राहू - केतू

कथा... विद्यार्थी आणि शिक्षक या गोड नात्याची
इयत्ता सहावी.. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आंबडस. पाचवी ते सातवीचे वर्ग छोट्या मैदानाच्या हद्दीत अगदी कौलरू रुपात मिरवत असायचे. आम्हाला मोजकेच चार शिक्षक. वर्गशिक्षक राऊत सर ज्यांच्याकडे गणित विषय होता, त्यानंतरचा तास खांबे सरांचा त्यांच्याकडे इतिहास- नागरिकशास्त्र,भूगोल.. मग निर्मला मॅडम..मराठी, हिंदी आणि विज्ञानासाठी..बापरे यांच्या वेळी बोलेल कोण? सरळ वर्गाच्या बाहेर ओणव उभ करायच्या आणि पाठीवर काठी..जर का काठी पडली की सटा..क ! आई.. ग नुसत टाईपत आहे तरी फील झालं मग खरोखर काय फील झालं असेल त्याचा विचार करा. आता पुढे..इंग्लिशला देसाई सर खूप गुणी.. इतके की अगदी दंगा केला तरी शांत माणूस. तेंव्हा वाटायचं सगळ्याच तासाना हेच सर असावेत.आमच्यामुळे तर बऱ्याचवेळा त्यांनी मुख्यध्यापकांची बोलणी देखील खाल्ली आहेत म्हणजे ऐकली आहेत. वाईट वाटायचं तेंव्हा आणि मग ठरवायचो आम्ही..की देसाई सरांच्या तासाला दंगा करायचं पण... शांतपणे...
पी. टी चे शिक्षक कांबळे सर. ते सगळ्यांना कॉमन होते. अगदी ज्युनिअर पासून ते सिनियर पर्यंत...त्यांचा तर आवज म्हणजे वाघ... सगळे शिक्षक सुद्धा घाबरायचे मग आम्ही काय चीज आहे.

शिक्षक सगळेच छान असतात. सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात. काही शिक्षक स्वतःच्या वागण्या बोलण्यातून मुलांच्या थेट हृदयाशी जातात. त्यातलेच आमचे दोन प्रिय शिक्षक.. \"खांबे सर आणि राऊत सर उर्फ राहू - केतू..

खांबे सर.. डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा.. चवळीच्या शेंगे सारखे बारीक.. कमरेच्यावर लूज अशी पँट आणि आठ दिवसात फक्त तीन रंगाचे शर्ट.. डाव्या हाताच्या मनटावर चॉकलेटी रंगाच्या पट्ट्याच घड्याळ आणि त्याच हातात शिमटी...

राऊत सर म्हणजे.. देवमाणूस.. देवमाणूस मधला नाही हां खऱ्या आयुष्यातील देवमाणूस.. मिडीयम अशी उंची.. अंगाने जरा जाड, चेहऱ्यावर नेहमी शांतता आणि ओठांवर गोड हसू. त्यांना पाहिलं तरी बर वाटायचं पण सोबत राहू असल्याने आम्ही शांतच रहायचो कारण हातात ओली शिमटी असायची ना!

तर असे आमचे हे राहू - केतू.

दोन्ही सरांची गावं बाजुबाजुला असल्याने दोघे एकत्रच यायचे. खांबे सरांकडे बाईक होती पण ते नेहमी मागेच बसून आलेले आम्ही पाहिलं आहे.. कारण अस..की खांबे सर त्यांच्या घरापासून ड्राईव्ह करत यायचे आणि शाळेत पोहोचण्याआधी गाडी राऊत सरांना सुपूर्त करायचे.त्यांचा एक नियम होता \"नवीन दिवस नवीन छडी\" म्हणून रोज एक मस्त पैकी पातळ हिरवीगार अशी शिमटी घ्यायचे आणि मग मागच्या सीटवर बसायचे. रस्त्यावरून जाताना जर कोणी मस्ती करतांना दिसल की शिमटी थेट पायावर...विद्यार्थी जागीच नाचला पाहिजे. \"साल्या उड्या काय मारतोस?शिस्तीत चाल.\" \" आज माझे दोन तास आहेत पाठांतर घेणार आहे मी.\" रोज मागच्या सीटवर बसून अशीच बोंब मारत यायचे आणि गंमत म्हणजे \"ढ\" विद्यार्थी पण त्यांच्या विषयाचं सगळच पाठांतर करून यायचे.(न करून सांगणार कुणाला) वर्गात तासाला आले की त्यांचा एक डायलॉग ठरलेला असायचा. \"साल्यानो अभ्यास करा अभ्यास.. नुसत खेळायला आणि बोंबलायला पाहिजे, पुढे जाऊन तुम्ही भिकाच मागणार वाटते!\"
क्रमशः
@श्रावणी लोखंडे

🎭 Series Post

View all