रहस्य स्यमंतकाचे.. भाग १०

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग १०


मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभ आणि आजोबा बदामीच्या लेण्यांमध्ये जातात. आता बघू पुढे काय होते ते.


"ही जांबवती. तुला म्हटलं होतं ना रत्न एकटं येत नाही म्हणून." स्वागताला आलेल्या रूक्मिणीला कृष्ण म्हणाला. रूक्मिणीने जांबवतीकडे बघितले. एवढ्या सगळ्या यादवांना बघून ती अगदी भांबावून गेली होती.

" हे ही स्वामींना शोभणारेच रत्न आहे. ये ग सखी." रूक्मिणीने प्रेमाने जांबुवतीला साद घातली. ती प्रेमाची हाक ऐकून जांबवती रूक्मिणीला नमस्कार करण्यासाठी खाली वाकली.

" अंहं.. जशी मी तशीच तू." असे म्हणत रूक्मिणीने जांबवतीला आपल्या ह्र्दयाशी धरले.

****************

" अनंतविष्णू.. अनंतविष्णूचे शिल्प म्हणतात याला." बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला. कौस्तुभने त्या माणसाकडे बघितले. वयाने त्याच्यापेक्षा थोडा मोठा असावा. अंगावर नीटनेटके कपडे, डोक्यावर टोपी.

" बरीच माहिती दिसते तुम्हाला."

" ठेवावी लागते.. कामच ते आहे."

" कसलं काम?"

" गाईडचं."

" तरीच.."

" तरीच काय?"

" तरीच एवढं चांगलं मराठी बोलताय. नाहीतर इथल्या मुलखात असं मराठी?" कौस्तुभ म्हणाला.

" पोटापाण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला हवा आहे का गाईड?" त्याने विचारले.

" नको.." कौस्तुभ परत आपली नजर त्या मूर्तीकडे वळवत म्हणाला.

" जास्त नाही घेणार साहेब. आणि तुम्हाला या लेण्यांमधल्या अश्या गोष्टी पण सांगेन ज्या बाहेर कोणाला माहित नाही." तो आग्रह करू लागला.

" असं सगळेच म्हणतात. "

" मी त्यांच्यामधला नाही साहेब."

" तुम्ही मला सांगा. मी देते तुम्हाला पैसे." काव्या मध्ये पडत म्हणाली.

" बरं.." तो खांदे उडवत म्हणाला. त्याने बोलायला सुरुवात केली. "तर सगळ्यात आधी माझे नाव राज. गेले अनेक वर्ष मी हे गाईडचे काम करत आहे. माझे वडील इथे नेहमी यायचे. त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या पूर्वजांनी ही शिल्प कोरणाऱ्या शिल्पकारांची काळजी घेतली. म्हणजे त्यांना जेवण वगैरे आणून देणे आणि बरंच काही. त्यामुळे या शिल्पांच्या जन्मापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत." राज बोलत असताना काव्याने जांभई दिली. ते बघून राजने आपले बोलणे आवरते घेतले. "आता आपण वळू या शिल्पांकडे. ही समोर दिसते आहे ती आहे अनंतविष्णूची मूर्ती. तुम्ही आत्तापर्यंत पाहिलेल्या मूर्तीत आणि या मूर्तीत फरक आहे. काय तो सांगता येईल का?"

" हो.. बाकीच्या मूर्तीत विष्णू शेषशायी असतात. पण इथे ते बसलेले आहेत." राजच्या बोलण्यात कौस्तुभ कधी गुंतला हे त्यालाही समजले नाही. तो उत्तर देऊन मोकळा झाला.

" बरोबर.. ही मूर्ती बघा. देवाच्या अंगावर वस्त्रभूषणे नेहमी सारखीच आहेत. पण त्यांचा मुकूट मात्र वेगळा आहे. आता आपण बघू याला अनंत का म्हणतात. हा जो शेषनाग इथे कोरला आहे, तो लांबवर पसरलेला आहे. आपण अगणित किंवा तुम्ही गणितात इन्फीनाईट म्हणता तसा. म्हणून याचे नाव अनंत आहे. या लांबच लांब पसरलेल्या शेषावर बसलेला विष्णू हा राजासारखा दिसतो. आता इथे याचं छत बघा. इथे चक्क कुबेर आहे. तसेच ऐरावतावर बसलेला इंद्र. असं म्हटलं जातं की त्याकाळी परकीय आक्रमणापासून आपला खजिना लपवण्यासाठी राजांनी एक तळघर बांधून घेतले होते. त्या तळघरात जायचा दरवाजा इथेच कुठेतरी आहे. पण तो आजपर्यंत कोणाला सापडलेला नाही." राजचे बोलणे काव्या, आजोबा आणि कौस्तुभही मन लावून ऐकत होता.

"तळघराचा दरवाजा.. किती एक्सायटिंग! हे सगळं भन्नाट आहे. कोणी तो दरवाजा नाही शोधला कधी?" काव्या बोलू लागली.

" असं वाटतं का तुम्हाला? अनेकजण येतात. इथे दरवाजा शोधायला. पण फक्त दरवाजा शोधून काय फायदा? त्याची चावी नको?" चावी हा शब्द ऐकून आजोबा आणि कौस्तुभ चमकले.

" कसली चावी?" कौस्तुभने विचारले.

" दरवाजाची चावी. असं म्हणतात की त्या दरवाज्याची एक चावी आहे. पण ती आमच्या राजांकडेच आहे. तो दरवाजा उघडला तर फक्त त्याच चावीने."

" अय्या.. अजूनही इथे राजा आहे?" काव्याचे प्रश्न संपत नव्हते.

" हो.. राजवाडा आहे इथे अजून. पण राजेसाहेब इथे गावात थोडीच राहणार? ते राहतात मोठमोठ्या शहरात. पण सणावाराला येतात इथे." राजने परत माहिती द्यायला सुरुवात केली.

" तुम्ही बघितली आहे का ती चावी?" कौस्तुभने त्याचे बोलणे थांबतात विचारले.

" थट्टा करताय का राव गरिबाची? मी बघितली नाही. पण ऐकलं आहे माझ्या बाकडून. त्याने बघितली होती म्हणे मी लहान असताना."

" कशी होती ती? काही सांगितलं त्यांनी?" कौस्तुभ विचारत होता.

" तुम्ही का एवढे प्रश्न विचारत आहात?" राजच्या कपाळाला आठी पडली.

" उत्सुकता म्हणून. "

" तो सांगत होता.. ती कसली तरी पट्टी होती आणि त्यावर चिन्ह होती एवढं नक्की. अंधारात बघितली होती त्याने."

" निघायचं का आता इथून? तुम्ही खूप दमला असाल आजोबा." कौस्तुभ अचानक घाई करू लागला.

" पण.." काव्या बोलता बोलता थांबली. कारण आजोबा लेण्या चढून थकलेले तिला दिसत होते. राजला त्याचे ठरलेले पैसे देऊन तिघेही तिथून निघाले. आजही तिथेच मुक्काम करायचा असे ठरले. रात्री सगळे झोपले आहेत हे बघून कौस्तुभने आपली बॅग उघडली. त्यातून त्याने ती चावी काढली. जवळचा टॉर्च घेऊन तो परत निघाला. बाहेर पडताना टॉर्च आणि चावी त्याने जॅकेटमध्ये लपवली. रिसेप्शनला पाय मोकळे करून येतो असे सांगून तो परत लेण्यांकडे निघाला. कौस्तुभ विष्णूलेण्यांपाशी आला. आजूबाजूला कोणीच नव्हते. अंधार पसरला होता.. कुठेकुठे मिणमिणते दिवे होते. त्याने ती पट्टी काढली. टॉर्च सुरू केली. कौस्तुभला धडधडत होतं. त्या पट्टीवर असलेली चित्रे त्याने परत बघितली. सकाळी बघितलेल्या अनंताच्या मूर्तीजवळ तो परत गेला. सकाळी जी गोष्ट त्याला जाणवली तिथे त्याने ती पट्टी ठेवली.. आणि...


काय झालं असेल , बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

कृष्णार्पणमस्तु

🎭 Series Post

View all