राधा भाग २

“कोणास ठाऊक कधी सावरेल तुमची बहीण? मी काही कोणाचे करत बसणार नाही. ज्याला त्याला कळायला पाहिजे. उगाच बोट दिले तर हात नको धरायला. एकदा आरामात खायची सवय झाली तर ती काही बदलत नाही. तुम्ही सांगा आता त्यांना त्यांच्या घरी जायला.”

कथेचे नाव - राधा 

विषय - कौटुंबिक

फेरी - राजस्तरीय करंडक कथामालिका 


राधाच्या डोळ्यात एक अंगार होता. खूप काही बोलायचे होते. तिने मोठा श्वास घेतला आणि बोलू लागली. ती फक्त बोलणार नव्हती तर ती तिच्या आयुष्याचे रहस्य सांगणार होती.

“गौरी, आपलं माणूस असे एकाएकी निघून जाणे मनाला चटका लावून जाते. आपल्या सोबत वावरणारी व्यक्ती, आपल्या जवळची. आपली हक्काची व्यक्ती जीच्यावर आपले सर्व भवितव्य अवलंबून असते. समोर केवळ काळोख दिसतो. ते सत्य नेहमी असत्य आहे की काय ह्याची खात्री करत राहतो. त्याची कमी आयुष्यभर भासते. कितीही प्रयत्न केला सावरायचा तरी व्यक्ती असफल राहते. माझे वडील गेल्यावर घर उद्ध्वस्त झाले. आम्ही पोरके झालो. खरं तर त्या प्रसंगाला सामोरे जाऊ वाटत नव्हते. त्या क्षणाला लाचारी,अगतिकता ह्या शब्दांचा अर्थ चांगल्या प्रकारे कळू लागला. फार कठीण काळ आणि त्याहून चीड यावी असे एका पाठोपाठ एक प्रसंग. आजही आठवले तरी चीड येते. खूप चीड.. नाण्याच्या दोन बाजू असतात. तसेच आपण ह्या समाजात राहतो त्याच्याही दोन बाजू आहेत. काळी बाजू काय हे सहज उमगू लागले होते. घरावरून छप्पर नाहीसे व्हावे आणि आडोश्याला जागा शोधूनही सापडू नये ही गत झाली होती बघ. आपली तगमग, हाल कळूनही समाज पुढे येत नाही. उलट चार पाऊलं मागे जातो.आपल्या विषयी क्षणार्धात दृष्टिकोन बदलतो. का बदलतो दृष्टिकोन? हा प्रश्न आजही सतावतो. खूप सतावतो..”

गौरी एक एक शब्द मन लावून ऐकत होती. राधा बोलतच होती. आज ती पहिल्यांदा इतकं मोकळं होत होती. डोळे काठोकाठ भरून आले होते आणि त्याहून जास्त मन. मनाला मोकळं व्हायचे होते आज.

“गौरी, मी नेहमी ऐकायचे नवरा गेल्यावर स्त्रीची काय अवस्था होते. जग तिला कोणत्या नजरेने पाहते. जेव्हा ही परिस्थिती घरात पहिली तेव्हा तीचे भयाण रूप किती किळसवाणे असते ते कळले. आईचा तो भकास चेहरा. आई कुठेतरी जणू हरवून गेली होती.

ज्या दिवशी बाबा गेले त्यादिवशी सगळया बायका आईभोवती जमल्या. कोणी तिच्या कपाळावरची टिकली काढत होते. तर कोणी बांगड्या फोडत होते. कोणी तिच्या पायातली जोडवी काढत होते. आधीच दुःखाने अर्धमेली झालेली माझी आई ,तिच्याशी ह्या बायका अश्या वागत होत्या. अशावेळी देखील भावनाशून्य होतात का माणसे? हे असे वागताना त्यांना काहीच वाटत नाही का? जेव्हा माझ्या आजीने पाहिले तेव्हा तिने त्या बायकांना रोखले. तिच्या आवाजाने बायका घाबरल्या. आजी म्हणाली “माझी लेक सौभाग्याचे दागिने आयुष्यभर मिरवणार. तिच्या अंगाला कोणीच हात लावायचा नाही. काही बायका मागे सरल्या.काही बायकांनी तोंडं वाकडी केली. काहींना आजीचे कौतुक वाटले. मी हा प्रकार पहात होते. मला तेव्हा माझ्या आजीचे प्रसंगावधान पाहून अभिमान वाटला. मला माझी आई आधी जशी रहात होती तशीच हवी होती.

बाबांच्या आठवणीने व्याकुळ झाली होती. रक्ताचे नातेवाईक देखील आम्हाला लांब ठेवू लागले. त्यांना भीती होती की आम्ही त्यांच्यावर ओझे बनून राहू. मी, माझा दादा माझ्या आईच्या माहेरी गेलो. आजीला वाटत होते आई आणि आम्ही नातवंड थोडे दिवस त्यांच्या जवळ रहावे जेणेकरून दुःख हलके होईल. आम्ही गेलो. त्या दिवशी आजीच्या घरात वेगळीच वागणूक मिळाली. मामीला आम्ही गेलो ते अजिबात आवडले नाही. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. त्या घरात आम्हाला उचलून फेकल्यासारखे झाले. चार दिवस झाले आणि मामा मामीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यांचा आवाज बाहेर येत होता. सारे स्पष्ट ऐकू येत होते.
मामा म्हणत होता.

“ती काही कायमची राहणार नाही, तिचे दुःख हलके व्हावे म्हणून आणले आहे. ती सावरली की जाईल.”

“कोणास ठाऊक कधी सावरेल तुमची बहीण? मी काही कोणाचे करत बसणार नाही. ज्याला त्याला कळायला पाहिजे. उगाच बोट दिले तर हात नको धरायला. एकदा आरामात खायची सवय झाली तर ती काही बदलत नाही. तुम्ही सांगा आता त्यांना त्यांच्या घरी जायला.”

आजीला हे सर्व ऐकून राग आला. तिला अजिबात सहन झाले नाही. ती तडक उठली. तिने मामाचा दरवाजा ठोकला. मामाने दार उघडले. आजीने तोंडाचा पट्टा सुरू केला.

“माझी मुलगी मला जड झाली नाही. तिला वाटेल तितके दिवस राहील. तिच्या दुखात मी आई म्हणून तिला आधार देऊ नको का? तुझी हिम्मत कशी झाली असे बोलायची? कसल्या काळजाची आहेस गं तू? अश्या वेळेला आधार द्यायचे सोडून वाटेल ते बोलते आहेस? थोडा तरी विचार कर. आले तिच्या नशिबी हे दुख. तीची काय चूक आहे? आपली माणसे सावरायला असतात. असे तुटकपणे वागणे शोभत नाही. पुन्हा जर काही बोलली तर याद राख, गाठ माझ्याशी आहे.”

त्यानंतर मामी एकही शब्द बोलली नाही. तिला आजीचा प्रचंड राग आला. तिने राग गप गिळला. इथे आईच्या डोळ्यातून अश्रु थांबत नव्हते. मी आणि दादा आई जवळ बसून होतो. आजीने आम्हा तिघांना कवेत घेतले. आजीच्या मायेची ऊब आधार देत होती. त्या रात्री आम्हाला झोप लागली नाही. आईसाठी तो मोठा धक्का होता. कधी नव्हे ते मामीचे वेगळे रूप पाहिले होते. खरे तर रूप तेच होते ते फक्त त्या दिवशी समोर आले. ते म्हणतात ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे.. तसलाच काहीसा प्रकार. धक्क्यामागून धक्के येत होते. आयुष्याचे अनेक पैलू अनुभवायला मिळत होते.

क्रमश:
अश्विनी कुणाल ओगले.
जिल्हा- रायगड रत्नागिरी

🎭 Series Post

View all