राधा भाग पाच

माझी लेक आणि नातवंड इथे दुःखात असताना माझं मन कसे बरे लागले असते? तुझ्या बाबांचे आई बाबा तर आधीच देवाघरी गेले होते. कोण होते माझ्याशिवाय माझ्या लेकीला आणि नातवंडाला सावरणारे?”
कथेचे नाव – राधा 
विषय – कौटुंबिक
फेरी – राजस्तरीय करंडक कथमालिका

राधा विचारांच्या तंद्रीतच घरी आली. खरं तर आज गौरीने विकासचा विषय काढला म्हणून आज त्याचे विचार डोक्यात नकळतपणे घोळत होते. तसा तिला त्याच्यात काहीच रस नव्हता पण तरीही का कोणास ठाऊक! असो आज विषय काढला म्हणून कदाचित त्याचे विचार घोळत असावे. आजीचे लक्ष राधाकड गेले. तिच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव आजीच्या नजरेतून काही सुटेले नाही. आजी पुस्तक वाचत होती. आजी जागेवरून उठली. तिला मधेच उठलेले पाहून राधा म्हणाली.

“अगं, आजी का उठतेस ? पुस्तक वाचते आहेस ना? वाच की मग..”

“तुला पाणी आणते.”

आजी किचनमध्ये जाता जाता म्हणाली. राधा बॅग ठेवत म्हणाली,

“असू दे गं आजी, मी घेते पाणी. तू वाच पुस्तक.”


राधा पाणी प्यायली आणि आजी जवळ जाऊन बसली.

“आजी, कोणते पुस्तक वाचते आहे?”

“श्यामची आई”

“किती छान आहे ना पुस्तक आजी! कितीही वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते असे आहे. मी देखील कमीत कमी सात ते आठ वेळा वाचले आहे. मला खूप आवडते हे पुस्तक. सुरेख शब्द रचना आणि कथाही सर्वोत्तम. जीव ओतून लिहिले आहे अगदी. पहिल्यांदा वाचले होते तर अगदी मी रडले होते आजी.आजी तुला आठवत असेल ना? तू आली होतीस तेव्हा इथे राहायला? ”

आजी राधाच्या खांद्यावर अलगद हात ठेवत हसून म्हणाली,

“हो मला चांगलेच आठवते आहे. कशी विसरेल बरं? तुझ्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे बरं का! तू पहिल्यांदा पुस्तक वाचले आणि खूप उदास झाली होतीस आणि म्हणाली होतीस, आज मला जेवण नको.. तेंव्हा तू दहा वर्षांची होतीस. त्यानंतर किती विनवणी करावी लागली तुला जेव म्हणून. तुझा मूड इतका ऑफ झाला होता विचारू नको. किती काय काय केले. तुझ्या बाबांनी तुला कुल्फी देणार सांगितले तेव्हा कुठे तुझी नाराजी दूर झाली बघ.. ”

राधाने आश्चर्याने विचारले,

“आजी, खरंच की काय मी अशी वागले होते?”

“हो गं तू अशीच वागली होतीस..”

आजी पुढे बोलू लागली,
“ह्या पुस्तकामध्ये जे दडले आहे ते खूप मौल्यवान आहे राधा. आई आपल्या मुलांना कशी संस्कार देते. कशी घडवते.. अगदी स्वर्गवास झाला तरी तिचा जीव मात्र आपल्या मुलांकडे असतो. खूप वास्तव लिहिले आहे बघ अगदी मनाला भिडणारे असे.”

खरं तर हे बोलत असताना आजीचा कंठ दाटून आला होता.

“हो गं आजी, तू बरोबर बोलते आहेस. आईचे प्रेम, शिकवण सारे काही अमूल्य असते. तिच्यामुळे तर आयुष्याला अर्थ असतो. आता तूच बघ ना आईसाठी किती काय करते. तिच्यावर तुझे प्रेम किती आहे. बाबा गेल्यावर तू किती सपोर्ट केला. तूझ्यामुळेच तर आई पुन्हा सावरली गं आजी.”

डोळ्यात पाणी आणत राधा म्हणाली.

“पुरे गं राधा. मी काहीच केले नाही. खरं तर माझा स्वार्थ म्हण. माझी लेक आणि नातवंड इथे दुःखात असताना माझं मन कसे बरे लागले असते? तुझ्या बाबांचे आई बाबा तर आधीच देवाघरी गेले होते. कोण होते माझ्याशिवाय माझ्या लेकीला आणि नातवंडाला सावरणारे?”

आजीने राधाच्या डोक्यावर हात फिरवला आणि स्वाताच्या डोळ्यातील पाणी अलगद टिपले. राधालाही अगदी भरून आले. ती शांतपणे आजी काय बोलते आहे ऐकत जरी असली तरी तिच्याही मनात बाबा गेल्यानंतर जो गोंगाट सुरू झाला होता तो आज किंचितसा जाणवत होता. आजी बोलू लागली,

“हा एकटेपणा फार क्रूर असतो गं राधा.. धड जगू देत नाही आणि मरूही देत नाही. शेवटी माझे आईचे काळीज गं. ते काही शांत बसणार होय. माझ्या लेकीला सावरायला मीच तर होते. असो. बरं जाऊ दे.. तू फ्रेश हो.. मी आपल्याला मस्त चहा ठेवते. ”

“आजी राहू दे गं मी ठेवते चहा.”

राधा फ्रेश होऊन आली आणि आजीच्या गळ्यात हात घालतच म्हणाली,

“आजी मला हे सांग किती सहज जमते गं तुला हे सर्व. कधी कठोर होते. कधी मृदु होते, कधी लहान मुलीप्रमाणे वागते तर कधी सखोल विचार करून मनाला भुरळ घालतेस..”

“काही नाही गं राधा.. वयाच्या एका टप्प्यावर हे सहज जमू लागते. काही अवघड नाही. चांगले आणि वाईट अनुभव माणसाचे व्यक्तिमत्व घडवतात. खरं तर राधा माणसाचा स्वभाव कधी बदलतो हे त्याचं त्याला कळत नाही,एक मात्र समजते आपला स्वभाव बदलला आहे.”

आजी बोलता बोलता क्षणभर थांबली.

“आजी, तू खरंच गं प्रेरणादायी आहेस. मला तर तुझ्या सारखे व्हायचे आहे. तुला माहीत आहे माझी मैत्रीण गौरी तिला तुला भेटायची इच्छा आहे.”

राधाच्या बोलण्यावर आजी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले,

“मला भेटायचे आहे ? का बरं ?”

“काही नाही गं, मी तुझ्याबद्दल थोडं फार सांगितले तिला म्हणून तिला भेटायची इच्छा झाली.”

राधा हसून म्हणाली.

“राधा, काय गं किती ते माझे कौतुक! इतकीही काही महान नाही आहे मी.”

राधा आजीचा हात पकडतच म्हणाली,

“आजी तूला वाटत असेल असे पण माझ्यासाठी, आईसाठी, दादासाठी तू खूप महान आहेस.”

आजीलाही भरून आले. राधाने आजीच्या मांडीवर डोकं ठेवले.

“बरं, मी आपल्याला चहा ठेवते.”

राधा किचनमध्ये गेली चहा ठेवला आणि पुन्हा आजीजवळ येऊन बसली. राधाला एकदम विकासचा चेहरा आठवला. त्याचे तिच्याकडे पाहणे. मागे मागे येणे सारं तिला आठवू लागले. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्याची लकेर उमटली. राधाला असं मधेच हसताना पाहून आजीने तिला विचारले,

“काय राधा, हे हसू कशासाठी बरं? मी तुला आल्यापासून पाहते आहे. काही स्पेशल का?”

“काही नाही गं आजी असंच”

“सांग बरं पटकन काय झाले. हे सतत हसू येणे असंच नाही आहे हे.. मला माहीत आहे. तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते..”

राधा आणि आजी मैत्रिणीच होत्या. अगदी बेस्ट फ्रेंड
दोघींचे पारदर्शक नाते होते.

“आजी, असेही तुला मी सांगणार होते. चल सांगतेच. वर्गात एक मुलगा आहे विकास नावाचा. त्याला मी आवडते. सतत मागे मागे असतो बघ माझ्या.. त्याचा चेहरा मला आठवला म्हणून हसू आले. अभ्यासात कमी आणि माझ्याकडे लक्ष जास्त असते.”

ती हसून म्हणाली.

“काय ही पोरं..”

आजीही मिश्किलपणे हसत म्हणाली,

“बोलू का मी त्याच्याशी?”

ती खळखळून हसू लागली.

“आजी, तू नको हा काही बोलू.. मला तुझी अदा माहिती आहे. उगाच बिचारा कॉलेज सोडून निघून जाईल.”

आजी देखील हसू लागली. राधाने जीभ चावली.

“काय झाले ?”

“अगं आजी चहा आटला”

असे म्हणत तिने किचनमध्ये पळ काढला. चहा आटला होता. आजी म्हणाली,

“त्या विकासने चहा आटवला बघ..”

राधा चहाचे कप बाहेर आणत म्हणाली,

“आजी, तुझी बातच निराळी! कधी काय विचार करशील आणि काय बोलशील ह्याचा काही नेम नाही बघ..”

“राधा, अभ्यास कसा चालू आहे तुझा?”

“एकदम छान आजी.. सर आणि मॅडम छान शिकवतात. सगळं काही समजते.”

आजी नातीच्या बऱ्याच गप्पा सुरू होत्या. तोच राधाची आई श्रेया आली.

“काय गप्पा चालू आहेत? आजी नाती दोघी निवांत बसल्या आहे?”

“आमचं गुपित आहे बरं का? ते काही आम्ही सांगणार नाही.”

आजी डोळे मिचकवत राधाकडे पाहून म्हणाली.

“बरं बरं.. चालू दया तुम्हा दोघींचे गुपित.. मी जरा जाऊन पडते. ऑफिसमध्ये खूप काम होते. खूपच दमले आज..”

श्रेया रूमध्ये निघून गेली.

“आजी, उद्या रविवार आहे तर गौरीला उद्या घरी बोलावू का?”

“हो चालेल..”

राधा खुश झाली. तिने गौरीला फोन करून उद्यासाठी घरी बोलावले. गौरी देखील जाम खुश झाली. आजी आणि राधा ह्या दोघींचे नाते खूप छान होते. राधा तर मनातलं सर्व आजीला सांगायची. राधाला माहीत होते की आजी तिला समजून घेईल. आई कामाला गेल्यावर आजीचा सहवास जास्त लाभला होता म्हणून तर आजी आणि राधा ह्या आजी नाती कमी आणि मैत्रिणी जास्त झाल्या होत्या. उद्या गौरी येणार होती.

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
जिल्हा-रायगड रत्नागिरी.

🎭 Series Post

View all