रहस्य स्यमंतकाचे.. भाग ९

कथा स्यमंतकाची
रहस्य स्यमंतकाचे.. भाग ९


मागील भागात आपण पाहिले की ज्या हॉटेलमध्ये कौस्तुभ आणि आजोबा नाश्ता करायला थांबतात तिथे त्यांना बनशंकरीच्या आसपासच्या लेण्या दिसतात. हंपीला जायच्या आधी ते तिथे जायचे ठरवतात. बघू पुढे काय होते ते.


" क्षमा करा मला. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही." एकवीस दिवसांच्या तुंबळ युद्धानंतर जांबुवंत श्रीकृष्णाची क्षमा मागत होता.

" क्षमा कशासाठी? मी तर फक्त रामावतारात तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करत होतो." चेहर्‍यावर तेच हास्य ठेवत कृष्ण म्हणाला.

" मी समजलो नाही."

" गरजही नाही. बरं आतातरी मला ते मणीरत्न मिळेल का?'

" तुमचेच आहे ते. पण माझी एक विनंती आहे."

" सांगा.."

" माझ्या या कन्यारत्नाचा आपण स्विकार करावा ही इच्छा आहे." जांबुवतीला बोलावत जांबुवंताने प्रार्थना केली.

" मान्य." आपल्यासारख्या वनकन्येचा स्विकार करणाऱ्या त्या राजबिंड्या पुरुषाकडे जांबवती पहातच राहिली.

******************


" आजोबा, तुम्ही नक्की डोंगर चढू शकाल का?" काव्याने काळजीने विचारले.

" बघू.. प्रयत्न करू. त्यातूनही मला काही झाले तर तुम्ही आहातच ना?" आजोबा दोघांकडे बघत म्हणाले. रात्री बनशंकरीचे दर्शन घेऊन तिथेच तिघांनी मुक्काम केला होता. काव्या तिच्या खोलीत गेली हे बघून कौस्तुभला आजोबांशी खूप काही बोलायचे होते. पण तो एवढा थकला होता की बेडवर पडल्या पडल्याच झोपून गेला होता. आजोबा मात्र बराचवेळ विचार करत होते. सोबत आणलेला नकाशा परत परत बघत होते. सकाळी लवकर उठून आवरून ते इथे आले होते. आजोबांनी विठ्ठल मूर्ती नीट जपून हॉटेलच्या रूममध्ये ठेवली होती. सुजयला त्या नकाशातून काय सांगायचे असावे, त्याची उत्सुकता कौस्तुभ आणि आजोबा दोघांनाही होती. फक्त काव्यासमोर त्यांना बोलता येत नव्हते. गणपती बाप्पाचे नाव घेऊन तिघांनीही डोंगर चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात ते पहिल्या लेणीपाशी आले. आजोबा दम घेण्यासाठी थांबले. कौस्तुभने त्यांना पाणी दिले. तोपर्यंत काव्याने तिच्या फोटोशूटला सुरुवात केली सुद्धा. कौस्तुभच्या नकळत ती त्याचे सुद्धा अनेक फोटो कॅमेर्‍यात कैद करत होती.

" आजोबा.. कसली अमेझिंग शिल्पं आहेत ही! मस्तच!" काव्या कौस्तुभशी बोलणं टाळत होती. पण यामुळे तो तिच्याकडे ओढला जात होता.

" सुंदरच.." कौस्तुभ तिच्याकडे बघत पुटपुटला.

" काही म्हणालात का?" काव्याने मान वळवून विचारले. त्यामुळे कौस्तुभ पटकन गांगरला.

" हो.. आतमधले शिवाचे शिल्प अतिशय प्रसिद्ध आहे. आजोबा जायचे का आत?"

" सुपर्ब.." भान हरपून काव्या समोरच्या शिल्पाकडे बघत होती.

" खरंच.." कौस्तुभच्या तोंडातून परत निघून गेले. काव्याने वैतागून त्याच्याकडे बघितले.

" तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?"

" एकमेव.. अतुलनीय.." कौस्तुभ भारावला होता.

" तुम्ही फ्लर्ट करता आहात माझ्याशी?" काव्याच्या चेहर्‍यावर गुलाब फुलले होते. या दोघांचं बोलणं सुरू आहे हे बघून आजोबा कधीच त्या शिल्पापाशी जाऊन पोहोचले होते.

" वेड लागलं आहे का मला? मी सांगत होतो ही शिवाची मूर्ती अतुलनीय आहे. भरतनाट्यमच्या एक्याऐंशी प्रकारच्या मुद्रा या एकाच मूर्तीतून शिल्पकारांनी दाखवल्या आहेत." कौस्तुभमधला पुरात्तवज्ञ जागा झाला होता.

" खरंच की.." आश्चर्याने काव्या म्हणाली.

" आजोबा.. तुम्ही कसला विचार करता आहात?" महिषासुरमर्दिनीचे शिल्प बघत असलेल्या आजोबांना कौस्तुभने विचारले.

" यात काहीतरी वेगळे आहे. आणि ते वेगळं मला उमजत नाहिये." कौस्तुभने क्षणभर त्या शिल्पाकडे बघितलं.

" आजोबा, रेड्याचे तोंड."

" अरे हो. तरी मी म्हणतो आहे काय चुकलंय."

" चुकलंय की चुकवलंय?" कौस्तुभ विचारात पडत म्हणाला.

"तुमचं नक्की काय चालू आहे समजेल का?" काव्या मध्ये पडत म्हणाली.

" काही विशेष नाही. महिषासुरमर्दिनीच्या महिषाचे तोंड नेहमी उजवीकडे असते. इथे डावीकडे आहे. असं का? हाच विचार करत होतो." आजोबा सावरून घेत म्हणाले.

" निघायचे इथून?" कौस्तुभने विचारले.

" पण मला अजून बाकीच्या शिल्पांचे फोटो काढायचे आहेत." काव्या वैतागली होती.

" हवे तेवढे फोटो काढा आणि मग या.
आम्ही बाजूच्याच लेण्यात आहोत." कौस्तुभ म्हणाला.

" बाजूच्या म्हणजे नक्की कोणत्या?"

" डावीकडच्या." कौस्तुभ आजोबांकडे बघत होता.

" मी पण येते. मी एकटी इथे काय करू?" हिरमुसून काव्या म्हणाली. ते तिघेही डावीकडच्या लेण्यात गेले. आणि बघतच राहिले. आधीचे लेणे शंकराला वाहिले होते तर हे फक्त आणि फक्त विष्णूला. दरवाजापाशीच अष्टभुज विष्णूची प्रतिमा होती. त्याकडे बघतच तिघांनी आत प्रवेश केला. इथेसुद्धा अनेक शिल्प होती. काव्या तर ते बघून स्तिमित झाली होती.

" आजोबा, हे कसले शिल्प आहे?"

" हा नरसिंह अवतार आहे." आजोबा म्हणाले.

" नरसिंह म्हणजे तो हिरण्यकश्यपूचे पोट फाडणारा ना?"

" हो.. तोच तो."

" मग त्याची मूर्ती ही अशी का? मी तर नेहमी त्याला बसलेलाच बघितला आहे." काव्याचे प्रश्न संपत नव्हते.

" तोच विचार करतो आहे. ही मूर्ती उभी का?" कौस्तुभने परत मूर्तीकडे बघितले. नरसिंहाचा नेहमीचा उग्र अवतार नव्हता. तर मोठ्या डौलात हातातील गदेला टेकून फक्त प्रसन्न हसत उभी असलेली ती मूर्ती होती. गळ्यात आभूषणे, कमरेला पट्टा, डोक्यावर कमलपुष्पे. नक्की काय सुचवायचे आहे शिल्पकाराला? विचारांच्या तंद्रीत कौस्तुभ पुढे चालत गेला. आणि समोर बघतच राहिला.


काय दिसले असेल नक्की कौस्तुभला? इतरत्र कुठेही न आढळणारी उभी नरसिंह मूर्ती का कोरली असावी तिथे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

कृष्णापर्णमस्तू.

🎭 Series Post

View all