कधीच पैशांची कमतरता जाणवली नाही. भरपूर नसला तरी पोटापाण्याचे नक्कीच भागायचे."

" आणि मग तुमचे गाव?"

" मी कधीच गेलो नाही. बाबांच्या बाजूने कोणी नव्हतेच. आईच्या बाजूचे सगळे आईबाबा गेल्यावर लांबच झाले. मग मी ही नाही गेलो परत कधी. आपलं आपलंच जगत राहिलो."

" आता???" कनिकाने विचारले. तिच्या चेहर्‍यावर विचित्र भाव होते.

" म्हणजे? " सुयशच्या चेहर्‍यावर काहीच न कळल्याचे भाव होते.

" या पारगावचा शोध लावूयात? मी ना शहरात राहिले आहे. ही इनामदारी, राखणदार माझ्यासाठी नवीन आहे." कनिकाचा उत्साह ओसंडून वहात होता.

" अग पण एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात हे पारगाव शोधायचे कसे आणि कुठे?"

" आपण आधी तुझ्या आईबाबांचे जुने काही कागदपत्र आहेत का ते शोधू आणि ते सापडले तर हे वापरू." कनिका मोबाईल नाचवत म्हणाली.

" पण त्याआधी झोपायला जाऊ. मध्यरात्र उलटून गेली आहे. उद्या सकाळी बघू काय ते." सुयश दरवाजा बंद करत म्हणाला. रात्रभर दोघेही जागे होते. दोघांच्याही मनात उठलेल्या वादळामुळे दोघेही रात्रभर तळमळत होते. दिवस उगवताच दोघेही उठले आणि आवरून सुयशच्या आईवडिलांच्या बॅगा शोधू लागले. सुयशने त्यांचे सगळे सामान जसेच्या तसे ठेवले होते. त्यांचे सामान बघून सुयशला भरून आले.

" इतके वर्ष झाले त्यांना जाऊन. पण ते नाहीत यावर विश्वासच बसत नाही अजून." सुयश आईची साडी हातात घेत म्हणाला.

" नक्की काय झाले विचारू?" कनिकाने घाबरत विचारले.

" कामासाठी म्हणून दोघे बाहेरगावी गेले होते. माझी कसलीतरी परीक्षा होती म्हणून मी घरीच थांबलो होतो. रात्री अचानक बातमी आली की त्यांचा अपघात झाला आणि दोघे जागीच गेले. सोळा सतरा वर्षाचाच होतो मी. कसा सावरलो मलाच माहित." सुयशच्या डोळ्यातून अश्रू घरंगळले. कनिका पुढे झाली. तिने बॅग उघडली. सुयशच्या बाबांची कागदपत्रे होती.

" तू ही कधी बघितली नाहीस?" कनिकाने आश्चर्याने विचारले.

" नाही.. बाबांचे बँकेचे व्यवहार मामाने बघितले. त्यांचे पैसे वगैरे मिळवून माझ्या हातात दिले. तेवढेच त्याचे उपकार.. त्यानंतर हे सामान कधी उघडावेसे पण वाटले नाही." सुयश आईबाबांच्या वस्तूंवर हात फिरवत होता.

" सुयश, तुझ्या बाबांचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. इथे त्यांचा गावचा पत्ता आहे बघ." दोघांचेही डोळे चमकले.

गावी जाण्याआधी कसलाही आडपडदा न ठेवता सुयशने आपल्या आर्थिक परिस्थितीची कनिकाला जाणीव करून दिली. तिने मग या मोहरा विकून पैसे आणण्यापेक्षा तिच्या नोकरीतून साठलेला पैसा वापरूया असे सुचवले. सुयशचा कारखाना काही दिवस तरी बंद असणार होता. कनिकाने ऑफिसमधून बिनपगारी सुट्टी काढायचे ठरवले. आणि दोघांनी सुयशच्या गावी जायचे कन्फर्म केले.


गावी जाऊन काय मिळेल या दोघांना? राखणदाराची प्रतिक्रिया काय असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all