राज्ञी- अंतिम

Gosht shivbanchya patanichi

सईबाईंच्या मनीचे हे विचार ऐकून 'नियती ' मूकपणे अश्रू ढाळत होती. पण नियतीला इतिहासाचे पुढचे आगळेवेगळे पान उलटणे भागच होते. काहीही असो, सुखाला दुःखाची किनार जोडावीच लागते. त्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि मनात पराक्रमाची आगही उसळत नाही.

शिवाजीराजांची अवस्था काही वेगळी नव्हती. सईबाईंचे हे रूप पाहून शिवाजीराजांचे काळीज गलबलून गेले होते. राजे आणि सईबाईंचा विवाह झाला, तेव्हा त्या केवळ सात एक वर्षांच्या होत्या. राजांच्या पहिल्या वहिल्या 'सखी...' सई.

आपल्या शांत, सोज्वळ स्वभावाने सईबाईंनी राजांचे मन जिंकून घेतले. सईबाईंनाही जिजाऊ आणि राजांसारखीच स्वराज्याची तहान होती. राजे सतत मोहिमेवर असत. त्यांना बळ देण्याचे कार्य सईबाईंनी केले. विजयी होऊन परतलेले राजे जेव्हा गडावर येत, तेव्हा सईबाई राणीसाहेब त्यांच्या स्वागतासाठी कायम स्वतः जातीने हजर असत. विजयाचा जो आनंद सईबाईंच्या डोळ्यात दिसे, त्या आनंदाला तोड नव्हती.

राजांच्या आठ राण्यांपैकी सईबाई या थोरल्या. पण थोरालेपणाचा बडेजाव त्यांनी कधीच मिरवला नाही.
राजांना वाटे, "स्वराज्याची वाट बहुत बिकट. आमचे लक्ष सतत गड किल्ल्यांवर." रणांगणावर आपल्या सवंगड्यांसह, मर्द मावळ्यांसह स्वतः तलवार हाती घेऊन लढायचे. या लढाईत कधी जीत, तर कधी हार. तर कधी त्या सवंगड्यांना प्राणही गमवावे लागत.
राजे आपला प्राण तळहातावर घेऊन लढत. आपल्या कुटुंबाची याद त्यांनाही येत होती.
पण मोहिमेत सोबतीला असत, फक्त तलवारी, ढाली, बाण आणि स्वराज्यासाठी लढणारे हिंमतवान मावळे. तिथे संसार, घर-दार या विचारांना थारा नव्हता. सईबाई या आपल्या स्वप्नाशी एकरूप झाल्या, कधीच कुठली अपेक्षा न ठेवता. आजवर त्यांच्या तोंडून उणा शब्दही कुणाविरुद्ध बाहेर पडला नव्हता. राजस्त्रीने सोशिक असावे हे मान्य..पण सहनशीलता हा त्यांना मिळालेला 'वर 'असावा. त्यांनी कधीच कुठलीच तक्रार केली नाही. आपल्या पतीचे  कर्तृत्व, पराक्रम, यश सईबाईंनी आपल्या हृदयात साठवले, अनुभवले.

सईबाईंचे माहेर तालेवार, थोरामोठ्यांचे. त्याचा वृथा अभिमान त्यांनी कधीच बाळगला नव्हता. त्या भोसले घराण्याशी अशा एकरूप होऊन गेल्या, या घरची लेकच जणू.
शिवाजीराजांना आपल्या घर -संसाराकडे लक्ष द्यायला उसंत नव्हती. गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वराज्य स्थापनेचा प्रचंड मोठा संसार त्यांनी मांडला होता. या आपल्या स्वप्नांना राणी सईबाईंनी साथ द्यावी हीच त्यांची अपेक्षा होती. या अपेक्षेेला सईबाईंनी उत्तम साथ दिली होती.

राजांचे आपल्या लाडक्या पत्नी सईबाईंवर
निरतिशय प्रेम होते. त्यांचे गुण, देखणे रूप, प्रेमळ, समजूतदार स्वभाव, त्यांची पतिनिष्ठा पाहून राजांच्या मनात त्यांचे मानाचे स्थान होते. गेली पंधरा सोळा -वर्षे सईंबाईंनी राजांना मनापासून साथ दिली होती. ही अशी साथ आयुष्याच्या अखेर पर्यंत मिळत राहावी, अशीच राजांची इच्छा होती.
राजे जेव्हा मोहिमेवर जाण्यास निघत तेव्हा सईबाईंच्या मनाची अवस्था काय होत असेल? ती त्यांची घालमेल राजांना जाणवे, त्यांच्या हृदयास जाऊन भिडे. तशीच ती अवस्था राजांना प्रेरणा देई आणि स्फूर्तीही.. गनिमाशी लढण्याची.

स्वराज्याचा विस्तार वाढत होता. राजांना आपल्या कुटुंबासाठी जराही वेळ नव्हता. पण त्यामुळे सईबाई कधीच नाराज झाल्या नाहीत. उलट राजांचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी त्यांस बळ देण्याचे कार्य केले.
जिजाऊसाहेबांचे आणि सईबाईंचे नातेच निराळे होते. शिवरायांना सईबाई आपल्या आऊसाहेबांची सावली वाटत..त्यांच्या सहवासात राहून भोसल्यांशी एकरूप झालेली.
राजे आणि सईबाईंच्या तीनही कन्या सर्वगुण संपन्न. अगदी सईबाईंसारख्याच. याचा राजांना अभिमान होता.
या दोघांनी एक स्वप्न पाहिले, पोटी एक पुत्र असावा, पित्याची सावली बनून साथ देणारा, स्वराज्याचा पाठीराखा.
सईबाईंना दिवस गेले. राजांना आनंद झाला. पण आपल्या आयुष्यातला सईबाई नावाचा ढासळणारा बुरुज पाहून त्यांचे हृदय पिळवटून निघाले. त्यांची काळजी घ्यायला आऊसाहेब होत्या, राणीवसा होता. तरीही सईबाईंचे मन राजांपाशी गुंतले असेलच. तरीही 'कर्तव्य आधी श्रेष्ठ..' म्हणून सईबाईंनी तो विचार मागे ठेवला असेल.
नऊ महिने पूर्ण होताच सईबईंनी बाळराजांना जन्म दिला. शिवाजीराजे आनंदले. पण सईबाईंची प्रकृती अधिकाधिक क्षीण होत गेली. त्याने सारेच काळजीत पडले. उत्तम वैद्य, औषधोपचार ,नवस- सायास झाले. पण सईबाईंची तब्येत बिघडत गेली.

यादरम्यान धूर्त, कपटी अफझलखान आपल्या वीस हजार फौजेसह आणि प्रचंड लवाजम्यासह देवळे रावळे नष्ट करीत होता. प्रजाजनांवर अत्याचार करीत होता. तर इकडे राणी सईबाईंचे दुखणे वाढत चालले होते. अखेर सारे उपाय थकले आणि रायगडावर सईबाईंनी ५/९/१६५९ रोजी भाद्रपद वद्य चतुर्दशीला साऱ्यांचा निरोप घेतला, कधीही न परतण्यासाठी.

शंभुराजे आईविना पोरके झाले. शिवाजीराजांच्या लाडक्या, थोरल्या पत्नी त्यांना एकाकी करून निघून गेल्या. त्यांच्या दुःखास अंतच नव्हता. पण स्वराज्याचे स्वप्न मोठे. त्यांना हे दुःख काळजात दडवावे लागले.
जिजाऊ आऊसाहेब, सारा राणीवसा, सारे स्वराज्यच दुःखात बुडाले.
नाईक निंबाळकरांची मुलगी, भोसले घराण्याच्या जिजाऊंच्या थोरल्या सुनबाई, सहनशील, पतिव्रता पत्नी, सात्विक सौंदर्य, लाघवी स्वभाव, एक प्रेमळ आई.. अशा विविध रूपांत वावरणाऱ्या राणी सईबाईंच्या निधनाने इतिहासही क्षणभर रेंगाळला आणि मूकपणे अश्रू ढाळत पुन्हा उभा राहिला...स्वराज्याचे पुढचे पान उलटण्यासाठी.

शिवरायांच्या 'प्रथम पत्नी राणी सईबाई' यांबद्दल लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न. आवडल्यास लाईक करा आणि नक्की कमेंट मध्ये कळवा.

समाप्त.

🎭 Series Post

View all