Jan 26, 2022
नारीवादी

राधाला गरज सहकार्याची भाग २

Read Later
राधाला गरज सहकार्याची भाग २


एक वेळ अशी आली की राधाला काही सुचतचं न्हवतं.. मी काय चुकले मी काय गुन्हा केला की अशी शिक्षा मला मिळते आहे??

का मंगेश माझ्याशी असे वागतो??.सर्वस्व अर्पण ज्याला केले तोच असा वागतो...

असेच दिवस जात होते...मंगेश आणि तिच्यात प्रेमाचे बंध तर न्हवते पण माणुसकीचे सुद्धा बंध न्हवते.त्या नात्याला असूनही काडीमात्र अर्थ न्हवता....


ऑफिसला जाण्याआधी सर्व काही जेवन ,भांडी तीच करत होती ..मोलकरणीची कामं जमत नाही म्हणून सासूने मोलकरीण काही ठेवू दिली न्हवती..सगळं करून नाकी नऊ येत होते पण तरी राधा गपगुमान करत होती.कामातही फक्त चुका काढणे हा नित्यक्रम झाला होता..एकही दिवस मानसिक त्रास झाला नाही असे होत न्हवते...

एक दिवस तिला कणकणी आली म्हणून तापाचे औषध घेऊन ती सकाळी उशिरापर्यंत झोपून राहिली...

सासू आणि नवरा नाश्त्याची वाट पहात होते.. दहा वाजले तरी राधाचा पत्ता न्हवता....नवरा रूममध्ये गेला आणि तिला म्हणाला

"राधा अजून नाश्ता तयार नाही ??मला उशीर होत आहे..उठ आणि नाश्ता कर.


राधा:"मला बरं वाटत नाही म्हणून जरा पडले आहे...ताप आला आहे .please आजच्या दिवस अरेंज कर..

आठ्या पाडत तो राधा जवळ गेला..एव्हाना गोळी घेतल्यामुळे ताप गेला होता..त्याने तिच्या डोक्याला हात लावला...पाहतो तर ताप न्हवता..

डाफरतच तीला म्हणाला

"काही ताप नाही ,का खोटं बोलतेस???
प दरवाज्यापाठी उभी राहून सासू सगळं ऐकत होती आणि ती पण तावातावाने आत आली..

मंगेशकडे पाहून बोलू लागली
"काही नाही मंगेश नाटके करते ही वरून हिचे कान भरवायला आहेतच की तिच्या माहेरकडचे..मुद्दामून झोपली असेल.."

राधा:"विनाकारण माहेरच्यांचं नाव घ्यायची गरज नाही..मला ताप आला होता म्हणून उठली नाही,मी गोळी घेतली म्हणून ताप उतरला."…

सासू:"एक नंबरची खोटारडी आहेस तू,तुला कामाचा कंटाळा येतो म्हणून तुझी नाटकं असतात"...

राधाला काहीच सुचत न्हवते..एकतर आजारी होती विचारपूस केली नाही आणि वरुन दोघेही तिच्यावर आरोप लावून मोकळे झाले होते..


राधा:"मंगेश, तू तरी समजून घे कमीत कमी तू असा नको वागूस.."

मंगेशने ऐकून न ऐकल्यासारखं केले आणि तावातावात निघून गेला....
तिने चार दिवस सुट्टी काढली आणि माहेरी जाण्याचा निर्णय घेतला..
निघताना तिने मंगेशला सांगितले तो म्हणाला"चार दिवस काय गरज नाही रहायची,दोन दिवसात परत ये"....


राधा माहेरी आली...
मुलीला पाहून आई वडील दोघेही खुश झाले... कोरोना सारख्या आजारातून दोघेही सुखरूप बाहेर पडले होते.. आपण त्यांना पैश्याची नाही मदत करू शकलो पण आपला सहवास तर त्यांना देऊ शकतो.दोन चार दिवस आपण त्यांच्यासोबत राहिलो तर त्यांनाही बरं वाटेल.तीला आई वडिलांना पाहून खरं तर अपराधीपणाची भावना येत होती ..आपण ज्या वेळेला मदत करायला हवी होती आपण केली नाही...तरीही आई बाबा किती खुश झाले होते राधाला पाहून...

असेच असतात आई वडील ,मुलांकडून अपेक्षा ठेवत नाही. राधा मनोमन आई वडिलांची माफी मागत होती.....

माहेरच्या सावलीत तिला मुक्त बागडायचे होते, तिथे तिला कोणी टोमणे मारणारे न्हवते आणि आरोप लावणारे न्हवते.. तिला judge करणारेही न्हवते..तिला लांब रहायचे होते त्या आगीपासून जिथे संसाराचे चटके सोसवत न्हवते..
ना ना खोटे आरोप ,विश्वासघाताचे निखारे आणि लग्न ह्या सुंदर नात्याला लागलेली अमानुष हवा ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहायचे होते..

फक्त आता प्रेम हवं होतं..माया हवी होती.समजून घेणारं मन हवं होतं..तिला फक्त लेक म्हणून जगायचं होतं. पैसा, स्वार्थ ह्यापलीकडे जे सुंदर आयुष्य लग्नाआधी जगत होती पुन्हा जगायचे होते..


आई:"राधा किती बारीक झालीस गं,तुझी स्वतःकडे लक्ष न देणे ही सवय कधी सुटणार??? अजिबात खाण्याकडे लक्ष नसतं तुझं... असंच चालू आहे वाटतं..अधिसारखं तुझ्यापुढे ताट ठेवायला मी काय माहेरी असणार आहे का?? .. "

राधा:"अगं आई जेवते गं मी वेळेवर, जरा ऑफिसमध्ये काम भरपूर असतं,म्हणून जरा तब्येत खराब झाली,बाकी काही नाही"

मनात तर खूप रडवेली झाली होती ...डोळ्यात पाणी आले..
आई:"अगं डोळ्यात पाणी आले??

राधा:"नाही गं आई,कचरा गेला बहुतेक....

आईने लगेच पदराने डोळे पुसले....

आईचा चेहरा पडला..

आई "कसला कचरा गेला काय माहीत ??किती पाणी येत आहे बाई माझ्या पोरीच्या डोळ्यात ,पाणी मार बरं डोळ्यावर... बरं वाटेल.

आईने तिचा हात धरला आणि बेसिनपाशी घेऊन गेली....

राधाला अजून गहिवरून आले......तिने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणले..आईसाठी रडणे थांबवले....जेव्हा डोळ्यातून पाणी येणे थांबले तेव्हा कुठे आईचा चेहरा हसरा झाला..

तेवढ्यात बाबा आले आणि विचारले काय झाले??राधाचा डोळा खूप लाल दिसतो आहे

आईने राधाच्या डोळ्यात काही तरी गेल्याचे सांगितले..त्यामुळे डोळा लाल झाला...

बाबासुद्धा अस्वस्थ झाला.

राधा बाळा, थांब मी डॉक्टरांना फोन करतो..

राधा "अहो बाबा त्याची गरज नाही.ok आहे मी ....
बाबांनी डोक्यावरून हात फिरवला...


राधा रूममध्ये गेली आणि थांबवून ठेवलेला अश्रुचा बांध आता मोकळा करू लागली..

किती प्रेम करतात माझे आई बाबा..माझ्या डोळ्यात कचरा गेला तर किती अस्वस्थ होतात...त्यांना जर मी माझी व्यथा सांगितली तर किती अस्वस्थ होतील..त्यांना किती वाईट वाटेल??मनाला विचार शिवला जर माझ्या आई बाबांना सहन झाले नाही तर??....छे असं नको व्हायला... मनाचा मनाशी संवाद चालू होता..

नाही नाही अजिबात नाही ...त्यांना सांगण्याची चूक मी करणार नाही..अंतःकरण जड झालं होतं ,खूप जड...मनाची चलबिचल सुरू होती..काय करावं समजतं न्हवतं??पण मनाशीच ठरवलं ..नवऱ्याचे आणि सासूचे वागणं काही सांगणार नाही....

तिने जुन्या आठवणीत रमण्याचा विचार केला...जुने फोटो,वह्या ,पुस्तकं चाळु लागली.तिला सवय होती शाळेपासून लिखाण करायची.. अनेक वाह्यामध्ये लेख ,कविता,चारोळी लिहून ठेवली होती..पुढे कॉलेजमध्ये ती हा छंद जणू विसरली..
अशीच एक वही चाळत असताना एक लेख तिच्या नजरेस पडला...

विषय होता...

"मीच लक्ष्मी मीच दुर्गा"


ती खचली होती ,थकली होती..
आपल्याच माणसांच्या प्रेमाच्या जाळ्यात नकळत फसली होती..खूप रडली होती आणि तडफडली होती..सर्वत्र बाजूने तिला फक्त अंधार दिसत होता..कोणीतरी गळा दाबतोय, डोळ्यात तप्त सुळी खुपसतो आहे .ज्वालामुखीच्या कठड्यावर जणू तिला उभं केलं आहे ,तिला भीती दाखवली जात होती आपल्याच लोकांकडून..विद्रुप रूप पहात होती त्या गोजऱ्या चेहऱ्याचे जे कधी पाहिन असे वाटले न्हवते..गर्भगळीत झालेल्या देह आता फक्त शेवटचा घटका मोजण्यास जणू हळुहळू पुढे चालला होता..तोच तोच तिचा आत्मा चवताळला ,किंचाळी निघाली अशी जी चारही दिशा पसरली.अश्रू वाहणारे डोळे लालबुंद झाले होते,थरथरणारं तिचंच शरीर जणू सर्वांचा थरकाप उडवणारं होतं...लाचार होऊन माफी मागणारे हात बळकट झाले होते... ती उभी राहिली होती आता बदला घेण्यासाठी....एक एक पाऊलं पुढं टाकत चालली होती ...तसा धरणीला कंप सुटत होता..सगळेच लपून बसले होते ,तिचे रूप पाहून..प्राणाची आहुती कोण देणार??.....ती दुर्गा आज शोधात होती,कोपली होती ..बळी घ्यायचा होता असुरांचा.असुर लांब पळ काढत होते..आता तिच्यावर अन्याय करणे तर दूर तिच्या तेजस्वी रुपाला पाहण्याची हिम्मत कोणाचीही होत न्हवती...कारण ती आता दुर्गा झाली होती...ती लक्ष्मी दुर्गा झाली होती..

राधाच्या अंगावर जणू शहारे आले....वेगळीच शक्ती संचारली..किती ती शक्ती तिच्या अंगात भिनली...नजर लेखाच्या खाली गेली..
त्या लेखाच्या खाली तिच्या आवडत्या शिक्षिकेने सुंदर अक्षरात एक वाक्य लिहिले होते..

"राधा,तुझा हा लेख फक्त लेख नसून प्रेरणा आहे ..खचलेल्या मनाला उभारी देणारी शब्दांची जादू आहे,खूप यशस्वी हो"....


राधा हळवी झाली..राधा अशीच होती,धाडसीवृत्तीची,आत्मविश्वास तिच्या रोमारोमात वसलेलाल...जिद्दी होती..शिक्षणातही हुशार मग हे काय होऊन बसले होते????

जी स्वतः एक प्रेरणेचा झरा होती ,ती कोणत्या डबक्यात जाऊन पडली होती...??

बंधन जरी लादली तरी तिने स्वीकार का करावा??

कदाचीत प्रेमापोटी.. मंगेशच्या प्रेमापोटी....
सर्वस्व मानलं होतं ना त्याला???
मी त्याचीच झाले होते..समर्पण मीच केले होते म्हणजे??

सुरवतीपासून खेळ खेळत राहिला आणि मी प्रेमापोटी बसं वेडी झाले... भावनेच्या ओघात, प्रेमाच्या ओघात मी इतकी वाहवत गेले की मला योग्य आणि अयोग्य ह्याच्यातला फरकही कळू नये???

माझं शरीर,माझं आयुष्य फक्त त्याच्यासाठी जगण्याची शप्पथ मी फक्त एकटीनेच घेतली...सात फेरे मी एकटीनेच घेतले????तो कुठेच नव्हता....तो फक्त भास होता का??मी संसाराला सुरवात केली आणि त्याने काय केले?प्रत्येकवेळी माझ्या भोळ्या वृत्तीचा फायदा घेतला..मला प्रत्येकवेळी खोटं ठरवलं... नको ते आरोप..भांडण,वादविवाद,कलह बस हेच आहे माझ्या आयुष्यात.... मला कळतंय माझ्याशी चुकीचे वागत आहेत ते...मग तरीही मी हे सहन का करते आहे??

लग्न झाले म्हणून???
लग्न झाले म्हणजे मी ते निभावण्यासाठी तोंड दाबून बुक्यांचा मार किती दिवस सहन करायचा..??

असं लग्न जे फक्त मानसिक त्रास देते ,विश्वासघात करते ते मोडू नये म्हणून मी गप्प बसावं का??

ह्या अश्या अनेक प्रश्नाच्या विळख्यात अडकलेली राधा आईची दरवाज्यावर थाप पडली तशी भानावर आली ..लगेच डोळे पुसले ..तिने चेहऱ्यावर पाणी मारले आणि दरवाजा उघडला...

मंगेशचा call आला होता..राधाचा मोबाईल बाहेर होता.आईने तिच्या मोबाईल हातात दिला आणि शेजारीच उभी राहिली....


मंगेश:"ए बाई कधी येतेस??किती दिवस राहनार आहे तुला बोललो होतो ना दोन दिवसात ये मग ??


राधा आई समोर होती ,म्हणून चेहऱ्यावर हास्य आणत म्हणाली हो हो येते लवकरच.


आईला फार कौतुक वाटत होते.....

मंगेश:"तुझा पगार आल्यावर लगेच मला transfer कर,मला जरा काम आहे"

राधा:"कसलं काम????

मंगेश :"तुला काय करायच्या चौकश्या??तू ट्रान्सफर कर"....

राधा:"हो करते"..

मंगेशने कॉल cut केला.....


आई राधाला चिडवतच म्हणाली"काय बाई, जावई बापूंना काही करमत नाही वाटतं.. किती ती आठवण येते आहे तुझी...

राधाने नको असताना आईला हास्य दिले…..

पुन्हा रूममध्ये निघून गेली..

"आई तुला कसं सांगू ,तुझ्या जावयाला माझ्यावर प्रेम नाही..ना त्याच्यात माणुसकी आहे..तुझा गोड गैरसमज दूर करावा खूप वाटते पण हतबल का होऊन बसले माहीत नाही..तुमच्या प्रेमामुळे ..किती प्रेम करता ना तुम्ही दोघं. मला खरचटलं तरी कासावीस होणारे तुम्ही;जर का तुम्हाला तुमच्या लेकीच्या विस्कळीत झालेल्या संसाराचं रूप जरी कळलं तरी तुम्ही कोसळून जाल हीच भीती वाटते.. .......ज्या व्यक्तीने तुम्ही दोघं आजाराने ग्रस्त होता तेव्हा एकदाही विचारपूस केली नाही..पण तो तुमच्या लेकीचा जावई आहे,म्हणून किती तो आदर करता..पुन्हा तो लेख तिने वाचला...कधी कल्पना केली न्हवती काल्पनिक लेख मला वास्तव जगात जगण्याची प्रेरणा देईल.....

क्रमशः


काय असेल राधाचे पुढचे पाऊल......पुढील भागात वाचायला विसरू नका..पुढील भाग लवकरच..
©®अश्विनी ओगले..
लेख अवडल्यास लाईक, शेअर कंमेंट करायला विसरू नका......

मला फॉलो करायला विसरू नका..ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..