राधा भाग तीन

“श्रेया, असे नको करूस बाळा. मी आहे की तुझ्यापाठीशी खंबीरपणे उभी.. असे लगेच जायचे बोलू नको. तू काय तिचे बोलणे मनाला लावून घेतेस? तिला काय बोलायला? उचलली जीभ लावली टाळ्याला. ज्याचे जळते त्यालाच कळते.”


कथेचे शीर्षक -राधा   

विषय - कौटुंबिक

फेरी- राजस्तरीय करंडक कथामालिका.

मी आजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेले होते. मध्येच मला जाग आली. मी डोळे मिटून होते. त्यांच्यातील संवाद ऐकत होते. आजी बोलायला लागली.


“श्रेया, असे नको करूस बाळा. मी आहे की तुझ्यापाठीशी खंबीरपणे उभी.. असे लगेच जायचे बोलू नको. तू काय तिचे बोलणे मनाला लावून घेतेस? तिला काय बोलायला? उचलली जीभ लावली टाळ्याला. ज्याचे जळते त्यालाच कळते.”

आजी आईचे डोळे पुसत तिला समजावत होती.

“आई, मी तुझीच लेक आहे. बाबा गेल्यावर हे सारे वैभव तू किती जिद्दीने उभे केले. सर्वांना तू एकटीच पुरी पडली. मी सगळे पाहीले आहे. आई तुझा काळ वेगळा होता. त्या काळी आजी आजोबाने तुला सपोर्ट केला नाही. लहान सहान कामे करून तू आम्हाला वाढवले. शिक्षण दिले. लग्न लावून दिले. खूप काही केले आणि आताही करते आहे. आई, पण मला असे वाटते की मी सुद्धा माझा आत्मसन्मान जपला पाहिजे. इथे वहिनीला मी चार दिवस नको आहे हे मला कळले आहे तर मी कशाला राहू.? तू लाख म्हणशील गं आई रहा तरी ते योग्य वाटत नाही. मी उद्या माझ्या घरी जाते. असेही किती दिवस मी इथे राहणार. उगाच माझ्यामुळे तुमच्यामध्ये वितुष्ट नको.”

आई डोळे पुसत म्हणाली.

“श्रेया, असे काही नाही बाळा.. घर म्हंटले की भांड्याला भांडे लागणारच. रुसवा फुगवा, नाराजी हे काय होतच राहते. आपण लक्ष नाही द्यायच. तू नको मनाला लावून घेऊस आणि जास्त विचार नको करू. तिला तिची चूक कळेल. कधी कधी समोरच्याला त्याची चूक समजून यावी म्हणून कठोर बोलावे लागते. मी जे बोलले ते अगदी बरोबरच बोलले.”

आजी ठामपणे म्हणाली.

“आई, आपण सगळेच बरोबर आहोत, तू तुझ्या ठिकाणी आणि मी माझ्या ठिकाणी.. आई मला जाऊ दे माझ्या घरी. असेही एक ना एक दिवस जावेच लागणार मला. कायमचे मी काही इथे राहणार नाही. असेही मला ओढ लागली आहे माझ्या घरची. असे वाटते हे मला बोलवताहेत. मला जाणवतेय, त्यांचा आत्मा तिथेच आहे. माझ्या घरात. ते माझी वाट बघत आहेत. मला जाऊ दे आई..”

आईचे बोल ऐकून आजीचे डोळे भरून आले. तिचे अश्रू माझ्या गालावर ओघळले.

“आई, त्यांचे शरीर गेले पण आत्मा तर अजूनही तिथेच आहे ना. खूप स्वप्नं सजवली होती. ती पूर्ण करायची आहेत. आई, आज आतून खूप खूप शांत वाटते आहे कारण माझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. खूप मोठी.. राधा आणि किशोरची जबाबदारी.. ही जबाबदारी इतकी मोठी आहे की मला आता हात पाय गाळून जमणार नाही,वेळ वाया घालून जमणार तर मुळीच नाही.”

आई मनात काहीसा निर्धार करून उठली.

“श्रेया, शोभतेस हो तू माझी लेक.. जा तू घरी.. मी तुला रोखणार नाही. तुझे बरोबरच आहे. आता गर्भगळीत होण्याची वेळ नाही. स्वतःला सावरून पुढे जाण्याची वेळ आहे. एक लक्षात असू दे. ही आई तुझ्यापाठीशी नेहमीच उभी आहे..”

आजीच्या आश्वासक स्पर्शाने आईला नवी उर्मी मिळाली. मायलेकीने घट्ट मिठी मारली. ही मिठी होती आता ताकदीची. आधाराची. एका आईच्या आशीर्वादाची. राधा पुढे बोलू लागली.

“गौरी, त्या रात्री आजी, आईच्या डोक्यावर हात ठेवूनच होती. जणूकाही ती स्वतःचे बळ आईला देत होती. दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो.

मामा आईला म्हणाला.

“ताई, नको जाऊ.. थांब थोडे दिवस.”

“शिरीष, आज ना उद्या जायचेच आहे.. अशीही भरपूर जबाबदारी आहे. खूप कामं बाकी आहे. मी येईल पुन्हा भेटायला. काळजी घे..”

मामी तिथेच उभी होती. आईने तिलाही जाते म्हणून सांगितले. ती फक्त निर्विकार चेहऱ्याने पाहत होती. आजी मामाला म्हणाली.

“मी श्रेयासोबत जाते आहे, येते पुन्हा..”

आईला हायसे वाटले. आजी आपल्यासोबत येईल असे तिला वाटले नव्हते. आम्हा बहीण भावाला अगदी आईलाही आजी सोबतीला येते आहे हे कळल्यावर खूप आनंद झाला. आम्ही आमच्या घरी निघालो. हो आमच्या घरी. आमचे हक्काचे घरटे आमची वाट बघत होते. घरी आलो. आईने घरात पाय ठेवला तसे तिला पुन्हा भरून आले. डोळ्यात आलेले पाणी पुसतच तिने प्रवेश केला. आजीने आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली,

“श्रेया, आता डोळ्यातून अजिबात अश्रू गाळायचे नाहीत. त्यांना आवर घाल, सावर स्वतःला..”

आईला धीर आला. जड अंतकरणाने ती बाबांच्या फोटोला पाहू लागली. तिने बाबांचा फोटो पुसला. बाबाच्या फोटोला तिने कवटाळले. बाबाच्या फोटोकडे पाहून जणू मनातल्या मनात त्यांना म्हणत होती.

“तुमची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर..”

“आईला मी निरखून पाहत होते. वेगळाच आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. जेव्हा हातातून सर्वच निसटून जात असते. कठीण प्रसंग आ वासून समोर उभा असतो, तेव्हा एकच गोष्ट त्यातून बाहेर यायला मदत करते ती म्हणजे ‘धीर..’ तो धीर आता आईमध्ये आला होता. मलाच आश्चर्य वाटलं. खरं तर मला, दादाला तिची काळजी वाटत होती. त्याक्षणी आईला पाहिले आणि जाणवले खरंच स्त्रीमध्ये एक वेगळीच शक्ती असते. अगदी ती वाहत्या नदीप्रमाणे असते. जसे वळण येईल तसे वळण घेते. कधी फुलापेक्षा कोमल तर कधी वज्राहुन कठोर. तिचा आत्मविश्वास पाहून मला, दादाला धीर आला. आजीलाही बरे वाटले. आईपेक्षा जास्त कोण ओळखते आपल्या मुलांना? आजी आईच्या भावना समजत होती. मला आईमध्ये माझ्या बाबाची प्रतिमा दिसली. तेच हवे होते मला. मला आणि दादाला पुन्हा बळ मिळाले. खूप मोठा दिलासा मिळाला.”

“श्रेया, आता पुढे काय?”

आजीने विचारलं. आई निश्चयाने म्हणाली,

“आता नोकरी करणार आई..”

आईने नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. घरी बसून चालणार नव्हते. तसा तिने जॉब केला होता. नंतर दादाच्या जन्मानंतर ती गृहिणी म्हणून राहिली. त्यानंतर मी झाले. आमच्या दोघांच्या संगोपणात कोणतीच कसर सोडली नाही.

“तू कामाला जा. घरातली सर्व जबाबदारी मी घेते.”

आजीच्या वाक्यासरशी आईचे डोळे चमकले ती म्हणाली,

“आई, तू नेहमीसाठी माझ्यासोबत राहणार?”

आजीने मान डोलावली. आईला काय बोलावे सुचत नव्हते. तिला आजीचा खूप आधार वाटला. आमच्यासाठी आजी नेहमीसाठी आली होती. आम्ही सगळेच खूप खुश झालो. तो सुखाचा धक्का होता.
क्रमश:
२६-८-२०२२
अश्विनी कुणाल ओगले.
जिल्हा - रायगड रत्नागिरी..

🎭 Series Post

View all