रहस्य स्यमंतकाचे.. भाग १४

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग १४


मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभ शेवटी खजिन्याचा दरवाजा उघडण्यात यशस्वी होतोच. आता बघू पुढे काय होते ते.


" आता तरी खात्री पटली का दादा, की तो मणी कधीच माझ्याकडे नव्हता?" कृष्णाने भर दरबारात बलरामाला विचारले.

" मला क्षमा कर धाकल्या. मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता." बलराम पश्चातापाच्या स्वरात बोलत होता.

" द्वारकेच्या युवराजांच्या मुखी हे शब्द अजिबात शोभत नाहीत. त्यांनी फक्त आज्ञा करायची." कृष्ण बलरामाला मिठी मारत म्हणाला. सगळा दरबार भारावून दोन भावांची भेट बघत होता.

" अक्रूरकाका, तो मणी तुम्हाला हवा होता तर तुम्ही तसे सांगायला हवे होते. एवढे गैरसमज झाले नसते. तुमच्यासारख्या ज्येष्ठ यादवाकडून हे अपेक्षित नव्हते. पण असो. तो मणी आता तुमच्याकडेच राहू दे. फक्त एक विनंती, तो मणी घेऊन तुम्ही द्वारकेतच रहा. म्हणजे इथे कसलीच ददात पडणार नाही." लाजिरवाण्या चेहर्‍याने समोर बसलेल्या अक्रूराला कृष्णाने विनंती केली. शासन होईल असे वाटत असणाऱ्या अक्रूराला हे शब्द अनपेक्षित होते. ते ऐकून त्याच्या डोळ्यातून अश्रू घरंगळला. त्याने जयघोष केला, "द्वारकाधीशांचा विजय असो." ते ऐकून बाकीच्या यादवांनी ही जयजयकार करायला सुरुवात केली.

******************

" सर तुम्ही?" समोर उभ्या असलेल्या आदित्यनाथांना बघून कौस्तुभला धक्का बसला होता.

" हो.. मीच. आता बोलण्यात वेळ वाया न घालवता पुढे हो. गेले वीस वर्ष वाट बघतो आहे मी या क्षणाची."

आदित्यनाथ कौस्तुभवर पिस्तुल रोखत म्हणाले. त्यांच्यासोबत त्यांची काही शस्त्रसज्ज माणसेही होती. अचानक घडलेल्या या प्रसंगाने कौस्तुभ भांबावला होता. यांनी मला फसवलं तसंच काव्यानेही फसवलं? त्याच्या काळजात कळ आली. बधिर मनाने तो समोरच्या दरवाज्यात शिरला. समोर दिसणार्‍या पायर्‍या उतरायला त्याने सुरूवात केली. प्रत्येक पायरीसोबत आपण खोल अंधारात उतरतो आहोत, असं त्याला वाटत होते. जवळजवळ तीसेक पायर्‍या उतरल्यानंतर त्याचे पाय जमिनीला लागले. खाली अंधार होता. प्रतिक्षिप्तपणे त्याने खिशातला टॉर्च काढला. त्याने समोर टॉर्चचा प्रकाश पाडला. तिथे अनेक लहानमोठ्या पेट्या दिसत होत्या. प्रत्येक पेटीवर काहीतरी लिहिले होते. समोर दिसलेल्या खजिन्यापेक्षा झालेल्या फसवणुकीचा कौस्तुभला जास्त धक्का बसला होता. समोर परत एकदा विठ्ठलाची मूर्ती त्या पेट्यांच्या मधोमध उभी होती. हे सगळं बघेपर्यंत पाठून आदित्यनाथ आणि त्याची माणसे आलीच होती. आदित्यनाथ हातातले पिस्तुल कौस्तुभवरून न हलवता एका पेटीपाशी गेला. त्याने पेटीवरील अक्षरे वाचण्याचा प्रयत्न केला. आणि सोडून दिला. त्याने ती पेटी उघडली. आतमध्ये देवाचा सोन्याचा मुकुट होता. त्याचे डोळे चकाकले. त्याने आपल्या माणसांना हुकूम दिला.

" प्रत्येक पेटी जपून उघडा. ती एक शिसमी पेटी असेल. त्यात तो मणी असेल. तो जर मणी सापडला तर आयुष्यात बघितला नसेल एवढा पैसा मिळेल तुम्हाला."

माणसांनी त्या पेट्या उघडायला सुरूवात केली. आदित्यनाथ तिथे असलेल्या एका खांबाला टेकला.

" इच्छा असेल ना जाणून घ्यायची.. काय चालू आहे ते?" आदित्यनाथ कौस्तुभकडे बघत कुत्सितपणे म्हणाला. कौस्तुभ काहीच न बोलता विठ्ठलाच्या मूर्तीकडे एकटक बघत बसला.

" तर सुजय.. माझा मित्र. एक इतिहासप्रेमी. हंपीचा इतिहास शोधून काढत होता तो. आणि त्याला मदत करत होती अवनी, तुझी आई." त्याने बोलताना चेहरा वाकडा केला.

" पण या सगळ्यात तू कुठे बसतोस?" कौस्तुभने विचारले.

" तुम्हीवरून तू? बरं.. मरणाऱ्या माणसाचे सगळे अपराध माफ." एक डोळा काम करणाऱ्या माणसांकडे ठेवत आदित्यनाथ बोलत होता. "त्या पुस्तकी किड्याला मी संगणकाचा वापर संशोधनासाठी कसा करायचा, नेटवर संदर्भ शोधून ते कसे वापरायचे ते शिकवत होतो. त्याला संगणक वापरता येत नव्हता. मीच त्याला तो कसा वापरायचा ते शिकवला. ते शिकवत असतानाच त्याच्या लिखाणात स्यमंतक मण्याचा उल्लेख झाला." स्यमंतक मणी ऐकल्यावर कौस्तुभने नजर आदित्यनाथकडे वळवली.

" दचकलास ना? माझेही तेच झाले होते. तो उल्लेख वाचून मी ही भारावून गेलो. मग मी ते सगळे पेपर जास्तच काळजीपूर्वक बघू लागलो. ती अगम्य भाषा काही मला समजेना. सुजयला मी विचारले पण त्याने त्या विषयावर बोलणे टाळले. हळूहळू तो माझ्यासमोर ते काम करणं टाळू लागला. पण मी हुशार होतो. मी आधीच त्याचे सगळे काम कॉपी करून माझ्याकडे घेतले होते. माझी अडचण अशी होती की ते मला समजत नव्हते. दुसर्‍या कोणा इतिहास संशोधकाकडे जायचा धोका मी पत्करू शकत नव्हतो. मग मी एक सोपी युक्ती केली. मी एका गुंडांच्या टोळीमध्ये सामिल झालो. त्यांना फक्त एवढंच सांगितलं की एखादं घबाड मिळू शकतं. मग त्यांनी सुजय, अवनीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्याला त्यांचा संशय आला असावा. तो फारच जपून काम करायला लागला. माझ्याशी तर त्याने बोलणेच थांबवले. मला त्याचा फार राग आला होता. पण मी काहीच करू शकलो नाही. कारण माझ्याकडे असलेल्या माहितीचा मी उपयोग करू शकत नव्हतो. त्यात अचानक एके दिवशी सुजय, अवनी आणि त्याची आई कारमधून बाहेर जायला लागले. आधीसुद्धा तो अनेकदा हंपीला गेला होता. मी माझ्या माणसांना त्यांचा पाठलाग करायला सांगितला. मला हे माहित होते की जे आहे ते हंपीमध्येच आहे. पण कुठे? हे समजत नव्हते.

सुजय परत हंपीच्याच दिशेला जातच आहे हे समजल्यावर मी ही हंपीला जायला निघालो. पण... माझ्या लोकांच्या मूर्खपणामुळे त्या तिघांचा अपघात झाला. ते तिघेही जागच्याजागीच मरण पावले हे समजल्यावर मी अर्ध्या रस्त्यातून परत फिरलो. तुमच्या घरी आलो. त्याचा संगणक सुरू केला. त्याचा पासवर्ड वगैरे मला माहितच होता. पण तो हरामी निघाला. कंप्युटरवर काहीच माहिती नव्हती. फक्त एक फोटो ठेवला होता त्याने. मी सगळं घर शोधलं. काही म्हणजे काहीच सापडलं नाही. मी रागाने वेडापिसा झालो होतो. वाटत होतं तुला आणि तुझ्या आजोबाला पण मारून टाकावं. पण मी शांत डोक्याने विचार केला. तुम्हाला मारून काही फायदा झाला असता? नाही. उलट जर त्याने त्या मण्याची काही माहिती ठेवली असेल तर ती ही आशा संपली असती. म्हणून मग मी संयम ठेवला. तुझ्यावर आणि तुझ्या आजोबांवर लक्ष ठेवले. ते म्हणतात ना सब्र का फल मिठा होता है. तसंच झालं बघ. वीस वर्ष थांबलो आणि मला हा खजिना आणि मणी मिळाला."

कौस्तुभ हताशपणे बघत राहिला. त्याच्या पित्याचा अपराधी समोर होता पण तो हतबल होता. काय करावे हे सुचत नव्हते. तरिही मनातला सल त्याने बोलून दाखवला.

" मित्राचा विश्वासघात करून समाधान मिळाले नाही म्हणून मुलीचा वापर केलास?" ते ऐकून आदित्यनाथ हसला.

" नाही.. ते मात्र अनपेक्षित होते. काव्याने हट्ट केल्यामुळे माझे एक काम कमी झाले. तू काय करतो आहेस याची माहिती माझ्यापर्यंत पोहोचत होती. कालचा अनंतविष्णूचा व्हिडिओ बघूनच तर मी इथे आलो."

" बॉस, सगळ्या पेट्या शोधल्या. पण तुम्ही म्हणत आहात तसा मणी सापडला नाही." आदित्यनाथाची माणसे सांगू लागली.

" कसं शक्य आहे? मी त्याचा दोनतीनदा उल्लेख वाचला आहे. हे एवढे धन इथे आहे म्हणजे तो मणीही असलाच पाहिजे." आदित्यनाथ काळजीत पडला.

" पण बॉस हा खजिना पण करोडोंचा असेल ना? मग तो एक मणी नसला तर काय झाले?" एकाने विचारले.

" अरे मूर्खा, तो मणी साधा मणी नाहीये. त्या मण्यामधून दिवसाला सात ते आठ भार सोने मिळते. तुम्हाला काय समजणार म्हणा?" एवढे सोने ऐकून त्याची माणसे परत शोधकार्याला गेली. कौस्तुभला मात्र बरे वाटले. पण तो ही विचार करू लागला की तो मणी कुठे गेला असेल? बाबांनी त्याचा उल्लेख केला होता. म्हणजे त्यांना त्याची जागा समजली होती? मी इथून बाहेर पडू शकेन का? कौस्तुभने आजूबाजूला कसली मदत मिळू शकते का हे बघायला मान हलवली.

" हलायचा प्रयत्नही करू नकोस. एक गोळी आणि सगळं संपून जाईल." आदित्यनाथ कौस्तुभला म्हणाला.


खरंच स्यमंतकमणी अस्तित्वात असेल? असेल तर आदित्यनाथ मिळवू शकेल का तो मणी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

कृष्णपर्णमस्तु.

सदर कथा ही काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.

🎭 Series Post

View all