रेनकोट.... बिन कोट...

रेनकोट आणि त्यामागचे खुसखुशीत किस्से. वाचता वाचता आपल्याला सुद्धा हसू येईलच.
रेनकोट…. बिनकोट…!!

"अरे देवा….!!किती चिंब भिजलात हो….शंभर वेळा सांगितलंय की आठवणीने रेनकोट घेऊन जात जा…. चला कपडे बदला आता चटकन…आणि गरम पाण्याने अंघोळ करा….एवढे मोठे झाले तरी काही समजत नाही पुरुषांना…" इती बायको. हिच्याशी लग्न करताना नेमकी समज कुठे गेली होती देव जाणे. अर्थात हे वाक्य मनातल्या मनात.

रेनकोट आठवणीने डीक्कीत ठेवायचाच असा दृढ निश्चय करून मी अंघोळीला गेलो. अंघोळ करता करता रेनकोट चे किस्से आठवायला लागले.

मराठवाड्यात नोकरी करायचो तेव्हा बऱ्यापैकी दूर अंतरावरून जाणे येणे करायला लागायचे. त्यामुळे डबल शिट अगदी सामान्य बाब होती, ट्रीपल सीट सुध्दा कधी कधी जावही लागायचं नाईलाजाने. मुळात तिकडे जोरदार पाऊस फार दिवस पडायचाच नाही, त्यात मानधन कमी असल्याने शक्य तेवढी काटछाट करावी लागायची. जेव्हा केव्हा आठवणीने रेनकोट न्यायचो, तेव्हा का कुणास ठाऊक पाऊस यायचाच नाही. जणूकाही हा डेटा ब्रह्मदेव पृथ्वी वरून घेऊनच ठेवायचा की काय. जेव्हा पावसाचा मागमूस नसायचा तेव्हा बरोबर अर्ध्या मधात खिंडीत गाठायचा. पावसात भिजू नये या बेताने गाडी बाजूला लावे लावेपर्यंत त्याने त्याचं काम केलेलं असायचं. मनातल्या मनात कितीही चरफड केली तरी आंबूस ओल्या अंगाने दिवसभर काम करावं लागणार हे निश्चित असायचं. कधी कधी मित्र छत्री उघडून बचावात्मक पवित्रा घ्यायचाही पण ती छत्री नेमकी ड्रायव्हर च्या डोळ्यापुढे येऊन माणसाचा कधीही धृतराष्ट्र होऊन जायचा कळेना. त्यात हवा शिरून गाडी मागच्या बाजूला ओढली जायची, कधी उलटी होऊन जायची. पडून हातपाय मोडण्यापेक्षा आपलं भिजलेलं बरं! हा सुज्ञ विचार करून जमेल तसं शाळेवर पोहचायचे. नेमक्या गावाच्या अलीकडे वेशीवर शेतातली माती वाहून आलेली असायची आणि त्यात भर म्हणून गुरांचे शेण आणि काय काय मिसळून अगम्य असा चिखलाचा निसरडा प्रकार रस्त्यावर आलेला असायचा. त्यात मी नवशिक्या उमेदवार असल्याने मागचा की पुढचा ब्रेक की दोन्ही एकदाच? हा विचार करेपर्यंत चाकांनी रस्ता सोडलेला असायचा. आजही आमच्या एका साहेबांची झालेली घसरगुंडी आठवली की हसू आवरत नाही. त्यानंतर कधीही साहेबांनी त्या वाटेला पावसाळ्यात गाडी टाकली नाहीच. जणूकाही साहेबांच्या आणि आमच्या मध्ये हा अभेद्य खंदकच होता.

डोळ्यांना चष्मा असल्याने चालू पावसात डोळ्यांसमोर नागमोडी रेषा, पाण्याचे मोठे मोठे घरंगळणारे थेंब, नाका तोंडातून उडणारी उष्ण हवा आणि त्यामुळे आतून चष्म्यावर उमटणारे धुके अशा दिव्य दृष्टीतून बघत गाडी चालवावी लागे. समोरचे रस्ते, खड्डे आणि माणसे (विशेष म्हणजे सर्व रस्ता आपल्या बापाचा आहे असे समजून रस्त्याच्या मधोमध चालणारे माझ्यासारखे दुचाकीस्वार) यांना ओलांडत ओलांडत आपले इष्ट ध्येय गाठल्यावर केवळ गाडी चालवण्याचा नव्हे तर विमान चालवण्याचा आंतरराष्ट्रीय परवाना द्यायला हरकत नव्हती. चष्मा घालून गाडी चालवताना दरवेळी एक मजेदार विचार डोक्यामध्ये यायचा, \"या चष्म्याला वायपर बसवता आले असते तर??\" चालू गाडीमध्ये एका हाताने स्टेरिंग चालवत मध्ये मध्ये बोटांनी चष्मा पुसावा लागायचा. त्यात पावसाचे थेंब तोंडावरून गळ्यामध्ये शिरून पोटांना गारवा द्यायचे. त्यामुळे जे जाणवायचं ते शब्दांत सांगता येणं, त्यातही सभ्य शब्दात तर अशक्यच….

या सगळ्या गोष्टींना कंटाळून म्हटलं, "आता रेनकोट घ्यायचाच." रेनकोट बाबत अनुभव असलेल्या मित्राला सोबत घेऊन एका चांगल्या दुकानांमध्ये गेलो, दुकानदाराने अगदी कामचलाऊ मेन कापडी रेनकोट पासून तर अतिशय मजबूत भारदस्त महागड्या रेनकोट पर्यंत सगळ्या रेंज दाखवल्या. रेनकोट घ्यायला काय पैसा खर्च करायचा, या व्यावहारिक विचारांच्या आधाराने आणि हुशार मित्राच्या अनुभवी सल्ल्याने मी एक मध्यम किमतीचा रेनकोट घेतला. गाडीला डिक्की असल्यामुळे डिक्कीत ठेवूनही दिला, आणि एक दिवस त्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली.

खरंतर रेनकोट हा सुद्धा एक ड्रेसच की नाही? मग त्याची डिझाईन थोडी छान हवी की नाही? त्या बर्फाच्छादित प्रदेशांमध्ये एखादा पेंग्विन कसा दिसतो, रेनकोट घालून मी अगदी तसाच दिसायला लागलो. बरं गंमत अशी की माझ्या उंचीचा रेनकोट कुठेच मिळेना, त्यामुळे त्यातल्या त्यात जवळपास जाणाऱ्या उंचीचा रेनकोट मी घेतला. \"शेवटी काय उपयुक्तता महत्त्वाची,\" अशी मनाची समजूत घालून रेनकोटचे उद्घाटन केले. छान पैकी टोपी आणि त्याला बांधायला असलेली दोरी, रेनकोट बनवणाऱ्यानी विचार केलाय हो खराच असं मनातल्या मनात कौतुक करत मी शाळेमध्ये पोहोचलो. रेनकोट काढून ठेवला आणि मला धक्का बसला…. माझी सगळी पाठ ओली चिंब झाली होती, आणि पॅन्ट सुद्धा मागच्या बाजूला ओलसर झालेली होती…
माझी जरा चिडचिड झाली, असं अर्धवट ओल व्हायचं असेल तर रेनकोट कशाला घालायचा? रेनकोट म्हणजे पावसापासून संरक्षण की नाही? शेवटी दिवसभर अंगावरती कपडे सुकवत मी घरी आलो.

"अहो प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र असतं, तुम्हाला साधा रेनकोट सुद्धा घालता येत नाही, तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीच्या पद्धतीने घातला असेल, उद्या अगदी व्यवस्थित घालून जा बरं…."इति बायको.

लग्न झाल्यापासून बायकोच नेहमीच बरोबर असते हे मी अनुभवाने शिकलो होतो, त्यामुळे माझ्या सद्सद विवेक बुद्धीपेक्षा बायकोला माझ्या बुद्धी बद्दल जे वाटतं ते खरं म्हणून मी दुसऱ्या दिवशी आरशात बघून रेनकोट घातला. रेनकोट घालून अगदी खुशीमध्ये शाळेत पोहोचलो. रेनकोट काढून खुंटीला टांगला आणि तिथल्या आरशामध्ये बघितलं. आज खरंच बदल झालेला होता, \"आज पाठ कोरडी होती आणि छाती आणि पोट ओले चिंब झाले होते….\"

आता नेमका राग कुणावर काढायचा? साहजिकपणे बायकोवर हा राग काढता येणे शक्य नव्हते, तेवढी हिंमत अजूनही देवाने मला दिली नाही.

"कुठलेही स्वस्त रेनकोट घेऊन येता आणि भिजता. आपल्या जिवासाठी एवढा तरी काय विचार करायचा? जरा महागडा पाहून चांगल्या ब्रँडचा पाहून एक व्यवस्थित रेनकोट घेऊन या. कधी कधी स्वस्त वस्तू महागड्या पडतात हो…"इति बायको.

तालुक्याच्या ठिकाणी एका चांगल्या दुकानात हुशार मित्राला घेऊन गेलो, आणि "एक जरा उत्तम दर्जाचा रेनकोट दे रे बाबा…!!" असे म्हणालो. दुकानातला पोरगा खरोखर खूप अभ्यासू वाटला.

"अहो साहेब रेनकोट- रेनकोट मध्ये लय फरक आहे, काही रेनकोट मेनकापडी, काही काही रबरी, काही दोनपदरी तर काही टू इन वन रेनकोट असतात."

"अरे बाबा, मला यातलं फार काही समजत नाही. तुझ्या दृष्टीने उत्तम असा रेनकोट मला दे. साहेब हा बघा, टू इन वन रेनकोट आहे, हिवाळ्यात उलटा करून घालायचा म्हणजे थंडी वाजत नाही, आणि पावसाळ्यात सुलटा करून घालायचा म्हणजे पाऊस लागत नाही आणि थंडीही वाजत नाही."

पुढचे दहा पंधरा मिनिट त्याने या ब्रँडचा रेनकोट किती जबरदस्त आहे याबद्दल मला अगदी कन्व्हेन्स केल. हुशार मित्रानेही दुजोरा दिल्याने मी अगदी निर्धास्तपणे हा नवा रेनकोट घेतला.

पहाटेची शाळा असल्यामुळे स्वेटर आणि त्यावर रेनकोट हा द्राविडी प्राणायाम करावा लागायचा. आता मात्र मी \"अगदी स्मार्ट\" असा रेनकोट घेतलेला असल्यामुळे माझे दोन्हीही काम होणार होते. हा रेनकोट दिसायलाही जरा बरा होता. त्याला असलेली टोपी आणि पारदर्शक टोक यामुळे यामुळे रेनकोट बनवणाऱ्या कंपनीची मी मनापासून स्तुती करत होतो.

खरोखर गाडी चालवताना थंडी वाजत नव्हती. पावसाची रिमझिम आणि थंड हवा या दोघांना तोंड देत देत मी शाळेत पोहोचलो. रेनकोट काढून आरशासमोर मोठ्या दिमाखात उभा राहिलो…..

तळपायाची आग मस्तकात गेली, काय झालं होतं माहिती नाही, माझं सर्व शर्ट ओलं झालेलं होतं….

कधी कधी आपणच बरोबर होतो आणि मित्र आणि बायको दोघे चुकीचे होते, अशी शंका यायला लागली. अख्खा दिवस त्या ओलेत्या कपड्यांमध्ये राहून दुसऱ्या दिवशी सर्दी पडसे झाले.

"रेनकोट हे प्रकरण एवढे किचकट का असते? साधा रेनकोट तो काय? ते काय रॉकेट सायन्स आहे का? ××ला….!!

"तुला राग येणार नसेल तर सांगू का? रेनकोट कधीच महाग घ्यायचा नाही, साधा रबरी रेनकोट घ्यायचा, दिसायला फारसा आकर्षक नसला तरी त्याला शिवण नसल्यामुळे एक थेंब सुद्धा पाणी अंगात शिरत नाही…"इति हुशार मित्र.

\"मित्र आपल्या हिताचीच गोष्ट सांगत असतात,\" एक सुविचार…असे मनाला सांत्वन देऊन मी त्याच्या मागच्या गुन्ह्यांवर पांघरून घातले आणि परत त्याच्या सल्ल्याने एका साध्या दुकानात जाऊन रबरी रेनकोट घेतला. यावेळी मात्र त्याला शंभर पैकी शंभर गुण दिलेच पाहिजे. या रेनकोट ने पूर्ण पावसात मला छान साथ दिली.

रेनकोट घालून माणूस पूर्ण कोरडा राहू शकतो ही मुळातच अंधश्रद्धा आहे, पण त्यातल्या त्यात अगदी अल्प प्रमाणात ओले करून कोरडे राखण्यात या रेनकोट नी यश मिळवले होते. पावसाळा संपताच त्याची घडी करून मी बायकोच्या हाताने मी त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवून दिले. पुढच्या वर्षी परत पावसाळा सुरू झाला, आणि तिने आठवणीने रेनकोट गाडीच्या डिकीत ठेवायला दिला. दिवसभर पाऊस आला नाही, नेमका जाताना मात्र पाऊस सुरू झाला. झाडाखाली थांबून घाई घाईने डीक्की मधला रेनकोट काढला…..

हाय रे देवा….!! रबरी असल्यामुळे की काय कुणास ठाऊक हा रेनकोट जागोजागी चिकटला होता, अतिशय सावकाशपणे काढत सुद्धा दहा ठिकाणी तो फाटलाच, तो अस्ता व्यस्त, अर्धवट फाटलेला रेनकोट घालण्यापेक्षा फेकून दिलेला बरा या विचाराने मी रागारागाने तो रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

मनातल्या मनात कुणाकुणाला आणि किती किती शिव्या देत अगदी सर्वांगाने ओला होत मी घरी आलो. पुढे काय झाले असेल, याचा याचा सुज्ञ वाचक नक्कीच अंदाज करतीलच.

रेनकोट असून फजिती आणि नसून खोळंबा हे कळायला बराच काळ जावा लागला. पू ल देशपांडे यांनी म्हटल्या प्रमाणे हा रेनकोट चा मार्ग भलत्याच अशक्य कोटितून जातो हे मात्र खरं….!!

लेखन -
संदीप विष्णू राऊत
बुलडाणा

(चित्र नेट वरून साभार)