Feb 25, 2024
पुरुषवादी

राहू - केतू भाग अंतिम

Read Later
राहू - केतू भाग अंतिम

माझी बदली झाली आहे! चिपळूणच्या डी.बी.जे. कॉलेज मध्ये. मी फक्त आजच्या दिवस इथे आलो आहे..तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला. पेपर देणं हा फक्त एक बहाणा होता.

काहीवेळ आम्ही सरांकडे आणि सर आमच्याकडे बघत होते. काहीच सुचेना. सगळ जग थांबलय अस वाटू लागलं होत. थोड्यावेळाने मधल्यासुट्टीची बेल वाजली आणि सर निघुन गेले. त्यादिवशी खांबे सर आमच्या सोबत जेवायलाही आले नव्हते कारण त्यांना फार दुःख झालं होत त्यांचा जवळचा मित्र दुसरीकडे जातोय म्हणून. आम्ही मुल मात्र हातात पेपर धरून मुसमुसत होतो. मधल्यासुट्टीनंतर निर्मल मॅडमचा तास होता. वर्गात असणारा धिंगाणा आज शांत का? हे त्यांना माहीत होत. आमचे रडणारे चेहरे बघून त्यांनाही रडू आल आणि त्यांनी त्यांच्या छोटूश्या फोनवरून राऊत सरांना फोन करून आमच्या वर्गात बोलावून घेतल.

सरांनी दारातूनच मॅडम ना आत येऊ का म्हणून विचारलं आणि आम्ही क्षणात धावत जाऊन सरांना मिठी मारली. आम्ही एवढ्या जणांनी मिठी मारली की सर अक्षरशः ढोपरावर बसले. आम्ही धाय मोकलून रडत होतो आणि सर.. ते तर शांतच होते. नेहमी सारखं चेहऱ्यावर हसू होत. आम्ही सरांना मारत होतो. नका जाऊ म्हणून विनवत होतो आणि सर मात्र शांत राहून स्मित करत होते. निर्मल मॅडम त्यांना रडून मोकळ व्हायला सांगत होत्या ज्याचा अर्थ आम्हाला तेंव्हा समजत नव्हता. खांबे सर त्यांची ओली शिमटी घेऊन आले आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना बाजूला केलं. आम्ही लांब राहून रडत होतो. सर नका ना जाऊ..आम्ही मस्ती नाही करणार म्हणून विनवणी करत होतो हात जोडत होतो पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. हातात शिमटी घेऊन डाव्या खांद्यावर आपले डोळे पुसणारे खांबे सर त्यांनाही विनंती केली तुमचा सगळा अभ्यास करू तुमचं सगळ ऐकू पण त्यांना थांबवा. निर्मल मॅडम समोर पण हात जोडले होते पण त्याही डोळ्याला पदर लावून फक्त उभ्या होत्या. आम्ही मात्र ओक्साबोक्शी रडत होतो. आमचं रडण बघून तिन्ही शिक्षक आम्हाला एकट सोडून निघून गेले. मधल्या सुट्टी नंतर आमच्या तासावर एकही शिक्षक आला नव्हता. तरी मस्तीखोर म्हणून ओळख असलेला आमचा वर्ग शांत होता जणू त्या वर्गात कुणीच नव्हत.
शाळा सुटली आणि आम्ही घरी गेलो. सरांनी आवाज देऊनही थांबलो नाही कारण आम्ही खूप दुखावलो होतो. दुसऱ्या दिवशी खांबे सर एकटेच आले बाईक वरून राहू - केतू ची जोड गोळी सोबत नव्हती. ती पुन्हा कधीच सोबत दिसणार नव्हती.

आठ दिवसांनी राऊत सरांचा निरोप समारंभ होता. खांबे सरांनी निक्षून सांगितलं होत. कुणी रडायचं नाही.. आपण छान हसत खेळत त्यांना निरोप देऊ या. आम्ही सरांसोबत मिळून त्यांच्यासाठी एक वॉल हँगिंग गिफ्ट घेतल. (जमतील तसे पैसे काढले होते कारण तेंव्हा शाळेत जाताना दोन रुपये मिळायचे खाऊ साठी)

निरोप समारंभाचा दिवस उजाडला. सगळे शिक्षक काही ना काही भेटवस्तू घेऊन आले होते. सगळे शिक्षक त्यांच्यासाठी दोन दोन शब्द बोलले. विद्यार्थ्यांना दोन शब्द बोलायची विनंती केली पण कोणीच जायला तयार नव्हत. शेवटी राऊत सर स्वतः आले. सगळ्या शिक्षकांना आणि मुलांना धन्यवाद देऊन शाळेबद्दलच्या काही आठवणी सांगून ते थांबले. सगळ्या शिक्षकांनी मिळून त्यांचा सत्कार केला. शाळेचा फोटो त्यांना फ्रेम करून गिफ्ट देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आम्ही सरांना शोधत होतो कारण त्यांना गिफ्ट द्यायचं होत. सगळीकडे शोधून झालं आणि शेवटी सर.. विज्ञानच्या प्रयोग शाळेत दिसले. कपाटाच्या आडोश्याला उभ राहून रडत होते. माझी पुढे जायची हिम्मत झालीच नाही. मी खांबे सरांना जाऊन सांगितल. आम्ही सगळे रुमच्या बाहेर उभे राहून रडत होतो. आमच्या रडण्याचा आवाज आला तसे सर समोर आले. एवढे दिवस रोखून धरलेले अश्रू आज बरसू लागले होते. सरांनी रडता रडता दोन्ही हात लांब केले तशी सगळीच मुल धावत त्यांच्या मिठीत शिरली. सगळ्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सर ही खूप रडत होते. मी मात्र लांबच होते आणि माझ्या सोबत खांबे सर. खूपदा बोलावून सुद्धा मी काही गेलेच नाही. खांबे सरांनी हाताला धरून मला सरांकडे नेल मग मात्र माझ्याही अश्रूंचा बांध फुटला. आम्हाला रडतांना बघून सगळेच शिक्षक रडू लागले. कडक शिस्तीचे..वाघासारखा आवाज असणाऱ्या कांबळे सरांचाही त्यापुढे निभाव लागला नव्हता.

जड मनाने आणि इच्छा नसतांना सुद्धा आम्ही सरांना निरोप दिला होता.. त्यांना पाठमोर जातांना बघून जास्तच गहिवरून येत होत पण तरी आमच्या अश्रूंना डोळ्यातच थोपवून आम्ही त्यांना टाटा करत होतो. अगदी..ते दिसेनासे होईपर्यंत!

राऊत सरांची बदली झाली आणि दुसऱ्यादिवशी नवीन सरांनी वर्गशिक्षक म्हणून आमच्या वर्गाचा ताबा घेतला होता. आमचा वर्ग म्हणजे बेशिस्त अस त्यांच्या ऐकिवात होत पण त्यांच्या अनुभवावरून सहा महिन्यांनी जेंव्हा चार्जशीट काढली शिस्तबध्द वर्गाला गुण देण्यासाठी त्यात आमचा पहिला नंबर होता. कधीकाळी बेशिस्त असणारा वर्ग राऊत सरांच्या जाण्याने शांत झाला होता. आम्ही बऱ्यापैकी न ओरडता अभ्यास करू लागलो होतो.


राऊत सरांची बदली होऊन सहा महिने उलटून गेले होते त्यांच्या आठवणी मनात ठेऊन आम्ही पुढे जात होतोच की.. खांबे सरांनी पी. टी च्या तासाला आम्ही ग्राउंड वर असताना त्यांनी बदली करून घेतली आहे अस सांगितल. आम्ही फक्त त्यांच्याकडे एक नजर पाहिल आणि वर्गात निघुन गेलो. आमच्या पाठीवर सर आले त्यांनी फार समजावलं होत आम्हाला पण आम्हाला समजून घ्यायचं नव्हत.

सगळ्याच मुलांना काही ना काही टोपण नाव ठेवलं होत त्यांनी. मला झंडू बोलायचे. मला झंडू म्हणून हाक मारली की लटका राग घेऊन फुगून बसायचं त्यांच्यावर.. मग ते सॉरी बोलून पँटच्या खिशातून एक पार्लेजिचं चॉकलेट काढून द्यायचे. खोटा खोटा आलेला राग कुठल्या कुठे छू व्हायचा. झंडू नाव हे त्यांच्या तोंडून ऐकायलाच छान वाटायचं.

हे दोन शिक्षक फक्त आमचे शिक्षक नव्हते! जिवाभावाचे मित्र होते..दादागिरी करणारे भाऊ होते..वडीलांसारखी माया करणारे वडीलधारे होते तर कधी आजारी असताना आई सारखी काळजी करणारी आमची माय होते.

दोन्ही सर आमची शान होते. दोघांपैकी एक जरी आमच्या सोबत कुठे असले ना तरी खूप मिरवायचो आम्ही. खांबे सर म्हणजे अगदी फणसासारखे होते...बाहेरून काटेरी आणि टणक, आतमध्ये तेवढाच गोड..रसाळ.

राऊत सर म्हणजे मोगरा.. सदैव सगळीकडे सुगंधित उधळण..प्रेमाचा- मायेचा ओलावा..

नवीन सरांशी आम्ही कधी जुळवून घेतल नाही रादर आम्हाला त्यांच्याशी जुळवून घ्यायचं नव्हत. तुमची मुलं शांत असली तरी नीट अभ्यास करत नाहीत अशी तक्रार नवीन सरांनी राऊत सरांकडे केली होती. म्हणून सर आम्हाला भेटायला आले त्यांच्या समजावून सांगण्याने आम्ही समजलो आणि तसच वागायला लागलो.

असे शिक्षक पुन्हा माझ्या आयुष्यात कधी आलेच नाही.
राऊत सर आणि खांबे सर...नेहमीच अडचणीत असलेल्या मुलांना मदत करण्यासाठी पुढे असायचे मग ते स्पर्धा परीक्षांची फी असो किंवा सहलीचे पैसे असो. स्वतःच्या खिशातून द्यायचे आणि \"मोठा कमावता झालास की परत दे हा!\" असही म्हणायचे.

या दोन सरांची बातच न्यारी
खूपच खास या दोघांची यारी
शिक्षक म्हणून नेहमीच होते बेस्ट
अभ्यास आमचा कधीच जाऊ दिला नाही वेस्ट
नेहमीच हातात हिरवीगार छडी
म्हणून इतिहासावर बसली आमची..चांगलीच घडी
गणित म्हणजे डोक्यात नुसताच किस
पाढे पाठ करायला शिकलो गाण्यात
म्हणून टेस्ट मधे गुण वीस पैकी वीस..

काही पुरुष असेही असतात जे शिक्षक रुपात खूप नाती निभावतात. आई,बाप,भाऊ, बहिण या सगळ्यांचं प्रेम देतात. मदत करतात तर कधी योग्य मार्ग दाखवतात.
अजूनही ते दिवस जसेच्या तसे आठवणीत आहेत. दोन्ही सरांना फेसबुकला शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडलेच नाहीत.
समाप्त...
@श्रावणी लोखंडे...


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading

//