राहिले दूर घर माझे (भाग ३)

Story of relationship between husband and wife

राहिले दूर घर माझे (भाग ३)

प्रसादच्या घरून प्रीतिसाठी होकार आला होता. प्रीतिला प्रसाद आवडला होता, तिच्या घरच्यांनाही प्रसाद योग्य मुलगा वाटला. त्यांनी प्रसादकडे होकार कळवला. प्रसादचे मामा मध्यस्थी होते. त्यांनी दोन्ही घरच्या सोयीनुसार लग्नाच्या बैठकीची तारीख ठरवली. लोकलज्जे खातर सरलाताई प्रसादच्या वडिलांना ,सज्जनरावांना सोबत घेऊन आल्या होत्या.

"देण्या- घेण्याबद्दल तुमच्या अपेक्षा कळल्या तर बरं होईल." प्रीतिच्या वडिलांनी सरळ मुद्द्याला हात घातला.

"तुमची परिस्थिती तशी आमची परिस्थिती! काय म्हणणार यावर? लग्नाचा खर्च तुम्ही करा, बाकी आम्हाला काही नको आहे." सरलाताईंनी म्हटलं. प्रीतिच्या वडिलांना ते पटलं आणि ते तयार झाले. दोन्ही घराच्या सोयीने दिवाळीनंतरची लग्नाची तारीख काढली.

दरम्यान प्रसाद प्रीतीसोबत बोलायला दर दोन-चार दिवसात प्रीतिच्या शेजारच्या घरी असलेल्या लँडलाईन वर फोन करत होता. त्यातही प्रसाद जास्त बोलायचा, प्रीति शेजारच्या घरून बोलायची त्यामुळे बोलताना जास्तच अवघडून जात होती. प्रसाद फोनवर आईबद्दल, त्याच्या घराबद्दल खूप भरभरून बोलायचा. 'प्रसादला त्याची आई जास्त जवळची आहे' हे प्रीतिच्या लक्षात आलं होतं. प्रसादच्या बोलण्यावरून त्याचा, त्याच्या आईचा स्वभाव कसा असेल? प्रसादच घर कसं असेल? याचा अंदाज प्रीति बांधत होती. फोनवर बोलण्या बोलण्यात प्रीतिच्या डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न फुलत होती. स्वप्नात रंग भरता-भरता दिवस कसे भर्रकन उडून गेले. डोक्यावर अक्षता पडल्या आणि प्रीति लग्न होऊन प्रसादच्या घरी आली.

दारावरचं तांदुळाच माप ओलांडून प्रीतिने गृहप्रवेश केला. रितिभातीनुसार देव दर्शन, पूजा वगैरे सगळे कार्यक्रम झाले. घरातल्या पाहुण्यांची वर्दळ कमी झाली. नव्याचे नऊ दिवस संपले होते; पण प्रसाद आणि प्रीति नातं म्हणावं तसं फुलल नव्हतं. 'प्रसादचा स्वभाव नेमका कसा आहे?' हे प्रीतिला कळतच नव्हतं. कधी कधी तो तिला फुलाप्रमाणे जपायचा, तर कधीकधी विनाकारण तिच्यावर अतिचिडायचा. प्रीतिला नेमकं कसं वागावं तेच कळत नव्हतं.

प्रसादच्या सुट्ट्या संपल्या, तो पुन्हा कंपनीत रुजू झाला. प्रीति सकाळीच लवकर उठून प्रसादचा डब्बा वगैरे बनवायची, त्यानंतर दिवसभर घरातली सगळी कामं करायची. हाता-पायाने धडधाकट असूनही सरलाताई प्रीतिला कोणत्याच प्रकारची मदत करायच्या नाही. उलट टिपिकल सासू करते तसा सासुरवास हळूहळू डोकं वर काढायला लागला होता. प्रीतिच्या रंगावरून, लग्नात काही हुंडा मिळाला नाही त्यावरून सरला ताई प्रीतिला घालून-पाडून बोलू लागल्या होत्या.

प्रसाद घरी आला की सरलाताई प्रीतिच्या तक्रारींचा पाढा वाचत होत्या. प्रीति चुपचाप सगळं ऐकून घेत होती, सासूबाईंनी ज्या गोष्टींच्या तक्रारी केल्या त्या पुन्हा होऊ नये म्हणून प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करत होती. प्रीति मुकाट्याने सगळं ऐकते हे बघून सासूबाईंना अजून चेव फुटत होता. कधी कधी प्रसाद आपल्यापरीने दोघींना समजावून सांगायचा; कधी आईवर चिडायचा, तर कधी प्रीतिवर; पण त्याच्या आईच्या स्वभावात काडीमात्र फरक पडत नव्हता. प्रीति मात्र या सगळ्या गोष्टींमुळे कोमेजून चालली होती. प्रसादच लग्न झाल्यापासून त्याच्या वडिलांमध्ये एक खूप मोठा फरक पडला होता; दारू पिऊन आल्यावर ते घरात पूर्वीसारखा धिंगाणा घालत नव्हते, सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपून जात होते. असेच दिवस सरत होते. प्रसाद प्रीतिला कधीकधी बाहेर फिरायला नेत होता. तेव्हामात्र प्रसाद प्रीतीसोबत खूप चांगला राहायचा, तोच काय तो वेळ प्रीति प्रसादसोबत शांतपणे बोलू शकत होती. त्यावेळी मात्र प्रीतिला पुन्हा आपण घरी जाऊच नये असं वाटत होतं.

प्रीतिच्या लाघवी बोलण्यामुळे शेजारच्या बायकांसोबत प्रीतिचं चांगलं पटत होत. एक दिवस शेजारच्या काकूंनी प्रीतिला न्यूज पेपर आणून दिला.

"प्रीति, अग हे बघ, कॉलेजची जाहिरात आलीये. संस्कृतसाठी पद रिकामं आहे. इंटरव्ह्यू देऊन बघ ना, झालं सिलेक्शन झालं." शेजारच्या काकू प्रीतिला पेपरमधली जाहिरात दाखवत बोलल्या. प्रीतिने आशाळभूत नजरेने तिच्या सासुकडे पाहिलं.

"अग, माझ्याकडे काय पाहतेस? तुझ्या नवऱ्याला विचार आणि कर तो म्हणेल तसं. त्याला नोकरी लागल्यापासून त्याने माझं पापड, वाळवणाचं काम बंद केलं. तू नोकरी केली तर माझी ना नाहीये." सासूबाई बोलल्या त्यामुळे प्रीतिच्या आशा पल्लवित झाल्या. प्रसाद घरी आल्यावर तिने ही गोष्ट प्रसादला सांगितली.

"अग काय गरज आहे नोकरीची? हे बघ हे काय आहे?" प्रसादने एक लिफाफा तिच्या हातात देत म्हटलं. प्रीतिने तो लिफाफा उघडला.

"अय्या! प्रमोशन!" प्रीतिने आनंदाने उडी मारली. सरलाताईंनी देवापुढे साखर ठेवली. प्रसादला बढती मिळाली होती, त्याच्या पगारातही चांगली वाढ झाली होती. 

"प्रसाद, मी काय म्हणत होते? त्या इंटरव्ह्यूसाठी जाऊ का मी? ते कॉलेजही आपल्या घरापासून जवळ आहे. सगळं नीट मॅनेज होईल." प्रीतिने रात्री झोपताना पुन्हा इंटरव्ह्यूचा विषय काढला.

"अग, काय गरज आहे आता त्याची? माझा पगारसुद्धा वाढला आहे. तू नोकरी नाही केली तरी आपलं काही अडणार नाही." प्रसाद

"हो, ते आहे; पण मीसुध्दा स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलं होतं… पैशासाठी नाही तर अनुभव म्हणून हा जॉब करायची माझी ईच्छा आहे." प्रीति.

"जा ना मग, मला कशाला विचारतेस? तुला जे हवं असेल ते कर. तसही ते प्रायव्हेट कॉलेज आहे, तिथं नोकरी करायची म्हणजे आधी आपल्याला पैसा फेकावा लागतो, कळलं? जा… कर नोकरी… पैसा तुझ्या माहेरून आण, तसही आता तुझे दोन्ही भाऊ कमावतात, वरून तुझ्या वडिलांची पेंशन! मग काय पैसाच पैसा! तो पैसा आण आणि रोज खुशाल जात जा नोकरीवर." प्रसाद एकदम चिडून बोलला.

बोलताना प्रसादने असा माहेरच्या लोकांचा विचित्र उल्लेख केला म्हणून प्रीतिला खूप वाईट वाटलं. उगीच पुढे भांडणं आणि कटकटी वाढायला नको म्हणून तिने हा विषय बंद केला.

"पण आयती संधी चालून आली होती, आपण कमीतकमी प्रयत्न करून बघायला हवे होते." हे शल्य प्रीतिच्या मनात सलत होतं.


 

लवकरच प्रसादने एक मोठं घर घेतलं. या नवीन घरात तरी आपल्याला आपल्या आवडीनिवडीच्या वस्तू घेऊन, घर हवं तसं सजवता येईल असं प्रीतिला वाटलं होतं; पण "आमचं सगळं आयुष्य काटकसर करण्यात आणि पदरमोड करण्यात गेलं, आता राहिलेले दिवस तरी आमच्या मनाने करू द्या." असं म्हणत सरलाताईंनी सगळं त्यांच्याच मनाप्रमाणे केलं.

'आपल्या पोरामुळे आपल्याला चांगले दिवस बघायला मिळाले, आपल्या कष्टाचं चीज झालं' म्हणून सरला ताई आनंदीत होत्या. या सगळ्यात मात्र प्रसाद आणि त्याच्या आईने त्याच्या वडिलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. प्रीतिला हे आवडत नव्हतं. ती त्यांची विचारपूस करत होती, त्यांना खाऊ-पिऊ घालत होती हे प्रसादला आणि त्याच्या आईला मुळीच आवडत नव्हतं. एक दिवस नेहमीप्रमाणे प्रसादचे वडील दारू पिऊन आले आणि त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपले ते कायमचेच.

सज्जनराव गेले त्याचा सरलाताईंवर काहीच परिणाम झाला नाही. उलट त्यांचं प्रीतिला टोमणे देणं, तिच्या चुका काढण्याचं प्रमाण वाढलं होतं. सरलाताईंनी लग्न झाल्यापासून प्रीतिला कधी चार दिवस माहेरी जाऊ दिलं नाही. प्रीति कधी माहेरी गेलीच, तर दुसऱ्याच दिवशी प्रसाद तिला माघारी घेऊन यायचा. सासरी घडलेली एकही गोष्ट प्रीति माहेरी सांगत नव्हती; त्यामुळे, 'आपली मुलगी आनंदात आहे' असा समज प्रीतीच्या माहेरी झाला होता.

"सगळं चांगलं होईल," या आशेवर प्रीति एकेक दिवस पुढे ढकलत होती. प्रीतिने अनेकवेळा प्रसादला जॉब करण्याबद्दल विचारलं होतं; पण प्रत्येकवेळी प्रसाद त्या गोष्टीवरून प्रीतीसोबत भांडायचा, विषय पुढे वाढू नये म्हणून प्रीति गप्प बसत होती.

एकदा प्रीति काही कामानिमित्त शेजारच्या घरी गेली होती. नेमका त्यादिवशी प्रसाद लवकर घरी आला.

"आई, एकटीच काय करतेय? प्रीति कुठे गेली?" प्रसाद

"गेली हुंदडायला! घरात बसवतं होय तिला. उठसूट बाहेर जा. याच्या घरी जा, त्याच्या घरी जा… सुरूच असतं तिचं." सरलाताईंनी आग लावायचं काम केलं. तेवढ्यात प्रीति घरी आली.

"प्रसाद, आज लवकर आलात!" प्रीति

"हो, त्यामुळं तुझं पितळ उघडं पडलं ना! कुठे गेली होतीस?" प्रसाद

"कुठे काय? इथेच होते शेजारी. काल त्यांच्याकडून कणिक आणली होती उसनी, आज गहू दळून आणले तर परत केली." प्रीति

"काही गरज नाही असं काही संपलं तर शेजारून मागायची. एक वेळ खाल्लं नाहीस तर मरणार नाही तू." प्रसाद रागाने बोलला.

"घरात काय मला एकटीला खायला लागत का?" प्रीतिही चिडली होती.

"ए… जास्त बोलायच नाही हां… आपल्या औकातीत राहायचं. कळलं? आज गेलीस शेजारी, यापुढे गेली तर याद राखायचं. " प्रसाद तोंडाला येईल तस बोलत होता. सरलाताईंना मात्र दोघांच्या भांडणात असुरी आनंद मिळत होता. प्रीतिसोबत भांडण झालं की प्रसाद त्याच्या आईच्या मागे मागे करत होता. प्रीतिसोबत शब्दही न बोलता सरला ताईंसोबत गप्पा करत होता.

सज्जनराव गेल्यापासून प्रसाद प्रीतिचं बाहेर हिंडण फिरणं बंद झालं होतं. प्रीतिला बाहेर जावं वाटायचं पण प्रसाद प्रत्येक वेळी "घरी आई एकटीच राहते, तिला असं सोडून जाणं चांगलं नाही" ही सबब पुढं करायचा. प्रीति आणि प्रसादला हवी ती प्रायव्हसी मिळत नव्हती. प्रीति त्यातल्या त्यातही आनंद शोधायचा प्रयत्न करत होती.

एक दिवस सकाळी प्रीति रोजच्यासारखी कामं आटोपत होती, त्यावेळी तिला चक्कर आली आणि ती खाली पडली. प्रसादची ऑफिसची तयारी सुरू होती. प्रीति पडल्यावर सरलाताई मोठ्याने ओरडल्या. त्यांच्या आवाजाने प्रसाद बाहेर आला. त्याने ताबडतोब प्रीतिला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी प्रीतिला तपासलं, काही टेस्ट केल्या. थोड्यावेळात प्रीति शुद्धीवर आली. 

"अभिनंदन प्रसाद, तुम्ही बाबा होणार आहात." डॉक्टरांनी प्रसादला सांगितलं प्रसादच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. प्रीतिला कुठे ठेऊ आणि काय करू असं त्याला होऊ लागलं.

"येणाऱ्या या छोट्याशा जीवामुळे का होईना, प्रसाद आता माझ्यासोबत चांगला वागेल… सासूबाईसुध्दा मायेने बोलतील… बाळाच्या बोबड्या बोलांनी सगळं घर आता गोड गोड बोलेल… आता सगळंच चांगलं होईल…" प्रीति डॉक्टरांनी सांगितलेली गोड बातमी ऐकून मनातल्या मनात विचार करत होती…

क्रमशः

खरंच… येणाऱ्या छोट्या बाळामुळे परिस्थिती बदलेल की तशीच राहील? पाहूया पुढच्या भागात.

© डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all