Feb 25, 2024
पुरुषवादी

राघव

Read Later
राघव

#राघव

©️ अंजली मीनानाथ धस्के

राहूल , राघव, सुमित आणि अक्षय हे चौघे पाचगणीच्या बोर्डिंग शाळेपासूनचे मित्र होते. मोठे झाल्यावर नोकरी निमित्त कोणत्याही शहरात असले तरी वर्षातून एकदा सगळ्यांनी एकाच ठिकाणी जमायचे असा त्यांचा नियमच झाला होता. यंदाही त्यांनी कुठे आणि कधी भेटायचे हे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे राहूल , सुमित आले . नुकतेच लग्न झालेला अक्षयही आला होता. राघव मात्र आला नव्हता. गेले बरेच दिवस त्याचा फोनही लागत नव्हता.

राघव स्वभावाने मितभाषी होता. तो कधीच त्याच्या घरच्यांबद्दल फारसे बोलायचा नाही. \"तो जन्मल्यावर वर्षातच त्याची आई अल्पशा आजाराने देवाघरी गेली होती. त्याच्या वडिलांनी काही वर्षांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या त्रासापासून वाचवण्यासाठी त्याला बोर्डिंग शाळेत घातले होते.\" त्याच्याबद्दल एवढीच माहिती त्याच्या मित्रांना होती. चौघांनी शाळेनंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केले. चौघांनाही चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. तरी चौघांची वार्षिक भेट कधी चुकली नाही.

राहूल, सुमित यांची लग्ने झाली. राघव सोडून इतर तिघांपैकी कोणीही सबब सांगून भेटणे टाळले तरी पण राघव मात्र आवर्जून येतं असे.

असे असूनही यंदा राघव कसलीही पूर्व सूचना न देता भेटीला आला नव्हता. त्याची अनुपस्थिती तिघांच्या जीवाला घोर लावणारी होती. या आधी तिघांपैकी कोणीही राघवच्या घरी गेले नव्हते .

तिघांनी ठरवले की, आज काहीही झाले तरी राघवच्या घरी जावून यायचे. त्याची भेट घेतल्याशिवाय गप्प बसायचे नाही.

तिघे राघवच्या घरी पोहचले. भव्य बंगला बघून तिघेही आवाक झाले. फोनवरून चौकीदाराने घरातल्यांना राघवचे मित्र आल्याची वर्दी दिली. तिघांनाही आत बोलावले. तिघेही बंगल्याच्या दिवाणखान्यात जावून बसले. खोलीतल्या प्रत्येक वस्तूतील श्रीमंती डोळे दिपवून टाकणारी होती.

राघवचे वडील कामानिमित्त बाहेर जाण्याच्या तयारीत होते. त्यांनी तिघांची औपचारिक चौकशी केली. तिघे राघवला भेटायला आले हे कळाल्यावर त्यांनी स्पष्टच सांगितले," आता राघवशी आमचा काहीच संबंध नाही. सध्या तो कुठे असतो? काय करतो याची आम्हाला कल्पना नाही. त्याच्या बाबतीत जाणून घेण्याची आमची इच्छाही नाही" त्यांच्या या बोलण्याचे तिघांनाही आश्चर्य वाटले पण इतर काही विचारण्या आधीच ते भरकन् निघूनही गेले.

त्या दिवसानंतर अनेक दिवस तिघे राघवचा शोध घेत होते. त्याच्या कामाच्या ठिकाणीही त्यांनी शोध घेतला तेव्हा त्यांना कळाले की, त्याने ती नोकरी आधीच सोडली होती.

आता तर त्यांना राघवची काळजी वाटू लागली.

तीन वर्षांनी .... राहूल कामानिमित्त बेंगलोरला गेला असतांना तिथल्या मॉलमधे त्याला राघव दिसला. साधारण दोन वर्षे वयाच्या मुलाला त्याने कडेवर घेतले होते. राहुलने अगदी अधिरतेने राघवला हाक मारली. राघवने राहुलकडे बघितले. दोघांनाही सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

राघवच्या कडेवर असलेले बाळ फारच गोड होते. ते बाळ म्हणजे राघवचा छोटा मुलगा " आरव" असून मोठा मुलगा " अंश" व पत्नी "राधा " शेजारच्याच शॉपमधे कपडे खरेदी करत होते. राघव राहुलला राधाशी भेट घालून देण्यासाठी घेवून गेला. राघवने सहा वर्षीय अंशची मुलगा म्हणून तर राघवची मोठी बहीण शोभेल अशा स्त्रीची पत्नी राधा म्हणून ओळख करून दिली तेव्हा तर राहूल गोंधळून गेला.

\"गेली तीन वर्षे ते राघवचा शोध घेत होते. आज राघव भेटला तेही सहकुटुंब \" हे पाहून राहुलला आनंद झाला होता. त्याहीपेक्षा जास्त त्याला आश्चर्य वाटले होते.

राहूलने," राघव सहकुटुंब भेटलाय" असे सांगून सुमित व अक्षयलाही बेंगोलोर बोलावून घेतले.

सगळ्यांचे पुन्हा एकदा एकत्र येवून मजा करण्याचे ठरविले. राघवलाही राहुल थांबला होता त्या हॉटेल वर बोलावून घेतले.

गप्पा रंगायला लागल्या, तसा अक्षयने तिघांच्या मनात घोळत असलेला विषय काढलाच. इतक्या कमी आवधीत राघवने एवढा मोठा संसार वाढवला कसा?

तेव्हा राघवने स्पष्टीकरण करतांना सांगायला सुरवात केली.

सहा वर्षांपूर्वी राधा आणि त्याची ओळख झाली. त्याला राधा खूप आवडली होती. राधाला लग्नासाठी तयार करायला राघवला खूप कष्ट पडले होते. अखेर राधा आणि तिचा मुलगा अंश त्याच्या आयुष्यात आनंद घेवून आले.

हे ऐकून तिघांनाही प्रश्न पडला की राघव दिसायला देखणा सोबतच चांगली नोकरी व घरचा गडगंज श्रीमंत असतांनाही त्याने त्याच्या पेक्षा पाच वर्षे मोठ्या व एक मुलगा असलेल्या बाईशी लग्न का केले?

राहूल गमतीने सहज बोलून गेला की," राधाला एवढा मोठा मुलगा होता, तरी तू तीच्या प्रेमात पडला? कॉलेजला असताना तर सुंदर पोरीनांही भाव देत नव्हतास आणि आता चक्क \" ताई \" टाईप मुलीशी लग्न केले. खोटं नको बोलुस .... ती अनुभवी होती म्हणून तू तीच्याकडे आकर्षित झाला . हो ना .... अरे मग लग्न कशाला करायचं ? असेच भेटायचं ... दोघांच्याही गरजा भागल्या असत्या" असं म्हणून त्याने डोळा मारला. त्याचे ते बोलणे ऐकून सुमितही बोलला ," अरे मजाच मारायची होती तर ती तशीही मारता आली असती त्यासाठी तिच्या पोराची जबाबदारी कशाला गळ्यात मारून घेतलीस?"

त्यांचे हे बोलणे ऐकून राघवचा प्रचंड संताप झाला . त्याने सुमितची कॉलर पकडली आणि त्याच्या कानाखाली लगावली. राहूल मधे पडला तर त्यालाही एक ठेवून दिली. अक्षय राघावला शांत राहायला सांगत होता पण तो रागा रागात तिथून निघून गेला.

अक्षयने त्या दोघांनाही समजावले . राधा त्याची पत्नी आहे . तिच्याबद्दल असे बोलणे अयोग्य होते . तूम्ही त्याची माफी मागायला हवी. तूम्ही त्याची माफी मागितल्या शिवाय कोणीही इथून परत आपल्या गावी जाणार नाही.

इतरांप्रमाणे आपल्या जिवलग मित्रांनीही आपली खिल्ली उडवावी हि बाब राघवच्या मनाला खूप लागली. या सगळ्या टोमण्याना, कुचेष्टेला... घाणेरड्या नजरांना कंटाळून तर त्याने पुणे सोडले होते आणि बेंगलोरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. मित्रांची भेट झाल्यावर जो अत्यानंद झाला होता तो आता पार धुळीस मिळाला होता. रागात घरी आलेल्या राघवचे काहीतरी बिनसले आहे हे राधाला जाणवले पण तो जणू काहीच घडले नाही असा प्रयत्न करत असल्याने तिनेही विषय जास्त वाढवला नाही.

पहिल्यांदा भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला राधा आणि राघवला एकत्र बघून अनेक प्रश्न पडायचे. त्या प्रश्नाने... त्यांच्या विचित्र नजरांनी राघव अस्वस्थ होई. राधाला मात्र याची सवय झाली होती. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्याची, समाजाच्या प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने देण्याची तयारी ठेवली होती.

रात्री निवांत क्षणी राधाने राघवकडे त्याच्या मित्रांचा विषय काढला. त्यांनी केलेली निंदा राघवला आवडली नाही. त्याची चिडचड तिने समजून घेतली.

"इतरांना स्पष्टीकरण द्यावे असे नाही पण ते तिघे तुझे मित्र आहेत तेव्हा मैत्री संपावण्या आधी त्यांना तुला समजून घेण्याची एक संधी नक्की देशील." असे समजावून तिने राघवला शांत केले.

इकडे अक्षयने राहुल आणि सुमितलाही समजावले. "त्यांनी केलेल्या गंमतीने राघवच्या मानला वेदना झाल्या म्हणूनच एरवी शांत असणाऱ्या राघवने दोघांवर हात उचलला".मित्रांनीच मित्राला समजुन घेतले पाहिजे याची जाणीव त्यांना करुन दिली. शांत डोक्याने विचार केल्यावर दोघांनाही त्यांची चूक कळली. राघवची माफी मागितल्या शिवाय त्यांनाही चैन पडणार नव्हता.

दुसऱ्या दिवशी तिघेही राघवच्या घरी पोहचले. त्यांना असे अचानक आलेले पाहून राधा थोडी बावरली.

तिने तिघांचेही हसून स्वागत केले. तिच्या लक्षात आले की तिच्या असण्याने त्या चौघांना मनमोकळ बोलता येणार नाही. त्यांना चहा नाष्टा देवून ती दोन्ही मुलांना घेवून मैत्रिणीकडे निघून गेली.

आता घरातली शांतता चौघांनाही नकोशी झाली. अक्षयने ," यार तुझे घर तर मस्त आहे" असे म्हणून वातावरणातला ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.

राहूल आणि सुमित कालच्या प्रकरणाबद्दल माफी मागणार इतक्यात त्यांचे लक्ष दिवाणखान्यात लावलेल्या फोटो फ्रेम कडे गेले . फोटो मधे राघवचे वडील अंशला आणि एक वयस्कर स्त्री आरवला घेवून सोफ्यावर बसले होते तर त्यांच्या मागे राघव आणि राधा उभे होते.

एका सुखी कुटुंबाचा फोटो असतो तसा तो फोटो होता मात्र त्या फोटोतील वृद्ध स्त्री ही राघवची सावत्र आई नव्हती . मग ती कोण होती? असा प्रश्न त्यांना पडला.

न राहवून राघवच्या वडिलांना फोटोमधे बघून दोघांनीही एकच प्रश्न विचारला," हे इथे कसे ? म्हणजे यांना माहित होते तू बेंगलोरला आहेस ते.... तरी आमच्याशी खोटे बोलले " ते पुढे काही वाईट बोलणार त्याच्या आधीच अक्षयने त्यांना डोळ्यांनीच गप्प बसण्याचा इशारा केला.

तेव्हा राघवनेच बोलायला सूरवात केली.

राघव जन्माला तेव्हा वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. राघवची आई दिसायला अत्यंत देखणी आणि स्वभावाने महत्त्वाकांक्षी होती. वडिलांची परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नव्हती त्यातच राघवचा जन्म झाला होता. तिने कधीच राघवला प्रेमाने जवळ घेतले नाही. राघवच्या वडिलांनाही तिने कधी चांगली वागणूक दिली नाही. वडीलांनी घर खर्चाला दिलेले सगळे पैसे ती स्वतःच्या राहणी मानावर खर्च करत असे. घरात चांगला पैसा यायला लागला की आईचे वागणे बदलेल या आशेवर वडील नव नवीन व्यवसाय शोधून त्यात जम बसविण्याच्या प्रयत्नात असत. राघवकडे लक्ष द्यायला त्यांनाही अजिबात वेळ नव्हता. राघव जन्मल्या पासून घरात कामाला असणाऱ्या म्हाताऱ्या आजीनेच त्याला सांभाळले. तो जेमतेम दोन वर्षाचाही झाला नव्हता तेव्हा त्याची आई एका श्रीमंत माणसासोबत निघून गेली. तिच्या अशा जाण्याने वडील दुखावले. त्यांना आता त्या शहरात राहणे कठिण वाटू लागले. त्यांनी लवकरच राघवला घेवून ते शहर सोडले. राघवला घेवून नवी नोकरी किंवा व्यवसाय करणे वडिलांना कठिण जाईल म्हणून त्याची रवानगी जवळच्या शहरात राहणाऱ्या त्याच्या काकाकडे करण्यात आली. राघवला ठेवून घेतले तर वडील दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम पाठवणार होते म्हणून काका काकू दोघांनी त्याला ठेवून घेण्याचे मान्य केले.
वडीलांनी त्यांच्या जवळ जी जमा पूंजी होती त्यातून "कँडी कोला" या नामांकित कंपनीची शितपेये वितरणाची परवानगी मिळवली. फिरस्तीचे काम होते पण बऱ्यापैकी पैसा मिळू लागला.
काका काकू राघववर प्रेम करत नव्हते की त्याला फार त्रास ही देत नव्हते. काकांची परिस्थितीही फार काही चांगली नसल्याने आणि वडिल दर महा न चुकता राघवसाठी पैसे पाठवत असल्याने त्याने राघवला स्वतः जवळ ठेवून घेतले होते. काकांना दोन मुलं होती. राघव लहान असल्याने त्याला काकांच्या मुलांचेच जूने कपडे , खेळणी दिल्या जात होती.
राघव मोठा होवू लागला तसे काकाने त्याला घराजवळच्या शाळेत घातले. राघवला शाळेची पुस्तकेही स्वतःच्या मुलांची जुनीच देता येत असल्याने राघवचा खूप काही खर्च नव्हता. त्यामूळे वडिल पाठवत असलेली बरीच रक्कम शिल्लक राहायची. काकांना त्या शिल्लक रकमेची घरखर्च करण्यासाठी मदत होत होती.
राघव चौथी पास होईपर्यंत सगळे ठीक होते.
वडिलांचा शितपेयाच्या व्यवसायात चांगला जम बसला. भरपूर पैसे मिळू लागले तसे काकाने वडिलांकडे सतत पैसे मागणे सूरू केले. त्या दोघांचे वाद इतके विकोपाला गेले की एक दिवस अचानक राघवचे वडील येवून राघवला घेवून गेले. नाशिकला त्यांचे स्वतःचे छोटे घर होते. राघव तिथे काही महिने होता. वडील सतत फिरस्ती वर असल्यानं राघवला वडिलांचे प्रेम कधी वाट्याला येतच नव्हते. तरीही त्याला वाटले की आता आपण कायम आपल्या वडिलांकडेच राहू. पण तसे झाले नाही. वडीलांनी लवकरच त्याची रवानगी पाचगणीच्या बोर्डिंग शाळेत केली.
बायकोच्या दुसऱ्या श्रीमंत व्यक्ती सोबत पळून जाण्याने त्यांच्यातील अभिमानाला ठेच पोहचली होती. समाजात त्यांच्या विषयी लोक कधी दयेने तर कधी निंदेने बोलत. ते त्यांना अजिबात आवडत नव्हते. ही एक न भरून येणारी जखम होती. पैशासाठी बायको पळून गेल्याने त्यांना भरपूर पैसे मिळवायचे होते.
राघवला बघितले की त्यांना राघवच्या आईची आठवण होई. तिच्या मूळे झालेली बदनामी.... वाट्याला आलेली नामुष्की आठवून मनाला वेदना होत. त्यामूळे राघववर त्यांनी कधी प्रेम व्यक्त केले नाही. उलट राघव सोबत वेळ घालवणे टाळण्यासाठी ते सतत कामात गढून गेलेले असत. कालांतराने पैसा हाताशी असल्याने त्यांनी चांगल्या बोर्डिंग शाळेत राघवला प्रवेश मिळवून दिला आणि आपली जबाबदारी झटकली. त्यांनीही नाशिक सोडून पुण्याला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
शाळेत असतांना प्रत्येक मुलाचे पालक त्यांना भेटायला यायचे पण राघवला कधी कोणी भेटायला येत नव्हते. सुट्यांमध्येही घरी गेल्यावर थोड्या दिवसांसाठी येणाऱ्या पाहुण्याला वागवतात तशीच वागणूक त्याला मिळत असे. \"सावत्र आईने आपला लाड केला नाही तर निदान भरपूर छळ करावा म्हणजे वडीलांचे आपल्याकडे लक्ष जाईल असेही राघवला अनेकदा वाटे\". परंतू घरातल्या त्याच्या उपस्थितीची कोणीच कधीच फारशी दखल घेत नव्हते. घरातल्या या वातावरणाने शाळेची सुट्टी त्याला नकोशी वाटे. शाळेत येणारा प्रत्येक मुलगा आईवडिलांच्या आठवणीने व्याकुळ होई तेव्हा राघवला त्याची आई आठवतही नव्हती आणि वडिलांच्या आठवणीने व्याकुळ व्हावे असे त्यांचे बंध कधी जुळलेच नव्हते.
कालांतराने राहुल, सुमित अक्षय यांच्याशी त्याची मैत्री जुळली. आयुष्यात इतर कोणत्याही नात्याकडून न मिळालेले प्रेम, आपुलकी, काळजी हे त्याला या मैत्रीने दिले होते. आनंद, दुःख, चेष्टा मस्करी, लुटुपूटूची भांडणे, दिलखुलास हसणे , रुसणे, मनवणे, जीव ओवाळून टाकणे, आशा अनेक भावनांचा अनुभव केवळ मैत्री या नत्यामुळे तो अनुभवू शकत होता.

शाळेत असताना तिघांच्याही घरचे खावू यायचे. प्रत्येकाच्या आईने त्यांच्या आवडीचे पदार्थ स्वतः बनवून पाठविलेले असत. प्रत्येकाच्या बोलण्यात आई वडील घरातील इतर भावंड यांच्या बद्दल प्रेम काळजी दिसून येई. राघवने घराच्याबद्दल कधी काही बोलावं असे कोणतेच चांगले अनुभव त्याला आलेले नव्हते. लहानपणापासून त्याला अनेकांनी सांभाळलं होते पण जीव कोणीही लावला नव्हता.
तारुण्यात पदार्पण केल्यावर तारुण्य सुलभ भावनेने मुलांचे वागणेही तसेच होते. राघव मात्र कधी कोणत्याही मुलीकडे आकर्षित होत नव्हता. अनेक मुली त्याच्या मैत्रिणी होत्या पण कोणत्याही मुली सोबत नाते पुढे जावे असे त्याला वाटत नव्हते. आपल्या आईने जसे आपल्याला सोडून दिले . फिरून कधी साधी चौकशीही केली नाही . तसे जर त्याच्या पत्नीने केले तर तो सहन करू शकला नसता . म्हणून तो प्रेम, लग्न या सगळ्यापासून दूरच राहू इच्छित होता.
नोकरीला लागल्यावर एक दिवस अचानक तो ज्या प्रोजेक्टवर काम करत होता त्या प्रोजेक्टची हेड म्हणून राधाची नियुक्ती करण्यात आली होती. राधा कामाच्या बाबतीत तल्लख होती. कामात कुचराई तिला अजिबात खपत नव्हती. समोरच्याला दिलेली वेळ आणि दिलेला शब्द या दोन्हीचे ती काटेकोरपने पालन करत असे. ती एक आधुनिक विचारांची खंबीर स्त्री होती. ऑफिसमधे मात्र ती फटकळपणेच वागत होती .
प्रोजेक्ट जेव्हा यशस्वी झाला तेव्हा बॉसने राधाच्या टीमसाठी पार्टी ठेवली. पार्टीमधे जेव्हा राधा तिच्या बाळाला घेवून आली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पुढच्या प्रोजेक्टसाठी जो तो बॉस ला प्रभावित करण्याच्या प्रयत्नात होता. संपुर्ण पार्टीत राघवचे लक्ष मात्र तिच्या बाळावर खिळले होते. राधा एक क्षणही बाळाकडे दुर्लक्ष करत नव्हती . ती बाळाला घेवून आल्याने अनेकांच्या चेष्टेचा विषय बनली होती. पण तीला त्याची अजिबात पर्वा नव्हती. बाळाला सांभाळणाऱ्या मावशीने अचानक सुट्टी घेतल्याने तिला पार्टीला येता येणार नव्हते. बॉसने खास तिच्या टीमसाठी पार्टी ठेवली म्हंटल्यावर न जाणे ही शोभणार नव्हते.
पार्टीला हजेरी लावून तिने बॉसचा मान राखला होता . परंतू बाळाला तिथल्या वातावरणाचा त्रास होवू नये यासाठी ती जास्त काळजी घेत होती. यामुळे राघवला तिच्याबद्दल जास्त कुतूहल वाटू लागले.
पार्टी संपल्यावर राघवनेच तिला घरी सोडले. संपुर्ण रस्ताभर ती बाळाला शांत झोपवण्याचे प्रयत्न करत होती. एरवी फटकळ वागणारी राधा बाळासोबत अत्यंत प्रेमाने वागत होती.
तिच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू राघवला अनोळखी होता. तिचे ते रूप पाहून तो तिच्याकडे आकर्षित झाला . तिच्या प्रती त्याच्या मनातल्या या भावनांचे त्याचे त्यालाच नवल वाटत होते.
सोबत काम करतांना जेव्हा जिथे राधाचे नाव निघे तेव्हा तिथे राघव रेंगाळून त्यांचे बोलणे ऐकू लागला . राधाबद्दल जितकी माहिती मिळेल तितकी मिळवू लागला. तिच्याबद्दल ऐकण्यानेही त्याला आनंद मिळत होता.
याच बोलण्यात त्याला माहिती मिळाली की ,\"तिचे अद्याप लग्न झाले नसूनही तिने अंशला जन्म दिला आहे. ती एकट्याने अंशला सांभाळते\".
राघवच्या मनात या माहितीने उत्सुकता निर्माण झाली होती. त्याला राधाबद्दल जाणून घेण्यात अधिक रस निर्माण झाला. तो राधा बरोबर कामानिमित्ताने खूप वेळ घालवू लागला. तो तिच्या सानिध्यात जितका रहात होता तितका त्याला तिच्या फटकळ स्वभावामागे दडलेला हळवेपणाही जाणवू लागला. अंशच्या बाबतीत बोलतांना .... त्याचा सांभाळ करतांना तिच्यातील मातृत्वाची भावना किती प्रबळ आहे याची जाणीव त्याला सातत्याने व्हायची.
तरी ऑफिस मधील लोक मात्र राधाच्या माघारी तिच्या बद्दल वाईट साईट बोलायचे.
राघवने राधाबद्दल इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष राधालाच विचारायचे असा निर्णय घेतला.
एका सुट्टीच्या दिवशी राघवने राधाचे घर गाठले. राघवने थोडा वेळ अवांतर गप्पा मारल्यावर सरळ विषयाला हात घातला. तिचा भूतकाळ जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
त्याच्या आशा विचारण्याचे राधाला आश्चर्य वाटले. राघव ऑफिस मधील इतर लोकांसारखा बेरकी नाही याची जाणीव तिला अनेक दिवसांच्या सनिध्याने आली होती. तिनेही त्याला भुतकाळ सांगण्याचा निर्णय घेतला.
राधाचा जन्म झाला. घरात कोणालाच मुलगी नको होती. त्यातच काही दिवसातच एका अपघातात तिच्या वडिलांचे निधन झाले. या संधीचा फायदा घेत मुलीने बापाला खाल्ले असा आरोप करत तिच्या आजीने राधाला अनाथ आश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. आईने विरोध केला तेव्हा तिलाही घराबाहेर काढले. आईला माहेरचे सख्खे असे कोणी नव्हते . तेव्हा तर एकट्या तरुण स्त्रीला समाजही सुखाने राहू देत नव्हता. त्या भागात " स्त्रियांचे आरोग्य" या विषयावर जनजागृती करणाऱ्या सुमन ताईंनी बस स्टॉप वर तिच्या आईला तिला घेवून रडत बसलेली असताना पाहिले.
त्यांनी तिला स्वतःच्या कार्यालयात नेले." भीक किंवा दया नको, काम मिळाले तर ते करेन" असे आईने सांगितल्यावर त्यांनी स्वतः च्या कार्यालयात आईला कामाला ठेवले. कार्यालया शेजारीच अनाथ, गोरगरीब मुले आणि स्त्रियांना राहण्यासाठी काही खोल्या होत्या त्यातच आईची राहण्याची सोय केली. आईनेही प्रामाणिकपणाने पडेल ते काम केले. परंतू काही वर्षातच कर्क रोगाचे निमीत्त होवून आई देवाघरी गेली. सुमनताईंनी राधा हुशार असल्याने तिला उच्च शिक्षण घेण्यासाठी कायम प्रोत्साहित केले. राधाही सुमन ताईंना आदर्श मानत होती.
उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला कोलकत्ताला चांगली नोकरी मिळाली .
राधाचे बालपणी पासूनचे एकंदरीतच आयुष्य खडतर होते. आई गेल्यानंतर प्रेमाचे क्षण असे तिच्या वाट्याला फारसे आलेच नाही. नोकरीवर रुजू झाल्यावर मात्र राधा आणि तिच्या ऑफिस मधील सहकारी सारंग यांचे एकमेकांवर प्रेम जडले. राधा कामाच्या बाबतीत जेवढी हुशार होती तेवढीच दिसायला सुंदर होती. कामाच्या निमित्ताने ते कायम सोबत असतं. ते एकमेकांच्या प्रेमात वेडे होते. काम नसेल तेव्हाही ते मुद्दामहून एकमेकांच्या सहवासात वेळ घालवत. या प्रेमाचा परिणाम म्हणून सगळी काळजी घेवूनही राधाच्या उदरात अंकुर फुलला. इतक्यात सारंगला लग्न करायचे नव्हते . लग्ना आधीच राधा गरोदर राहिली आहे हे सारंगच्या घरच्यांना कळले तर त्यांनीही लग्नाला परवानगी नाकारली असती म्हणून सारंग \"सध्या बाळ जन्माला घालू नये\" म्हणून राधाची मनधरणी करत होता.
राधा मुक्त विचारसरणीची होती. तिच्या नोकरी संबंधी महत्त्वाकांक्षी होती म्हणून त्यालाही खात्री होती की राधा या बाळाला जन्म देणार नाही. राधाला मात्र वाटू लागले की,\"बाळाचा जन्म घेण्याचा हक्क नाकारणे म्हणजे ते बाळ अनैतिक आहे हे मान्य करणे. प्रेम करणे गुन्हा नाही. आपल्या चुकीने जर गर्भ राहिला आहे तर त्यात त्या गर्भाची काय चुकी. दोघांच्या अत्यंत सुंदर अशा प्रेम भावनेतूनच तर गर्भ राहिला आहे. कधीतरी लग्न करणारच होतो ते आता करू . लग्नाआधी गर्भ राहिला म्हणून त्याला नष्ट करणे म्हणजे आपल्या प्रेमाचा अपमान आहे. हवे तर कोणताही गाजावाजा न करता लग्न करू पण गर्भपात करु नये\" या मतावर ती ठाम होती.
इकडे सारंगने ऑफिसमधे परदेशातील प्रोजेक्ट मागून घेतला. दोन महिने तो परदेशात जाणार होता. \" भविष्यातील जबाबदारी वाढणार आहे तेव्हा आता परदेशातला प्रोजेक्ट नाकारून चालणार नाही \" अशी सारंगने राधाची समजूत काढली. तीनेही त्याच्या प्रेमा खातर आंधळा विश्वास ठेवून त्याला परदेशात जावू दिले. सुरवातीला रोज बोलणे होत होते. दोनच आठवड्यात सारंगमधे बदल होत गेला. तो राधाला टाळू लागला. दोन महिन्यात परत येणारा सारंग तीन महिने झाले तरी येत नव्हता. राधाला ती गरोदर आहे हे जास्त दिवस लपवता येणार नव्हते. तिने अखेरचा प्रयत्न म्हणून सारंगशी संपर्क साधला. " मी तुझ्याशी लग्न करु शकत नाही. मला चांगल्या घरची स्थळ सांगून येतात आहे. तूझ्या संगतीने मला माझी सामाजिक पत प्रतिष्ठा पणाला लावण्यात रस नाही. तूही माझ्या मागे लागू नकोस. गर्भपात करून सुखी रहा" असे सांगून मोकळा झाला.
सारंगच्या येण्याने आयुष्य प्रेमाने भरून गेले होते. गर्भात वाढणारा जीव हा सारंगच्या व आपल्या प्रेमाचा अंश आहे. आज नाही तर उद्या सरंगला त्याच्या चुकीची जाणीव होईल. या आशेने तिने \"काही झाले तरी \" गर्भातल्या जीवाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. सारंग परत आल्यावर लग्न करायचे म्हणुन ती निश्चिंत होती पण आता त्याचा राग शांत होवून परत येण्यात बरेच दिवस खर्ची होणार होते. इकडे तिच्या जडावलेल्या हालचाली.... बाळसे धरू पाहणारी शरीर यष्टी बघून ऑफिस मधील इतर सहकाऱ्यांना संशय येऊ लागला. इथे राहिलो तर बुरसटलेल्या विचारांचे लोक बाळाचा जन्म अनैतिक ठरवतील याची तिला कल्पना होती. ती पुण्यात सुमन ताईंकडे गेली. तिची अवस्था बघून त्यांना धक्का बसला. राधा अर्थिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून नव्हती. ही एक जमेची बाजू होती. राधाला सारंग परत येवून तिचा व पोटातल्या बाळाचा स्वीकार करेल याची प्रचंड खात्री होती. म्हणून सुमन ताईंनीही गर्भपाताचा दिलेला सल्ला मागे घेतला. तसेही तिला पाच महिने पूर्ण झाले होते. तिच्या या अवस्थेत गर्भपात शक्यही होणार नव्हता. राधा डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतःचे सगळे खाणे पिणे व इतर काळजीही घेत होतीच. \" बाळाचा जन्म होईपर्यंत राधाने कामावर जावू नये. अन्यथा बाळाच्या वडिलांचे नाव जाणून घेण्यासाठी कामाच्या ठिकाणी तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला जाण्याची शक्यता होती. तसेच सारंग इथे नसतांना आणि त्याची इच्छा नसतांना त्याचे नाव होणार्‍या बाळाचे वडील म्हणून सांगितले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. बाळाचा जन्म अनैतिक संबंधातून झाला यावरच चर्चा सुरू होतील आणि सध्या हे सगळे टाळणे गरजेचे असल्याने राधाने काही दिवस घरून काम करण्याची परवानगी मिळवावी\" असे सुमन ताईंचे मत होते. राधा बाळंत होईपर्यंत सुमन ताईं कडेच राहायला आली.
दिवस पूर्ण झाल्यावर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचा चेहरा पाहून ती हरखून गेली. आपल्या आयुष्यात आपण पहिल्यांदा कोणावर तरी जीवापाड प्रेम केले आणि त्या व्यक्तिनेही आपल्यावर प्रेम केले.... त्या अमूल्य प्रेमाचा अंश या मुलाच्या रूपाने आपल्यासोबत कायम राहणार म्हणून त्याचे नाव "अंश" ठेवायचे हे तिच्या मनाने पक्के केले. व्यावहारिक जगात नैतिक अनैतिकतेचे लावले जाणारे मापदंड काहीही असू दे..... प्रेम पवित्र असते मग प्रेमाचा अंश अनैतिक असूच शकत नाही. जीव जन्माला येण्याची प्रक्रिया सारखीच मग केवळ लग्ना आधी जन्माला आला म्हणून त्याला अनौरस ठरवायचे? हे राधाला मान्यच नव्हते.
बाळाच्या जन्माची माहिती आणि फोटो तिने सारंगला पाठविले. बाळाचा निरागस चेहरा पाहून तो धावत येईल अशी तिला खात्री होती.
इतक्या दिवसात कधी एका शब्दाने त्याने तीची चौकशी केली नव्हती. उलट जे मुल त्याचाच अंश होते त्यालाही तो केवळ लग्ना आधी जन्माला आल्याने समाजातील इब्रतीसाठी नाकारत आला होता. त्याच्याकडून तो बाळाचा स्वीकार करेल हे अपेक्षा ठेवणेच चुकीचे होते. झालेही तसेच...

राधाचा अपेक्षा भंग झाला . तो स्वतः तर आलाच नाही पण पत्र पाठवून तिने जर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर ती ज्या कंपनीत कामाला आहे तिथे," राधा व्यभिचारी असून दुसऱ्याच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलाचे खापर सारंगवर फोडते आहे" असे पत्र पाठविण्याची धमकी दिली. ज्या कंपनीमार्फत तो परदेशात गेला होता ती नोकरी सोडून त्याने परदेशातल्याच दुसऱ्या कंपनीत नोकरी स्वीकारली. राधा त्याच्या धमकीला घाबरली नव्हती परंतू तीने सत्य स्विकारले होते. त्याला वकिलाची नोटीस पाठवून अंशची जबाबदारी स्वीकारायला भाग पाडता आले असते ही पण ज्या प्रेम भावनेतून अंश जन्माला आला ती प्रेमभावनाच नष्ट झाली होती. " गर्भाला वाढविण्याचा हट्ट आपला आहे तर त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही आपलीच " अशी राधाने स्वतःची समजूत घातली. तिने सारंगचा विषय मनातून काढून टाकला.

तिच्या मानत \"अंश \" बद्दल ममत्व इतके होते की सारंग बद्दल द्वेश, घृणा, निर्णय चुकीचा झाल्या बद्दल शंका व नैराश्य अशा कोणत्याही भावनेला थाराच उरला नव्हता.
तिच्यासाठी जगातले नैतिक अनैतिकतेचे नियम एकीकडे आणि मातृत्वाची अनुभूती एकीकडे होती.
अंशसाठी ती आणि तिच्या साठी अंश म्हणजे सगळे विश्व होते.
सुमनताईचा तिला आधार होता. राधाचा अंशला जन्म देण्याचा निर्णय धाडसी होताच परंतु आता सारंगने जबाबदारी नाकारल्यावर समाजाच्या बोचऱ्या नजरांचा ही तिला सामना करावा लागणार होता. राधाने निवडलेली वाट संघर्षाची होती . परंतू तिच्यातील मातृत्व तिला सगळ्या संकटांशी सामना करण्याचे बळही देत होते.
राधा कामात अचूक असल्याने अंशच्या जन्मानंतर तिला बढती मिळाली. पुण्याच्या नविन शाखेत तिला रुजू व्हायचे होते. सुमन ताईं पुण्यात कार्यरत असल्याने राधाने ती संधी लगेच स्वीकारली होती.

राधाने तिच्या गत आयुष्याबद्दल राघवला सगळे सांगून टाकले.
तिच्याबद्दल सर्व ऐकून घेतल्यावर राघवचा तिच्या प्रती असलेला आदर द्विगुणित झाला.
राधा कामाच्या व्यापात अंशकडे अजिबात दुर्लक्ष करत नव्हती. तिला तसे बघून राघवला त्याच्या आईने त्याच्यावर केलेल्या अन्यायाची तीव्रतेने जाणीव होई. भौतिक सुखासाठी संसार मोडून , आपल्या तान्ह्या बाळाला सोडून त्याची आई निघून गेली होती. इथे राधाला मात्र गर्भपात करुन सहज समाजात मिसळता आले असते पण तिने तसे केले नाही. बाळाच्या भविष्यासाठी ती पूर्वी पेक्षाही कणखर बनली.
राघवला जसा तिच्या प्रती आदर भाव होता तसाच तिलाही राघवबद्दल विश्वास होता म्हणून तिनेही काही एक न लपवता , चिडचिड न करता त्याला आपला भूतकाळ उलगडून सांगितला होता.
या प्रसंगा नंतर दोघांच्याही वागण्यात एकमेकां प्रती मोकळेपणा अधिक वाढला. राघवला स्वतःच्या घरात कधीच प्रेम , आदर मिळाला नाही परंतू राधा आणि अंशच्या सानिध्यात त्याला कशाचीच उणीव भासत नव्हती. अनेकदा अंशला पूर्व प्राथमिक शाळेत सोडण्यासाठी तसेच त्याच्या शिक्षक पालक भेटीलाही तो राधा बरोबर हजर राहू लागला.
राधा राघव पेक्षा वयाने मोठी होती. परंतू राघवच्या अनेक बाबतींत तिच्या या मोठ्या असण्यानेच ती त्याला उत्तम प्रकारे समजुन घेत होती. हक्काने रागावू शकत होती . राधा त्याला आईची माया देत होती. बापाची छत्र छाया देत होती.
राघव आणि राधा जास्तीत जास्त वेळ सोबत असायचे. त्यावरून लोकांमधे बरीच चर्चा रंगू लागली. खरं तर राघव राधाच्या प्रेमात होताच पण त्यात कुठेही शारिरीक आकर्षण नव्हतं. राघवला आतापर्यंतच्या आयुष्यात जो आपलेपणा, प्रेम मिळालं नाही ते तो अंश आणि राधाकडून मिळवू पहात होता. अंश जेव्हा त्याचा हात आपल्या चिमुकल्या बोटांनी पकडायचा तेव्हा जाणवणारी प्रेमाची ऊब त्याला हवी हवीशी वाटत होती. राघवच्या आजारपणात राधा अंशसारखी त्याची काळजी घ्यायची त्यातून तो आईची माया अनुभवायचा. राधामधे मातृत्वाची भावना प्रबळ असल्याने ती दुखऱ्या जीवाला कायम जीव लावायची. तिच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला ती आदराने वागवायची. लग्ना आधी मुल जन्मला घालण्याची हिंमत दाखविल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याने एकटी रहात असल्याने तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून ती कामाच्या ठिकाणी फटकून रहायची. मात्र
एकदा का तिला एखाद्यावर विश्वास बसला तर त्या व्यक्तिला ती शेवटपर्यंत साथ द्यायची.
राघव आणि राधा बद्दलही लोक नको ते बोलायचे. राघवला मात्र वाटायला लागले की," आतापर्यंतच्या आयुष्यात कायम समजूतदारपणाची भूमिका घ्यावी लागली. कोणतेही हट्ट केले नाही की आपली कोणी समजूत काढली नाही . आनंदाच्या क्षणी शाबासकी मिळाली नाही की दुःखाच्या क्षणी कोणाच्या कुशीत शिरता आले नाही. इतर कोणत्याही मुलीशी लग्न करण्यापेक्षा राधाशी लग्न केले तर आपल्या आयुष्यात ज्या ज्या प्रेमाला आपण मुकलो ते सहज प्राप्त होतील. अंशच्या असण्याने तर आपल्याला लग्न केल्या क्षणी कुटुंब मिळेल."
राधाला राघवने दिलेला लग्नाचा प्रस्ताव स्वीकारणे कठीण होते. तिच्या आणि राघवच्या वयातही बरेच अंतर होते. वयाचा मुद्दा दुर्लक्षित केला तरी लग्नामुळे अंशकडे दुर्लक्ष झालेले तिला चालणार नव्हते. त्यामुळेच अंशच्या जन्मानंतर लग्नचा विचारही तिच्या मनाला कधी शिवला नव्हता. राधाने लग्नाआधी एका मुलाला जन्म देण्याचे धाडस केले होते परंतू वयाने लहान असणाऱ्या मुलाशी लग्न करण्याचे धाडस तिच्यात नव्हते. राघवने त्याला अनुरूप अशा मुलीशी लग्न करावे या मतावर ती ठाम होती.

राघव मात्र राधा व अंशच्या आयुष्यात येण्याने कुटुंबातील सगळे भावबंध अनुभवत होता. त्याला लोक काय म्हणतील याचा विचार करायचाच नव्हता. राधाच्या विरोधाला बघता सुमन ताईंनी राघवची भेट घेतली. त्यांना राघव पसंद पडला. राधासाठी राघव अनुरूप आहे. राघवशी लग्न करण्यात काहीच गैर नाही, असा त्यांनी राधाला विश्वास दिला.
राधालाही नवऱ्याकडून ज्या आदराची, स्वातंत्र्याची अपेक्षा होती ते राघव तिला कायम देत होता.
राघवकडून अंशलाही वडिलांचे प्रेम मिळत होते. तेही राधाला अंश पासून हिरावून घ्यायचे नव्हते. राघव इतर पुरुषांप्रमाणे फक्त तिच्या शरीराला महत्त्व देणारा नव्हता. तो राधाच्या जितक्या प्रेमात होता त्या पेक्षाही जास्त लळा त्याला अंशचा लागला होता. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन राधानेही होकार कळवला.

राघवने आई वडील हयात असूनही कधी त्यांचे प्रेम अनुभवले नव्हते. राधाच्या सानिध्यात मात्र त्याला खूप सुरक्षित आणि परिपूर्ण कुटुंबाची अनुभूती मिळत होती. तिच्याकडून आई वडील दोघांचीही माया मिळवत होता. आता पर्यंत कधी पुरवले गेले नाहीत ते सगळे हट्ट आता तो राधाकडून पुरवून घेत होता. राधा रागावली, चिडली तरी त्याला ते हवे हवेसे वाटतं होते.
राधामधे मातृत्व भाव अधिक होता. त्यामूळे ती अंश सारखेच राघवलाही जपत होती. नेमकी ह्याच गोष्टीला राघव गत आयुष्यात मुकला होता. आता राघावला समाज काय म्हणेल या गोष्टीचा विचार करायचा नव्हता.
राधा त्याच्या आयुष्यात ते सगळ घेवून आली होती जे त्याला हवे होते. म्हणूनच एरवी शांत असणारा राघव समाजाच्या विरुद्ध बंडखोरी करायला तयार झाला होता. केवळ सामाजिक मापदंडात बसत नाही म्हणून राधाशी लग्न करायचे नाही . हे त्याला मान्य नव्हते.
होणाऱ्या सगळ्या परिणामांचा विचार करूनच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
राघवच्या या कृतीने वडीलांनी त्याच्याशी संबंध नाकारले. वयाने मोठ्या व एका मुलाच्या आईशी लग्न करणे त्याच्या वडिलांना प्रतिष्ठेच्या विरुध्द जाणारे वाटले. वडीलांनी त्याला संपत्तीतून बेदखल केले . कोणीही राघव आणि राधाला समजून घेतले नव्हते. लग्नाच्या बाबतीत राधाचे वय राघव पेक्षा जास्त आहे हेच समाजाच्या दृष्टीने अयोग्य होते. त्यात भरीस भर म्हणजे ती कुमारी माता हे समाजासाठी अतिशय निंदनीय होते .
राघव मात्र तिच्यातल्या मातृत्वाला बघत होता. सामजिक दृष्टीने तो औरस पुत्र असूनही त्याच्या आईने त्याला झिडकारले होते त्या उलट अंशच्या जन्माने राधाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते तरी ती त्या सगळ्या विरुद्ध खंबीर पणे उभी होती. हिच गोष्ट राघवला भावली होती .
परंतू समाजातील लोक मात्र राघवला शय्या सोबतीला अनुभवी स्त्री हवी आहे आणि राधाला वयाने लहान पुरुष असे घाणेरडे ग्रह करुन होते. राधाने राघवला स्वतःच्या जाळ्यात अडकवले, दुसऱ्याचे पाप राघवच्या गळ्यात मारले असे तुच्छ आरोपही राधावर केल्या गेले. राधा आणि राघव मात्र स्वतःच्या निर्णयाशी प्रामाणिक होते . कुटुंब, समाज यापैकी कोणीही त्यांना समजून घेवू शकले नाही.
वडिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये तसेच कामकाजाच्या ठिकाणीही चुकीच्या पद्धतीने चर्चा रंगत होत्या त्या थांबविण्यासाठी पुण्याची नोकरी सोडून राघव आणि राधाने बेंगलोरला नवी नोकरी स्वीकारून स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
बेंगलोर मधे दोघे आनंदात संसार करत होते.
बेंगलोर मधे आल्यानंतर सुमंताईंच्या संस्थेची जी शाखा होती तिथे दोघेही गरजू स्त्रिया आणि मुले यांच्यासाठी त्यांना जमेल तसे काम करू लागले होते . अंशही आई वडिलांच्या छत्र छायेत आनंदी होता.
एक दिवस अचानक राधाची आणि राघवच्या आईंची सुमन ताईंच्या संस्थेत भेट झाली. ओळख वाढल्यावर राघवच्या आईला राधा आपली सून आहे याची कल्पना आली. राधासोबत त्या तिच्या घरीही जावून आल्या. राघवचे फोटो बघून त्यांना राघवला प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा अनावर होई.
"राघवला भेटल्यावर सगळयात आधी त्याची माफी मागायची "हे त्यांनी मनोमन ठरवले देखील.
राघव आणि राधा दुसऱ्यांदा आई बाबा झाले. राघवची आई \"आरव \" बाळाला आणि राधाला भेटण्याचे निमित्त करून घरी आली. अंश सोबत खेळण्यात रमलेल्या राघवला बघून त्यांना राहवले नाही. त्यांनी राघवला जे घडले त्याबद्दल माफी मागितली. त्यांच्या आयुष्याचा जीवन पट त्याला सांगितला .. .
घरातल्या तंगीला कंटाळून राघवला सोडून त्या एका श्रीमंत मित्राबरोबर निघून गेल्या होत्या. त्यानंतर दोघांनी लग्नही केले. काही दिवस आनंदात गेले . त्या मित्राला मुल हवे होते. संपत्तीला वारस हवा होता. लग्नाला सहा वर्षे झाली तरी मुल झाले नाही. सगळे देव धर्म केले. सगळे दवाखाने केले दोघांमध्ये काहीही दोष नव्हता . तरी मुल झाले नाही ते नाहीच. त्या श्रीमंत मित्राचा राघवच्या आई मधला रस संपू लागला. त्याला काहीही झाले तरी मुल हवे होते. अखेर दोघांच्या संमतीने घटस्फोट घेण्यात आला. राघवला सोडुन गेल्या नंतर राघवच्या आईला आयुष्यात पैसा भरपूर मिळाला पण मातृत्व विकत घेता आले नाही.
एकाकी आयुष्य खायला उठले . शेवटी मिळवलेल्या पैश्याचा वापर गोरगरिबांसाठी करावा या निर्णयाप्रत त्या पोहचल्या. सुमन ताईंच्या संस्थेत त्या देणगी देण्यासाठी वरचेवर जात होत्या. तिथेच राधाशी भेट झाली आणि गमावलेले मातृत्व पुन्हा अनुभवण्याच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या.
अनेक दिवस त्या राधा, राघव आणि अंशला दुरून बघण्यात समाधान मानत होत्या. परंतू आता त्यांचा कर्क रोग चौथ्या पायरीवर असल्याचे निदान झाले होते. मरण्या आधी राघवने त्यांना एकदा का होईना"आई"म्हणावे एवढीच त्यांची इच्छा होती.
म्हणूनच परिणामाचा विचार करण्यात वेळ घालवण्या ऐवजी त्यांना राघवला भेटण्याचा निर्णय घ्यावा लागला.
त्यांना पूर्ण पश्चाताप झाला होता.
राघवला सोडू गेलेली त्याची आई अशी अचानक भेटेल याची कल्पना नव्हती. तो गांगरून गेला. तिला \"आई\" म्हणावे असे भावबंध त्यांच्यात नव्हते. त्याच्या गरजेच्या वेळी आईने त्याला झिडकारले तसे आता तिला झिडकारावे असे तीव्रतेने वाटत असले तरी आईने केलेली चूक त्याला करायची नव्हती.
आई म्हणणे लगेच शक्य नसले तरी त्याने आईला कधी ही घरी येण्यास व मुलांना तसेच राधाला भेटण्यास मज्जाव केला नाही.
हे ही त्याच्या आईसाठी खूप मोलाचे होते.
त्या वरचेवर घरी येवू लागल्या. राघवच्या आईला झालेला पश्चाताप बघून राधाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली. \" राघवच्या वडिलांची माफी मागणे\" ही त्यांची शेवटची इच्छा
होती. राधाने त्यांची ती तळमळ बघून स्वतः पुढाकार घेतला. राघवलाही खुल्या मनाने आईला स्वीकारण्यासाठी तयार केले. राघवने पत्र पाठवून आपल्या वडिलांना आईच्या तब्येतीबद्दल सविस्तर माहिती दिली. " आईला तिच्या चुकांची जाणीव झाली आहे. तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तिला माफ करून आत्मशांती देणे आपल्याच हातात आहे. चुकलेल्यांना माफ करणे म्हणजे मनाचा मोठेपणा दाखविणे. लहापणी मी आईच्या प्रेमाला मुकलो . तुमच्या संगतीत राहूनही कधी वडिलांची माया अनुभवली नाही. तुमच्याकडे कधी काही मागितले नाही आता मात्र मागतो आहे.
"माझ्यासाठी सगळे जुने विसरून तुम्ही आईला माफ करा". काही क्षण का होईना मला आई वडीलांची माया मिळाली तर त्याचा आनंद मी आयुष्यभर मनात जतन करू शकेल." अशी विनवणी ही केली
पत्रात आरवचे फोटो पाठवून, तो आजोबांची आतुरतेने वाट बघतो आहे हे लिहायला तो विसरला नाही.
राघवच्या वडिलांचे राघववर प्रेम होते पण त्यांनी ते उघडपणे कधी व्यक्तच केले नाही. त्यांनी रघावला प्रेम दिले नाही पण कधी वाऱ्यावरही सोडून दिले नव्हते.
या सगळ्यांचा योग्य तो परिणाम झाला . ते राघवच्या भेटीसाठी बेंगलोरला आले. राघवच्या आईलाही त्यांनी माफ केले. राधा मधली जागरूक आई आणि उत्तम रित्या सांभाळलेला संसार बघून
वडिलांनाही राघवचा राधाशी लग्न करण्याचा निर्णय योग्य होता याची जाणीव झाली.
सगळे एकत्र जमले होते त्याची आठवण म्हणून राघवने सगळ्यांसोबत फोटोही काढले. त्यातलाच एक फोटो आता राघवच्या दिवाणखान्यात लावला होता. तो फोटो बघितला की," जुने सगळे विसरुन .... फोटोतल्या सारखे आनंदी कुटुंब बनून राहता आले तर ".... हाच विचार राघव करत असे. कारण अजूनही त्याला आईला \"आई\" म्हणून हाक मारणे जमले नव्हते
काही महिन्यातच राघवच्या आईची तब्येत खालावली. आईच्या त्या अवस्थेत राघव रोज दवाखान्यात जावून भेटत होता. आता कुठे राघवला खऱ्या अर्थाने कुटुंबाचे प्रेम अनुभवायला मिळत होते. त्याला हे क्षण असेच रहावे असे वाटत होते . एका हळव्या क्षणी राघव आईला म्हणालाच ," आई आता पुन्हा नको न सोडुन जावू " ..... त्याच्या तोंडून \"आई \" हे शब्द ऐकुन आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्या जणू याच क्षणाची वाट बघत होत्या. चेहऱ्यावर मंद स्मित आणि डोळयात तृप्ततेची भावना ... याच अवस्थेत त्यांनी जगाचा निरोप घेतला.
या सगळ्यांनंतर आता कुठे राघव आणि राधा यांच्या आयुष्यातील नैतिक, अनैतिकतेचे वादळ थोडे शांत झाले होते. राघवला मित्रांची आठवण येत होती परंतू तेही राधाशी लग्न करण्याचा निर्णय समजून घेणार नाही याची त्याला भीती होती. प्रत्यक्षात झालेही तसेच होते. मित्रांनी राधाविषयी वाईट शब्द काढलेच.... मित्र म्हणवून घेतात तरी मित्राला समजून घेवू शकत नाही. यामुळे त्याला प्रचंड राग आला. इच्छा नसतांनाही मित्रांवर हात उचलल्या गेला होता.
आज मात्र त्याने आपले मन मित्रांजवळ मोकळे केले.
त्याची ही कहाणी ऐकून मित्रांनाही त्यांची चूक कळली. नवरा बायको अशा जोडप्यांना निव्वळ त्यांचे वय , दिसणे या बाह्य मापदंडावर तोलने चुकीचे आहे याची जाणीव त्यांना झाली . नाण्याची केवळ एक बाजू बघून कोणाबद्दल ग्रह करुन घेण्याआधी नाण्याची दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे आहे. हे त्यांना चांगलेच समजले. राघवसाठी राधाच योग्य जीवन साथी आहे. हे मनोमन त्यांना पटले.
तिघांनीही त्याची माफी मागितली. इथून पुढे वार्षिक भेट चुकवायची नाही असे वचन त्यांनी राघवकडून घेतले. बेंगलोर सोडण्यापूर्वी त्यांनी राधाचीही माफी मागितली. त्यांच्या वार्षिक भेटीसाठी सगळ्यांनी सह कुटुंब सह परिवार यायचे असे राधाने सुचविले तेंव्हा सगळ्यांनी ते लगेच मान्यही केले. पुरुष हा हळवा नसतो, तो नेहमीच स्त्री सौंदर्याकडे आकर्षित होत असतो, तो दुसर्‍याच्या मुलाला आपले मानू शकत नाही हे सगळे समज राघवच्या बाबतीत चुकीचे होते. त्याच्या बालपणी जे घडले म्हणून त्याने कधी समस्त स्त्री जातीचा राग केला नाही की उथळ वागला नाही. त्याला राधा प्रती असलेला आदरच त्यांच्या समजूतदार संसाराला कारणीभूत होता. राधा कणखर होतीच परंतू त्याच्या साथीनेच राधा अधिक खंबीरपणे संसार सांभाळत होती.
सामजिक दृष्टीने राघव आणि राधाचे लग्न विजोड होते परंतू ती दोघे केवळ एकमेकांच्या संगतीनेच परिपूर्ण होती.
©️ अंजली मीनानाथ धस्के

टिप: लिखाण नावा सहितच शेअर करावे. लिखाण आवडल्यास like comment ने प्रोत्साहन देवू शकता. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//