राहिले दूर घर माझे (भाग १)

गोष्ट नवरा बायकोची, गोष्ट एका संसाराची

राहिले दूर घर माझे (भाग १)


संसार हा दोघांचा असतो... एकानं पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं, एकानं चिडलं तर दुसऱ्याने समजून घ्यायचं असत.. संसाराच्या गाडीची दोन्ही चाकं एकाच गतीने धावायला हवीत.. त्यासाठी ज्या चाकाची गती जास्त त्यानं दुसऱ्यासाठी ती थोडी कमी करावी लागते आणि ज्याची कमी त्यानं ती वाढवावी लागते, म्हणजे गाडी चांगली चालते, कोणा एकाचीच फरफट होत नाही; पण ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाही आली तर? होणाऱ्याची फरफट होतच जाते…कसं असतं ना, जगताना आपण एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची किंमत करत नाहीत. पण जेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जाण्याची वेळ येते तेव्हा तिची किंमत कळायला लागते. ही किंमत वेळेवर कळली तर बरं नाही तर आयुष्यभर सोबत राहतो तो "रिग्रेट." 

ही गोष्ट आहे अशाच एका संसाराची…


प्रसाद डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याचे डोळे जड पडले होते. हात-पाय सर्व शरीर त्राण नसल्यासारखे जाणवत होते. \"आपण कुठे आहोत?\" याची जणीवसुद्धा त्याला होत नव्हती. तेवढ्यात त्याच्या डाव्या हाताला एकदम मुंग्या आल्यासारखं वाटलं, हाताची बोटं जड पडल्यासारखी वाटली. एका मिनिटात पुन्हा हात पूर्ववत झाला. प्रसादने डोळे किलकिले केले. त्याला डोळ्यासमोर आकाशी रंगाचं काहीतरी दिसत होतं. टून टून टून असा कसलासा आवाज येत होता. प्रसादने प्रयत्नपूर्वक डोळे पूर्णपणे उघडले. त्याच्या सभोवताली आकाशी रंगाचे पडदे होते. त्याने डाव्या हाताला पाहिलं, हाताच्या दंडाला एक मोठासा बेल्ट लावलेला होता. त्या बेल्टमध्ये पुन्हा हवा भरल्या गेली आणि प्रसादच्या हाताला पुन्हा मुंग्या आल्या. त्याचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं. त्याच्या पोटापर्यंत करड्या रंगाच ब्लँकेट टाकलेलं होतं. उजव्या हाताच्या तर्जनी बोटावर क्लिपसारखं काहीतरी लावलेलं होतं. त्याच हाताच्या बाजूला एक सलाईन स्टँडला एक लहान आणि एक मोठी असे दोन सलाईन लटकलेले होते. त्याचं लक्ष हाताकडे गेलं, हाताला आयव्ही कॅन्युला लावलेला होता. त्यातून ते दोन सलाईन सुरू होते. छातीला कसलेसे स्टिकर लावलेले त्याला जाणवले. त्यातून काही वायर त्याच्या शर्टच्या वरून गेलेले होते. त्याने वर पाहिलं, एका मॉनिटरवर वेगवेगळे आकडे आणि काही रेषा येत होत्या.


एव्हाना \"आपण हॉस्पिटलमध्ये आहोत\" हे त्याला कळलं होतं. बाजूच्या पेशंटजवळ काही तरी इमर्जन्सी सुरू होती. डॉक्टर, सिस्टर लोकांची धावपळ सुरू होती. प्रसादने उठून बसायचा प्रयत्न केला. त्यामुळे मॉनिटरला जोडलेले वायर दबले गेले आणि मॉनिटरचा टून टून टून असा जोरात आवाज यायला लागला. तेवढ्यात एक नर्स धावत तेथे आली.


"मि. प्रसाद… थांबा… असे एकदम उठू नका." नर्स.


"नर्स… मी…" प्रसाद बोलणार तेवढ्यात नर्सने त्याचं वाक्य तोडलं.


"तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात मि. प्रसाद. काळजी करू नका. सगळं चांगलं आहे. बाजूच्या बेडवर एक इमर्जन्सी सुरू आहे, पेशंट क्रिटिकल झाला आहे, त्यामुळं थोडंसं थांबा. डॉ. गिरीश तुम्हाला तपासतील." नर्स बोलत होती. प्रसादच्या हाताला बांधलेला बी. पी. कफ पुन्हा हवेने भरला.


"नर्स, हे हाताचं तेवढं काढा ना." प्रसाद.


"ठीक आहे, मी त्याची सायकल चेंज करते. आता मिनिटा-मिनिटाला होणार नाही, पंधरा मिनिटांनी होईल. ठीक आहे?" नर्स मॉनिटरवरचे कसलेसे बटण फिरवत बोलली. तिने सलाईन मध्ये एक इंजेक्शन टाकलं आणि ती क्रिटिकल झालेल्या पेशंटजवळ मदत करायला गेली. प्रसाद पडद्या आडून काही दिसतं का याचा व्यर्थ प्रयत्न करत होता.


"हॉस्पिटलमध्ये कधी आलो मी? आणि कसा आलो? मी तर ऑफिसमध्ये गेलो होतो. आठवतं की मला, मिटिंग होती… बॉस पुन्हा खडूस सारखा बोलला… मी आणि अमित बाहेर आलो मिटिंग रूमच्या. पाठीत थोडं दुखल्या सारखं झालं होतं. मी अमितसोबत बोलत होतो… नंतरच काही आठवत नाहीये." प्रसाद डोक्याला ताण देऊन आठवायचा प्रयत्न करत होता. तितक्यात डॉ. गिरीश त्याच्याजवळ आले. नर्सने त्याच्या भोवतीचे पडदे बाजूला सारले. प्रसाद इकडे तिकडे बघत होता. त्याच्यासोबत तिथे अजून पेशंट्स होते. काही जागी होते, तर काही निपचित पडून होते. ते सर्व चित्र बघून प्रसाद थोडा घाबरलाच. 


"हॅलो, मि. प्रसाद! हाऊ आर यु?" डॉ. गिरीश.


"फाईन. डॉक्टर मी …" प्रसाद पुढे बोलणार तेवढ्यात डॉक्टरांनी त्याला हाताने थांबवलं आणि नर्सला काही प्रश्न विचारले. नर्स त्याप्रमाणे उत्तरं देत होती, हातातले काही कागदपत्र डॉक्टरांना दाखवत होती. डॉक्टरांनी तिला त्यात काही बदल करायला लावले.


"येस मि. प्रसाद, काही त्रास होतोय." डॉ. गिरीश.


"नाही सर, त्रास म्हणून असं काही नाही; पण मी तर ऑफिसमध्ये होतो, इथे कसा आलो." प्रसाद.


"हो, काल तुमची तब्येत अचानक बिघडली. तुमचे सहकारी तुम्हाला इथे घेऊन आले होते." डॉ. गिरीश.


"काल…!" प्रसादने आश्चर्याने विचारलं.


"हो काल… कालपासून बेशुद्ध होतात तुम्ही… म्हणून तुम्हाला काही आठवणार नाही." डॉक्टर


"माझे फॅमिली मेम्बर्स कुठे आहेत? " प्रसादच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते.


"हो, आहेत इथेच. बाहेर थांबले आहेत. आय. सी.यु. मध्ये नातेवाईकांना परवानगी नसते ना म्हणून." डॉ गिरीश प्रसादला बोलले. 


"नर्स, यांच्या पत्नीला बोलवा, कालपासून त्या इथेच आहेत. मला पण थोडं बोलायचं आहे त्यांच्यासोबत आणि मि. प्रसाद पण भेटतील." डॉ. गिरीश बोलले आणि नर्सने प्रीतिला आत बोलावलं.


प्रीति आय.सी. यु. मध्ये आली. तिने निर्विकारपणे प्रसादकडे पाहिलं आणि डॉक्टरांसमोर जाऊन उभी राहिली. प्रसादला गोष्टी ऐकू न जातील एवढ्या अंतरावर डॉक्टर उभे होते.


"सो… मिसेस प्रीति… मि. प्रसाद इस आऊट ऑफ डेंजर नाऊ… सिव्हिअर हार्ट अटॅक होता… तीन ब्लॉक्स होते… काल वेळेत इथं आणलं आणि तुम्ही वेळ न दवडता अँजिओप्लास्टीला परवानगी दिलीत त्यामुळे सगळं चांगलं झालं… नाऊ नेक्स्ट इज… पेशंटची काळजी कशी घ्यायची…? सिगारेट, अल्कोहोल टोटली बंद… लो फॅट अँड लो सॉल्ट डाएट द्यायचं. बाकी मेडिसिन नंतर समजावून सांगू. आजचा दिवस आय. सी. यु. मध्ये ठेऊ, उद्या स्पेशल रूममध्ये शिफ्ट करू आणि त्यानंतर दोन दिवसात डिस्चार्ज प्लॅन करू." डॉक्टर सांगत होते प्रीति अगदी कान देऊन ऐकत होती.


प्रसाद बेडवरून प्रीतिच्या निर्विकार चेहऱ्याकडे बघत होता. आनंद, दुःख, चीड यापैकी एकही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती.


"किती दिवसात प्रीतिचा चेहरा निरखून पहिलाच नाही. तशीच दिसते अजूनही… गव्हाळ रंग… चरचरीत नाक… बोलके डोळे… पण चेहेऱ्यावरच हास्य, ते हुशारीचं तेज, तो आत्मविश्वास कुठे हरवला? आणि कधी हरवला? प्रीति माझ्यापासून दूर गेली की मी तिच्यापासून दूर गेलो….? हो… मीच दूर गेलो…! माझ्याबद्दल कोणत्याच प्रकारची भावना तिच्या चेहऱ्यावर दिसू नये इतकं दूर केलं मी तिला…." प्रसादच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. डोळ्यात आपसूकच पाणी जमा झालं होतं. तितक्यात डॉक्टर आणि प्रीति तिथे आले.


"मि. प्रसाद, इथून पुढे नो सिगारेट, नो अल्कोहोल… लो सॉल्ट अँड लो फॅट डाएट घ्यायचं… ओके?" डॉक्टरांनी सांगितलं आणि प्रसादनी होकारार्थी मान डोलावली.


"मिसेस प्रीति, आपण यांना खायला देऊ शकतो आता. तुम्ही होम फूड आणू शकत असाल तर उत्तमच, नाही तर मग इथे मिळतं, ते दिलं तरी चालेल." डॉक्टर.


"मी आणते घरूनच. डॉक्टर एक विनंती होती, माझी मुलं बाहेर आहेत, त्यांना दोन मिनिटं त्यांच्या बाबांना बघू द्याल का? फक्त दोनच मिनिटं." प्रीति चाचरत बोलली आणि डॉक्टरांनी मुलांना भेटायला परमिशन दिली म्हणून बाहेर जाऊ लागली. जाता जाता तिने प्रसादकडे पुन्हा निर्विकार भावनेनं पाहिलं.


मुलं आत आली. मोठी मुलगी शैली आणि मुलगा पियुष… तिच्या पाठचा.


"मुलंही किती लवकर मोठी झाली. शैली… फर्स्ट इयर ला असेल… नाही नाही सेकंड ला असावी… आणि पियुष… दहावी… नाही… अकरावीत असेल… खरंच… आपली मुलं कोणत्या वर्गात आहेत हे पण आपल्या लक्षत राहू नये… एवढा दूर का झालो मी?" प्रसाद स्वतःलाच कोसत होता. मुलं पाच मिनिटे तिथे उभी राहिली. \"बाबा,कसे आहात?\" मुलीने विचारलं फक्त त्यावर \"छान\" एवढंच उत्तर प्रसादने दिलं आणि मुलं बाहेर गेली.


"माझं कुटुंब माझ्यापासून एवढं दूर गेलं… आणि मला कळलंच नाही… कसं कळणार ना? मी तर माझ्याच विश्वात मशगुल होतो… त्यांनी आवाजही दिला असेल मला… पण मी माझ्याच धुंदीत… साथ मागितलीही असेल पण मी माझ्याच कोशात… ज्या प्रीतिवर एवढं प्रेम केलं… तिच्या नजरेत आपल्याप्रति एवढी शुष्कता! हे काय करून ठेवलं मी? आयुष्यात एवढा पुढं निघून आलो की माझं घरंच मला दिसू नये..." प्रसादला त्याचा भूतकाळ अगदी स्पष्ट दिसत होता…


क्रमशः

©डॉ. किमया मुळावकर

🎭 Series Post

View all