रहस्य स्यमंतकाचे भाग ५
मागील भागात आपण पाहिले की कौस्तुभ त्याच्या वडिलांचा संगणक सुरू करतो. पण त्यावर काहीच माहिती नाही हे बघून त्याला आश्चर्य वाटतं. आता बघू पुढे काय होते ते.
" द्वारकाधीश, तुम्ही या गुहेत जाणं धोक्याचं आहे. आत कोणताही वन्यपशू सुद्धा असू शकतो. आज्ञा करा. मी जातो." सात्यकी म्हणाला.
" सात्यकी, धोका फक्त मलाच असेल? तुम्हाला नाही?" कृष्णाने त्याच्या नेहमीच्या शैलीत विचारले.
" मलाही असेलच." काय बोलावे ते न सुचून सात्यकी पुटपुटला.
" हो ना? मग विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही सगळे इथेच थांबा." कृष्ण आत जायला निघाला.
**************
" आजोबा, माझं हे खेळणं कुठे आहे?" कौस्तुभने अचानक प्रश्न विचारल्याने आजोबा दचकले.
" काय म्हणालास?"
" आजोबा, माझ्या हातात हे जे खेळणं आहे ते कुठे आहे? तुम्ही फेकून नाही ना दिलेत?"
" बरा आहेस ना? कसं फेकून देणार होतो? सुजयने वारंवार बजावले होते, काही झाले तरी हे खेळणं नजरेआड होऊ देऊ नका." आजोबा बोलून गेले. आणि चमकून दोघांनीही एकमेकांकडे बघितले.
" आजोबा, ते खेळणं.." कौस्तुभ जोरात ओरडला.
" तुझ्या जुन्या वस्तूंमध्येच असेल. ते सगळं आजीच्या खोलीत ठेवलं आहे."
" चला पटकन.. ते सापडतं का बघू." कौस्तुभ उठत म्हणाला. दोघे बाजूच्या खोलीत गेले. घरी येणार्या मावशींनी सगळ्या वस्तू कपाटात नीट रचून ठेवल्या होत्या. आजोबा तिकडच्या पलंगावर बसले. कौस्तुभ कपाटातली खेळणी बाहेर काढत होता. आणि सगळ्यात शेवटी त्याला ते दिसले. त्याच्या बाबांनी आणलेला मोठा टेडी बेअर.. तो बघूनच कौस्तुभ रडला होता. पण आज त्याच्यावरून हात फिरवताना त्याला त्याच्या बाबांचे प्रेम जाणवत होते. त्याने तो टेडी हातात घेतला. त्याला मिठी मारली. आजोबा हे सगळं बघत होते.
" आजोबा, या टेडीमधून बाबांना काय सांगायचे असावे?" भरलेल्या डोळ्यांनी कौस्तुभने विचारले.
" मी तरी काय सांगू? तू जरा तो चाचपून बघ." कौस्तुभने तो टेडी चाचपला. आणि खरंच टेडीच्या पाठी एक छोटी चेन हाताला लागली. धडधडत्या ह्रदयाने त्याने ती चेन उघडली. आतमध्ये एक छोटा लॅमिनेट केलेला कागदाचा चिटोरा होता. ते बघून नाही म्हटलं तरी कौस्तुभची निराशा झाली.
" बघ बरं, काय लिहिले आहे ते." कौस्तुभच्या पाठीमागे उभे राहून आजोबा म्हणाले. त्या कागदावर त्यावर फक्त काही आकृत्या होत्या. आणि खाली लिहिले होते.
" शोधले की सापडतेच."
" आजोबा, यातून काय शोधायचे आहे आणि काय सापडणार आहे? बाबांनी हे असं का लिहिले आहे?"
" काय माहित मलातरी? बघू कसल्या आकृत्या आहेत ते." आजोबा हात पुढे करत म्हणाले. कौस्तुभने आजोबांच्या हातात तो चिटोरा दिला.
" हा कसला तरी नकाशा वाटतो आहे." आजोबा निरखून बघत म्हणाले.
" पण कसला नकाशा? आणि तो इथे का ठेवला आहे?" कौस्तुभ विचारात पडला होता.
" कौस्तुभ, मला असं वाटतं आहे, सुजयला जो कसला शोध लागला असेल, म्हणजे एखाद्या जुन्या दुर्मिळ वस्तूचा किंवा अजून कसलातरी. त्या गोष्टी इतर कोणाच्याही हाती लागू नये त्यासाठीच त्याने ही सावधगिरी बाळगली असावी."
" पण मग आजोबा, हे आपल्याला कसं समजणार?"
" समजेल. जसं हे समजलं तसं ते ही समजेल. तू तुझ्या तयारीला लाग. मी बघतो मला काही आठवतं का ते." कौस्तुभ पुढे काही बोलणार तोच त्याचा फोन वाजला.
"हॅलो सर.. हो हो.. दोन दिवसात निघीन मी."
"बहुतेक कार घेऊन जाईन."
" माझे आजोबा आहेत सोबत. त्यामुळे."
" अच्छा.. कंपनीतर्फे फ्लॅट पण दिला जाणार आहे. मग बरंच झालं. कारण माझ्या आजोबांना बाहेरचं जेवण चालत नाही."
" ओके.. एक सहकारी पण आहे का? नाही नाही. उलट बरंच झालं."
" अच्छा त्यांना माझ्यासोबत घेऊन जायचे आहे का? तुम्ही माझा नंबर त्यांना देणार आहात का? हो.. मला कसली अडचण? चालेल ना. उलट मला कामाचा अंदाज तरी येईल. हो. मी तुमच्या संपर्कात नेहमीच असेन. थँक यू सो मच सर. अगदी मनापासून. हो. जमेल तसं नक्की भेटू." कौस्तुभ बोलत होता. आणि त्याचे एकतर्फी बोलणे आजोबा ऐकत होते.
" काय रे काय झाले?"
" काही नाही. त्यांनी आपल्याला तिथे रहायला घर दिलं आहे तेच सांगायला फोन केला होता. आणि आपल्यासोबत कोणीतरी येणार आहे." कौस्तुभ वैतागत म्हणाला.
" बरं झालं. सोबत तर मिळेल. नाहीतर किती वेळ एकमेकांना झेलणार आपण? कौस्तुभ, आता हा पसारा उचल. तोपर्यंत मी खिचडी टाकतो."
" हो आजोबा." कौस्तुभ उठायला गेला. उठताना तो टेडी त्याच्या मांडीवरून खाली पडला. खण्णकन आवाज आला. त्याने आश्चर्याने बघितले तर त्याच्या आत एक धातूची वस्तू होती. ती धातूची पट्टी म्हणजे जणू काही एखादी चावीच होती.
" आता याने कोणता दरवाजा उघडणार, विठ्ठलच जाणे." आजोबा डोक्याला हात लावत म्हणाले.
कोण असेल ती व्यक्ती? काय रहस्य दडले आहे त्या नकाशात आणि त्या किल्ली? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई