राजू बन गया जंटलमन

Raju ban gaya gentleman.

#कान्यांचा_राजू

राजेश काने ,एसवाय बीए. सकाळचं कॉलेज. कॉलेज सुटलं की कट्टागप्पा. आधीच होळी सरली तरी थंडी अजुनही सरत नसल्याने तसं जिकडंतिकडं गुलाब्बी वातावरण. दोस्तांचे बडडे..चायनीज, तंदुरी..मुलींशी हव्याहव्याशा वाटणाऱ्या गप्पा. खांद्यापर्यंत केसं..त्यावर तो नागमोडी तारेचा बँड,डोळ्यांवर गॉगल,कानात डूल..एकुणच छपरी अवतार.

राजू मित्रमंडळीत राजूभाई म्हणून फेमस. तसा स्वभावाने चांगला. अडल्यानडल्यांना मदत करणारा. कॉलेजच्या शिक्षकांमध्येही पॉप्युलर..अभ्यासात हुशार वगैरे नाही पण अगदीच माठही नाही. 

राजूची आई ग्रुहिणी. बाबा सरकारी नोकर. बाबा व राजू म्हणजे भारत पाकिस्तान. बाबा त्याला दिवटा म्हणायचे. राजूला काहीही सांगायच झालं की त्याच्या आईला सांगायचे उदा. रिक्षावाल्याची मुलगी सीए झाली,कचरेवाल्याचा मुलगा आएएस परीक्षा उत्तीर्ण झाला.. गरीबांची मुलं शिकतात. याला सगळ्या सोयीसुविधा मिळताहेत. दोन वेळ चांगल खायला मिळतं..हवी ती वस्तू हवी तेंव्हा मिळते तर अभ्यास करायला नको. जरा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आत्तापासून सुरु करेल तर पुढे परीक्षा देताना सोप्पं होईल. 

पास झाला तर त्याचच आयुष्य उजळेल. याला काय पडलेली नाही नी तू फक्त त्याला पाठीशी घालतेस .
हे सर्व ऐकून सौ कानेंचे कान किटले होते. कधीकधी तिला वाटे यात माझा काय दोष. मग जास्तच झालं की ती श्री.कानेंना सांगे, "जसा तो माझा मुलगा आहे तसाच तुमचाही आहे व आपण सगळी एकाच घरात रहातो. तेंव्हा मला तुमच्यातला दूत बनवायचं नाही. जे काय सांगायचय ते त्याला सांगा जा." मग काने म्हणायचे,"तुच लाडावून ठेवलैस त्याला. तुझ्यामुळेच शेफारलाय तो.  काय हवं ते करा." 

फावल्या वेळात सौ.काने राजूची समजूत काढायची. त्याला वडिलांच म्हणणं पटवून देवू पहायची पण राजूच्या कानात बुचं असायची व नसली तरीही त्याचं मन हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचं. फेसबुकवर कोणतं स्टेटस टाकायचं..मग त्याला किती लाईक्स भेटतील..त्यातले मुलींचे किती..अनोळखी मुलींचे किती..असे अनेक उद्योग पक्याकडे असायचे.

सुट्टीच्या दिवशी श्री.काने ,केस कापून ये म्हणून राजूच्यामागे तगादा लावायचे पण राजू त्यांची डाळ शिजू द्यायचा नाही. दाढी कर म्हंटल तरी ऐकायचा नाही. हॉलमध्ये चप्पल घालून यायचा त्यावरून आई त्याला रोज सांगायची. पण तो दुर्लक्ष करायचा. आई त्याला कधी थोडा केर काढ,दोन भांडी घास सांगायची तर कधी थोडाथोडा स्वैंपाक शिकून घे म्हणून आग्रह करायची पण राजू ढिम्म. तिला अजिबात दाद देत नसे. 

श्री.कानेंच्या ऑफिसात नवीन साहेब आला होता. तो जाम कटकटी होता. त्याला स्वतःला कामाचं नियोजन नीट करता येत नव्हतं . हाताखालच्या कर्मचाऱ्यांकडून जरा जरी चूक झाली तरी त्यांना वाट्टेल तसं बोलायचा.
 वयाचा विचार करत नव्हता की प्रामाणिकपणाचा विचार करत नव्हता. श्री.कानेंना दहा वर्षापुर्वीच्या फाईलवरुन साहेबाने जाम झापले. सहकाऱ्यांसमोर त्यांचा पाणउतारा केला. काम हेच दैवत मानणारे श्री.काने पुरते खचले. साहेबाचे शब्द त्यांच्या जिव्हारी लागले. एवढंस तोंड करुन घरी आले. थोडसं खाल्ल्यासारखं केलं व झोपायला गेले पण त्यांना झोप येईना. आयुष्यात एवढा अपमान त्यांचा कोणत्या साहेबाने केला नव्हता. नोकरी करताना किती प्रलोभनं आली तरीही श्री.कानेंनी त्यांचा प्रामाणिकपणा कधीच सोडला नव्हता. 

मध्यरात्री त्यांना फार अस्वस्थ वाटू लागलं. त्यांनी सौ.कानेंना उठवलं. सौ.कानेंनी राजूला आवाज दिला. राजूने शेजाऱ्यांची बेल दाबली. श्री.कानेंना जवळच्या इस्पितळात न्हेलं. 

श्री.कानेंना डॉक्टरांनी आयसीयुत हलवलं.   इसीजी वगैरे काढण्यात आला.   राजूची आई बाहेर डोकं गच्च धरुन बसली होती. नातेवाईकांना, मित्रांना राजूने फोन केला. मित्र,नातेवाईक थोडा थोडा वेळ बसून विचारपूस करुन जात होते.

 एका रात्रीत राजू बरंच काही शिकला. इमर्जन्सी रुमच्या होलमधून हातांना सुया टोचलेले वडील पाहताना त्याच्या छातीत भरुन आलं. लहानपणी सायकलवरुन शाळेत नेणारे बाबा,रोज सकाळी अंघोळ घालणारे बाबा,घोडाघोडा करणारे बाबा,सुरात कविता म्हणणारे बाबा,त्याला आवडतं ते डार्क चॉकलेट न विसरता आणणारे बाबा,त्याच्यासाठी त्याच्या आवडीची बेट घेणारे बाबा,उन्हाळ्यात आंबे कितीही महाग व खिशाला न परवडणारे असले तरी त्याच्यासाठी आवर्जून दोन पेट्या हापूस आणणारे बाबा,अभ्यास कर रे कर रे म्हणून पाठी लागणारे बाबा..राजूला सारं काही आठवत होतं व खूप मोठं झाल्यासारखी त्याने त्यांना दिलेली प्रत्युत्तरं,त्याच्या व बाबांमध्ये बनत चाललेली एक अद्रुश्य भिंत..हे सारं राजूला खायला येत होतं. तो पुरता तुटून गेला होता.

 बाप म्हणजे काय असतो, त्याचं आपल्या आयुष्यात काय स्थान असतं हे कळण्यासाठीच जणू देवाने त्यांच्या कुटुंबावर असा प्रसंग आणला होता. इस्पितळातल्या बाप्पाच्या मुर्तीसमोर हात जोडून राजू बसला होता. एक एक क्षण त्याला युगासारखा भासत होता.  पहाटे चार वाजता डॉक्टरांनी राजूला केबिनमध्ये बोलावलं व म्हणाले की मायनर हार्ट एटेक येऊन गेला आहे. तरी दोन दिवसांनी डिस्चार्ज देऊ. याच्यापुढे तुला त्यांची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या मनावर ताण येईल अशा गोष्टींपासून त्यांना लांब ठेवा. त्या एका रात्रीने राजूला बरंच काही शिकवलं. 

राजू वडिलांना घरी घेऊन आला. आत्ता राजू सुधारतोय. बाबांची गोळ्याऔषधं तो स्वतः जातीने त्यांना देतो. बाबांना आवडतात तसे बारीक केस कट केलेत. छान दाढी केली आहे. आईकडून रोज थोडाथोडा स्वैंपाक शिकणार आहे. मन लावून अभ्यास करणार आहे. मि.कानेही लेकातला बदल पाहून फार खूष आहेत. साहेबाचा फोन येऊन गेला तेंव्हा सौ.कानेंनी त्या साहेबाची सालं सालं काढली आहेत. 

-------गीता गजानन गरुड.