राहिलेलं माहेरपण.. भाग २

कथा माहेरपणाला आसुसलेल्या माहेरवाशीणीची
राहिलेलं माहेरपण.. भाग २


" त्या बॅगेत आहे.. उघडा आणि घ्या.."
" तू दे ना.. आई कोणाच्या बॅगेला हात
लावला कि ओरडते.." मुलांनी तक्रार केली..

" आत्तूच्या बॅगला चालते.. पार्थ आणि दीक्षा कुठे आहेत?"
" अशी काय तू? ऑफिस नाही का दोघांचे.. तू जा हातपाय धुवून घे.. अंग मळलंय बघ किती.."
"जाईल ग ती नंतर.. थोडा वेळ बसू तर दे.." बाबा मध्येच बोलले..
"खायला काय आहे? मला ना खूप भूक लागली आहे.."
" अग कालच्या पोळ्या खूप उरल्या होत्या.. त्याचा चिवडा केला आहे.. तू थांब थोडी मी पटकन थालीपीठ करते. आधी सांगितलं असतेस तर तयारी करून नसती का ठेवता आली.. तुझे ना हे नेहमीचे आहे.. ऐन वेळेस येतेस आणि माझी धांदल उडवतेस.." शोभाताई थोड्या कृतककोपाने बोलल्या..
" तो चिवडा आण पोळीचा.. खूप दिवस झाले खाल्ला नाही.."
" वेडी आहेस का ग तू? कधी काळी येणार आणि म्हणणार शिळं दे.. मी करते पटकन थालीपीठ.."
"मी नाही खाणार थालीपीठ.. लग्न झाले कि परकी होते का लेक? शिळं खायचं नाही माहेरचे?"
" तू ना बोलण्यात हार जाणार नाहीस.."
" आत्तू या बॅगला काहीतरी लागले आहे बघ.." सोनल पळत आली..
" अग बाई.. रक्त लागले आहे.. काय ग?"
" अग येताना थोडी धडपडले.. ते लागले असेल.. बाळांनो ते पुसा आणि त्यात जी गंमत आहे ती आणा.."
मुलेच ती.. पळत गेली.. आधी कापडाने ते रक्त पुसले.. मग बॅग उघडली.. आत सोनल साठी परीचा फ्रॉक, नील साठी विमान, आई आणि दीक्षा साठी सुंदर साड्या, बाबांसाठी एक जुने दुर्मिळ पुस्तक, पार्थसाठी छानसा सदरा होता..
"अग. केवढं काय काय आणले आहेस?" बाबांनी आश्चर्याने विचारले.
" मला कुठे सतत यायला मिळते.. दूर एका टोकाला माहेर तर दुसऱ्या टोकाला सासर.. मुलांचे, तुमचे वाढदिवस कशाला यायला मिळत नाही म्हणून.. सोनल आत अजून एक गंमत आहे.."
" काय आत्तू?"
" तुला आवडतात तशी मी केलेली बिस्किटे आणि नीलसाठी शंकरपाळ्या.."
" थॅंक यू आत्तू.." सोनल पपी द्यायला पुढे आली.. पण नेहमीप्रमाणे समिधाने गाल पुढे नाही केला..
" आत्तू, तुला बरं नाही का?" नीलने विचारले.
" का रे.. तुझा हात थंड लागतो आहे.."
" अरे मी खूप दमले आहे ना? आणि मला भूक पण लागली आहे.. पण तुमची आजी मला खाऊ देतच नाही.. बघाना.. " डोळ्यातले पाणी पुसत शोभाताई आत गेल्या.. एका ताटात चिवडा दही घेऊन बाहेर आल्या..
" घे खाऊन घे.."
" नको.. तू बस इथे.. मी जरा पडते."
" अग पण भूक लागली होती ना तुला?"
" हो पण आता वासानेच पोट भरले आहे.. तू बस.. मी जरा तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. "
समिधाने ताट बाजूला केले आणि तिथेच सोफ्यावर शोभाताईंच्या मांडीवर डोके ठेवून झोपली.. मुलेही शहाणपणाने बाहेर गेली..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all