May 15, 2021
नारीवादी

जनाबाई चाळीतली राधाक्का

Read Later
जनाबाई चाळीतली राधाक्का

जनाबाई चाळीतली राधाक्का

राधाक्काचं लग्न.तिच्या लहानपणीच अगदी नकळत्या वयात म्हणजे तिला पदर यायच्या आधीच झालं होतं.

राधाक्का पदर येईस्तोवर माहेरी वाढली. तिला पदर आला तेव्हा त्यावेळच्या पद्धतीनुसार काही माणसं सनईचौघडा घेऊन हा संदेश द्यायला तिच्या सासरी पाठवली होती. मग एका शुभमुहूर्तावर राधाक्काचं सासरी आगमन झालं. सत्यनारायणाच्या पुजेला उभयता बसल्यानंतर राधाक्काला सासूने तिच्या यजमानांच्या गोविंदपंतांच्या खोलीत जाण्यास सांगितले. 

राधाक्काला गोविंदपंतांची फार भीती वाटायची. ती सासूस विनवे,"मला तुमच्यासोबत निजू द्या." मग सासू तोंडाला पदर लावून हसायची व राधाक्काची समजूत काढायची. 

विशीच्या आत राधाक्काला तीन मुलं झाली. प्रणयसुखाबाबत वगैरे ती अनभिज्ञ होती. रात्री नवऱ्यास काय हवे ते द्यायची व पहाटे उठल्यावर पाणी शेंदायची,सडासारवण करायची,केरवारा काढायची,बेडे सोलायची,स्वैंपाकपाणी करायची. तिची मुलं आजीच्या अंगाखांद्यावर खेळत. कसलंसं निमित्त झालं नि राधाक्काची सासू कालवश झाली. 

नवऱ्याचा लहरी स्वभाव..नुसता जमदग्नी. राधाक्का गोविंदपंतांच्या तालावर नाचत राहिली. गोविंदपंतांनी बाहेर एक बाई ठेवली होती हे तिला आडूनाडून कळले होते पण विचारायची टाप नव्हती तिची. पुढे पुढे तर गोविंदपंत त्या बाईला घेऊन राजरोसपणे हिंडायचे.

एकदा गोविंदपंतांना साथीचा ताप आला. खूप वैद्यहकीम केले पण ताप जाता जाईना. शेवटी गोविंदपंतांचेही देहावसान झाले.

राधाक्का तेव्हा बावीसेक वयाची होती. संसार,म्हणजे काय हे कळायच्या आधीच तिला वैधव्य आलं. अंगावरला साज काढण्यात आला. राधाक्का भुंडी झाली.  माडापोफळीचं उत्पन्न होतं पण तिचे इतर दिरभावजयी तिला सुखाने जगू देईनात. 

शेवटी काळजावर दगड ठेवून तिने ते घर सोडलं अन् एका भटणीच्या वसरीला भाड्याने राहू लागली. ही भटीण फार दयाळू,प्रेमळ होती. राधाक्का चरितार्थासाठी चार घरची भांडीकुंडी करायची. राधाक्का घरात नसताना भटीण तिच्या मुलांसोबत राधाक्काच्या मुलांनाही सांभाळायची. त्यांना खाऊपिऊ घालायची. मुलं संस्कारात वाढत होती. शाळा शिकत होती. मोठी पमा,मधला विकास व धाकटी संजू. भटीण आपल्या मुलांसोबत राधाक्काच्या मुलांचाही अभ्यास घ्यायची. 

दिवस,महिने,वर्षे पाठी पडत गेली. राधाक्काची मुलं मोठी होत होती. विकास मेट्रीक पास झाला. एका नातेवाईकाच्या ओळखीवर मुंबईस आला. त्या नातेवाईकाच्या ओळखीवर बीएसएनएलमधे भरती झाला. खानावळीत जेवू लागला. पमाला अभ्यासाची गोडी होती. ती पुढे शिकत राहिली. बीए झाली. धाकट्या संजूला अभ्यासाची विशेष आवड नव्हती. ती जेमतेम मेट्रीक पास झाली. तिला पुढे शिकायची इच्छा नव्हती. 

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींनी खेड्यापाड्यातील महिलांसाठी एक योजना आणली होती. तिच्या अंतर्गत महिलांना शिवणकामाचे शिक्षण मोफत दिले जात होते. संजू शिवणक्लासला जाऊ लगली. पोलकी,झगे,झबली,टोपरी शिवू लागली. तिच्या शिवणकामात सफाई होती. संजू व तिच्यासारख्या इतर मुलींचा शिवणकामाचा कोर्स पुर्ण झाल्यावर या योजनेंतर्गत प्रत्येकीला मोफत शिवणयंत्र,कातर,सुई,धागे देण्यात आले. संजू मन लावून हे काम करत होती.

दोनेक वर्षांत विकास मुंबईत स्थिरस्थावर झाला. त्याने दादरच्या चाळीत एक खोली घेतली व आई व बहिणींना मुंबईस घेऊन आला.

दादरला जनाबाई चाळीतल्या खोलीत राधाक्काने संसार थाटला. आजुबाजूची माणसं जीवाला जीव देणारी होती. सगळे सण चाळीत उत्साहात साजरे व्हायचे. दहीहंडीला मधल्या चौकात उंचावर हंडी लावली जायची. वर्षभर सराव केलेली गोविंदा पथकं हंडी फोडायला यायची. धाक्कुमाक्कुम धाक्कुमाक्कुम बोल बजरंग बली की जय अशी गाणी लाऊडस्पीकरवर लावली जायची. थरावर थर चढू लागले की गेलरीत सगळी आबालव्रुद्ध बघायला गोळा व्हायची..गोविंदांच्या अंगावर बादल्यांनी,कळशांनी पाणी ओतायची. लहानगी पाण्याने भरलेले फुगे मारायची. 

एका पथकाला हंडी फोडायला जमली नाही की ते पथक जायचं मग दुसरं ,तिसरं,चौथं अशी पथकं येत रहायची.चारपाच वाजेस्तोवर हा कार्यक्रम सुरु असायचा. एकदाची हंडी फुटायची. सारे चाळकरी अरे बोल बजरंग बली की जय,गोविंदा रे गोपाळा यश़ोदेच्या तान्ह्याबाळा असे म्हणून जल्लोष करायचे. लाह्या,दूध,दही,काकडी,इतर फळांच्या फोडी याचा गोपाळकाला साऱ्यांना आवर्जुन वाटला जायचा.

चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव असायचा. अकरा दिवस सगळे चाळकरी गणरायाची मनोभावे सेवा करायचे. नेत्ररंजक  देखावे उभे करायचे. भाविकांची दर्शनासाठी रांग लागायची. राधाक्का आता तिच्या या घरात गणपती बसवायची. त्याची मनोभावे सेवा करायची. राधाक्काने चाळीत खानावळ सुरु केली. मिलमधे काम करणारी माणसं जी एकटीच मुंबईत रहायची ती तिच्या खानावळीत जेवू लागली.

पमाला बघायला स्थळं येत होती. पमा दिसायला सावळी होती. अभिजीत दळवी यांना ती पसंत पडली. ते पोस्टात कामाला होते. पमाचे सेविंग,राधाक्काची बचत यावर तिचे लग्न लावण्यात आले. लग्नात तांदूळ निवडण्यापासून ते वर्हाडी मंडळींची सरबराई करेपर्यंत चाळीतली सारी मंडळी जणू घरचं कार्य असल्यासारखी वावरली. 

राधाक्का विचार करायची,रक्ताच्या नात्यांनी दगा दिला पण ही चाळीतली माणसं जीवाला जीव लावणारी भेटली. पमीला निरोप देताना चाळीतल्या सगळ्या बायकांचे डोळे भरले होते. पमीही दादाच्या,आईच्या गळ्यात पडून खूप रडली. ती गेल्यावर राधाक्काचं घर हळवं झालं. 

राधाक्काला,संजुला चाळकऱ्यांनी पुन्हा हसतंखेळतं केलं. संजू एका गारमेंट कंपनीत कपडे शिवायला जाऊ लागली. तिथेच तिला सागर भेटला. दोघांची नेत्रपल्लवी झाली. मैत्री वाढत गेली. मैत्रीचे रुपांतरण प्रेमात झाले. दोघं कधी राणीच्या बागेत,कधी छोटा काश्मीरला फिरायला जाऊ लागली, एकत्र सिनेमे पाहू लागली.

 एकदा विकास मित्रांसोबत हॉटेलात नाश्ता करत होता. बोलता बोलता त्याची नजर फेमिली रुमकडे गेली. गुलाबी साडी,फुलाफुलांची..त्याने संजुला भाऊबीजेला घेतलेली अगदी तशीच..साडीचा काठ हिरवा अगदी सेम टू सेम. विकासने चप्पल पाहिली तीही संजूच्या चपलेसारखीच..इतकं साम्य कसं शक्य आहे! 

विकासच्या काळजाची धडधड वाढली. त्याची ही चलबिचल मित्रांना जाणवली. त्यांचही फेमिली रुमकडे लक्ष गेलं. फेमिली रुमचं दार उघडत असताना विकासने पाहिलं. संजू..हो ती संजूच होती. मित्रही अवाक झाले. विकासने मान खाली घातली. संजू सागरसोबत हातात हात घालून निघून गेली. भावाने तिला पाहिलय याची त्या वेडीला सुतराम कल्पना नव्हती.

विकास घरी आला. संजू घरी पोहोचली होती. आईस पोळ्या लाटून देत होती. खानावळी जाईस्तोवर विकास गप्प राहिला मग त्याने संजूस विचारले,"कुठे गेली होतीस?"
संजू म्हणाली,"गारमेंटमधे."
"का उदरभरण हॉटेलच्या फेमिलीरुममधे? खरं सांग."
आता मात्र संजू चपापली. तिला कळलं,आपल्याला दादाने पाहिलं. चोरुन ठेवण्यात अर्थ नव्हता. तिने राधाक्कास व दादास सांगितलं,"माझं सागरवर प्रेम आहे." राधाक्काने कधी नव्हे तो लेकीवर हात उचलला. राधाक्काची पाची बोटं संजूच्या गालावर उमटली. ती रात्र तिघांनीही आपापल्या अंथरुणात  रडत घालवली. विकासला वाटलं,"उगीचच आईला सांगितल. माझ्यामुळे संजूला मार पडला."

सागर त्यांच्या जातीचा नव्हता. शिवाय त्याचा पगारही तुटपुंजा. सकाळी राधाक्काने संजूला परत समजावलं पण संजू तिचा हेका सोडेना. विकास संजूवर खूप ओरडला. आम्हाला समाजात रहायचय म्हणाला. संजूचं बाहेर जाणं बंद केलं पण संजू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. चाळीतल्या जुन्याजाणत्या माणसांनीही संजूची समजूत काढली,पण व्यर्थ.

 एकेदिवशी संजू सार्वजनिक शौचालयात जाण्याच्या निमित्ताने जी गेली ती थेट सागरकडे. सागरचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते. सागर एकटाच एका लहानशा खोलीत रहात होता. सागरचे मित्र मदतीला धावून आले. मित्रांच्या मदतीने  नोंदणीकृत पद्धतीने संजू व सागरचं लग्न झालं.

सागर संजूला खूप जपायचा. त्यांनी एका चाळीत भाड्याने घर घेतलं. सागर सकाळी उठून खालच्या नळावरून पाणी भरायचा. रेशनच्या दुकानातही स्वतः रांग लावून रेशन घेऊन यायचा. संजूला राहूनराहून आईची,दादाची आठवण यायची. सागर तिची समजूत घालायचा..हेही दिवस जातील अन् एक दिवस तुझे घरचे आपला स्वीकार करतील असं म्हणायचा. यासाठी संजू देवाची आराधना करायची. 

संजूच्या दादाला,विकासला तिने लग्न केलं हे समजलं. संजू व सागर दोघंही सज्ञान असल्याने तो हतबल होता. तो कायद्यापुढे सागरचं काही वाकडं करु शकत नव्हता.

विकास चांगला नोकरीला असल्यामुळे त्याच्यासाठीही आता स्थळं येऊ लागली. नात्यातलीच एक मुलगी नंदा विकासला पसंत पडली. राधाक्काने युलीची चौकशी केली. मुलगी गोरीपान,उंच,सडसडीत होती. तिला वडील नव्हते. मोठा भाऊ होता. तिची नुकतीच ओटीपोटाची कसलीतरी शस्त्रक्रिया झाली होती. 

राधाक्काने विकासला समजावून सांगितले की आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू. जरा रंगरुपाने डावी असली तरी चालेल पण प्रक्रुतीने बरी अशी..पण विकासच्या मनावर नंदाची जादू झाली होती. त्याने राधाक्कास सांगितलं की लग्न करेन तर नंदाशीच. राधाक्काचं त्याच्या हट्टापुढे काही चाललं नाही.

काही नातेवाईकांनी पुढाकार घेतला नि विकासला आता संजूला व तिच्या नवऱ्यास माहेरी येण्यास परवानगी दे असं समजावलं. विकासही तसा संजूबाबत हळवा होता. ती घर सोडून गेल्यापासून राधाक्काही तिच्या काळजीने नीट जेवत नव्हती. 

संजूचा पत्ता शोधून विकास संजूच्या घरी गेला. संजू घरात एकटीच होती. ती नेहमीप्रमाणे देवाची आराधना करत बसली होती. दारावर ठकठक ऐकू येताच ती जागेवरुन उठली व तिने दाराची कडी काढली. दारात तिचा दादा उभा होता. देवाने तिचं ऐकलं होतं. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. ती दादाच्या कुशीत शिरली. विकासच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागलं. त्याची लाडकी बहीण इतक्या दिवसांनी त्याला भेटत होती. 

संजूने विकासकडे आईची चोकशी केली. त्याला चहापाणी दिलं. त्याच्या आवडीचा तिच्या हातचा गोडाचा शिरा व पुऱ्या केल्या. किती दिवसांनी विकास बहिणीच्या हातची शिरापुरी खात होता! तितक्यात सागर आला. सागरलाही विकासला पाहून आनंद झाला. दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. सागरने त्या उभयतांना लग्नाचं आमंत्रण दिलं व आठवडाभर आधीच रहायला यायला सांगितल.

लग्न पंधरा दिवसांवर आलं तशी राधाक्काने एकेक कामं हातावेगळी करायला सुरुवात केली. साताठ बायका बोलावून लग्नाचे तांदूळ निवडले. चाळीतल्याच चौकातल्या स्टेजवर लग्न पार पाडायचे ठरले. पत्रिका छापल्या गेल्या. जवळच्या नातेवाईकांना राधाक्का व विकास स्वतः जाऊन लग्नाचं आमंत्रण देत होते.

 एके दिवशी विकास आईला घेऊन संजूच्या घरी गेला. इतक्या दिवसांनी आईला बघताच संजूने आईला मिठी मारली. राधाक्कालाही लेकीला पाहून भरुन आलं. लेकीचा संसार तिनेनी भरल्या डोळ्यांनी पाहिला. तिचं मन समाधान पावलं. लेक सुखी आहे हे तिच्या तब्येतीवरुन कळत होतं. राधाक्का जावयाशी बोलली. एका नव्या नात्याला प्रारंभ झाला.

पुऱ्या चाळीला लायटींगने सजवलं. दादरच्या फुलमार्केटमधून फुलं आणून स्टेज सजवला गेला. चाळीचा ठरलेला भटची होता. त्याच्या हस्ते लग्न पार पडलं. लग्नाला सगळे चाळकरी उपस्थित होते. पमा व संजू करवल्या होत्या. राधाक्काने दोन्ही जावयांचा व लेकींचा रीतीप्रमाणे मानपान केला. दोघी बहिणींनी नात्यातल्या व चाळीतल्या साऱ्या महिलांना हळदकुंकू लावून खणानारळाने ओट्या भरल्या. बुंदी गाळण्यासाठी व लाडू वळण्यासाठी खास कारागीर बोलवला होता. पंगतींवर पंगती उठल्या. शेवटी नवरानवरीची पंगत बसली. साऱ्यांनी वधूवरांना घास भरवण्याचा आग्रह केला. नंदाने लाजतलाजत नाव घेतले. निरोपाचा क्षण जवळ आला तशी नंदा दादाला मिठी मारुन खूप रडली. तिची आई राधाक्काला म्हणाली,"जपा ओ माझ्या लेकीला. थोडी हट्टी आहे तेव्हा सांभाळून घ्या."

 विकास व नंदाला पांढऱ्या घोड्यावर बसवलं.  एक तासभर वरात चालत होती. पमी,संजू व चाळकरी लग्नात बेंडबाजाच्या तालात खूप नाचले. 

दारात वरात आली तशी पमीने लगबगीने आत जाऊन त्या उभयतांवरुन भाकरतुकडा ओवाळून टाकला. पमी व संजू दोघीही दारात दादाच्या लेकीला मागणी घालायला उभ्या राहिल्या. दादाने हो म्हणताच त्यांनी त्यांची वाट सोडली.

वेगवेगळे खेळ खेळण्यात जोडप्याचे पहिले दोन दिवस गेले. नंदाला दोन्ही नणंदांचा स्वभाव आवडला. टिचभर खोली असली तरी आजुबाजूच्या खोल्याही पैपाहुण्यांची उठबस करण्यासाठी शेजाऱ्यांनी राखून ठेवल्या होत्या. दोन दिवसांनी सत्यनारायणाची पूजा घातली.

 पुजेच्या दिवशी नंदाला दोन्ही नणंदांनी छान नटवलं. डाळींबी रंगाची,जरीच्या बुट्ट्यांच नऊवार लुगडं नंदा नेसली होती. खांद्यावरुन जरतारी कुयऱ्यांचा पोपटी रंगाचा पदर घेतला होता. गळ्यात मंगळसुत्र,आईने दिलेली सोन्याची चेन,तनमणी,हातात हिरवाकंच चुडा,मोत्यांचे तोडे,दंडात रुतलेलं डाळिंबी खड्याचं बाजुबंद, नुकत्याच न्हालेल्या ओलेत्या केसांची बटवेणी,त्यात मोगऱ्याचा गजरा..विकास तिच्या या आरसपानी मराठमोळ्या सौंदर्याकडे भान हरपून पहात राहिला.

संजूने तिच्या खांद्यावर नाजूक कशिदा काढलेली हिरव्या रंगाची शाल ठेवली. मोती कलरचा झब्बा,मोती कलरचं धोतर व त्याच रंगाचं खांद्यावर उपरणं घेतलेला विकासही खूप हँडसम दिसत होता. पमाने त्या उभयतांच्या वस्त्रांची गाठ मारली. 
गुरुजींनी सत्यनारायणाची कथा सांगण्यास प्रारंभ केला. 
तुलसीपत्रे सत्यनारायणाला वहाताना,गंधाक्षता वहाताना विकासच्या उजव्या हाताला नंदाने तिचा हात लावला होता.

पुजा संपन्न झाली तशी पमीने उखाणा घेऊन त्या दोघांच्या वस्त्रांची गाठ सोडली. विकास व नंदाने गुरुजींना वाकून नमस्कार केला नंतर घरातील इतर मंडळींनाही केला. संध्याकाळी दोघंजणं गणपतीच्या देवळात जायला बाहेर पडली तसं संजूने नंदाला म्हंटलं लवकर या हं वहिनी.

विकास व नंदा असे प्रधमच बाहेर निघाले होते. दोघंही परस्परांना नवीन होते. गणपतीच्या देवळाजवळ त्यांनी श्रीफळ,फळं,फुलं घेतली व मुर्तीला वाहिली,नमस्कार केला मग तिथल्या बागेतल्या हिरवळीवर बसले. तिथल्याच बाजुच्या बेंचवर एक प्रेमी युगुल बसलं होतं. ते प्रेमरसात बुडून गेलं होतं. त्यांचा प्रेमालाप पाहून नंदाने चटकन मान खाली केली. विकास म्हणाला,"शहरात घरं लहान असतात. प्रेम व्यक्त करण्यास जागा भेटत नाहीत म्हणून मग हे असं बागेत,झुडुपामागे गुटरगु करतात. नंदाला विकासच्या बोलण्याचं हसू आलं.

काही दिवस अगदी मखमली गेले नंतर मात्र सासवासुनांत भांडणं होऊ लागली. अनेक टक्केटोणपे खाल्ल्याने राधाक्काचा स्वभाव थोडा कडक झाला होता. नंदाला मात्र माहेरी कुणी रागे भरणारं नव्हतं. तिचे वडील लहानपणीच गेल्याने भावाची फार लाडकी होती ती. तिला राधाक्का काही बोलली की राग येई मग दोघींची शाब्दिक चकमक सुरु होई. 

पुढे नंदा बाहेरची झाली की रीतीनुसार बाहेर बसे पण राधाक्काच्या लक्षात आलं की नंदाला जेमतेम अर्धाएक दिवस विटाळ होतो. लेकाने हे काय म्हणून लोढणं गळ्यात बांधून घेतलं असं दुर्गाक्काला झालं. तिचं मन सैरभैर झालं. एकहाती नवऱ्याच्या मदतीशिवाय तिने संसाराचा गाडा ओढला होता. लेकाचं लग्न झालं की मांडीवर नातवंड खेळतील अशी वेडी आशा होती तिला. 

पमीला एक मुलगा होता व संजुलाही काही वर्षांत दोन मुली झाल्या. पमी सरकारी नोकरीत होती. दोघांच्या पगारामुळे छान घर,फर्निचर..सगळं कसं गुडी गुडी होतं. नंदा पमी माहेरी आली की तिचा यथोचित मानपान करायची. पमीही तिच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन यायची.  

संजूची परिस्थिती हलाखीची होती. मुली झाल्यापासून ती घरातच असायची. तिचा नवरा एकटा कामाला जायचा. हातावरचं पोट होतं. तिचंच तिला भागताना मुश्कील होतं. कधीतरी तिलाही आईला बघायला यावंस वाटे. ती आली की नंदाचा नुसता तीळपापड होई. संजू घरी आलेली तिला आवडत नसे म्हणजे तसे ती बोलून दाखवत नसे पण काही गोष्टी न बोलताही समजतात बाईच्या जातीला. 
चाळकरी मात्र संजुला व तिच्या कुटुंबियांना प्रत्येक सणासमारंभाला आवर्जुन बोलवायचे. तिचा यथोचित मानपान करायचे. एका घरच्या लेकी म्हणजे त्या साऱ्या चाळकऱ्यांच्याच लेकीबाळी अशा आपलेपणाच्या भावना होत्या चाळकऱ्यांमधे.

नंदा व विकासने एका गरीब नातलगाची मुलगी,जया वाढवावयास घेतली. तिला शाळेत घातले. नंदा जयाला शाळेत सोडूआणू लागली. जयामुळे घरात  चैतन्य आले. 

एकदा संजुने वहिनीला फोन केला की आईला बघायला येते. ती घरातली कामं,काही फॉलबिडींग आवरुन दुपारी दोन वाजता माहेरी पोहोचली. सोबत तिच्या मुली होत्या पण नंदाने तिला जेवणार का म्हणूनसुद्धा विचारलं  नाही. संजू तासभर थांबली. आईची चौकशी केली. तिच्याजवळ आयोडेक्स नव्हतं ते घेऊन आली. तिच्या कंबरेला चोळलं. दोनशे रुपये आईला कनवटीला बांधायला दिले व भरल्या डोळ्यांनी घरी गेली. 

नंतर संजूचं माहेरी जाणं तसं विरळच झालं व भाऊभावजयही तिला काही आग्रहाने बोलवत नव्हते. पमीचा मुलगा दहावी झाला. त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. संजू मुलींच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष देत होती. मोठी नर्स झाली. धाकटी इंजिनिअर झाली. दोघींनाही चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. संजूच्या नवऱ्याचा धंदाही जोरात चालू झाला. संजूने टॉवरमध्ये घर घेतलं.

आता नंदा संजुलाही मायेने फोन करु लागली. तिला माहेरी येण्याचा आग्रह करु लागली. संजूला ही माया तिच्यावर की तिने कमावलेल्या संपत्तीवर हे कळत होतं पण ती उघडपणे बोलून संबंध वाईट करत नव्हती.

राधाक्का एका कोपऱ्यात बसून थकल्या डोळ्यांनी सुनेचा कारभार पहात राही.  

**

ही एक सत्यकथा आहे. राधाक्का व तिच्या लेकीसुनांच जीवन असंच चालू आहे. कोण बरोबर कोण चूक हे ठरवता येत नाही कारण प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे. नंदा त्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ करत आहे. राधाक्का एकटीच बाहेर बसून रहाते. कोणी मुलं खेळत असली व त्यांचा चेंडू तिला मिळाला की दडवून ठेवते. नंदा मग राधाक्का झोपली असताना मुलांना त्यांचे चेंडू परत करते . राधाक्का आताशी एकभुक्त रहाते. दोन वेळ जेवणं तिच्या प्रक्रुतीला मानवत नाही. सत्यकथा असल्याने उगाचच शेवट करायच्या भानगडीत पडले नाही. म्हणतात ना 

जीवनगाणे गातच रहावे तसंच काहीस.

--------सौ.गीता गजानन गरुड.