राधा भाग ७

“विकी, वहिनी तुला पहात होती.”विकासचा चेहरा पाहण्यासारखा होता. त्याला तर अगदी मनात गुदगुल्या होत होत्या. त्या विचाराच्या दुनियेत तो रंगला होता.



कथेचे शीर्षक – राधा
विषय – कौटुंबिक
फेरी – राजस्तरीय करंडक कथामालिका.
संघ – रायगड रत्नागिरी

राधाच्या आईला आणि आजीला भेटून गौरी प्रचंड खुश झाली होती आणि तितकीच हळवी. त्यात आजीने निघताना दिलेली भेट ह्यामुळे ती गहिवरून गेली होती.
घरी गेल्यावर ती आईला सगळं भरभरून सांगू लागली. गौरीच्या आईने पहिल्यांदा गौरीला इतकं भावनिक होताना पाहीले होते. भावना आणि गौरीचा दुरदूरचा संबंध नव्हता.
तिने आईला प्रश्न विचारला
“आई, माझे आजी बाबा का बरं इतक्या लवकर देवाघरी गेले.? बघ ना राधा किती नशीबवान आहे, तिला आजीचे प्रेम मिळते आहे. आणि एक मी ”
इतका वेळ भरभरून बोलणारी गौरी आता शांत झाली होती.
आई डोक्यावर हात ठेवत म्हणाली “जन्म आणि मृत्यू हा काही आपल्या हातात असतो का गौरी? ज्याची वेळ येते तो निघून जातो. अजून असे अमृत बनले नाही की जे प्यायल्यावर माणूस अमर होईल बघ. सत्य आहे त्याला सामोरे जाणे ह्या शिवाय दूसरा पर्याय नसतो.”

गौरी “हो गं आई मान्य आहे. जन्म आणि मृत्यू हा आपल्या हाती नाही; पण तरीही विचार केला तरी किती वाईट वाटते. आपली माणसे आपल्यासोबत नाही. आई मला कधी कधी हा प्रश्न पडतो? आजी आजोबा आता कुठे असतील? इतके वर्ष व्यक्ति जगतो आणि एक दिवस अश्या प्रवासाला निघतो जिथली आपल्याला काहीही एक खबर नसते. काय होत असेल गं आई? खूप प्रश्न मनाला सतावतात.”
“मलाही ठाऊक नाही गौरी. काय होते ? कुठे जातात आपली माणसे ? खूप मोठे कोडे आहे हे. शेवटी प्रत्येकाला जावेच लागते. अगदी शंभर वर्ष जगलो तरी देखील एक ना एक दिवस ती पायरी येतेच बघ. बरं, आता ह्या गप्पा राहू दे दोन घास खाऊन घे” आई.

“आई, माझे पोट गच्च भरलं आहे, नको नको म्हणताना राधा आणि तिच्या घरी सर्वांनीच जेवणासाठी आग्रह केला.” गौरी रूममध्ये जात म्हणाली.
आई तिच्या कामात व्यस्त झाली.

दुसऱ्या दिवशी राधा गौरीची वाट पाहत कॉलेजच्या बाहेर उभी होती. कॉलेजची वेळ झाली होती. राधा रस्त्याकडे डोळे लावून होती. बरीच मुले येत होती. गौरीचा मात्र पत्ता नव्हता. तोच राधाला विकास दिसला. पहिल्यांदाच विकास आणि राधाची नजरा नजर झाली होती. विकास खूपच सुखावला. कमीत कमी राधाने आपल्याला पाहिले ह्या विचाराने त्याच्या दिवसाची सुरवात मात्र सुंदर झाली होती.
विकासचा मित्र राजला माहीत होते की, विकासला राधा आवडते.
वर्गात गेल्यावर राज विकासच्या कानात म्हणाला “विकी, वहिनी तुला पहात होती.”
विकासचा चेहरा पाहण्यासारखा होता.
त्याला तर अगदी मनात गुदगुल्या होत होत्या.
त्या विचाराच्या दुनियेत तो रंगला होता.

गौरी धावतच आली.
राधा रागातच म्हणाली “काय हे गौरी ! किती उशीर ? कधी पासून वाट पाहत आहे. ?”
गौरी कान पकडतच म्हणाली “सॉरी गं राधा, माझी ट्रेन मिस झाली.”
“बरं चल आता लवकर नाही तर क्लास मिस होईल.”
राधा आणि गौरी दोघी आत आल्या तसे राज मुद्दाम विकास विकास करून ओरडू लागला.
राधाच्या लक्षात आले पण ती आपली बॅग सावरत बाकावर बसली.
विकास तिला चोरून पाहत होता. त्याला आशा होती, राधा त्याला बघेल. कसलं काय ती तर आल्या आल्या डोकं पुस्तकात घालून बसली होती.
असेच दिवस जात होते.
विकास चातकाप्रमाणे राधा कधी भाव देते ह्याची वाट पाहत होता ; पण काही केल्या राधा काही भाव देत नव्हती. त्यालाच काय ती कोणत्याही मुलाला नजर वर करून पाहत नव्हती.
कॉलेजमध्ये चित्रकला स्पर्धा झाली. गौरीला विश्वास होता की राधाचा नक्की क्रमांक येईल.
“मी म्हणाले होते ना राधा तुझा नंबर येईल” गौरी.
“हो गं छान वाटले. खूप वर्षाने भाग घेतला स्पर्धेत आणी दूसरा क्रमांक आला”
“काय? दूसरा क्रमांक? भुवया उडवतच गौरी म्हणाली.
“हो”
“मग, पहिलं कोण आले?”
“विकास आला”
“काय? विकास ?
गौरीने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले.
“इतकं आश्चर्यचकीत व्हायला काय झाले. त्याने खूप छान काढले होते चित्र. तो पाहिला क्रमांक डीसर्व करतो.” बॅगमध्ये पुस्तक ठेवत राधा म्हणाली.
“काय बात आहे राधा, खूप तारीफ करते आहेस विकासची?”
हे बोलायला आणि राज आणि विकास वर्गात यायला असे झाले. विकासला पाहिले तशी ती गौरीला शांत बस म्हणाली.
विकासने राधाच्या तोंडून नाव ऐकले आणि भलताच खुश झाला.
त्याचा आनंद इतका अनावर झाला की, चक्क त्याने राजला मिठी मारली.
राजला विकासचे खरे प्रेम कळत होते. विकास वेडावला होता. तो राजला मनातले सर्व सांगत असे.

राज “एकदा राधाला तुझ्या मनातले सांग तरी. असे किती दिवस दुरून फक्त राधाला पहात राहणार. तुझ्या मनातले ओठावर कधी येणार?
“माहीत नाही राज, मला फार भीती वाटते. मी जर तिला मनातले सांगितले आणि राधा नाही म्हणाली तर ? विचारही करवत नाही.
“हो पण हो किंवा नाही काही तरी कळू दे..राजचे बोलणे पूर्ण होत नाही तोपर्यंत विकास रडावलेल्या सुरात म्हणाला “प्लीज, प्लीज राज काहीच बोलू नको. ती जर नाही म्हणाली तर ..
“तर काय विकास?” विकासाच्या डोळ्यातील भाव टिपत त्याने प्रश्न केला.
“तिच्याशिवाय मी कोणाचाही विचार करू शकत नाही.”
विकासचे पाणावलेले डोळे भरूपूर काही सांगून जात होते.
राज विकासच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला
“तू तर एकदम पक्का आशिक निघालास भावा. तू तर आकंठ बुडाला आहेस तिच्या प्रेमात. राधा तर तुला पहात देखील नाही. अजिबात भाव देत नाही; तरी देखील तू तिच्यासोबत आयूष्याची स्वप्न पाहू लागला.”
विकासला राधा आणि गौरी त्याच्याजवळ येताना दिसल्या.
विकासने राजला इशाऱ्याने शांत बसण्यास सांगितले.
राजही शांत बसला. मागे वळून पाहिले तर राधा आणि गौरी होती.
विकासच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली.
एव्हाना वर्गातली सगळी मुलं निघून गेली होती.
गौरीच राधाला म्हणाली होती विकासचे अभिनंदन करूयात.
राधा नको म्हणत होती; पण गौरीने हट्ट केला. गौरीच्या सांगण्यावर ती आली होती.
गौरी “अभिनंदन विकास. चित्रकलेत पहिला क्रमांक आला त्यासाठी”
विकास “धन्यवाद गौरी”
विकास राधाकडे नजर रोखून बघत होता.
राधा म्हणाली “अभिनंदन विकास”
विकासला तर वाटत होते की तो स्वप्न पाहत आहे. राधा चक्क त्याच्याशी बोलत होती. त्याच्या समोर उभी होती. त्या तंद्रीत तो तिला धन्यवाद देखील बोलला नाही.
राज त्याला हळूच चिमटा काढत म्हणाला “विकास, राधा तुझे अभिनंदन करते आहे.”
विकास भानावर आला. चेहऱ्यावर स्मितहास्य देत तो राधाला धन्यवाद म्हणाला.
दोघी निघून गेल्या. विकास राधाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच होता.
राज त्याला चिडवत म्हणाला “विक्या आता काही खरं नाही. चक्क राधा तुझ्याशी बोलली. आता तुझी प्रेमाची गाडी पुढे सरकते आहे बघ.”
विकासचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला होता. तो चक्क लाजला.
विकासला आता आशा लागून राहिली होती की,मी खरं प्रेम करतो तर नक्की ते राधापर्यंत पोहोचेल. तिला लवकरच जाणीव होईल.
तो विचारांचे पूल बांधू लागला. तिला मी आवडतो म्हणून तिने अभिनंदन केले का?

विकास अश्या मुलीच्या प्रेमात पडला होता जी प्रेमाचा विचार स्वप्नातही करत नव्हती . जिला फक्त आणि फक्त उच्च शिक्षण आणि स्वत:च्या पायावर उभे राहायचे होते.


क्रमश:
अश्विनी ओगले.
आजचा भाग आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या

🎭 Series Post

View all