Login

रहस्य स्यमंतकाचे.. भाग ११

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग ११

मागील भागात आपण पाहिले की लेण्यांमध्ये भेटलेला गाईड तिथे असलेल्या तळघराबद्दल सांगतो. आता बघू पुढे काय होते ते.

"सत्राजितकाका, प्रसेनाला एका सिंहाने ठार केले होते. त्याच्याजवळचा हा स्यमंतक मणी या जांबुवंतांना सापडला होता. तोच मी तुम्हाला या समस्त यादवांसमक्ष देतो आहे. याचा स्वीकार व्हावा." कृष्णाने तो मणी एका पेटीत ठेवला होता. ती पेटी त्याने सत्राजितासमोर धरली.

" मला माफ करा यादवराज. मी तुमच्यावर नको तो आळ घेतला. त्याचे परिमार्जन म्हणून हा मणी आणि माझी कन्या सत्यभामा तुमच्या सुपूर्त करू इच्छितो." सत्राजित प्रार्थना करत होते.

" काका, द्रव्याचा लोभ मला कधीच नव्हता. हा मणी मी आपल्या मथुरेच्या यादवांसाठी मागितला होता. पण.. असो. मी स्यमंतकाचा स्वीकार नाही करू शकत. पण तुमच्या कन्येचा करेन." कृष्णाचे बोलणे पूर्ण होताच दरबारात कृष्णाचा जयजयकार झाला.

******************

धडधडत्या ह्रदयाने कौस्तुभ लेणीमध्ये शिरला होता. सकाळी अनंत विष्णूची मूर्ती निरखताना त्याला एक जागा दिसली होती. बाकी सगळीकडे जिथे कंकण कोरून ठेवले होते, फक्त तिथेच दशावतार कोरलेले होते अगदी तसेच जसे त्याला सापडलेल्या पट्टीवर होते. त्याने जेव्हा अजून काळजीपूर्वक बघायला सुरूवात केली तेव्हा तिथे त्याला ती फट दिसली होती. कौस्तुभने ती किल्ली काढली. थरथरणार्‍या हाताने त्याने ती त्या फटीत सारली. एक प्राचीन खजिना आपल्याला दिसणार या कल्पनेनेच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. त्याने ती किल्ली फटीत टाकून ती फिरवली. किल्ली फिरवल्याबरोबर आत कुठेतरी एक कळ फिरली असावी. हळूहळू एक छोटासा दरवाजा उघडला. एकावेळेस एकच माणूस जाऊ शकेल एवढीच त्याची रुंदी होती. कौस्तुभने मागे वळून बघितले. कोणीच दिसत नव्हते. आपण जर आत अडकलो तर कोणाला समजणारही नाही. आजोबांचा विचार मनात येताच त्याने आवंढा गिळला. पण हे गुपित त्याला पुढे खेचत होते.

कौस्तुभने आत पाऊल टाकले. आतल्या अंधारात त्याला आधी काहीच दिसले नाही. त्याने टॉर्च सुरू केला. समोरच्या उजेडात दिसत होत्या दोनच मूर्त्या.. एक उभ्या नरसिंहाची आणि दुसरी विठोबाची. कौस्तुभ दरवाजातून आत आला. खजिनाच काय, या दोन मूर्त्या सोडून बाकीचं काहीच या दालनात नव्हतं. निराश होऊन कौस्तुभने तिकडच्या भिंतींवर टॉर्चचा झोत मारला. एका भिंतीवर त्याला वारी कोरलेली दिसली. ती पंढरीची वारी होती का? कोणीतरी विठ्ठलाची मूर्ती खांद्यावर घेऊन चालले होते. पाठीमागे तुळशीवृंदावन माथी घेतलेल्या बायका होत्या. कौस्तुभ निराशेने पाठी वळला. कोणीतरी पटकन बाजूला झाल्यासारखे त्याला वाटले. कौस्तुभने मोबाईल मधून पटापट फोटो काढून घेतले आणि तो लगेच त्या दालनातून बाहेर आला. त्याने मगाच्या फटीत घातलेली ती किल्ली परत उलट्या दिशेला फिरवली. हळूहळू तो दरवाजा बंद झाला.

कौस्तुभ हॉटेलवर परत आला. रूमचे दार त्याने हलक्या हाताने उघडले. बेडवर आजोबा झोपले होते. त्याने हळूच कपडे बदलले आणि तो झोपण्यासाठी पलंगावर पडला.

"कुठे गेला होतास न सांगता?"

" आजोबा.. हे असं बोलतात का? मला वाटलं तुम्ही झोपला आहात." कौस्तुभ दचकून ओरडला.

" तू हळूच निघून गेल्यावर मला झोप येईल का? तू जाताना दरवाजा लावलास तेव्हाच जाग आली होती मला. पण सतत तुझ्या गळ्यात लोढणं नको म्हणून मी आलो नाही तुझ्या पाठी." आजोबा म्हणाले.

" थॅंक यू सो मच त्यासाठी."

" काय केलेस मग बाहेर जाऊन?"

" आजोबा, त्या किल्लीने दरवाजा तर उघडला. पण तिथे फक्त नरसिंह आणि विठ्ठलाच्या कोरीव मूर्त्या होत्या. आणि अजून एक.. एका भिंतीवर वारी कोरलेली होती. मी फोटो दाखवू?" कौस्तुभने विचारले.

" नको. कौस्तुभ या भूलभुलैयात नको अडकायला. आपण उद्याच इथून हंपीला जाऊ. तू तुझे काम कर. आणि बस्स.." आजोबा गंभीरपणे बोलत होते.

" पण का आजोबा? आईबाबा काय करत होते ते समजण्याची एक संधी मिळाली आहे. तर.." कौस्तुभ निराश झाला होता.

" कौस्तुभ, सुजय अवनीचा अपघात होण्याआधी मलाही तुला पडले तसे स्वप्न पडत होते. मी तेव्हा त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता मात्र मला तुला गमवायचे नाही. हा जो काही खजिना असेल तो शतकानुशतके तिथेच राहिला आहे, अजून राहिला तर काय फरक पडतो? तू हा विचार सोडून द्यावास हेच योग्य. " आजोबा कूस बदलून झोपायला गेले. आजोबांचे बोलणे ऐकून त्या लेण्यांमध्ये कोणाची तरी चाहूल लागली होती हे त्यांना सांगावेसेच वाटले नाही. तो ही डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करू लागला.


" गुड मॉर्निंग आजोबा.. आजचा काय प्लॅन?" आवरून आलेल्या काव्याने विचारले.

" आज हंपी." आजोबा कौस्तुभकडे न बघताच बोलले.

" ओके.. आजोबा, काही झाले आहे का?" ते कौस्तुभशी बोलत नाहीत हे बघून काव्याने विचारले.

" नाही ग.. आणि तुम्हाला तुमचे काम नाही का करायचे?"

" काम तर आम्ही आधीच सुरू केले आहे. काल कौस्तुभ जेव्हा ती माहिती सांगत होते तेव्हाच मी ते शूट केले. काल रात्री मी तर बाबांना कालची एक फाईल पाठवली सुद्धा. बाबांना तर त्या गाईडने सांगितलेली माहिती पण आवडली. तुम्हाला बघायची आहे?"

" हंपीला गेल्यावर दाखव. नाहीतरी तिथे कामच करायचे आहे ना तुमचे." आजोबा म्हणाले. कौस्तुभने ऐकून घेतले. त्याचे उतरलेले तोंड काव्याला बघवत नव्हते.

"आजोबा, एक जोक सांगू?" काव्याने विचारले.

" सांग ना.."

" एक्कावनातून एक हत्ती गेला, मग किती उरले?"

" पन्नास. पण हा जोक कुठे? हे तर गणित आहे." आजोबा म्हणाले.

" चूक.. उत्तर शून्य. मी म्हटलं एका वनातून एक हत्ती गेला." काव्या हसत म्हणाली. ते ऐकून आजोबांनी डोक्यावर हात मारला आणि कौस्तुभच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर आली.

" हा माझा फेवरेट आहे.. श्रीमंत दामोदरपंत नावाच्या नाटकात आहे. मी एवढे वेळा हे नाटक बघितले आहे ना." काव्या नॉनस्टॉप बोलत होती आणि हसवत होती. बोलता बोलता ते कधी हंपीला पोहोचले ते समजलेच नाही.

" चला उतरा.. आलं आपलं हॉटेल." कौस्तुभ गाडी थांबवत म्हणाला. सगळे गाडीच्या बाहेर आले. ते एक घरगुती हॉटेल होतं.गाडीचा आवाज ऐकताच एक मुलगा बाहेर आला.

" आप वही हैं ना जो मेहना धो मेहना यहा रहेगा?" त्याने मोडक्यातोडक्या हिंदीत विचारले. कौस्तुभने मान हलवताच त्याने सामान बाहेर काढायला मदत केली. आजोबा त्याच्यासोबत पुढे जायला निघाले. काव्या मात्र उगाचच रेंगाळत होती.

" थॅंक यू." काव्याला कौस्तुभ म्हणाला.

" कशासाठी?"

" सगळ्यांना हसवण्यासाठी."

"सगळ्यांना आनंदी ठेवायला आवडतं मला." काव्याच्या चेहरा लाल होत होता.

" पुढच्या वेळेस मी ही प्रयत्न करेन."

" कसला?"

" तुला आनंदी ठेवण्याचा." कौस्तुभ पुढे वाकून त्याची बॅग घेत म्हणाला.

" चलायचे?" त्याने हात पुढे केला. काही न बोलता काव्याने त्याच्या हातात हात दिला.

दोघांच्या प्रेमकहाणीत खजिन्याचा शोध मागे पडेल का? सुजयला जो शोध लागला होता तो समजेल का कौस्तुभला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

कृष्णपर्णमस्तु

🎭 Series Post

View all