राधा भाग ६

नात्यात येणे सोप्पे असते पण ते नाते शेवटपर्यंत निभावणे अवघड..



कथेचे शीर्षक – राधा
विषय – कौटुंबिक
फेरी – राजस्तरीय करंडक कथामालिका.
संघ – रायगड रत्नागिरी
रविवारचा दिवस उजाडला. राधाकडून आजीविषयी इतके ऐकले होते की आता कधी भेटते आजीला असे झाले. आजीच्या भेटीसाठी गौरी खूप आतुर झाली होती. राधाही गौरी येणार म्हणून खुश होती. तिच्यासाठी फक्कड जेवणाचा बेत केला होता. गौरी पहिल्यांदाच येणार होती. मस्त पाव भाजी, गुलाबजामून भरपूर काही पदार्थ केले होते. गौरी घरी आली. आल्या आल्या ती आजीच्या आणि श्रेयाच्या पाया पडली. आजी राधाला म्हणाली,

“राधा, गौरीसाठी पाणी आण बाळ..”

गौरी एकटक राधाच्या आजीला आणि आईला न्याहळत होती. दोघीही दिसायला सुंदर, देखण्या.. गौरी हलक्या आवाजात राधाला म्हणाली,

“किती गोड दिसतात गं आजी आणि आई!”

राधा तिच्याकडे पाहून फक्त हसली.

“बाळा गौरीसाठी छान आल्याचा चहा ठेव बरं..”

आजीने राधाला आवाज दिला. आजीने विषय काढत गौरीला विचारलं.

“गौरी, कुठे राहतेस बाळ?”

“मी, इथेच दादरला राहते आजी.”

गौरीने उत्तर दिलं.

“तुझ्या घरी कोण कोण असते?”

आजीने प्रश्न केला.

“माझ्या घरी आई,बाबा,माझी मोठी बहीण आणि मी..”

गौरी आपल्या कुटुंबाची माहिती देत म्हणाली.

“आजी, मला राधाने जेव्हापासून तुमच्याविषयी सांगितलं नं तेव्हाच मी तिला म्हणाले, मला आजीला भेटायचे आहे. मी तर अगदी तुमची चाहती झाले आहे आजी..”

आजी हसतच म्हणाली

“अगं ती काही माझं कौतुक करणे थांबवत नाही बघ.. नुसतं आपलं आजी, आजी चालूच असते. ”

राधा आजीला मिठी मारत म्हणाली,

“हो, मी तर आजी आजी करणारच. आहेच माझी आजी अशी लाखात एक.”

आजीने राधाचा गालगुच्चा घेतला. ते पाहून गौरीचे डोळे भरून आले.

“काय गं गौरी? काय झाले?”

तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून आजीने विचारलं.

“काही नाही आजी..”

गौरी नजर चोरत म्हणाली. आजी गौरीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली,

“बोल गं गौरी? जशी राधा माझी नात तशीच तू.. मनात काही असेल तर बोलून मोकळे व्हावे.. मनातल्या गोष्टी मनात ठेवल्या की त्रास होतो..”

गौरी डोळे पुसत म्हणाली,

“आजी, तुम्हा दोघींचे नाते किती छान आहे! तुम्हा दोघींना असं एकमेकींच्या कुशीत पाहून मला माझ्या आजीची आठवण आली. आईचे आई बाबा तर मी पाहीले नाही. कारण मी लहान होते तेव्हा ते अपघातात दगावले. बाबांचे बाबा मी वर्षभराची होते तेव्हा गेले आणि आजी मी बारा वर्षांची होते तेव्हा गेली. आजी आणि आजोबांचे प्रेम काही वाट्याला आलेच नाही. तुम्हा दोघींना पाहिले आणि आज खूप आठवण आली..”

पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळले. आजीने रुमालाने गौरीचे डोळे पुसले.

“गौरी, आजी आजोबांचे प्रेम हे वेगळेच असते. मुलांपेक्षा जास्त जीव हा नातवंडावर असतो. तुझ्या आजी आजोबांबद्दल ऐकून वाईट वाटले. हे बघ गौरी, मी पण तुझ्या आजीसारखीच आहे. त्यामुळे कधी वाटलं तर हक्काने ये ह्या आजीकडे.. काय? येशील ना? असे नाराज होऊ नको. चल आता डोळे पुस पाहू आणि चहा घे..”

आजी चहाचा कप पुढे करत म्हणाली. राधालाही गौरीविषयी ऐकून वाईट वाटले. आजी राधाला म्हणाली,

“राधा, तुझी खोली दाखव गौरीला..”

राधा गौरीला तिच्या खोलीत घेऊन गेली. दोघींनी खोलीत प्रवेश केला. आत शिरताच गौरीला खूप प्रसन्न वाटलं. छोटीशी पण स्वच्छ, नीटनेटकी, प्रकाशित टापटीप खोली.. एका बाजूला कपाट आणि त्याच्या शेजारी अभ्यासासाठी टेबल खुर्ची.. खोलीत एका बाजूला छोटासा बेड.. त्यावर अंथरलेली सुंदर नक्षीदार बेडशीट.. भिंतीवर लावलेली सुंदर पेंटिंग्स पाहून गौरीला खूपच आनंद झाला. ती आश्चर्याने ती म्हणाली,

“किती सुंदर पेंटिंग्स आहेत यार! एकदम ऑसम.. तू काढलेस का?”

तिने होकारार्थी मान डोलावली. राधा गौरीला तिने काढलेली पेंटिंग्स दाखवू लागली.

“किती सुरेख चित्र काढले आहेस राधा! तू तर ऑल राउंडर आहेस.. सगळं जमते बघ तुला.. तू तर भारीच आहेस राधा..”

“थॅंक यू गौरी..”

राधा हसून म्हणाली.

“राधा. तू म्हणाली होती तशीच आहे गं आजी.. किती मायाळू आहे आजी! खूप नशीबवान आहेस तू, इतकी छान, प्रेमळ आजी देवाने तुला दिली..”

चित्र पाहता पाहता गौरी म्हणाली.

“हो गं, खरंच देवाने मला खूप खूप गोड आजी दिली आहे. या बाबतीत मी खरंच खूप नशीबवान आहे.”

“हे चित्र पाहून आठवले.. तुला माहीत आहे आपल्या कॉलेजमध्ये चित्रकला स्पर्धा आहे. तू घे ना त्याच्यात भाग.. नक्की जिंकशील बघ..”

गौरीने कॉलेजमध्ये असणाऱ्या स्पर्धेबद्दल राधाला सांगितलं.

“हो चालेल, घेईन मी भाग. मी काय म्हणते आपण जेवूया का आता?”

राधाने गौरीला विचारलं.

“अगं नको. घरी आईने जेवण केले असणार. मी निघते.”

गौरी आढेवेढे घेत म्हणाली.

“गौरी, हे अजिबात चालणार नाही हं.. मी, आई, आजीने मिळून तुझ्यासाठी छान पाव भाजी केलीय. आणि तू टेस्ट न करताच जाणार? मी तुला न जेवता जाऊच देणार नाही.”

राधा निक्षुन म्हणाली. इतक्यात आजी आत आली.

“बघ ना आजी, ही म्हणते मी जाते.. तिला म्हणाले दोन घास खाऊन जा तर ऐकत नाही..”

नाराजीच्या स्वरात राधा आजीकडे लाडीक तक्रार करत म्हणाली

“गौरी, दोन घास खाऊन घे.. तू येणार म्हणून तिने भरपूर तयारी केली आहे बघ. असे न खाता जाऊ नकोस..”

आजी गौरीकडे पाहून म्हणाली.

आता आजीचा शब्द कसा मोडणार? सगळे जेवले आणि पुन्हा गप्पात रंगले. आजी राधा आणि गौरी दोघींना म्हणाली,

“पोरींनो, तुम्हाला माहीत आहे का? आपल्या सगळ्यात जवळ कोण असते?”

गौरी पटकन म्हणाली,

“हो आजी आपला परिवार..”

“अगदी बरोबर.. गौरी, परिवार हा प्रत्येक व्यक्तीसाठी खास असतो. कारण सुखदु:खात आपला परिवारच कायम आपल्या सोबत असतो. ज्या व्यक्तीचा सहवास आपल्याला जास्त लाभतो ती व्यक्ती खूप जवळची होते..”

राधा आणि गौरी आजी काय बोलते आहे हे अगदी मन लावून ऐकत होत्या. थोडं थांबून आजी पुन्हा म्हणाली,

“तर सांगायचा मुद्दा असा की, आपल्या आयुष्यात असलेले मित्र आणि मैत्रिणी देखील आपल्या सहवासात खूप वेळ असतात.. त्यांच्याशी एक वेगळे नाते निर्माण होते. भावनिक नाते, जे तुमच्या दोघींमध्ये निर्माण झाले आहे..”

आजीने गौरी आणि राधाच्या हातावर अलगद हात ठेवला आणि पुढे म्हणाली,

“तुम्ही देखील ही मैत्री कायम जपायची आहे.. कॉलेज झाल्यावरही संपर्कात रहायचे आहे. उद्या लग्न झाले, संसारात पडलात तरीही भेटत रहायचे.. नात्यात येणे सोप्पे असते पण ते नाते शेवटपर्यंत निभावणे अवघड.. तुम्ही दोघी राहणार ना संपर्कात?”

दोघींनीही होकारार्थी मान हलवली. आजीच्या बोलण्यात गहन अर्थ दडला होता. गौरी आणि राधाने जणू आजीला वचन दिले.

“आजी, आम्ही नक्कीच राहू संपर्कात.. ही मैत्री कायम अशीच टिकून राहील.. हो ना गौरी?”

राधाने गौरीकडे पाहिलं.

“हो राधा, ही मैत्री आपण नेहमीच जपूया.”

गौरी तिचा हात हातात घेत म्हणाली. थोड्याच वेळात गौरी घरी जाण्यासाठी निघाली. आजीने गौरीसाठी भेट आणली होती.

“गौरी, हे तुझ्यासाठी..”

गौरीसाठी आणलेलं गिफ्ट तिला देत आजी म्हणाली.

“आजी,नको नको ह्याची काय गरज आहे?”

गौरी आढेवेढे घेत म्हणाली.

“हे काय गं? एकीकडे तू मला माझी आजी म्हणतेस आणि असं वागतेस? आजीला नाही म्हणायचे नसते गं. घे चल..”

आजी हलकेच तिला प्रेमाने दटावत म्हणाली.

“घे ना गौरी, आजी तुला प्रेमाने देतेय.. तिचा आशीर्वाद आहे असं समजून घे..”

राधाने गौरीच्या हातात गिफ्ट दिलं. मग मात्र गौरीला नकार देता येईना तिने भेट स्विकारली. आजी आणि श्रेयाने गौरीला जवळ घेत मायेने डोक्यावरून हात फिरवला. गौरीने राधाला प्रेमाने मिठी मारली आणि सर्वांचा निरोप घेतला.

क्रमश:
अश्विनी कुणाल ओगले.

🎭 Series Post

View all