रहस्य स्यमंतकाचे.. भाग १२
मागील भागात आपण पाहिले की आजोबा कौस्तुभला त्याच्या कामावर लक्ष द्यायला सांगतात. आता बघू पुढे काय होते ते.
" द्वारकाधीश, मला न्याय हवा आहे.." प्रवासाने थकलेली, रडून दमलेली सत्यभामा कृष्णाला विनवत होती.
" भामा, आधी शांत हो. बस इथे."
" कशी शांत होऊ? त्या दुष्टाने माझ्या पित्याचा वध केला आणि भेकडासारखा तो मणी चोरून पळून गेला. जोपर्यंत मी त्याला शासन करत नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही." डोळे पुसत भामा निर्धाराने बोलली.
" शतधन्व्याला शासन होणार भामा.." कृष्ण तिच्या हातावर थोपटत म्हणाला.
******************
" आजोबा, आजपासून आमचं काम सुरू होणार आहे. तुम्ही येताय ना?" कौस्तुभने विचारले.
" नाही. आज नाही येत. काल जरा दगदग झाली आहे. तुम्ही तुमचे काम करा. मी उद्या येईन."
" मी सोबत थांबू का?" काव्याने विचारले.
" नको. तू इथे थांबलीस तर शूटिंग कोण करणार? जा तू. मी आहे. आणि काही लागलंच तर हा मुलगा आहे ना. बरं आल्यावर काय खाणार तुम्ही? मी तसं बनवून ठेवतो?"
" आजोबा, तुम्ही स्वयंपाक करणार?" काव्याला खूप आश्चर्य वाटत होतं.
" का? मला जमणार नाही असं वाटतं तुला?"
" असं नाही.. पण."
" पण नाही आणि परंतु नाही. बघतो इथे काय मिळतं ते. तसं करून ठेवतो. नाहीतर आहेत इडली आणि डोसे."
" निघतो आम्ही. काळजी घ्या आणि काही लागलं तर फोन करा." काळजीने कौस्तुभ म्हणाला.
" मग आज काय करायचं?" काव्याने विचारले.
" आज फक्त फिरायचं. आज आपण बाहेरूनच एकेक जागा बघू. आणि मग त्याप्रमाणे कामाला कशी सुरुवात करायची ते बघू " कौस्तुभ रिक्षामध्ये बसत म्हणाला.
" आपण रिक्षाने जायचे?"
" मी जर गाडी चालवण्याकडे लक्ष दिले तर आजूबाजूच्या गोष्टी बघायला कश्या मिळतील?" कौस्तुभ काव्याच्या डोळ्यात बघत म्हणाला.
" आजच्या दिवसाच्या कामात हे ही आहे का?"
" हे म्हणजे काय?"
" गरीब बिचार्या मुलीला बोलण्यात अडकवणे." काव्या रिक्षात बसत म्हणाली.
" मी? आणि मुलींना अडकवणार? मला तर मुलींशी बोलताही येत नाही." कौस्तुभ बापडा चेहरा करत म्हणाला.
" एवढं तोंड पाडायची गरज नाही. माझ्याशी बोललास की इतर कोणाशी बोलायची गरजच पडणार नाही."
" एक्सक्यूज मी.."
" यु आर एक्सक्यूज्ड." काव्या नाक उडवत म्हणाली.
" ओ भाईसाब, निकलना है या यहींपे बात करना है?" रिक्षावाल्याने विचारले.
" चलो चलो.."
" बरं.. निघायच्या आधी काही माहिती द्याल का मला? "एक मिनिट.. तो राज आहे का?" रिक्षाच्या आरश्यात बघत काव्या म्हणाली.
" कोण राज?" कौस्तुभने विचारले.
" आपला बदामीचा गाईड."
" तो इथे कशाला येईल?" कौस्तुभने सुद्धा आरशात बघितले. "कोणीच नाहीये."
" मला भास झाला असेल मग. बरं तुम्ही माहिती द्याल का मला थोडी?" काव्या नाटकीपणे म्हणाली.
" हो.. माझं आवडीचं काम आहे ते. आता आपण जे हंपी बघणार आहोत ते रामायण काळापासून प्रसिद्ध आहे. इथेच पंपा नावाचे सरोवर आहे. सुग्रीवाची किष्किंधा नगरी याच्या अगदी जवळच होती. कालांतराने पंपाचं हंपी झालं. इथेच हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी एक बलाढ्य हिंदू साम्राज्य उभे केले. एकाहून एक अश्या सरस राजांमुळे या राज्याचे वैभव वाढतच राहिले. अडीचशे वर्ष वैभवाच्या शिखरावर असलेले हे शहर नंतर मात्र मुसलमान राज्यकर्त्यांनी फक्त लुटले. आता हे जे काही दिसतात ते फक्त अवशेष आहेत. विचार कर हे राज्य तेव्हा कसे असेल?" बोलताना कौस्तुभचा स्वर कापत होता. काव्या हे सगळं ऐकत होती.
"मेरे पिताजी तो बोलते थे, की तब तो हर मंदिर सोनेसे बना था. इतना पैसा था, इतना खजाना था. क्या बताऊ? मूर्ती के आंखमें हिरे, खंबेमे मोती.." रिक्षावाला मध्ये बोलू लागला.
" आपको मराठी समझता है?" काव्याने विचारले.
" अरे यहांपे पुरे देशभरसे लोग आते हैं, तो सब भाषा थोडा थोडा समझता है. एक बात बोलू, कुछ लोगों को तो लगता है के यहांपे तो खजाना भी छुपा है.." रिक्षावाला गाडी चालवता चालवता बोलत होता. खजिन्याचे नाव घेताच कौस्तुभ गप्प बसून बाहेर बघू लागला.
" कौस्तुभ, ती नरसिंहाचीच मूर्ती आहे ना?" गप्प बसलेल्या कौस्तुभला बोलकं करण्यासाठी काव्याने विचारले.
" हां.. यह मूर्ती लक्ष्मीनृसिंह नाम से जानी जाती है." रिक्षावाल्याने माहिती पुरवली.
" आपण बदामीला बघितलेली उभी मूर्ती होती ना?" काव्याने परत विचारले.
" आपको नरसिंह की और मूर्ती देखनी है तो आप विठ्ठलमंदिर जाईये. वहांपे बहोत मूर्ती है."
" विठ्ठलमंदिरमें नरसिंह की मूर्ती?"
" हां जी. बाकी की मूर्ती भी हैं मतलब कृष्ण भगवान, रामायण. पर वहां पे एक पुरा मंडप सिर्फ और सिर्फ नरसिंहजी के लिए है. देखना है?"
" चलिये." कौस्तुभ म्हणाला. काव्या त्याच्याकडे बघतच राहिली. ते दोघं विठ्ठलमंदिरात आले. दरवाजात दगडी रथ उभा होता. गरुडाची स्थापना केलेला. रथ जरी हत्ती ओढत आहेत असे दाखवले होते तरिही त्याजागी आधी असलेल्या घोड्यांच्या शेपट्या आणि मागील पायांचे अवशेष दिसत होते. ते बघत कौस्तुभ पुढे चालला होता. काव्या काहीच न बोलता फक्त फोटो काढत होती. दोघे सभामंडपात आले. अनेकजण तिथे असलेल्या खांबांवर आघात करत होते.
" हे काय चालू आहे?"
" वो खंबे में से सूर निकलते है तो." पाठीमागून आलेल्या रिक्षावाल्याने खांदे उडवले. कौस्तुभ बाकी कुठेच न बघता पुढे आला. उत्तरेकडच्या मंडपात त्याला नरसिंहाच्या अनेक प्रतिमा दिसत होत्या. हिरण्यकश्यपूची आतडी बाहेर काढणारा नरसिंह आणि त्याच्या पायाशी बसलेला प्रल्हाद. हे दोघे तिथे उठून दिसत होते. त्याच्यासमोर असलेले गर्भगृह रिकामे होते.
" यहां पे विठ्ठलमूर्ती की प्रतिष्ठापना हुई थी." हात जोडत रिक्षावाला म्हणाला.
कौस्तुभने मागे पाहिले नरसिंह आपल्या उग्र डोळ्यांनी समोरच बघत होता. कौस्तुभने समोर बघितले. रिकामी असलेली विठ्ठलाची जागा जणू त्याला कसलीतरी आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती. कौस्तुभने दोन्ही हातात डोके धरले. त्याला काहीच सुचत नव्हते. तो काव्याला काहीतरी सांगणार तोच तिचा फोन वाजला.
" हां बोल आई. काय?? कधी?? मी निघतेच."
लगेच निघण्यासारखे नक्की काय झाले असावे? काय संबंध आहे नरसिंह आणि विठ्ठलाचा? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
कृष्णार्पणमस्तु
सदर कथा ही काल्पनिक असून मनोरंजनात्मक हेतूने लिहिण्यात येत आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.