Login

राजम्मा

Rajmma

राजम्मा ©®विवेक चंद्रकांत......खूप पूर्वीची गोष्ट. आम्ही प्राथमिक शाळेत जायचो तेव्हा एक मद्रासी अण्णा गोळयाबीस्कीटचे छोटंसं दुकान लावून बसायचा. मागे त्याचे झोपडीवजा घर. त्याच्या बायकोचे नाव राजम्मा. राजम्मा काळी सावळी. प्रसन्न चेहरा, दुकानात सहसा तीच असायची. हेल काढून हिंदीत बोलायची. आम्ही पोरं गेलो की तिच्या डोळे मायाळू व्हायचे. खूप प्रेमाने बोलायची. माझे गाल तेव्हा एकदम गोबरे होते. माझ्या गालावरून हात फिरवून "बिवेक" म्हणून मला चॉकलेट द्यायची. त्या दोघांना मुलबाळ नव्हते. त्या चॉकलेट च्या मोहापायी मी मित्रांना चुकवून एकटाच तिच्या दुकानात जायचो.

मध्ये काही दिवस अचानक त्याचे दुकान पंधरावीस दिवस बंद राहिले. खरेतर ते सहसा गावी जायचे नाही. शाळेला सुट्टी लागली कीच जायचे. नंतर दुकान उघडले तर आणखी एक काळीकुट्ट तरुणी तिथे दिसली.मग आजूबाजूचे लोक म्हणू लागले की राजम्माला मुलबाळ होतं नाही म्हणून अण्णाने दुसरी बायको करून आणली.

राजम्मा अजूनही कधीतरी दुकानावर बसायची. पण तिचा प्रसन्न चेहरा हरवून गेला.मी बरेचदा जायचो तेव्हा अण्णा आणि त्याची नवीन बायको दुकानात गप्पा मारत बसलेले दिसायचे.ती नवीन बायको खुदुखुदु हसायची.कोणजाणे मला मात्र त्या नवीन बायकोचा रागच यायचा. एकदा भरदुपारी राजम्मा कडून चॉकलेट मिळेल म्हणून मी गेलो.. आणि बरेच दिवसांनी राजम्मा मिळाली. चेहऱ्यावरचा घाम पदराने पुसत.तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कधीच गायब झाले होते. मला बघून तिचे डोळे एकदम भरून आले.. तिने माझ्या गालावरून हात फिरवला आणि तिला काय वाटले कोणास ठाऊक?

"बिवेक.. बिवेक" म्हणून तिने मला कवेत घेतले आणि रडू लागली.सुरुवातिला तर मी घाबरूनच गेलो. पण तिच्या ऊबदार मिठीत एवढ्या उन्हाळ्यातही खूप छान वाटतं होते.केव्हातरी तिचा रडण्याचा आवेग ओसरला. डोळे पुसून तिने मला एकाच्या ऐवजी दोन चॉकलेट दिले.

पुढे मी highschool ला गेलो. शाळा बदलली, रस्ता बदलला, आणि विश्वही बदलले. राजम्माच्या दुकानात जाणे जवळजवळ बंदच झाले.दोनतीन वर्षानंतर अण्णा दुकान बंद करून गावाला गेल्याचे कळले.गावातल्या लोकांकडून समजले की त्याच्या दुसऱ्या बायकोलाही मुलबाळ झालेच नाही आणि ती एकेदिवशी भांडण करून गावी निघून गेली. जातांना दोन दोन बायका करतो पण मुलं पैदा करू शकत नाही म्हणजे दोष तुझ्यातच आहे हेही सांगून गेली. त्यानंतर अण्णा खचला आणि राजम्मा सह गावी निघून गेला.

त्याचं गाव कोणते ते काही माहित नाही. पण राजम्माच्या अनेक आठवणी मनात राहिल्या.. तिने दिलेली चॉकलेटस .. बिवेक बिवेक म्हणून गालावरून मायेने फिरवलेला हात. आणि सवत आल्याचं दुःख कोणालाच न सांगता आल्यामुळे मला मिठीत घेऊन रडून मोकळ्या केलेल्या भावना...

राजम्मा सदैव माझ्या आठवणीत राहील.
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.