राखणदार.. भाग १

रहस्य एका विहिरीचे


राखणदार..


" उठ ना.. किती काळ वाट बघायला लावणार आहेस? कधीची तळमळते आहे. ये ना लवकर." विहिरीतला तो चेहरा कनिकाला बोलावत होता. विस्कटलेले केस, पुसलेले कुंकू, अस्ताव्यस्त पदर. कनिका घाबरून पाठी जाऊ लागली तसा तिने हात पुढे केला. पाण्याचे काही थेंब कनिकाच्या तोंडावर पडले. आणि ती जोरात किंचाळली.

" अग ए.. किती जोरात किंचाळतेस? एक दिवस हार्ट अ‍ॅटॅक येईल मला." सुयश ओरडला. त्याचा आवाज ऐकून कनिकाने डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या सुयशला बघून तिला हायसे वाटले. तसेच उठून तिने त्याला मिठी मारली. त्यासरशी त्याच्या हातातली बाटली हिंदकळली. त्यातले पाणी परत तिच्या अंगावर पडले आणि एक विचित्र शहारा तिच्या अंगावर आला. तिचा भेदरलेला अवतार बघून सुयशने तिला जवळ घेतले.

" काय झाले? वाईट स्वप्न पडलं का?"

त्याच्या कुशीतून वर न बघता तिने मान हलवली आणि मिठी अजून घट्ट केली.

" तुझे ना विचित्रच आहे सगळे. बायकांना पुरूषांची स्वप्ने पडतात. आणि तुला या बाईची." सुयश कनिकाला हसवायचा प्रयत्न करत म्हणाला. त्यासरशी त्याला चापट मारत कनिका उठली.

" तुला मस्करी सुचते आहे? माझा जीव जातो." कनिकाच्या डोळ्यात पाणी आले. ते बघून सुयश वरमला.

" सॉरी.. तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. तुझा मूड हलका करायचा होता." कान पकडत सुयश बोलला.

" असू दे.. जातेच मी."

" नको ना चिडून जाऊस. नुकतंच लग्न झालेल्या बायकोला रागावू दिलं तर नरकातही जागा मिळत नाही म्हणे." सुयश गंभीरपणाचा आव आणत बोलला.

"हो का? अश्या किती लग्नांचा अनुभव आहे तुम्हाला?" कंबरेवर हात ठेवत कनिकाने विचारले.

" एका लग्नाचा नक्कीच आहे.. आता त्या अनुभवात अजून थोडी भर टाकावी म्हणतो आहे." हळूहळू सुयश कनिकाजवळ येऊ लागला. तिने डोळे मिटून घेतले. तो तिच्या अजून जवळ येणार तोच सुयशच्या फोनची बेल वाजली. कनिकाने वैतागून डोळे उघडले.

" जा.. बघ कोण आहे ते. मी जाते आवरायला." मूड सुयशचाही ऑफ झाला होता. त्याने फोन बघितला. त्याच्या सहकार्‍याचा फोन होता.

" काय? कधी?" सुयशचा आवाज ऐकून कनिका बाहेर आली.

" काय झाले?" तिने खुणेने विचारले.

" टिव्ही लाव.." सुयशने फोन ठेवला. कनिकाने टिव्ही लावला. बातम्या सुरू केल्या. सुयश जिथे काम करत होता त्या कारखान्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या ती आग विझवायचा प्रयत्न करत होते. पण आग कमीच होत नव्हती.

"संपलं.. सगळं संपलं.." सुयश बोलत होता.

" अरे, निराश काय होतोस? होईल सगळं नीट." झालेल्या प्रसंगाने कनिकाही घाबरली होती. ती सुयशला धीर द्यायचा प्रयत्न करत होती. सुयश सुन्नपणे तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यासमोर येत होते, लग्न करायचे म्हणून हप्त्यावर घेतलेले नवीन घर, इथून तिथे जायला घेतलेली गाडी. घर सजवण्यात वापरलेली पुंजी. नोकरीच्या जीवावर वापरलेली सगळी बचत. कोणत्या तोंडाने तो हे सगळं कनिकाला सांगणार होता? कारखाना जळाला म्हणजे सुरू व्हायला निदान काही महिने जाणार. तोपर्यंत दुसरी नोकरी बघायची म्हटलं तरी लगेच नोकरी कोण देणार? यातून बाहेर येणे शक्य आहे?

घाबरलेली कनिका सुयशशी बोलायचा प्रयत्न करत होती. त्याला धीर देत होती. पण तो कसलाच विचार करू शकत नव्हता.


कनिका आणि सुयश नवविवाहित जोडपे येतील का या संकटातून बाहेर? कनिकाला स्वप्नात आवाज देणारी स्त्री कोण असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all