Login

राधा भाग चार

श्रेया संतापून म्हणाली. “मग का नाही दिली त्याच्या थोबाडीत?”आजीने चिडून म्हटलं.

कथेचे शीर्षक - राधा

विषय - कौटुंबिक

फेरी- राजस्तरीय करंडक कथामालिका


“आजी आता आमच्या सोबत राहणार ह्या विचाराने आई आणि आम्ही सुखावलो जरी असलो तरी तिथे मामा आणि मामीला आजी त्यांच्याकडे कधी जाते ह्याची आस लागून राहिली होती. त्याचे कारणही तसेच होते. माझी मामी कामात खूप कच्ची होती. लग्नाला चार वर्ष उलटून गेले तरी मामीने घरातल्या कामाची जबाबदारी घेतली नव्हती. सर्व काही आजी पुढे होऊन करत असे. दोन महीने झाले तरी आजी गेली नाही म्हणून मामाने आजीला फोन केला.

“आई,दोन महीने झाले तू आली नाहीस.”

“श्रेयाच्या कामाचे झाले की मग मी येईन. ती अजून नोकरी शोधते आहे.”

आईने फोन ठेवून दिला.”

राधा हसली. तिला असं हसताना पाहून गौरीने विचारलं.

“तू हसली का?”

“गौरी, त्यानंतर आजी जाम चिडली होती कारण दोन महीने झाले तरी मामाने एक फोन केला नव्हता. आईची,आमची विचारपूस केली नव्हती. जेव्हा फोन केला तेव्हा मात्र त्याने स्वतःची आबाळ झाली म्हणून फोन केला होता.”

गौरला राधाचं बोलणं नीटसं समजलं नव्हतं. तिने पुन्हा विचारलं.

“म्हणजे?”

तिच्याकडे पाहून हसत राधा म्हणाली,

“म्हणजे हेच की, मामी घरी जेवण वैगेरे काहीच बनवत नव्हती. सरळ बाहेरचे खायला मागवायची. मामाच्या खिशाला कात्री तर लागली आणि वरुण त्याची तब्येत खालावली होती.”

“खरंच हे असे पण घडू शकते?”

गौरीने आश्चर्याने विचारलं.

“हो गं असेच झाले.”

राधा पुढे बोलू लगली.

“आजीला वाईट ह्यासाठी वाटले मामाला गरज वाटली म्हणून त्याने फोन केला. प्रेमापोटी केला असता तर नक्कीच आजी गेली असती पण त्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता. हे सर्व कळल्यावर आईलाही वाईट वाटले. आई तरी आजीला म्हणाली जा म्हणून पण आजी गेलीच नाही. तेंव्हा आजी म्हणाली,

“आधी तुला नोकरी लागू दे, तू स्थिरावली की मी बघेल जायचे की नाही ते.”

“आईला एक दिवस नोकरीची चांगली ऑफर आली. एकदाची आई नोकरीला लागली. हळूहळू आता आम्ही सावरू लागलो होतो. आजीचा आधार तर खूप मोलाचा होता. आई कामावर गेली की आजी सर्व घर सांभाळत असे. मी आणि दादा आजीला जमेल तशी मदत करत असू. आई महिना झाला कामाला जात होती. आधी तर खुश होती. नंतर ती नाराज राहू लागली. स्वतः मध्येच राहू लागली. आजीच्याच काय तर आमच्याही लक्षात येत होते आई बदलली आहे. आम्हाला वाटले आईची दगदग होत असेल म्हणून ती दमत असेल. म्हणून शांत असेल किवा बाबांची आठवण येत असेल. एक दिवस आजीने विषय काढला.”

आजी आईला म्हणाली,

“श्रेया, मी खूप दिवस झाले पाहते आहे तू गपगप असते. तुला बरं वाटत नाही का?”

“मी बरी आहे आई पण ..”

आईने अडखळत उत्तर दिले.

“पण काय?”

आजीने विचारलं.

“स्त्री काय फक्त उपभोग घ्यायची वस्तु असते का?”

आईच्या प्रश्नासरशी आजीने चमकून पाहिलं.

“असे का अचानक बोलते आहेस? कोणी काही बोलले का तुला?”

आजी काळजीच्या स्वरात म्हणाली. श्रेयाला बोलतानाही जीभ जड झाली. आजीने पाठीवर हात ठेवला आणि विचारलं,

“बोल श्रेया कोणी तुला काही त्रास दिला का?”

“आई माझ्या ऑफिसमध्ये एक श्रीकांत नावाचा माणूस आहे. येता जाता स्पर्श करायला बघतो. त्यांची नजरही फार घाणेरडी आहे. काही काम नसेल तरी जवळ उभा राहतो. खूप राग येतो मला. काल तर म्हणे माझी बायको माहेरी जाणार आहे. घरी येतेस का? शीईई.. खूप नीच माणूस आहे तो. मला तर खूप राग आला होता, असे वाटले त्याच्या थोबाडीत दोन लावून दयावे.”

श्रेया संतापून म्हणाली.

“मग का नाही दिली त्याच्या थोबाडीत?”

आजीने चिडून म्हटलं.

“ऑफिसमध्ये तमाशा नको म्हणून मी गप्प बसले. ह्यावेळी मी काहीच बोलले नाही. पुढच्या वेळेस सोडणार नाही.”

आईने शांतपणे उत्तर दिलं. आजी आता आईवर रागावली होती.

“ऑफिसमध्ये तो कसाही वागू शकतो. तुझ्याशी लगट करू शकतो आणि तू तुझे रक्षण देखील करू शकत नाही?”

आजी आईचा हात पकडत म्हणाली,

“चल आताच्या आता?”

“कुठे?”

आईने प्रश्न केला.

“त्याच नीच माणसाकडे..”

आजीने चिडून उत्तर दिलं. आजीने आईचे ऑफिस गाठले आणि श्रीकांत कुठे राहतो त्याची खबर काढली. आईला घेऊन आजी त्याच्या दारात उभी राहिली. आजीने जोरजोरात दार वाजवायला सुरू केले. श्रीकांत आणि त्याची बायको दोघेही आले. श्रीकांत श्रेयाला बघून फार आदराने बोलू लागाला.

“श्रेया मॅडम, अश्या अचानक माझ्या घरी? काही काम होते का?”

“हो माझ्या लेकीचे काम होते.”

आजी आईकडे बघत म्हणाली.

“श्रेया सांग काय काम होते?”

श्रेयाने जमेल तितका जोर लावून श्रीकांतच्या कानाखाली वाजवली. गाल लालेलाल झाले. श्रीकांतची बायको चवताळली आणि म्हणाली

“ ए बाई, तू माझ्या नवऱ्याला का मारते आहेस?”

“हा प्रश्न तुझ्या नवऱ्यालाच विचार, तो देईल तुला उत्तर. असेही तू उद्या माहेरी जाणार आहे म्हणून त्याने मला तुझ्या घरी आमंत्रण दिले आहे, म्हंटलं आज घर बघून यावे.”

श्रीकांतच्या बायकोच्या प्रकरण लक्षात आले. मोठ्या आवाजाने शेजारी जमा झाले होते. श्रीकांत बोलत होता.

“ही खोटे बोलते आहे. मी असे काही बोललो नाही, ही बाईच चालू आहे सारखी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते.”

श्रेयाला आता प्रचंड राग आला. तोच श्रीकांतची लहान मुलगी बाहेर आली. आजीने त्या मुलीला समोर घेतले .तिच्या डोक्यावर श्रीकांतचा हात ठेवला आणि म्हणाली,

“खा तुझ्या मुलीची शप्पथ, सांग की तू असे काही बोलला नाही..”

श्रीकांत आता मात्र एकदम गप्प बसला. त्याचे गप्प राहणे सांगून गेले होते. तो खोटे बोलत आहे. त्याच्या बायकोनेही सर्वांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली आणि श्रेयाची माफी मागितली.

“परत माझ्या मुलीला त्रास दिलास तर याद राख. माझ्याच काय तू कोणत्याही मुलीला त्रास दिलास तर चाबकाने फोडून काढायला मागे पुढे पाहणार नाही. बाई समोर दिसली तर तुमच्या सारख्या लांडग्याच्या तोंडाला लगेच पाणी सुटते का? डोक्यात आणि डोळ्यात नुसता कचरा भरला आहे. सडक्या मेंदूत चांगले विचार तरी कसे येणार? अरे नालायक माणसा शरम वाटली पाहिजे तुला., तुला पण तर देवाने मुलगी दिली आहे तरी देखील असली घाणेरडी वृत्ती तुझी. हे जे गाल लाल झाले आहेत ना ते नेहमी लक्षात राहू दे, पुन्हा तुझी हिंमत होणार नाही असे घाणेरड्या नजरेने कोणत्याही स्त्रीला बघायची. माझ्या मुलीची इज्जत घालवायला निघाला होतास, बघ तुझीच इज्जत मी तुझ्या दारात काढली”

आजी चिडून म्हणाली. श्रीकांतने वर नजर करून पाहिलं, पाहतो तर बायको रागाने त्याला पहात होती. आणि लेक आईला प्रश्न विचारत होती,

“बाबाचे गाल कसे लाल झाले?”

शेजारीसुद्धा कुजबूज करू लागले होते. श्रीकांतला पश्चात्ताप झाला. त्याने श्रेयाचे पाय पकडले आणि म्हणाला,

“खूप मोठी चूक झाली, असे पुन्हा होणार नाही. माफ करा मला..”

त्याला खरंच पश्चात्ताप झाला होता. श्रेयाचा ताण हलका झाला. श्रेयाने आणि आईने घरचा रस्ता पकडला. ”

गौरी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.

राधा “अगं गौरी काय झाले?”
गौरी: “काय भारी आजी आहे गं तुझी हिंमतवान.. मला तुझ्या आजीला आणि आईला भेटायचे आहे.

राधा “बरं बाई . नक्की भेट करून देईल..”
गौरी जाम खुश झाली.

“चल आता जावूया का घरी? खूप उशीर झाला आहे.

“हो चालेल, चल जाऊ.. पण विसरू नको हा मला आई आणि आजीला भेटायचे आहे.., ”


राधाने गालगुच्चा घेत म्हंटले

“नाही गं राणी , नाही विसरणार. आता चल”

क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
जिल्हा- रायगड - रत्नागिरी

🎭 Series Post

View all