राहू - केतू भाग 2

कथा... विद्यार्थी आणि शिक्षक या गोड नात्याची



शिकवायला सूरवात करण्याआधी रोज आदल्या दिवशीच्या धड्याखालची प्रश्नोत्तरे पाठ घेणं आणि उत्तर चुकलं की शिमटी आहेच. एकदा गंमतच झाली. वर्गात आम्हाला सांगितलं गेलं खांबे सर आठ दिवसांच्या रजेवर गेले आहेत. आम्ही एवढ्याने कोकललो की बाजूच्या वर्गात शिकवत असलेल्या राऊत सरांनी येऊन आम्हाला शांत रहायला सांगितल आणि इशारा पण दिला होता \"काम झाल त्यांचं तर दोनच दिवसांत येतील, जे काही पाठांतर आहे ते करून ठेवा.\" (खांबे सर म्हणजे फक्त पाठांतर हे संपूर्ण शाळेला माहीत होत. कारण आधी पाठांतर आणि मग गृहपाठ असा त्यांचा नियमच होता.)

आम्हाला "आठ दिवसांची सुट्टी" याशिवाय काही ऐकूच आल नव्हत पण का कोण जाणे दिलेल्या तिन्ही धड्याखाली जेवढे प्रश्न होते त्यांची उत्तर मी दोन दिवसात पाठ केली होती. रोज सोबत येणारी जोड गोळी दोन दिवस नव्हती कारण सर नसल्याने राऊत सर एस. टी ने येत जात होते आणि.. आणि अचानक तिसऱ्या दिवशी बाईकचा आवाज आला. आम्हा सगळ्यांच्या छातीत धडधडू लागल. माझ्या बहिणीने तर माझ्या पाठीत दोन्ही हाताने एवढ्या जोरात मारल की मी पुढच्या पुढे गेले वर म्हणते \"अग मेलीस.. खांबे सर पण आलेत वाटत? आता वाट..!\"

राऊत सरांच्या मागे खांबे सर नेहमी सारखेच ऐटीत सून आले होते. नेहमीपेक्षा जास्तच आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर (आणि का ते मी सांगण्याची गरज नाही) मात्र राऊत सर आमच्या भीतीचा आनंद घेत होते कारण त्यांनी आधीच सावध केलं होत सगळ्यांना. सातवीच्या वर्गात मयुरी म्हणून एक मुलगी होती अतिशय हुशार. तिला आवाज देत दोन्ही सरांनी टिफीनची बॅग तिच्याकडे दिली आणि बॅग देतच बोलले \" काय मग.. केलय ना सगळ्यांनी पाठांतर! वर्गात येऊन विचारणार आहे मी सगळ!\" तसे सगळेच एकसुरात ओरडले "हो" पण खर काय होत हे आमच्यापेक्षा सरांना जास्त चांगल माहीत होत आणि हुशार असणारी मयुरी पण अर्धी कोमातच होती कारण तीनेसुद्धा पाठांतर केलं नव्हत.

प्रार्थनेच्या आधी राऊत सरांना आम्ही सांगितल दोन तास तुम्हीच कंटीन्यू करा बर प्लीज प्लीज करून विनंतीही केली आम्ही पण आमचा वर्ग जास्त मस्तीखोर.. म्हणून राऊत सरांचा पहिलाच तास त्यांनी घेतला आणि प्रार्थना झाल्यावर राऊत सरांना मारलेला मस्का गॅस वर वितळतो तसा वितळला कारण आम्ही सरांना रिक्वेस्ट केली होती की तुमच्या गणिताच्या तासाला आम्हाला इतिहास वाचुद्या पण त्याचा काही उपयोग झाला नाही कारण राऊत सर हो बोलले होते आणि खांबे सरांनी किल्ला जिंकला होता. पुढे काय? मज्जाच मज्जा.. सगळ्यात जास्त आवाज माझा असायचा म्हणून पहिल्या प्रश्नाला मलाच उठवलं पण दोन दिवस वाचल्याने मला उत्तर लक्षात राहीली. सलग तीन प्रश्नांची उत्तर दिली आणि अख्खा वर्ग माझ्याकडे कौतुक वजा रागाने बघत होता त्यात माझी बहिण पण होती जिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होत. \"कुत्रे तू पाठांतर केलस आणि बोललीस पण नाही तू भेट नंतर.\" सरांनी मला बसायला सांगितल तस मी सापासारखी जीभ बाहेर काढतच बसले. सरांनी संपूर्ण वर्गाला एकच प्रश्न विचारला "कोणी कोणी अभ्यास पूर्ण केला नाही! आणि ज्यांनी पूर्ण केला नाही त्यांनी बाहेर निघा जर खोटं बोललात तर याद राखा." एवढंच बोलून होत नाही तोवर शिपाई काका निरोप घेऊन आले. निर्मल मॅडम नाहीत त्यांना शाळेच्या कामासाठी बाहेर पाठवलं आहे तर मॅडमनी तास तुम्हाला घ्यायला सांगितला आहे. झालं मग आमचं कल्याण.. सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला...पण, मनातल्या मनात.

खरा आनंद तर तेंव्हा झाला..जेंव्हा नवीन शिमटी आणायला सरांनी मला पाठवलं कारण मार खायच्या लाईनीत आमच्या वर्गातला हुशार मुलगा पण होता. आम्हाला मार खाताना बघतांना नेहमी हसायचा, आज बारी त्याची होती. (सबका दीन आता है) एकही प्रश्न न विचारता सगळ्यांच्या हातावर दोन दोन छड्या मारून पाठांतराला बसायला सांगितल आणि दुसऱ्या तासाला सगळ्यांचं पाठांतर झालं सुद्धा. मधल्या सुट्टीत आमच्या बाकी टीमने माझी काय दशा केली असेल हे मी सांगण्याची गरज नाही.

कधी ओरडुन तर कधी मारून .. हवा तसा परफेक्ट अभ्यास खांबे सरांनी आमच्याकडुन नेहमीच करवून घेतला. सहामाही परीक्षेत जेंव्हा ऐंशी पैकी सत्तर.. पंच्याहत्तर गुण मिळायचे तेंव्हा त्यांच्या ओरडण्याच महत्व समजायच पण तरी एवढं सगळ डोक्यात रहायला पण हवं ना...कारण डोक्यात नुसतीच हवा असायची आमच्या.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे

🎭 Series Post

View all