पाऊस धारा

पाऊस एका वेगळ्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न

अलक


बेधुंद बरसणाऱ्या पावसाला तो हळूच म्हणाला,
जिच्या डोळ्यातून तू बरसतोस, तिला सांगशील का रे? आजही मी तिच्यावर खूप प्रेम करतो.
तिच्या आठवणींत झुरतो.
तसा पाऊस म्हणाला, चुकलं असेल कोणीही, "त्या कोसळणाऱ्या पावसाला फक्त एकदा मिठीत घेऊन बघ, मनाच्या तुटलेल्या धाग्यांना पुन्हा एकत्र बांधून बघ.
तिच्या डोळ्यातून बरसणारा पाऊस तुझ्या डोळ्यातुन ही बरसेल आणि दाटलेले आभाळ पुन्हा रीते होईल."


बाहेर मुसळधार कोसळणारा पाऊस खिडकीतून पाहणाऱ्या, आपल्या छोट्या नातीला आजीने कुतूहलाने विचारले, "पाऊस कसा पडतो माहित आहे का आमच्या बाळाला?"
"हो..जेव्हा देवबाप्पाला दुःख होतं ना तेव्हा तो रडतो आणि पाऊस पडतो". आपल्या नातीचे हे निरागस उत्तर पाहून आजीचे डोळे भरून आले.


बरसणाऱ्या पावसाला ती हलकेच लाजून म्हणाली
किती वेड्यासारखा कोसळतोस!
"त्याला आठवण येईल ना माझी!"
तसा पाऊस हसून म्हणाला,
"त्याच्या मनातला पाऊस होऊन, तुझ्या आठवणीत बरसतोय मी."


ती त्याला म्हणाली, "आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा वातावरण किती सुंदर होत!श्रावणातल्या सारी आणि रिमझिम पाऊस बरसत होता. त्या आठवणींच इंद्र्धनुष्य आजही मनात उमटलेल आहे. हा वेगळं होण्याचा विचार सोडून देऊ आणि नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करू."
हे ऐकून त्याच्या डोळ्यातुन पाऊसधारा वाहू लागल्या आणि ती त्याला अलगद बिलगली.


खरं तर, त्याला पाऊस फारसा आवडायचा नाही. ती गेल्यापासून मात्र त्याला पाऊस जास्तच आवडायला लागला. तिच्या विरहात तो आज पावसात एकटाच भिजत होता आणि मनात साठलेलं वादळ शांत करण्याचा प्रयत्न करत होता.


आज त्याचा "अठरावा "वाढदिवस. "काहीतरी वेगळे करावे, "ही उर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. बाहेर धो पाऊस कोसळत होता. अचानक काही सुचून त्याने काही छत्र्या आणि रेनकोट खरेदी केले आणि रस्त्यावरल्या आडोश्याला राहणाऱ्या, गरीब बेघर लोकांना वाटले. त्या लोकांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहून वाढदिवस अतिशय छान साजरा झाल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर उमटले होते.

©️®️सायली.