राखणदार.. भाग २

रहस्य एका विहिरीचे


राखणदार.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की कनिका आणि सुयश हे नवविवाहित दांपत्य आर्थिक अडचणीत सापडले आहे. आणि कनिकाला विहिरीतला एक चेहरा बोलावत आहे. आता बघू पुढे काय होते ते.


" सुयश, दरवाजा वाजला का रे?" झोपेत असलेल्या कनिकाने विचारले.

" हो.. उठतच होतो उघडायला." जागा असलेला सुयश उठत म्हणाला.

" एवढ्या रात्री कोण आलं असेल?"

" बघितल्याशिवाय कसं समजेल?"

वरमलेली कनिका उठली आणि सुयशसोबत बाहेर आली. सुयशने दरवाजा उघडला. दरवाजात एक म्हातारा माणूस उभा होता. सुरकुतलेली त्वचा आणि हिरवे डोळे..


" कोण हवं आहे आपल्याला?" सुयशने विचारले.

" सुयश.." खूप कष्टाने त्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली.

" हो.. तुमचं माझ्याकडे काम आहे का?" सुयशला आश्चर्य वाटले. त्या माणसाने यावेळेस न बोलता मान हलवली.

" इथे बाहेर उभं राहून बोलण्यापेक्षा आत या ना." कनिका बोलली. तिला जणू त्या हिरव्या डोळ्यांची भुरळ पडली होती.. सुयशलाही ते पटले. ते आजोबा आत आले. चालताना ते पाय घासत आत आले. ते बघून कनिकाला सरपटणाऱ्या नागाची आठवण झाली. तिने मनातल्यामनात स्वतःला टपली मारली. सुयश त्या आजोबांबरोबर हॉलमध्ये बसेपर्यंत तिने आतून पाणी आणले.

" पाणी नको. थंड दूध आहे का?" त्या आजोबांना बोलताना फार कष्ट होत होते बहुतेक. कनिकाने सुयशकडे बघितले. पाण्याऐवजी दूध?असा विचार करत ती आत गेली. तोपर्यंत सुयशने प्रश्न विचारला.

" तुमचे माझ्याकडे एवढ्या रात्री काय काम होते?"

" ते.. हे द्यायचे होते." त्या आजोबांनी खिशातली एक पुरचुंडी काढली. आणि सुयशसमोर ठेवली.

" हे काय आहे?"

" तुमचे धन.." दूध घेऊन आलेल्या कनिकालाही धक्का बसला. सुयशने ती पुरचुंडी उघडली. आतमध्ये सोन्याच्या पिवळ्याधम्मक मोहरा चमकत होत्या. दोघांचेही डोळे विस्फारले होते. ते आजोबा मात्र शांतपणे दूध पित होते.

" हे आम्हाला कशासाठी?" कनिकाने विचारले.

" तुमच्या लग्नाची भेट म्हणून."

" तुम्ही आहात तरी कोण?" सुयशला त्यांचा संशय येऊ लागला होता.

" तुमचा हितचिंतक. या मोहरा घ्या. तुमची नड भागवा. मला जाऊ द्या." ते आजोबा उठू लागले.

" एक मिनिट.. तुम्ही कोण? आणि हे मला का देत आहात हे समजेपर्यंत मी याला हात लावणार नाही." सुयश ठामपणे बोलला.

" असं नका करू.. तुमची परिस्थिती खराब आहे म्हणूनच होत नसताना सुद्धा इथे आलो आहे."


" तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. पण तरिही तुम्ही कोण हे कळल्याशिवाय मी याला हात लावणार नाही. आणि माझी परिस्थिती खराब आहे हे तुम्हाला कोणी सांगितले?" सुयशला काय चालू आहे तेच समजत नव्हते.

" आम्हाला समजते. हे तुमचेच धन आहे. मी फक्त याचा राखणदार आहे."

" राखणदार? मला काहीच कळत नाहीये." सुयश चक्रावला होता.

" हो.. तुमच्या घराण्याचा राखणदार. " ते आजोबा ठामपणे बोलले.


" माझे घराणे? कोणते घराणे? " सुयश विचारू लागला.

" तुम्ही विचारू नका. मी सांगू शकत नाही." आजोबा उठत म्हणाले.

" तुमचे आणि माझ्या घरचे जर काही संबंध असतील तर त्याला स्मरून सांगा कोण आहे मी? काय ओळख आहे आपली? मी तुम्हाला याआधी कधी भेटलो आहे का?" सुयश आजोबांचे हात हातात घेऊन आपल्या बुद्धीला ताण देत बोलला. त्यांच्या थंड स्पर्शाने तो शहारला.

" तुम्ही आहात पारगावचे इनामदार.. आता बस्स. भरपूर सांगितले. ते पैसे वापरा. यापुढे जेव्हा लागतील तेव्हा मी येईन." बोलता बोलता आजोबांचे रूपांतर एका नागात झाले आणि ते सळसळत तिथून निघून गेले. कनिका आणि सुयश बघतच राहिले.


कोण असेल हा नागरूपी राखणदार? सुयश जर इनामदार असेल तर त्याला या सगळ्याची माहिती का नाही? काय असेल पारगावचे रहस्य.. बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all