Feb 26, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

पाऊस आणि वारी

Read Later
पाऊस आणि वारी

'तो' निदान आज तरी येईल म्हणून नाथा आणि रखमाबाई आभाळाकडे टक लावून पाहत होते. या वर्षीही तो आलाच नाही, तर हाता -तोंडाची गाठ पडणं अशक्य आहे, हे दोघांनाही माहित होतं.

सलग दोन वर्षे पाऊस न आल्याने नाथाची डोळ्यात न मावणारी जमीन आता कडकडीत वाळली होती. पाणी नसल्याने पीक नव्हतं, त्यामुळे घरच उत्पन्नही काही नव्हतं.
आपसूकच हाती पैसा नसल्याने, घरात आता अन्नाचा कणही शिल्लक नव्हता. त्यात जवळचा, शिल्लक असलेला पैसा- अडका संपून गेला होता.

नाथाच्या मोठ्या लेकराला शाळेत प्रवेश घ्यायला पैसे भरायचे होते. पण जवळचा पैसा संपल्याने नाथाने 'बघु पुढल्या वर्षी, पोटापेक्षा शाळा  महत्वाची न्हाय.' असे म्हणून तो विषयच बंद केला.
'मुलाला शाळेत पाठवा' म्हणून शाळेतले मास्तर  नाथाला दम द्यायला घरी आले खरे, पण त्याच्या घरची परिस्थिती पाहून तेही भरल्या डोळ्यांनी घरातून बाहेर पडले.

गावात साऱ्या कुटुंबांची अवस्था जवळपास सारखीच होती. कुणी श्रीमंत, सावकार असतील तेच कसेबसे तग धरून होते. सरकारी अधिकारी येऊन गावची अवस्था पाहून गेले. पण ती सरकारी मदत मिळणे आताशा फार अवघड बनले होते.

दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली अन् नाथाने विठू रायाला साकडं घातलं.
"राया या वर्षी बक्कळ पाऊस पडू दे रं. तुझ्या दर्शनाला, वारीला दर वर्षी न चुकता येतो..ते बी संगतीन."

"विठू रायानं आपलं साकडं ऐकलं न्हाई रखमे. आज घरी जावंसच वाटत न्हाई बघ." नाथा आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला.
आपल्या नवऱ्याच बोलणं ऐकून रखमाला वेगळीच शंका आली. ती झटकन नाथा जवळ येऊन बसली.
"अहो..देव हाय त्यो. आपलं गाऱ्हाणं असं कसं ऐकत न्हाई बघतेच मी. चला घराकडं. पोरं वाट पाहत असतील."
रखमाने आग्रह करून देखील नाथा जागचा उठेना. तशी रखमाला भिती वाटू लागली. तिनं नाथाला जवळ घेतलं. तसा तो ओक्साबोक्षी रडू लागला.
आपल्या नवऱ्याला असं रडताना पाहून रखमाचं काळीज तुटत होत. पण असं हरून चालणार नव्हतं. कारण रखमाचा बांध तुटला, तर नाथाला सावरणार जवळच कोणीच नव्हत.
तिनं मनातल्या मनात विठू रायाला विनवणी केली. 'देवा असा कठोर होऊ नगं रं. आमच्या पोरा- बाळांकडं बघ..त्यांची तरी पोटं भरू दे, आता तरी जमीन भिजू दे रं बाबा.'

रखमा आपल्या नवऱ्याला बराच वेळ समजावत राहिली.
मनात साचलेलं डोळ्यावाटे वाहून गेल्याने नाथा आता बराच शांत झाला होता. हे पाहून रखमा त्याला म्हणाली, "अजून लई कष्ट करायचेत. पोरांना शिकवायच ना! आपणच जिद्द हरलो तर त्यांच्याकडं कोण बघणार? उठा, डोळे पुसा अन् चला बघू घरी."

इतक्यात नाथाच्या हातावर दोन थेंब पडले. हे पाहून त्याने रखमाचे डोळे पुसले आणि म्हणाला "आता तू रडू नग बाई..चुकलं बघ माझं." तशी रखमा काऊन म्हणाली, "मी न्हाई रडत, अहो तुमचं आभाळ रडत असल बघा."

तसे नाथाने चमकून वर पाहिले. काळे ढग आभाळात गर्दी करत होते. हे पाहून नाथा आनंदाने उड्या मारायला लागला. तर रखमाने विठूरायाला हात जोडले.
काळे ढग दाटत होते, तसा गडगडण्याचा आवाज वाढत होता.

नाथाच्या डोळ्यापुढं स्वप्न दिसू लागले.
पीक -पाणी उत्तम आलं. घरात पैसा -अडका आला, धन -धान्य आलं.
"राया आता नाराज करू नकोस. माझ्या पोरांवर अशी वेळ येऊ नये, इतकंच बघ." असे म्हणत त्याने मनोभावे आभाळाला हात जोडले.

थोडयाच वेळात मोठाले थेंब जमिनीवर बरसू लागले. जणू थेंबही आसुसले होते, धरणीला भेटायला! बघता बघता तहानलेली जमीन चिंब भिजली आणि नाथाला कळतच नव्हतं, हे आनंदाश्रू आभाळातून वाहत आहेत की आपल्या डोळ्यातुन!
आता नाथा मनातून कधीच वारीला पोहोचला होता, प्रत्यक्ष विठुरायाच्या दर्शनाला!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//