Feb 25, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

रहस्य स्यमंतकाचे.. अंतिम भाग

Read Later
रहस्य स्यमंतकाचे.. अंतिम भाग
रहस्य स्यमंतकाचे.. भाग १५

मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभ खजिन्यापर्यंत जाऊन पोहोचतो. स्यमंतक मणी सापडेल त्याला? बघू काय होते ते.


" अक्रूरमहाराज, इथून लवकर निघा. पाण्याची पातळी वाढतच चालली आहे. समुद्राला भयंकर उधाण आले आहे. असे वाटते आहे की द्वारकाधीशांशिवायची द्वारका त्या रत्नाकरालाही बघवत नाहीये. ती गिळंकृत करण्यासाठी तो अधिर झाला आहे." अक्रूराचा खास सेवक त्याच्या जवळ येऊन म्हणाला. हे ऐकताच समुद्रात अर्पण करण्यासाठी धरलेली पेटी अक्रूराने जपून परत आपल्या शेल्यात सुखरूप ठेवली. निवडक यादववीरांसह तो किनार्‍यावर आला. त्याने तो मणी बाहेर काढला.

" अच्युता, तुझ्या इतके जवळ राहूनही या मण्याचा मोह मला सुटला नाही. मला क्षमा कर. हे रत्न तू मला दिलेस. ते तुझ्याकडेच रहावे अशी इच्छा आहे." अक्रूर प्रार्थना करून उठला.


***************

"कुठे ठेवला आहे तो मणी सुजयने? सांग. नाहीतर इथल्या इथे अख्खी बंदूक रिकामी करेन तुझ्या डोक्यात." आदित्यनाथाच्या डोळ्यात वेड उतरले होते.

" मणी हवा असेल तर त्याच्या केसालाही धक्का लागला तर बघ." आजोबांचा आवाज आला. सगळ्यांनी पाठी वळून बघितले. आजोबा आणि काव्या उभे होते. काव्याचा चेहरा रडवेला झाला होता. आपल्या वडिलांचा हा चेहरा तिला बघवत नव्हता.

"तुझ्याकडे खरंच आहे मणी? की नातवाचे प्राण वाचवण्यासाठी तू खोटं बोलतो आहेस?" आदित्यनाथ काव्याकडे लक्ष न देता आजोबांना विचारत होता.

" मी जर खोटं बोलत असेन तर मग अजून पन्नास वर्ष त्या मण्याला शोधत रहा."

" सांग कुठे आहे तो मणी? लगेच सांग. नाहीतर याला आत्ता गोळी घालतो."

" डॅड नको ना.." काव्या ओरडली.

" तुझे डॅड आणि बाबा तुझ्याकडेच ठेव. या मण्याची मी गेले अनेक वर्ष वाट बघतो आहे. तो नाही मिळाला तर हा कौस्तुभ गेलाच म्हणून समजा."

" तो मणी माझ्याकडे नाही हे तुलाही माहित आहे. तू जर कौस्तुभला सोडलंस तर मी त्याच्या सहाय्याने तो शोधू शकेन. " आजोबा शांतपणे बोलत होते.

" वेडा समजलास काय मला? मी त्याला सोडणार आणि तू पळून जाणार? हट."

" मी का पळून जाऊ? ही बघ सुजयची डायरी. यात त्याने अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पण त्यासाठी मला कौस्तुभची मदत हवी आहे." आजोबा निर्वाणीचे बोलले. आदित्यनाथ विचारात पडला. आजोबांनी खिशात हात घातलेला बघून त्याला घातपाताचा संशय आला. त्याने त्यांना सावध करण्यासाठी गोळी झाडली. गोळीचा आवाज ऐकताच लपलेले पोलीस पटकन पुढे आले आणि त्यांनी हातात पिस्तुल असलेल्या आदित्यनाथला गोळी घातली. आपला नेता पडल्यावर त्याचे बाकीचे साथीदार गुपचूप पोलिसांच्या स्वाधीन झाले. काव्या पळत आदित्यनाथाकडे गेली.

" मला एकदा मणी बघायचा आहे.. एकदा." बोलता बोलताच त्याचा प्राण गेला.

" बाबा.." काव्या रडू लागली.

" मिस काव्या.. तुम्ही बाजूला व्हाल का?" इन्स्पेक्टरने काव्याला विनंती केली. तो आवाज ऐकून कौस्तुभने त्याच्याकडे बघितले. तो राज होता.

" तुम्ही?"

" त्यांना त्यांचं काम करू देत. मी तुला सगळं सांगतो." आजोबा कौस्तुभला म्हणाले. त्यांनी रडणार्‍या काव्याला आधार दिला.

" आजोबा, हे मला काहीच माहित नव्हतं." ती अजून जोरात रडू लागली.

" मला माहित होतं ते. चला आधी इथून बाहेर पडू." तिघेही जडावलेल्या अंतःकरणाने बाहेर आले. राजने एका जीपमध्ये बसवून त्या तिघांना घरी पाठवून दिले. तिघे घरी आले. काव्या सुन्नपणे बसली होती. आपले वडिल असं काही वागतील असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. आजोबांनी तिकडच्या मुलाला चहा आणायला सांगितला.

" घे.." काव्याने गुपचूप चहा घेतला.

" पण आजोबा, बाबांच्या डायर्‍या तुमच्याकडे कश्या?" कौस्तुभने न राहवून विचारले. "आणि त्या स्यमंतक मण्याचे काय?"

" तुझे खेळणे, त्यात सापडलेला नकाशा बघून मला आश्चर्य वाटले. की सुजयने हे मला का नाही सांगितलं? नंतर मला आठवलं की आमच्या दोघांची एक जागा ठरली होती जिथे आम्ही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवायचो आमच्या गुप्त भाषेत. त्या डायर्‍या सापडताच मी माझ्या एका विद्यार्थ्याच्या कानावर ही गोष्ट घातली. तो म्हणजे इन्स्पेक्टर राजचा बाबा. तो स्वतःही पोलीस कमिशनर होता. त्याने या प्रकाराचे गांभीर्य ओळखून राजला मदतीला पाठवलं. तुला अचानक समोरून नोकरीसाठी होत असलेला आग्रह, हंपीला पाठवणं. काहीतरी खटकत होतं. समोर कोण आहे हे मात्र समजत नव्हतं. त्याला बाहेर तर काढायचे होते. पण त्यात तुला धोका असू शकत होता. म्हणून तुझ्याजवळ राहण्यासाठी तो गाईड होऊन आला."

" पण मग अनंतविष्णूची त्याने सांगितलेली माहिती?" कौस्तुभने विचारले.

" सुजयने लिहिलेली होती. मी त्याला पाठवली होती. त्यातली काही वाक्ये त्याने स्वतःची घातली. आम्हाला खात्री होती की आपल्या पाळतीवर कोणीतरी असेलच. त्याने ही बातमी पुढे पाठवायचे काम व्यवस्थित केले. आणि तो आदित्यनाथ बाहेर आलाच." आजोबा बोलत होते. काव्या आणि कौस्तुभ ऐकत होते. "सुजयच्या डायरीत एक नोंद आहे. स्यमंतक मण्याविषयी. अशी वदंता आहे की श्रीकृष्णाचा कलियुगीन अवतार म्हणजे पंढरीचा विठूराया. या विठुरायाच्या चरणी स्यमंतक मणी अक्रूराने वाहिला होता. जेव्हा कृष्णदेवरायाने या विठूरायाला हंपीला आणले होते तेव्हा त्याच्यासोबत हा मणी सुद्धा होता. पण भानुदास विठूरायाला परत पंढरपुरी घेऊन जायला आले. तेव्हा नाईलाजाने त्याला विठूरायाला परत पाठवावे लागले. पण तोपर्यंत यवनांचा, पोर्तुगीजांचा उपद्रव वाढला होता. देवस्थाने लुटणे हा तर त्यांचा आवडता छंद. म्हणूनच भानुदासांनी फक्त विठूरायाला घेऊन जायचे ठरवले. राजाने देवाला वाहिलेले सगळे दागिने इथे तळघरात ठेवले गेले. आधीपासूनच खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी तळघर आणि नंतर त्याची माहिती मिळावी म्हणून त्याचा नकाशा तयार केला होताच. फक्त तो मणी मात्र पंढरपूरास परत घेऊन जाण्याचे ठरले. एवढा मौल्यवान मणी. तो असा वाजतगाजत नेणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे होते. म्हणून तो लपवून नेला गेला. या विषयीची तशी नोंद खाजगीत करून ठेवली गेली. तो कसा घेऊन गेले हे मात्र कुठेही लिहून ठेवण्यात आले नाही. पण त्यानंतर राज्यावर आलेल्या संकटात ती कुठेतरी हरवली गेली. इथे येऊन अभ्यास करताना या सगळ्याची माहिती सुजयला मिळाली. ती चावी त्याच्या हातात आली होती. पण खजिना बघायच्या आधीच.." आजोबा बोलता बोलता थांबले. कौस्तुभ आणि काव्या ऐकत होते.

" मग तो मणी कुठे लपवला गेला याची काही माहिती?" कौस्तुभने विचारले.

"नाही ना.. कारण मूर्ती पंढरपूरात येताच भानुदासांनी समाधी घेतली."

" आजोबा, मग आपले पूर्वज?" कौस्तुभ पटकन म्हणाला.

" मी ते ही शोधले. पण त्यांचाही लगेचच खून झाला होता. तो मणी कुठे आहे हे त्या विठ्ठलालाच माहित असावे." आजोबा खिन्नपणे म्हणाले.

"'विठ्ठल.." काव्या पटकन म्हणाली.

" काय??"

" आपण जिथे जात आहोत तिथे आपल्याला फक्त नरसिंह आणि विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे. नरसिंहाच्या मूर्तीचा अर्थ निघाला खांबातून खजिना निघणे. मग स्यमंतक आणि विठ्ठलाच्या मूर्तीचा संबंध काही असेल का?"

" असू शकतो. पण तो कसा असेल?" आजोबा आणि कौस्तुभ म्हणाले.

" आजोबा.. मी तळघरातील मूर्ती बघितली. तिच्या डोक्यावर मुकुट नव्हता." कौस्तुभ आठवत म्हणाला.

" आणि आजोबा तुमच्या म्हणण्यानुसार तुमची ही मूर्तीसुद्धा त्याचवेळेस घडवलेली आहे ना? या मूर्तीत काही माहिती असेल तर?" काव्या उत्तेजित होत म्हणाली.

" आपल्या मूर्तीत? पण मग तशी कुठेतरी नोंद असती ना?"

" तुम्हीच म्हणालात ना लगेचच त्यांचा खून झाला. त्यांना सांगायची किंवा लिहून ठेवण्याची संधीच मिळाली नसेल." काव्या म्हणाली. कौस्तुभ काहीच न बोलता विठ्ठल मूर्ती घेऊन आला. त्याने त्या मूर्तीला नमस्कार केला.

" आजोबा, तुम्हाला आठवतं मी म्हटलेलं मूर्तीचा मुकुट हलतो आहे. आणि त्या मूर्तीलाही मुकुट नव्हता." काव्याने आठवण करून दिली. कौस्तुभने मुकुटाला हात लावला. खरंच तो हलत होता. वर्षानुवर्ष ती मूर्ती एकाच जागी ठेवून पूजा करत असल्यामुळे त्यांना कधी हे जाणवले नव्हते. कौस्तुभने आपली अवजारे आणत अगदी हलक्या हाताने तो मुकुट काढायचा प्रयत्न केला. थोड्या प्रयत्नांनंतर तो निघाला.. आणि डोळे दिपवणारा प्रकाश पसरला. मूर्तीचा मुकुट पोकळ होता. त्याच्या आत साक्षात सूर्यदेवांनी दिलेला स्यमंतक मणी होता. त्याच्या दर्शनानेच धन्य झाल्यासारखे वाटले. आपण काय बघतो आहोत यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. काही काळ असाच गेला. सगळ्यात आधी आजोबा भानावर आले. त्यांनी त्याला नमस्कार केला.

" आता याचे काय करायचे आजोबा?" कौस्तुभने विचारले.

" काय करायचे म्हणजे? सरकारच्या सुपूर्त करायचा." आजोबा म्हणाले.

" म्हणजे परत एकदा त्या मण्याची हाव आणि त्यातून खून होणार?" खिन्नपणे कौस्तुभ म्हणाला.

" म्हणजे?"

" बघा ना, प्रसेन,सत्राजित, शतधन्व्यापासून माझे बाबा, काव्याचे बाबा अश्या अनेक जणांचा फक्त या मण्यापायी मृत्यु झाला आहे. तो मणी जर परत लोकांपर्यंत पोहोचला तर या मण्याचा चांगला उपयोग करणारे कमी आणि वाईट हेतूने फायदा उचलणारेच खूप असतील." कौस्तुभ बोलत होता.

" मग तुझ्या मनात तरी काय आहे?"

" मला असं वाटतं की हा मणी कलियुगातील कृष्णावताराकडे असावा अशी अक्रूराची इच्छा होती. काही कारणास्तव तो आपल्याकडे राहिला. पण आपण परत तो त्याच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करूयात. पुढे तोच जाणे." कौस्तुभ ठामपणे बोलत होता.

" काव्या?" आजोबांनी विचारले.

" मला आवडेल तुमच्यासोबत यायला."

" पण तुला घरी जायला पाहिजे. आदित्यनाथाचे अंतिम संस्कार.." आजोबांनी तिला आठवण करून दिली. वडिलांची आठवण येऊन काव्याच्या डोळ्यात परत पाणी आले.

" दिवसकार्य झाले की आपण जाऊ." कौस्तुभ काव्याचा हात हातात घेत म्हणाला.

सगळे परत घरी गेले. आदित्यनाथ आणि कुटुंबाची चौकशी झाली. घरातल्यांना त्याच्या काळ्या धंद्याची काहीच माहिती नसल्याने ते बाकीच्या ससेमिर्‍यातून सुटले. आदित्यनाथाचे दिवसकार्य झाल्यावर कौस्तुभ, काव्या आणि आजोबा एक दिवस पंढरपूरला गेले. संध्याकाळी मंदिरातील गर्दी थोडी कमी झाली होती. तिघे विठुरायाच्या दर्शनाला गेले. मनोभावे हात जोडून उभे राहिले. ते प्रार्थना करत असतानाच अचानक मंदिरातील वीज गेली. सगळीकडे काळोख पसरला. हीच योग्य संधी आहे हे जाणून आजोबांनी खिशातील मणी काढून विठ्ठलचरणी ठेवला. आश्चर्य म्हणजे बघता बघता तो मणी तिथून दिसेनासा झाला. क्षणार्धात वीज परत आली. झालेला चमत्कार होता की दृष्टिभ्रम हे न समजून तिघांनी परत नमस्कार केला व ते तिथून निघाले.


कोणतेही मणी, माणिक, हिरे, मोती यापासून अलिप्त असा तो विठ्ठल आपल्या सस्मित चेहर्‍याने कंबरेवर हात ठेवून फक्त बघत होता.


कृष्णार्पणमस्तु..वरील कथा ही काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात आलेली आहे. बदामी, हंपी यातील शिल्पांची वर्णने मात्र खरी आहेत. किल्ली आणि दरवाजे हा भाग सोडून. कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//