Jan 29, 2022
नारीवादी

राहिले दूर घर माझे @राधिका कुलकर्णी.

Read Later
 राहिले दूर घर माझे @राधिका कुलकर्णी.

…राहिले दूर घर माझे…
 ••••••••••••••••••••••
©®राधिका कुलकर्णी.


आपले घर मग ते लहान असो की मोठे,भाड्याचे असो की स्वत:चे पण आपल्याला किती प्रिय असते ना!!!!
माजघर,पडवी मग अंगण.

अंगणातला औदूंबराचा पार,तुऴशीचे वृंदावन,पाराभोवती मैत्रिणींसोबत घातलेल्या गोलगोल घिरट्या.
आज्जीच्या वाती वळायची तीच जागा.
संध्याकाळी देवघरात तेवणारा नंदादीप आणि पर्वचांचा सूर वातावरण भारून टाकणारे.
रात्री आेसरीत झोपल्यावर झाडांच्या सावल्यांचे आकार पाहून भीती वाटून तोंडापर्यंत आेढून घेतलेले पांघरूण आणि आज्जीच्या कुशीत शिरून मिटलेले अश्वासक डोळे पहाटे थेट मंदिरातल्या पहाटच्या भजन काकड आरतींनीच उघडायचे.
मागील परसातला झोपाळा.कधी त्यावर झोके घेता घेता खाल्लेल्या शेंगा,बोरे किंवा मग आंबे,चिंचा कैऱ्या.
त्याच झोपाऴ्यावर कवितांचे पाठांतर किंवा विज्ञानाच्या क्लिष्ट व्याख्या ही तिथेच पाठ व्हायच्या.
आई रागावली की रूसुन बसण्याचे खास ठिकाणही तेच.

मागील परसातल्या पारिजातकाचा मोहक सुगंध. कोऱ्हांटी,अबोली,मोगऱ्याचे ताटवे,जाई,जूईच्या वेलींवरची नाजूक फूले.
अलगद त्यांच्या कळ्या तोडून शेजारच्या काकू,मावशी,आत्या,ताई किंवा मग एखाद्या जीवलग मैत्रिणीकरता तासनतास बसून केलेले गजरे.
त्यावेळी मानलेलीच नाती वर्षानूवर्षे जवळ राहून रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जवळची अन् हक्काची झालेली.

गल्लीतली लागून लागून घरे.
ह्या घरात काय घडले दूसऱ्या सेकंदाला सर्व गल्लीला कळणार.पण त्यातही वाईट वाटणे नव्हते.उलट त्यातल्याच एका घरातले कोणीतरी मधे पडून हक्कानी भांडण सोडवुन समेट घडवायला येणार.
त्यावेळी
"its our personal matter" ,
"don't interfere in our family matters."
"Its none of your business"
ही असली वाक्ये कुणाला माहितही नव्हती.
तर असे सुंदर घर जिथे सगळे बालपण गेले.

एक दिवस गरज आणि आवश्यकता बदलतात त्यानुसार शाळा,कॉलेज,
ऑफिसला जवळ पडणारे
सर्व अद्ययावत सूख सोयींनी सज्ज नविन घर घेतले जाते.
सूरवातीला घर सोडून जाताना डोळ्यात पाणी येते.
सगळ्या आठवणी डोळ्यांच्या कडातून नदीचे रूप घेवून बाहेर पडतात.जड अंत:करणानेच नव्या नवरी गत जूने सगळे मागे टाकून नविन घरात प्रवेश होतो.
सुरवातीला मग दर दोन दिवसांनी जून्या घराकडे चक्कर व्हायला लागते.
पण म्हणतात ना परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.
तसेच हळूहळू रोजची चक्कर आठवड्यात परिवर्तित होते.आठवड्याचा महिना अन् महिन्याचा वर्षात कधी बदल होतो कळत देखिल नाही.
कधी काळी गेलोच तर बसायला म्हणून सोडलेल्या जून्या फर्निचरवर बोथट, निर्जीव झालेल्या जाणीवांच्या पुसट आठवणींचा जाडसर धुळीचा थर चढलेला असतो.
आपल्याच पावूलखूणा आपल्याला खूणावताना दिसतात.
धुळीच्या अॅलर्जीची किडही तोवर लागलेली असते मनाला.पटकन एक वरवर भावनाशून्य नजर टाकून कायमचे भले मोठ्ठे टाळे लावून निघून जातात निक्रंट पाय.
एक दरवाजा उघडला की जून्या दरवाजाकडे नकळत पाठ फिरवली जाते.
किती दुर्दैवी आहे ना हे सगळे?
नात्यातही ह्याहून वेगळे काय होते हो?
असेच तर घडते सगळे.
निर्जीव वास्तूत सूद्धा काही काळ जीव घुटमळतो मग माणसांचे काय होत असेल?
असे फक्त गरजांपोटी नाती बदलणे खरच इतके सोप्पे असते???
मग मागे सोडलेल्या आठवणींचे काय??
नात्यांचा असा दु:र्दैवी अंत ह्रदयाला घर्रे पाडणारा असतो ....
सगळेच संभ्रमात पाडणारे...!!!!!
~~~~~~~~~~~~~~~
©®राधिका कुलकर्णी.
हैद्राबाद.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..