नाईक निंबाळकरांच्या घराण्यातही आपल्या कर्तव्यात कसूर न करणारी पुरुष मंडळी होतीच. याची सईबाईंना लहानपणापासूनच सवय होती. त्यामुळे त्यांनी राजांच्या बाबतीत कुठलीच तक्रार न करता त्यांना आपले सर्वस्व मानले होते.
वेळ मिळेल तेव्हा विश्रांतीसाठी शिवाजीराजे गडावर येत. त्यांच्या सरबराईत सईबाई स्वत:ला झोकून देत. राजांचेही सईबाईंवर निरतिशय प्रेम होते. प्रथम ती त्यांची सखी होती, नंतर पत्नी आणि त्यांची प्रेरणाही.
सईबाईंचा नम्र ,प्रेमळ ,शांत स्वभाव, सोशिकता, एकनिष्ठता, वागण्या -बोलण्यातील आदब ,सुसंस्कृतपणा यामुळे राजांच्या मनात पत्नी म्हणून सईबाईंचे एक वेगळेच स्थान होते. शिवाजीराजांनी आपल्या या स्वामिनीसाठी "श्री सखी राज्ञी जयति" अशी मुद्रा दिली होती.
डोंगर-दऱ्या, कड्या- कपाऱ्यात लढणारा,
ऊन ,वारा ,पावसाची तमा न बाळगणारा आपला लढवय्या पती स्वराज्याचा डाव मांडत होता. त्यांस संसाराच्या मोहात न अडकवता सईबाई राणीसाहेबांनी शिवाजीराजांना खंबीर साथ दिली. प्रत्यक्ष राजकारणात त्यांनी कधीच भाग घेतला नाही, पण अप्रत्यक्षरीत्या शिवाजीराजांस त्यांची 'सावली' बनून साथ दिली.
शिवाजीराजांचे रूप, त्यांची बुद्धिमत्ता, विशाल विचारसरणी, यावर सईबाईंचे मनस्वी प्रेम होते.
राजे आणि सईबाईंच्या विवाहानंतर शिवाजीराजांचे एकूण सात विवाह झाले. सगुणाबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई आणि लक्ष्मीबाई ही त्यांच्या पत्नींची नावे होत.
यात सईबाईंना थोरल्या राणीसाहेब म्हणून मोठा मान होता. पण सईबाईंच्या मनात किंचितही गर्वाची, मोठेपणाची भावना नव्हती. आपल्या सात ही सवतींना सईबाईंनी भगिनींप्रमाणेच वागवले.
राणी सगुणाबाई, या राजेशिर्के यांच्या कन्या. शहाजीराजांच्या उपस्थित शिवबांचा व सगुणा बाईंचा विवाह बंगळूर येथे पार पडला. पुढे त्यास एक कन्या झाली तिचे नाव नानीबाई.
तळबीडचे मोहिते घराणे आदिलशहाच्या दरबारी होते. पैकी संभाजी मोहिते यांची कन्या सोयराबाई यांचा विवाह शिवबांशी झाला. यांना दीपाबाई व राजाराम महाराज अशी दोन मुले होती.
शिवबांच्या चौथा पत्नी म्हणजेच पुतळाबाई. या पालघर घराण्यातील. राणी सईबाईंच्या निधनानंतर राजांना यांचा मोठा आधार होता. पुतळाबाईंना मूलबाळ नसून त्यांनी संभाजीराजांना आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवले.
राणी लक्ष्मीबाई आणि शिवबा यांचा विवाह, राजे जावळीच्या मोहिमेवर असताना गुप्तपणे पार पडला.
शिवबांच्या पत्नी राणी गुणवंताबाई या इंगळे घराण्यातील असून त्या शिवाजी इंगळे यांची कन्या होत्या.
राणी सकवारबाई या शिवबांच्या सहाव्या पत्नी गायकवाड घराण्यातील. त्यांचे बंधू कृष्णाजी हे शिवरायांचे अंगरक्षक होते. शिवराय आणि सकवारबाईंची एकुलती एक कन्या म्हणजेच कमळजाबाई.
राणी काशीबाई या संताजी जाधव यांच्या कन्या. या शिवरायांच्या सातव्या पत्नी होत.
भोसल्यांच्या घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेला आपले कुळाचार, रितीभाती सईबाई राणीसाहेब शिकवित असत. ह्या सर्व धाकट्या राण्यांच्या मनात मोठ्या राणी सईबाईंबद्दल आदराची भावना होती.
या सर्व राण्या सईबाईंना आपल्या मोठ्या भगिनीप्रमाणे समजत असत.
सईबाईंनी आपल्या लाघवी स्वभावाने साऱ्यांचे मन जिंकून घेतले होते. त्यांचे वर्तन नेहमीच भोसले घराण्याच्या जेष्ठ सुनेला साजेसे असेच होते. त्यांचे सुंदर रुपडे, मनमिळावू ,विचारी स्वभाव, मोजकेच आदबशीर बोलणे, भोसले घराण्याच्या रीतीला धरून असलेले वर्तन यामुळे त्या साऱ्यांनाच प्रिय होत्या. त्या एक आदर्श माता, पत्नी आणि आदर्श सून होत्या.
शिवाजीराजांची कमी हा त्यांचा भला परिवार जणू भरून काढत होता आणि सईबाई या परिवारात अगदी सामावून गेल्या होत्या.
त्यांच्या मनी विचार येई.. "जिजाऊआईसाहेबांनी शहाजीराजांचा विरह सोसला. स्वराज्य स्थापनेचे स्वप्न उराशी बाळगून शिवबांच्या मनावर योग्य ते संस्कार केले. राज्यकारभारातही तितक्याच निष्ठेने लक्ष घातले." अशा जिजाऊ आईसाहेबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सईबाई वाटचाल करत होत्या.
जिजाऊ आईसाहेबांना कन्येची कमी होती. सईबाईंना आपली मुलगीच मानले होते त्यांनी. सासु- सुनेचे नाते माय -लेकीच्या धाग्यात केंव्हाच गुंफले गेले होते, जेव्हा सईबाईंनी भोसले घराण्याच्या सून म्हणून वाड्यात पाहिले पाऊल टाकले होते.
जिजाऊंच्या संस्कारात, वात्सल्यात, मार्गदर्शनाखाली सईबाई मोठ्या होत होत्या. जिजाऊंचा त्यांना मोठा आधार होता.
जिजाऊ आईसाहेबांचा पुरा एकोणीस वर्षांचा 'सहवास 'सईबाईंच्या वाट्याला आला. निर्णय घेण्याची क्षमता, संघटन चातुर्य, प्रसंगानुरूप वागण्याचे धैर्य असे अनेक गुण जिजाऊंच्या ठाई होते. यांमुळे सईबाई प्रभावित झाल्या नसतील तर नवलच!
सईबाईंचे माहेरही अत्यंत प्रतिष्ठित घराणे. तिथेच त्यांना राजकारणाचे योग्य ते संस्कार झाले. युद्ध जन्य परिस्थितीत वागण्याचे, कर्तुत्ववान पतीस सांसारिक मोहात न गुंतवता त्याने गगन भरारी घेण्यास त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे धैर्य, याचे बाळकडू आपल्या माहेराकडूनही सईबाईंना मिळाले होते. विवाहानंतर जिजाऊंच्या सानिध्यात त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून आले, त्याला एक वेगळीच धार आली. जिजाऊ जशा शिवाजीराजांची प्रेरणा होत, तशाच सईबाईंच्याही.
स्वराज्याचा पाया रचला गेला.. शिवाजीराजांचे पराक्रम सईबाईंना अनुभवण्याचे भाग्य लाभले. राजांच्या पाठीशी आणि संपूर्ण भोसले घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या जिजाऊमाता त्यांच्या स्फुर्तीस्थान होत्या.
इकडे अफझलखानाने बादशाहास कळविले, "शहाजीराजे भोसले बादशहाशी बेइमानीने वागत आहेत." आपला वजीर मुस्तफाखान त्याला बादशहाने बोलावून घेऊन यावर त्याचा सल्ला मागितला. नंतर झालेल्या झुंजीत दगा, विश्वासघात करून बाजी घोरपड्यांनी डाव साधत शहाजीराजांना कैद केले. यावेळी शहाजीराजांचे थोरले पुत्र संभाजीराजे, धाकट्या पत्नी बंगळुरास होत्या.
आता शिवबांना कैद करायचे म्हणून फत्तेखान शिवाजी महाराजांवर चालून आले. "संकटे आली म्हणजे ती चहुबाजूंनी येतात," असे म्हणतात. काय करावे कोणालाच उमजत नव्हते. जिजाऊ अस्वस्थ होत्या. तर शिवाजीराजांच्या समोर शहाजीराजांना कैदेतून सोडवण्याचे आव्हान होते.
"पण असे हतबल व्हायचे नाही. आता लढायचेच.. माघार नाही घ्यायची."
आपल्या मावळ्यांसह शिवाजीराजे पुरंदर किल्ल्यावर आले. गडाच्या कारभाऱ्यांनी, महादजीपंतांनी भोसल्यांवरच्या प्रेमापोटी, शिवबांसाठी गडाचे दरवाजे उघडले. आधी शिरवळचा सुभानमंगळ किल्ला ताब्यात घेतला. मग फत्तेखानावर मराठ्यांनी झडप घातली. लढाई झाली. मात्र या मराठी फौजेच्या भीतीने फत्तेखान आपल्या फौजेसह विजापूरकडे पळून गेला. फत्तेखानचा पराभव झालाच, पण राजांचा 'बाजी पासलकर' हा हिरा ठार झाला.
तद्नंतर शिवाजीराजांनी मोगल सुलतान शहाजहानला "शहाजीराजे आपली चाकरी करू इच्छितात" अशा आशयाचे पत्र पाठवले. विजापूरास ही बातमी पोहोचली. याचा परिणाम असा झाला की मोगलांच्या भयाने आदिलशहाने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केले आणि सईबाईंच्या कल्पनेतून शहाजीराजांची सुटका कोंढाणा किल्ला देऊन झाली.
शिवाजीराजे पुरंदराहून पुण्यास आले. त्यावेळेस सईबाई आणि शिवाजीराजे यांच्या ज्येष्ठ कन्येचा जन्म झाला. सईबाईंना आपलेच इवलेसे प्रतिबिंब पाहून खूप खूप आनंद झाला. बाळाचे बारसे मोठ्या थाटामाटात पार पडले. नाव ठेवण्यात आले 'सखुबाई'..
१६५६ मध्ये सईबाईंचे बंधू बजाजी नाईक निंबाळकर यांचे ज्येष्ठ पुत्र महादजींसोबत सखुबाईंचा विवाह पार पडला. फलटणचे नाईक निंबाळकर हे सईबाईंचे माहेर असल्याने, शिवाय हे घराणे आपल्या तोडीचे असल्याने जिजाऊसाहेबांनी आपल्या नातीसाठी आणि शिवाजीराजांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी 'महादजींची' निवड केली. शिवाजी महाराजांनी सखुबाई यांना पुरंदर तालुक्यातील 'वाल्हे' गाव चोळी- बांगडीसाठी इनाम म्हणून दिले होते. पुढे महादजी आणि सखुबाई यांना पराक्रमी पुत्र झाला.
बजाजी नाईक निंबाळकरांच्या मृत्यूनंतर महादजी शिवाजीराजांच्या सैन्यात लष्करी अधिकारी म्हणून भरती झाले होते. शिवाजीराजांना त्यांनी उत्तम सहाय्य केले. संभाजीराजांना औरंगजेबाने पकडून नेल्यानंतर महादजी मोगलांच्या तावडीत सापडले. पुढे सखुबाई आणि महादजीराजेंना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यात कैद केले. पण काही दिवसातच महादजी यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पत्नी सखुबाई सती गेल्या.
सईबाई आणि शिवाजीराजांच्या द्वितीय कन्या 'राणुआक्का'. राणुआक्का या करारी होत्या. प्रेम आणि त्याग यांचा सुंदर मिलाफ होत्या. यांचा विवाह सिंदखेडच्या 'अचलोजी जाधवरावांशी' सईबाईंच्या निधनानंतर वर्षभराने झाला. सिंदखेडचे जाधव घराणे श्रीकृष्णाच्या वंशातले. जाधव घराणे शिवाजीराजांचे आजोळ तर जिजाऊंचे माहेर. राणुआक्का व त्यांच्या पतीस राजांनी भुईंज येथील जहागिरी दिली होती.
सईबाई आणि शिवाजीराजांच्या तिसऱ्या कन्या म्हणजेच 'अंबिकाबाई'. सईबाई यांच्या निधनानंतर सुमारे चार वर्षांनी अंबिकाबाईंचा विवाह 'हरजी महाडिक' यांच्याशी झाला. महाडिक घराणे हे प्राचीन घराणे होते. शिवाजीराजांना आणि नंतर संभाजी महाराजांना या हरजीराजे महाडिकांनी मनोमन साथ दिली.
आपल्या तीनही लाडक्या लेकींना राणी सईबाईंनी चांगले संस्कार दिले. त्याचबरोबर त्यांचे व्यक्तिमत्त्व उत्तम घडवले.
आता शिवाजीराजे आणि राणी सईबाई यांना आस लागून राहिली ती एका शूरवीर, पराक्रमी 'पुत्राची.'
स्वराज्याला, कुळाला वारस, मार्गदर्शक रक्षणकर्ता हवाच. मग..
क्रमशः