Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

रहस्य स्यमंतकाचे.. भाग ४

Read Later
रहस्य स्यमंतकाचे.. भाग ४
रहस्य स्यमंतकाचे.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभच्या आईवडिलांचा ज्यादिवशी अपघात होतो त्याच दिवशी त्यांच्या घरात चोरी होते. कौस्तुभ त्याचे आईवडील नक्की कशावर काम करत होते ते शोधायचा प्रयत्न करतो आहे. सापडेल का त्याला?


" द्वारकाधीश, हे अधरीय तर कोणा यादवाचे दिसत आहे." सात्यकी उद्गारला.

" हो. ते ही रक्ताने माखलेले. इथे त्या यादवाची वन्य प्राण्याशी झटापट झाल्याचे दिसून येत आहे." कृष्ण विचारमग्न झाला होता. "त्याच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला असेल तर त्याच्या मृतदेहाचे काहीतरी अवशेष इथे दिसले पाहिजेत. पण ते दिसत नाहीत. पावलांच्या ठश्यावरून तरी तो वन्यजीव वनराज असावा असे वाटते. नाहीतर कोणा यादवाला हरविण्याची ताकद इतर प्राण्यामध्ये कुठे?"

" हा प्रसेन असावा का?" सात्यकीने विचारले.

" त्याच्याशिवाय दुसरा कोणीही यादववीर असूच शकत नाही." कृष्णाच्या चेहर्‍यावर हास्य परतले होते. तिथे सिंहाच्या ठशांसोबतच काही मानवी ठसेही दिसत होते. यादवसैन्याने ठशांचा माग काढण्यास सुरूवात केली. थोड्याच अंतरावर एक मृत सिंह होता. तर मानवी ठसे एका गुहेपाशी येऊन थांबले होते.

***********


" बाबा, करू का मी हे?"

कौस्तुभने फोटोतल्या वडिलांना प्रश्न विचारला. त्यांच्या चेहर्‍यावरील हास्य हीच परवानगी समजून थरथरत्या हाताने त्याने संगणक सुरू केला. वाढत्या वयातही अनेकदा त्याला या सगळ्याचा शोध घ्यावासा वाटत होता पण आधी अभ्यास नंतर नोकरी यामुळे इच्छा असूनही कधी तो यापाठी गेला नाही. आपल्या आईबाबांविषयी जाणून घेण्यास तो फार उत्सुक होता. पण त्यांचा विषय काढला की आजोबा ओठ मिटून घ्यायचे. त्यालाही मग त्यांना अजून त्रास द्यायला नाही आवडायचे. आज त्यांनीच परवानगी दिली म्हटल्यावर तो आला खरा त्या खोलीत. पण यामागे काय दडले असेल याची अनामिक भिती त्याला वाटत होती. संगणक सुरू झाला. त्याच्या वॉलपेपरवर त्याचा लहानपणीचा फोटो होता. बहुतेक त्याच्या बाबांनी ठेवला असावा. त्याने बाबांचे काही काम दिसते का बघितले. कोणीतरी सगळी माहिती डिलीट केली होती. त्यावर एकही फाईल दिसत नव्हती. कौस्तुभला खूपच आश्चर्य वाटले.

" आजोबा, आजोबा.." कौस्तुभने आजोबांना हाक मारली.

" आलोच.." ते बहुतेक खोलीच्या बाहेरच उभे होते. कौस्तुभचा आवाज ऐकून ते लगेच आत आले. "काय झाले?"

" आजोबा, बाबा या कम्प्युटरवर काम करायचे का?"

" हो. तासनतास बसलेला असायचा. कधी तो तर कधी तुझी आई."

" मग यावर एकही फाईल कशी नाही? काहीच डॉक्युमेंट दिसत नाहीये." कौस्तुभचा हिरमोड झाला होता.

" मला त्यातलं काय समजतंय रे? माझा कधी त्याच्याशी संबंध आलाच नाही. मी आपला पुस्तकी किडा." आजोबा बोलत असताना कौस्तुभने रिसायकल बिन चेक केले. त्यातही काहीच नव्हते. त्याच्या एका मित्राने रिसायकल बिनमधली माहिती परत कशी मिळवायची हे शिकवले होते. त्याने ते ही करून बघितले पण नाही. कोणीतरी पद्धतशीरपणे ते सगळे पुसून टाकले होते. पण का? कौस्तुभ विचार करत होता.

" आजोबा, बाबा नेहमी हाच फोटो वॉलपेपर म्हणून वापरायचे का?" विचाराच्या जंजाळातून बाहेर येण्यासाठी त्याने विचारले.

" कोणता फोटो? बघू?" आजोबांनी फोटो बघितला. "नाही रे.. आधी तिथे गणपतीचा फोटो असायचा. हा फोटो त्याने जायच्या दोन दिवस आधी काढला होता. त्याला तुझा या खेळण्यासोबत फोटो हवा होता. पण तू एवढा रडला होतास की त्या खेळण्याकडे बघायलाही तयार नव्हतास." आजोबा जुन्या आठवणीत रमले होते. "मग तुझी हुशार आजी आली. तिने तुला काय सांगितले तिलाच माहित. मग त्यानंतर तू त्या खेळण्याला सोडतच नव्हतास. मग तुझ्या बाबाने तुझे भरपूर फोटो काढले. हा त्यातलाच एक." आजोबांचे बोलणे ऐकताना कौस्तुभ त्या फोटोकडे एकटक बघत होता. इनमिन पाच वर्षांचे वय. रडून रडून सुजलेले डोळे, लाल झालेले नाक आणि आता चेहर्‍यावर असलेले निरागस हास्य. फोटो बघताना त्याला जाणवले की हा फोटो हॉलमधला आहे. त्याच्या मागच्या खिडकीत कोणीतरी उभं असलेलं दिसत होतं. म्हणजे बाबांवर कोणीतरी नजर ठेवून होतं? त्याच्या मनात विचार आला. त्याने फोटो अजून नीट बघायला सुरूवात केली. फोटोच्या खाली अगदी बारिक फॉन्टमध्ये लिहिले होते, तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी..

" काय अर्थ असावा याचा?" कौस्तुभ पुटपुटला.

" काय म्हणालास?" आजोबांनी विचारले.

" तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी.. या शब्दांचा अर्थ काय असावा आजोबा?"

" तुझ्याकडेच तुझी गोष्ट आहे, पण तुला ती कुठे शोधायची माहिती नाही. पण ती गोष्ट काय असेल?"

" आजोबा, तेच तर शोधून काढायचे आहे. हा फोटो नीट बघा. खिडकीत कोणीतरी उभं असल्याचं जाणवतं आहे. कोण असेल ती व्यक्ती? आणि आईबाबा गेले त्याचदिवशी घरात चोरी का झाली? त्यातही आपल्या संगणकातील सगळी माहिती कोणी आणि का डिलीट केली? आईबाबा जे काम करत होते त्याची काहीच माहिती का नाही सापडत? प्रश्न, प्रश्न आणि नुसतेच प्रश्न पडले आहेत." कौस्तुभ डोके धरून बसला होता.

"शांत हो बाळा. हे बघ, इतके वर्ष हे तुला माहित होते का? नाही ना.. मग तेव्हा पडले का तुला हे प्रश्न? मग कशाला हे असे विचार करायचे? माझेच चुकले. मी तुला हे सांगायला नको होते. आजोबा स्वतःला दोष देत म्हणाले.

" आजोबा, प्रत्येक मुलाला त्याचे आईबाबा हवे असतात. ते नसले तरी त्यांची उणीव भासत राहते. तुम्ही जरी मला कसलीच कमतरता भासू दिली नाहीत तरी त्यांच्या जाण्याने झालेले दुःख सदैव ताजे होते माझ्या मनात. आज ना उद्या ही गोष्ट होणारच होती. फक्त हम्पीला जायच्या निमित्ताने ती आता घडली. आजोबा, मी नक्की शोधून काढेन माझे आईबाबा कोणते काम करत होते. आणि त्यांचा मृत्यु हा खरंच अपघाती होता की घातपात होता.

काय असेल कौस्तुभच्या आईवडिलांच्या मृत्यूचे गूढ? काय सांगायचे असेल त्याच्या बाबांना त्या फोटोतून? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//